Saturday, May 10, 2014

आईचं ऋण

"कारट्या, थांब बघतेच आता तुझ्याकडे. जीव नकोसा करून टाकला आहेस अगदी!" पासून "आयुष्यवंत हो, लवकर मोठ्ठा हो रे बाबा" या दोन वाक्यांत शब्दांचा फरक असला तरी त्यामागील भावनेत काहीही फरक नाही. जगामध्ये कुठेही गेलं तरी थोड्याफार फरकाने अशीच वाक्ये उच्चारली जात असतील. कारण त्यामागे असलेली व्यक्तीला आणि तिच्या हृदयाला विधात्यानं एकाच प्रकारे बनवलं आहे. काही तरी उपद्व्याप केल्यावर "मेल्या!" असे प्रेमळ शब्द उच्चारून हातात जी काही पळी, उलथनं असेल ते आपल्या दिशेनं भिरकावणारी आई, तीच आई पावसांत नखशिखांत भिजून आल्यावर एक सणसणीत धपाटा घालून टॉवेलनं डोकं पण पुसणारी, आजारी पडल्यावर दररोज संध्याकाळी दृष्ट उतरणारी.

मला आठवतं, लहानपणी मनसोक्त बाहेर हुंदडणारी आम्ही मुलं, दिवसभर खेळण्याच्या नादात जेवायची-खायची पण शुद्ध नसलेली, पण घरी आलो की प्रथम आई समोर दिसायला हवी असायची. मग आंघोळ न केल्याबद्दल, जेवायला वेळेवर न आल्याबद्दल खाली मान घालून बोलणी ऐकायची. आणि हे सगळं बोलत असताना ती टेबलावर ताट वाढून ठेवायची. तिचं जेवण झालेलं नसायचंच. त्याचीही आम्हाला शुद्ध नसायची. अर्थातच मुलांनी काही म्हणावं, द्यावं अशी आईची अपेक्षा नसायचीच. त्यावेळी नव्हती आजही नाही आणि पुढेही नसेल. याला आपलं तिला गृहित धरणं म्हणावं की अतिपरिचयात अवज्ञा? जणू तिचं सर्व जगणं आमच्या साठीच होतं. आईनं स्वत:साठी कोणतेही चोचले, लाड करून घेतल्याचं मला आठवत नाही. मला माझं शाळेचं वेळापत्रक कधीच लक्षात नसायचं, पण आईच्या नक्की असायचं. आणि तिलाही ती एक जबाबदारीच वाटायची. एकदा असंच मी जीवशास्त्राचं प्रॅक्टिकल विसरलो. दुसऱ्या दिवशी सबमिशन! मी रात्री उशिरापर्यंत मग जर्नल पूर्ण करत बसलो होतो. तर ते पूर्ण होईपर्यंत कसं काय विसरले रे मी सुद्धा असं म्हणत आईनंपण जागरण केलं.

पुढं मग आम्ही मुलं आईनं जसं देवाकडे मागणं घातलं होतं तसे मोठे झालो. आईच्या पदराच्या पलीकडे क्षितीज थोडसं विस्तारलं. कॉलेज, करिअर, सबमिशन, प्रॅक्टिकल, सेमिस्टर असले शब्द तोंडात येऊ लागले. थोडासा बेफिकीरपणा उगाचच दाखवू लागलो. अगं तुला माहीत नाही आम्हाला आता किती अभ्यास असतो ते हे त्या गरज नसताना जागरण केलेल्या मातेलाच सांगू लागलो. पण त्याचे यत्किंचितही वाईट वाटून न घेता आई काळजी करतच राहिली. अजूनही परीक्षेच्या दिवशी माझ्या आधी उठून मला उठवत राहिली. माझ्या नेहेमीच्या बेफिकीर वृत्तीप्रमाणे मी बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा जवळजवळ हुकवलीच होती. कसं कुणास ठाऊक, मला उठवून म्हणाली, तू हल्ली काही तुझं वेळापत्रक सांगत नाहीस, पण मला आज असं का वाटतंय की आज तुझी महत्वाची परीक्षा आहे? आणि माझ्या छातीत धस्स झालं. खरंच परीक्षा होती! कसाबसा शाळेत पोचलो, परीक्षा सुरु होऊन पाच मिनिटं झाली होती. सुदैवाने मला प्रवेश मिळाला. मी नंतर येऊन आईला म्हणालो, रिपीटर होण्यापासून वाचवलंस! कुठल्याशा महाराजांची कृपा एवढंच ती म्हणाली. तिला म्हणावसं वाटलं महाराजांची कृपा कसली, ही तुझ्याच निरपेक्ष प्रेमाची कृपा. निरपेक्षच. मुलांनी तिच्यासाठी केलेल्या अगदी छोट्या गोष्टीचंही केवढं अप्रूप, अभिमान तिला. बोलून दाखवायची नाही, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान, कृतार्थपण ओसंडायचं. आज आठवलं की हसू येतं. नोकरी लागल्यावर पहिला पगार झाला. अर्थातच तो आईवडिलांना द्यायचा. पण मी मुंबईत. मग मी आईसाठी साडी घ्यायचं ठरवलं. माझा आतेभाऊ सुनील आणि मी समवयस्क. दोघेही साडी घ्यायला म्हणून गेलो. आठवले आणि शहाडे यांच्या दुकानात. आत पाहिलं तर समस्त महिलावर्ग. आम्ही दोघे अभिमन्यू दुकानाच्या बाहेर किमान पंधरा मिनिटे उभे राहून या चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा आणि महत्वाचे म्हणजे बाहेर कसे यायचे याची आखणी करत होतो. शेवटी हिय्या करून आत शिरलो. पहिल्या पाच मिनिटांत जी पहिली साडी आवडली ती घेऊन बाहेरसुद्धा पडलो. जीवनात पुढे अनेक समरप्रसंग आले, पण हा साडीखरेदी प्रसंग सर्वांवर मात करतो. साडी आईला दिली. तिच्या डोळ्यांत अतीव प्रेम होते, कौतुक होते, कृतार्थता होती. मलाही बरे वाटले. पुढे अनेक वर्षांनी असाच साडी खरेदीचा विषय निघाला. मला बाबा म्हणाले, अरे पाच मिनिटांत तुम्ही साडी घेऊन बाहेर पडलात, नीट पाहिलीत तरी का? मी म्हणालो का? काय झालं? बाबा हसत म्हणाले तू तुझ्या आईला एकदम "मिस इंडिया" करून टाकलंस. मला काही कळेना. शेवटी आईच म्हणाली "अरे, त्या साडीच्या कडांवर छानपैकी बारीक अक्षरात मिस इंडिया असं लिहिलं आहे!" माझा चेहरा पाहण्यासारखा झाला असावा. अभिमन्यूने व्यूहभेद करावा पण विनाकटिवस्त्र व्यूहातून बाहेर यावे असे काहीसे झाले होते. तरीही इतकी वर्षं ती साडी केवळ आपल्या मुलानं पहिल्या पगाराची दिलेली म्हणून प्रेमानं नेसत होती.

लौकिकार्थानं आता प्रौढ झालो. आज पन्नाशी जवळ येताना दिसतेय पण आईसमोर तोच हट्टीपणा, हूडपणा आपोआप येतो. त्याच वेळी आपली बायकोही त्याच आईच्या जातीकुळीतील हेही दिसू लागतं. मुलं माझ्यापेक्षा त्यांच्या आईभोवतीच जास्त असतात. आईचं सोशिकपण बायकोतही आहे. मुलं आणि नवरा अशी कसरत सर्व आयांना करावी लागते तशी बायकोही करतेय. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, अखंड केवळ मुलांचाच विचार करणारी आई, तिचा विचार करण्यासाठी मदर्स डे कशाला हवा? आपला प्रत्येक क्षण तर तिनेच दिलेला आहे. त्याच्यावर तिचा हक्कच आहे. हे जे ऋण आहे ते फेडायचंच नाहीये मला. ऋणातच राहायचंय. तेव्हा आई, हे आमचं जगणं तुझंच दान आहे, एक दिवसच कशाला, सगळं आयुष्य आईसाठी, असं म्हणूयात.  

Friday, May 9, 2014

सिंदुर लाल चढायो

परवाच कुठेशी रा.रा. केजरूपंत यांची तुलना स्वये श्रीरामप्रभूंशी झालेली वाचली आणि धन्य धन्य झालो. भाबड्या भक्तांची इच्छा असेल तर वानराचा नर होतो याची देही याची डोळा खात्री पटली. मग भले त्या वानराची स्वत:ची इच्छा असो वा नसो. मग पुढे एकदा कपाळावर शेंदूर फासला गेला की देवपण आलेच. देवपण आले की नरत्व वा वानरत्व दोन्ही संपले. मग ते वानर ज्या काही कोलांट्या मारील, कोटिच्या कोटी उड्डाणे करील, स्वभावानुरूप माकडचेष्टा करील, त्या सर्व "लीला" होऊन जातात. भक्तगण त्या लीळा डोळ्यांमध्ये श्रद्धा आणून, कामधाम सोडून कवतिकाने पाहत बसतो. बुद्धी गहाण टाकून पैसे, नारळ, हळदकुंकू वाहू लागतो. एवढेच नव्हे तर दैवत कसे जागृत आहे याच्या कपोलकल्पित कथा विस्फारलेल्या मोठ्ठ्या डोळ्यांनी दिसेल त्याला सांगत सुटतो. इथवर सर्व ठीक म्हणायचे. कुणाची बुद्धी कशी चालावी आणि कशी चालू नये यावर काही बंधन नसते. पण हा अंधश्रध्द जमाव जेव्हा आपण म्हणू तो देवच अशा आग्रहावर येतो, तुम्ही त्याला मानले नाहीत तर तुम्हीच पापी असे म्हणू लागतो, तेव्हा त्या जमावाची उरलीसुरली विवेकबुद्धी संपून झुंडशाहीकडे वाटचाल चालू झाली असेच म्हणावे लागेल.

पूर्वी आमच्या नेहेमीच्या चहाच्या अड्ड्याशेजारी एक झाड होते. त्या झाडाखाली स्कूटर्स, मोटरसायकल्स लावल्या जात. मित्रमंडळी चहावर एक तास घालवून झाला की बाहेर येऊन पुन्हा एखाद्या मित्राच्या स्कूटरीवर रेलून पुन्हा अर्धा तास गप्पांत घालवत. झाडाला आमचा त्रास नव्हता, उलट कडक ऊन असेल तेव्हा झाडाच्या सावलीचा आम्हाला आधार होता. पुढे आमचे उमेदवारीचे दिवस संपले, मित्र चहूदिशांना पांगले. बरेच दिवस मग अड्ड्यावर जाणे झाले नाही. असेच दिवस धकाधकीत गेले. थोडेफार स्थैर्य येऊ पाहत होते. पुन्हा जुने नंबर्स काढून एकमेकांशी संपर्क झाले, अड्ड्यावर भेटायचे ठरले. ऐन वैशाखी वणव्याचे दिवस. रामराणा जन्मला ती टळटळीत वेळ. मी स्कूटरवरून पोचलो. कधी पार्किंगला जागा मिळायची नाही. दुरून मध्ये खूप मोकळी जागा दिसली म्हणून आनंदात स्कूटर घुसवली आणि थबकलो. जागा मोकळी का याचा उलगडा झाला. आता झाडाच्या बुंध्याशी कुणीतरी मोठा गुळगुळीत धोंडा आणून त्यावर छानपैकी शेंदूर माखून, हळद, कुंकू वाहून ठेवला होता. एक दोन फुले वाहिलेली. एवढेच पुरेसे होते. धोंड्याची प्रतिष्ठापना झाली. आणि या देवस्थानाला निदान सहा सायकली/स्कूटर्स बसतील एवढे अनुदान कुणी न मागता मिळाले. काहीही न करता. कुणाचाही नवस नव्हता, मागणे नव्हते, धोंड्याला काही करावेही लागले नाही. धोंड्याची इच्छासुद्धा नव्हती. अशा वेळी जे करायला हवे होते पण जे कुणीच करत नाही तेच मीही केले. त्या उपटसुंभ धोंड्याचे शेंदुरासह विसर्जन न करता दुर्लक्ष करून निघून गेलो. पुढे अशीच एकदोन वर्षे गेली आणि पुन्हा तेथे जाणे झाले. यावेळेला झाडाच्या बाजूला एकही वाहन नव्हते. दोन स्कूटरींमध्ये कौशल्याने आपली स्कूटर बसवणारा पुणेकर पूर्ण मोकळी जागा पाहिली की चपापून तारीख पाहतो. सम की विषम याला पुण्यात जेवढे महत्व आहे तेवढे गणिताच्या पेपरमध्येपण नसते. तसेच माझे झाले. एकही वाहन दिसत नव्हते. पण एक नवीन गोष्ट नजरेस आली. आता त्या शेंदूरधोंड्याला छोटेसे घर मिळाले होते! चक्क कुणीतरी त्या धोंड्यावरती छानपैकी तीन बाय तीन फुटाचे देऊळ बांधले होते! कपाळाला मारे गंधबिंध लावून एक इसम त्याची राखणही करत होता. समोर तबकात नोटा, नाणी दिसत होती. मी शेजारी स्कूटर लावायला गेल्यावर या भक्ताने लगेच स्कूटर समोरच्या बाजूला लावा असे सांगितले. त्या बाजूला वाहने लावलेली दिसतपण होती. एकूण हा धोंडा चांगलाच प्रस्थापित झाला होता. मला खात्री आहे पुढील वेळेस येऊ तेव्हा या धोंड्याचा एखादा उत्सवही चालू झालेला असेल. भक्तगण बेहोष होऊन भजन करत असतील, संख्येच्या जोरावर नास्तिकाला हाकलून दिले जाईल.

धोंडा निर्गुण निराकार, भक्त गर्जती सर्वत्र हाहाकार, असा प्रकार आहे. झुंडशाही, तर्कशून्यता आणि विवेकशून्य आक्रमकता यांच्या बळावर विरोध मोडून काढणे एवढेच या धुंद भक्तांचे कार्य असते. गळ्यात पाचदहा रुपयांच्या त्यागरूपी रुद्राक्षाच्या माळा, अंगभर फासलेले खोट्या विद्वत्तेचे भस्म, कपाळावर आपल्या स्वामिभक्तीचा मत्त टिळा अशा आवेशात हे भक्त गर्जना करून आपला धोंडा कसा श्रेष्ठ, त्याला शरण न जाणारे तुम्ही कसे पापी हे उच्चरवाने सांगत असतात. सांगोत बापडे. पण या अंधभक्तांची मजल जेव्हा धोंड्याला आता परमेश्वर मानायला भाग पाडण्यापर्यंत जाऊ लागली की मग भीक नको पण हे भक्त आवर असे वाटू लागते. जेव्हा मी धोंड्याला शेंदूर फासलेले पाहिले तेव्हाच त्यावर पाणी ओतून त्याचे दगडपण उघडकीस आणले असते तर तिथे आज दांभिकतेचे देऊळ उभे राहिले नसते. पण मला वाटते, आपणा सर्वांतच एक सुप्त आशा असते, कुणीतरी सुपरहिरो यावा, त्याने आपली सर्व दु:खे नाहीशी करावीत. न जाणो हा धोंडा परग्रहावरून आलेला एखादा सुपरमॅन असावा किंवा प्रत्यक्षात खरंच देवाचा अवतार असावा. मग केवळ एक खुळी आशा म्हणून नकळत अशा धोंड्यांना नमस्कार केला जातो, किमानपक्षी त्यांना लाथ तरी मारली जात नाही. या तुमच्या आमच्या आशेच्या जोरावर असे शेंदूरदगड उदयास येतात, त्यांची देवळे उभारली जातात. आपलेच नष्टचर्य, दुसरे काय?

Thursday, May 8, 2014

पावसाचं देणं

आज सकाळपासून पावसाची भुरभूर सुरु आहे. एरवी सळसळणारी ही झाडे आज कशी निश:ब्द ठिबकत उभी आहेत. मधूनच एखादी वाऱ्याची सर येते, हो पावसात वाऱ्याचीही सरच असते, त्या सरीने अंग शहारल्यासारखी पाने थरथरतात आणि पाय निघत नसल्यासारखे थोड्याश्या नाराजीनेच पाण्याचे थेंब प्रथम एक दोन आणि मग टपटप पडतात. मध्येच पावसाचा जोर मंदावतो, साठलेले पाणी रस्त्याच्या कडेने खळखळत वाहत राहते. काही वेळापूर्वी एखाद्या गर्भारशीसारखे दिसणारे आकाश आता निवळते, पण त्यात जन्म देऊन झाल्यानंतर आलेले क्लांतपण असते. विज्ञानानं केलेल्या व्याख्येप्रमाणे पाऊस पडण्याची प्रक्रिया एकच असली तरी प्रत्येक गावाचा पाऊस वेगळा असतो असं मला नेहेमी वाटतं. पाश्चिमात्य देशातील पाऊस जरासा कठोर, गारठून टाकणारा. तर भारतातील पावसाचं पडणं म्हणजे कधी वडीलधाऱ्यांच्या रागावण्यासारखं कडाडून, कधी मित्रांनी अचानक अवतीर्ण होऊन केलेल्या फजितीप्रमाणे तर कधी लहान मुलासारखं हट्ट करत अधूनमधून रडत राहिल्यासारखं, कधी सर्व चिंता सोडून देऊन मनसोक्त भिजायला बोलावणारं.

कडक उन्हाळ्याच्या काहिलीनंतर पहिला वळवाचा पाऊस यायचा. असा यायचा की वाटायचं आता ब्रह्मांड वाहून जाणार. तापलेल्या मातीवर पहिले टप्पोरे थेंब आदळायचे. त्या आघातानं माती आणि पाणी दोन्ही वर उडायचं. छोटासा स्फोटच जणू. काही क्षणातच धुंद करणारा मृद्गंध सर्वत्र दरवळायचा. जगातील सर्व सुगंध त्यापुढे व्यर्थ! पूर्वी कुठेसं वाचल्याचं आठवतं, बहुधा पुलं,"जगातील उत्तम सुखे अक्षरश: फुकट्यात मिळतात." हा मृद्गंध त्यातीलच एक सुखगंध. मनाच्या कुपीशिवाय कुठेही न साठवता येणारा. विकत घ्यायला गेलं तर कुठेच मिळणार नाही, पण ध्यानीमनी नसताना असं अचानक भरभरून समोर येईल. असा अचानक आलेला वळीवाचा पाऊस तसाच अचानक निघूनपण जायचा. पुन्हा मग काही दिवस तगमग सुरु. मग शाळा सुरू व्हायचे दिवस यायचे ते पाऊस घेऊनच. आणि कोकणातील तो पाऊस. एकदा सुरू झाला की निळं आकाश दिसायचं ते एकदम सप्टेंबरमध्येच. धबधब्यासारखा पडत रहायचा. मध्ये जरी थांबला तरी ढगांत खदखदत असायचा. आमचं घर डोंगराच्या पायथ्याशी. व्हरांड्यातून नजर टाकली की गर्द हिरवं ल्यालेल्या लेकुरवाळ्या माहेरवाशिणीसारखा तो डोंगर दिसायचा. त्या डोंगरानं आम्हा मुलांवर मायाही तशीच केली. पाऊस येणार हे एक दोन मिनिटं आधीच कळायचं. समुद्राची जशी गाज असते तशी धीरगंभीर गाज डोंगरातून ऐकायला यायची. डोंगराकडे पाहिलं की तो पूर्ण धुक्यात बुडून गेलेला दिसायचा. त्या धुक्यातून येणारी ती गूढ गाज मोठी मोठी होत जायची. वेंगुर्ल्याच्या बंदरातील डाकबंगल्याच्या गच्चीवर उभं राहिलं की जसा लाटांचा कडकडाट ऐकू येतो तशी ती गाज व्हायची. मग सुरु कौलांवर ताशा सुरु व्हायचा. क्षणार्धात समोरचा परिसर सरींमध्ये न्हाऊन निघायचा. पुढं एक तासभर तरी नर्तन चालू रहायचं. रात्री कौलांवर वाजणारा तडतडबाजा ऐकत कधी झोप लागायची ते कळायचं नाही. कोकणभूमी ती. पाणी एका जागी कधी ठरायचं नाही. उंच भागातून सखल भागाकडे सारखं धावत असायचं. थेट मोठ्या व्हाळाला (ओहोळ) मिळेपर्यंत. एरवी शांतपणे झुळूझुळू वाहणाऱ्या व्हाळानं रौद्र रूप धारण केलेलं असायचं. तांबड्या मातीनं लाल झालेलं ते पाणी प्रचंड आवाज करीत अक्राळविक्राळ होऊन धावायचं. त्याची भीतीच वाटायची. हिप्नोटाईज झाल्यासारखं आम्ही त्या पाण्याकडे पाहत असू. रस्त्यातील वाहत्या पाण्यातून अनवाणी चालणे हा एक छंदच होता. दक्षिण कोकणात सर्वत्र स्वच्छ रेती. त्यामुळे कुठेही चिखल व्हायचा नाही. तळपाय अगदी लहान मुलाच्या पायासारखे नितळ व्हायचे. पहिला महिना असा धबाबा पाऊस पडून गेला की आजूबाजूचं रूप बदलायचं. झाडांच्या बुंध्यावर, पडून राहिलेल्या ओंडक्यांवर अळंबी जीव धरायची. पायाखालचा पालापाचोळा नेहेमी ओला राहून एक विशिष्ट गंध पसरायचा. पक्ष्यांचा चिवचिवाट अगदी कमी असे. बहुधा ते घाटमाथ्यावर जात असावेत. सकाळी कुक्कुटकोम्ब्याचे कुकारे मात्र ऐकू यायचे. हे असं सर्व निरखत अनुभवत डोंगरातील घनदाटीत आम्ही समवयस्क मुलं मनसोक्त हुंदडत असू, भिजत असू. पण कधी आजारी पडल्याचं आठवत नाही. पावसानं खूप काही दिलं आम्हाला. जणू तो म्हणत असावा, पडावं तर माझ्यासारखं, तुफान, झोकून दिल्यासारखं, जसं काही आजचाच दिवस जगायचा आहे. पण असंही पडावं की सर्वस्व दान केल्यासारखं. पण ते दानच असावं, त्याने फक्त भलंच व्हावं, बुरं कुणाचं आणि कधीच नको. 

गंगेची तपश्चर्या अपुरीच

हे आम्ही काय ऐकले? कानावर विश्वास बसत नाही! अपरिमित त्यागाने प्राप्त झालेली ती प्रभावळ , सूर्याप्रमाणे दाहक असे ते तेज कुकरखालील ग्यास बंद केल्याप्रमाणे येकदम विझले? कुकरची शिट्टीपण झाली नव्हती. सकाळी पाच वाजता उठून नळाला पाणी येण्याची प्रतीक्षा करावी आणि प्रत्यक्षात शेवटी त्या नळातून दोन तीन थेंब थबकून त्याने राम म्हणावा? जो महापुरुष आपल्या नुसत्या दाढीयुक्त दर्शनाने समस्त जगाचे डोळे दिपवून टाकतो असे त्यांच्या भक्तगणाचे म्हणणे होते त्याने स्वत: उन्हाचा त्रास होतो म्हणून अंगभर सनब्लॉक चोपडून वर गॉगल लावून घरात बसण्यासारखे झाले हे.

स्वामीजींना प्रत्यक्ष गंगामैयाने पोष्टकार्ड धाडून तू लौकर ये रे बाबा म्हणून बलावून घेतले होते. त्यावर स्वामीजींनी बालके भगीरथ उर्फ गंगासुत याचा मातेचरणी शीर साष्टांग नमस्कार वि वि अशा मायन्याने उत्तर पण धाडले होते. त्यात त्यांनी नेसल्या धोतरासरशी येतो असे कळवले होते. यष्टीचे रिझर्वेशनपण केले होते. बंधू अपरिमितस्वामी यांना आम्ही एक दोन दिवस जाऊन येतो तोवर मठाचा कारभार सांभाळा असेही सांगून झाले होते. तेव्हा अपरिमितस्वामी आम्ही पूर्वीपासूनच कारभार करत आहोत, सॉरी सांगायचं राहून गेलं असे म्हणाले होते. पण मातेच्या ओढीने भगीरथ स्वामींनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. ते टॉवेल, धोतर, टूथपेस्ट, कमंडलू. त्यांचे आवडते फूल कमळ इत्यादी गोष्टी होल्डऑल मध्ये कशा ठेवाव्यात या विचारात होते. कमळ होल्डऑल मध्ये ठेवले तर वाराणशी येईपर्यंत त्याचा गुलकंद होईल या चिंतेत ते होते. शिवाय मातेसाठी काय घेऊन जावे बरे? खूप विचार केल्यावर त्यांनी स्वत:ला समजावले होते, तसे आपल्यापाशी मातेला आवडेल असे काहीच नाही, उलट आपल्यालाच माता देईल. तेव्हा "अरेच्या, माते! अरेरे! खास तुमच्यासाठी करवून घेतलेला हिऱ्यांचा हार गडबडीत शेवटी तिकडेच राहिला!!" असे म्हणावे झाले. आणि आपण हे कमळ नेतोच आहोत, तेच मातेचरणी अर्पण करावे. हां, हेच बरे. फक्त जाईपर्यंत हे कमळ चुरगाळू नये. नाहीतर फुलाच्या ऐवजी निर्माल्य वाहिल्यासारखे होईल.

अशी सर्व तयारी झाली असताना स्वामींनी जाणेच क्यान्सल करावे? मातेचे आपणच येकटे लेकरू नव्हे, अन्य लेकरेपण आहेत आणि ती मातेपाशी आपल्या आधीच दाखल झाली याचे स्वामींना जरा वाईटच वाटले होते. पण आपणच तिचे लाडके असे त्यांनी आपले समाधान करून घेतले होते. माता सर्वांना भले कुरवाळील, पण डब्यातील लाडू हळूच काढून आपल्याला देईल अशी त्यांना खात्री होती. मग आपण डोळे मिटून लाडू खाता खाता, माता हळूच, काय रे बाबा, एवढ्या दूर मठात शिकायला धाडला तुला. इतके दिवस कधी चिठी नाही चपाटी नाही. मी बोलावल्यावर तुला आठवण झाली आईची. बरं, निदान काय प्रगती केलीस ते तरी सांग असे म्हणेल. तिला काय सांगायचे? अगे माते, शिक्षणाचे ते काय? त्याशिवायच मी मठाधिपती झालो आहे! शेवटी शिकूनतरी काय मोठे करतात माणसे? आधीचे अधिपती? त्यांना म्हणालो रिटायर व्हा, किती दिवस कष्ट करणार? ते नाही म्हणत होते पण प्रेमाने त्यांना व्हीआरएस दिली. तेव्हापासून प्रचंड प्रगती झाली आहे. आपल्या भगिनी नर्मदामाता याला साक्ष आहेत. यावर माता कदाचित विचारेल, बाळा, कोणाची प्रगती? ती पेप्रात छापून आलेली नव्हे, खरीखुरी सांग! मग खरे सांगावेच लागेल. मग माता वरून क्रुद्ध पण आतून अतिशय दु:खी होईल. जाऊदे, त्यापेक्षा न गेलेलेच बरे. माता समजून घेईल, आईचे प्रेम सगळ्यावर पुरून उरते. माते! इथूनच तुला वंदन! काहीतरी बहाणा करावा. हां! वाराणशीच्या दुष्ट जकातवाल्यांनी कमळ आणायला सध्या बंदी घातली आहे, जबर जकात भरावी लागेल आणि वर परत दंड असे आम्हाला सांगितले आहे. अस्सेच सांगावे. बरं झालं उलट बंदी घातली ते. तसे नुकसान काहीच नाही. फार फार तर काय, रिझर्वेशन वाया जाईल. जाऊदे, पन्नास पैशाचेच तर होते. आणि इथे कोण तिकीट काढते म्हणा!

Monday, May 5, 2014

आमची शाळा - एक विस्कळित छंद

आमच्या म्याडम कित्ती गोऱ्यापान! तरी नेटिव्हांच्या शाळेत कित्ती आपलेपणाने शिकवतात ।।धृ।।

म्याडमनी आमच्या अ वर्गाची एक टीम बनवली आहे. त्या टीमचे तीन एक्के (म्हंजे मॉनिटर) आहेत. कपिल उर्फ कपि , दिगू उर्फ दुष्यंत आणि मी. म्याडमनी सांगितले आहे जास्तीचे मार्क पाहिजे असतील तर काही तरी जास्त करा, उगाच पहिल्या बाकावर बसून पेंगायचे असेल  किंवा सांगकाम्या बनायचे असेल तर आपले मौनीबाबा आहेतच. उगाच गर्दीपण जमवू नका. ते काम ब तुकडीतील एक्का प्रतिगाडगेमहाराज उर्फ प्र.गा.म. करतो आहेच. म्याडमचे आणि आमच्या पीटीच्या सरांचे जमत नाही. पीटीसर कडक शिस्तीचे आहेत, मुलांनाही शिस्तीने वागायला लावतात, पण कॉपी केली तरी तिकडे काणाडोळा करतात. त्यामुळे त्यांच्या वर्गातील मुले त्यांचे ऐकतात. पण म्याडमच्या तासाला मात्र त्यांची पाठ वळली की त्यांना बाण मारतात. तसं म्याडम कॉपी करायला नको म्हणत नाहीत. कॉपी करणं हा गुन्हा नाही, पण करताना सापडणं हा गुन्हा आहे असे त्या म्हणतात. त्या स्वत:सुद्धा लिहून आणलेले हळूच बघत शिकवतात. पीटीसर पूर्वी इतिहास आणि भूगोलपण शिकवायचे. पण खरे प्रेम शिस्तीवर. औंध संस्थानाचे पंतप्रतिनिधी त्यांचे आदर्श. साष्टांग नमस्काराचे अतिवेड. फक्त साष्टांग नमस्कार मात्र स्वत: घालायचे नाहीत, मुलांकडून स्वत:ला घालून घ्यायचे. हेडसर आले तरी खुर्चीतून उठायचे नाहीत. हेडसर बिचारे तास संपेपर्यंत तिष्ठत उभे असायचे. पण पुढे पीटीसर इतिहासाच्या तासालाही कवायत करून घ्यायला लागले. (खरी गोष्ट अशी की त्यांना स्वत:ला इतिहासाचे फारसे काही कळत नाही असे त्यांच्याच काही पट्टशिष्यांनी सांगितले) भूगोलाच्या तासाला म्हणायचे नकाशावर जसा दिसतो तसा भूप्रदेश प्रत्यक्षात कधीच नसतो. हिंदुभूमीचा, (सॉरी हं, या शब्दाने म्याडम लैच खवळतात), भारताचा नकाशा फळ्यावर टांगायचे आणि औद्योगिक क्रांतीवर रटाळपणे बोलत राहायचे. अशा वेळी मी, दिगू आणि कपि छान झोपायचो. पीटीसरांची मर्जीतील मुले मात्र झोप आवरत ते ऐकायची. याउलट आमच्या म्याडम कित्ती छान शिकवतात. कित्ती गोऱ्यापान आहेत त्या. थेट फ़ॉरेनरच. काय बोलतात ते कळत नाही पण ऐकायला आवडतं बुवा. परवा पाणी योजना शिकवताना "अब हम नर-मादा योजना शुरू करेंगे" असे सांगत होत्या. तर दिगू ताडदिशी हात वर करून उभा राहिला. मुलींच्या दिशेने पाहत म्हणाला,"म्याडम, म्याडम! मला करा मुख्य, वाटेल ते करून योजना यशस्वी करतो." म्याडम भडकून लालबुंद होऊन पाहू लागल्या. कपिने दिगूचा शर्ट ओढून त्याला खाली बसवलं आणि सांगितलं,"तुला ना, एक दिवशी भरपूर चोप मिळणार आहे. नर्मदा योजना असं म्हणायचं आहे त्यांना!" आमच्या म्याडम कित्ती कित्ती… ।।धृ।।

प्र.गा.म. पीटीच्या तासाला ग्राउंडवर कधीच नसायचा. व्यायामाचे आणि त्याचे वाकडे होते. मागे एकदा वजन उचलण्याच्या स्पर्धेत उतरला आणि पंधरा किलो वजन उचलताना पार आडवा झाला. वर आणि आमच्यावरच चिडला, म्हणाला तुम्ही इतकं जड असेल असं आधी का नाही बोललात? आता आम्ही त्याला भरीला पाडलं होतं हेही खरंच. म्याडमनी त्याबद्दल आम्हांला शाबासकी दिली होती. तर, तेव्हापासून आता तो थिअरीवर भर देतो, प्रत्यक्ष उचलायला जात नाही. कुणी वजन उचलत असेल तर तिथे जाऊन मसलमास, वेट, ग्राव्हीटेशनल एक्स्लरेशन, सेंटर ऑफ ग्राव्हीटी, ब्लड प्रेशर असलं काही तरी अगम्य बोलत राहतो. पण तो इतिहासाच्या तासाला मात्र न चुकता हजर राहायचा. हातात पुस्तक घेऊन पीटीसर कुठे चुकतात त्याची वाट पहायचा. चुकले की लगेच उभा राहून ते सांगायचा. पीटीसर दुर्लक्ष करून बोलत राहिले की चिडायचा, माकडटोपी काढून बाकावर आपटायचा. फक्त ग्यादरिंगला नाटक बसवायचे असेल तेव्हा मात्र अत्यंत उत्साहात सकाळी सहा वाजताच रिहर्सलला हजर असायचा. स्वत:चेच नाही तर सर्व पात्रांची भाषणे पाठ करायचा. त्याला हवी ती भूमिका मिळाली नाही तर नाटक पाडण्याच्या धमक्या द्यायचा. मग एकदा म्याडमनी त्याला सांगितले, वर्षभर काम करायला मिळेल अशी भूमिका देते, फक्त माझ्या तासाला दंगा करायचा नाही. पीटीसरांचा तास सुरु झाला की मी सांगते काय करायचं ते. प्र.गा.म. काही बोलला नाही, नुसतेच नाकातून उष्ण फूत्कार टाकीत खिडकीबाहेर पाहत होता. पण आमच्या म्याडम अज्जिबात रागावल्या नाहीत. त्यांना प्राण्यांना माणसाळवणे छान जमते. या कपिचंच पहा ना. हल्ली साखळीपण लावत नाहीत त्याला. आमच्या म्याडम कित्ती कित्ती… ।।धृ।।

ऐन परीक्षेच्या दिवस आहेत. सरांनी उजळणी सुरु केली आहे. त्यात आता प्र.गा.म. आणि त्याची ग्यांग कधीही पीटीसरांच्या कुठल्याही तासाला जाऊन म्हणतात आम्हाला आत्ताच्या आत्ता वर्ग झाडायचा आहे. तास संपल्यावर करा म्हटले तर ऐकत नाहीत. तोंडाला फडकी बांधून खराट्याचा प्रचंड आवाज करीत एका कोपऱ्यातील धूळ झाडायला सुरुवात करतात. त्याचे ग्यांगवाले मोठे मोठे बोर्ड घेऊन घोषणा देत उभे राहतात. पाच एक मिनिटांत सगळीकडे धुरळा उडाला की अचानक हे सगळे काम तसेच टाकून दुसऱ्या वर्गाकडे धावतात. वर्गातील धूळ फक्त एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे गेलेली असते. म्याडमची मुलगीपण आमच्याच वर्गात आहे. तिचे खूप नखरे असतात. आपली आई शिक्षक आहे म्हणजे आपण नापास होणारच नाही असं तिला वाटतं. कधी वह्यापुस्तकंपण नसतात तिच्या हातात. ती पीटीसरांच्या तासाला आयटम सॉंग गुणगुणत बसते. ते ऐकून कपि आणि दिगू खिदळत राहतात. पीटीसरांनी मग तिला एकदा सांगितलं, हे बघ, तू माझ्या मुलीसारखी आहेस म्हणून सांगतो, ही असली छचोर गाणी म्हणत जाऊ नकोस. त्याने मला त्रास होणार नाही तर तुझी स्वत:ची लायकी निघेल. तर फणकाऱ्याने म्हणाली अडलंय माझं खेटर तुमची मुलगी व्हायला. आम्ही काय तुमच्यासारखे गाववाले नाही. माझी आई, माझे बाबा फ़ॉरेनच्या देशात राहून आलेले आहेत. शिवाय माझे बाबा छान गुळगुळीत दाढी करत होते. त्यांची दाढी काही तुमच्यासारखी मोरी घासायच्या ब्रशसारखी खरखरीत नव्हती. माझा भाऊ तर थेट फ़ॉरेनमध्ये नापास होऊन आला आहे. आता गेली चार वर्षं तो इथंच दहावीत आहे. आता या परीक्षेनंतर ममा त्याला इथंच टीचर म्हणून घेणार आहे. तुम्ही बसा कवायती करत. मी आणि दिगू एकमेकांकडे पाहत राहिलो. तिच्या वाटेला जाऊ नका असा आम्हाला म्याडमनी दम दिला आहे. कपि तर तिचं दप्तरपण उचलून घरापर्यंत नेतो. त्याबद्दल म्याडम त्याला रोज एक केळं देतात. तिच्या भावाचंपण दप्तर आणलंस तर आणखी एक देईन असं त्या म्हणाल्या आहेत. ती (म्हंजे म्याडमची मुलगी) पार हाताबाहेर गेली आहे असं दिगू म्हणतो. हाताबाहेर गेलेल्या मुली या विषयावर दिगूचा प्रचंड अभ्यास आहे. लेकाचा नेहमी कुठल्या तरी मुलींना चिठ्ठ्या लिहून पाठवत असतो. त्याही टवळ्या त्याला उलट चिठ्ठ्या लिहितात याचे मला आणि कपिला वैषम्य वाटते. हा दिग्या लेकाचा घरून श्रीमंत आहे म्हणून, नाही तर आपण काय कमी देखणे आहोत? असे कपि मला म्हणाला होता. तुझे सर्व देखणेपण तुला शेपूट नसण्यात सामावले आहे असे मी म्हटल्यावर प्रचंड भडकला. मला म्हणतो अरे जा रे तिवाऱ्या, म्याडमनी मॉनिटर केलं म्हणून जास्त शेफारला आहेस तू. मी म्हणालो, मग? केलंच आहे मुळी. आमच्या म्याडम कित्ती कित्ती… ।।धृ।।

या सगळ्या गदारोळात आमच्या शाळेचा बारावीचा निकाल किती टक्के लागणार? मागील परीक्षेत सगळेच काठावर पास झाले होते. अनेकांना ग्रेस मार्क देऊन वरच्या वर्गात ढकलले होते. म्याडम म्हणतात काही करा, शाळेचा पार निक्काल लागला तरी चालेल पण पीटीसरांच्या आवडत्या मुलांना जास्त मार्क पडता कामा नयेत. तुम्ही नाही तरी गेली काही वर्षं बारावीतच आहात, आणखी काही वर्षं राहिलात तर काही बिघडत नाही. दिगूला तर ते हवंच आहे. त्याची सध्याची फ्लेम नववीच्या वर्गात आहे म्हणे. त्यामुळे याला कॉलेजमध्येच जायचं नाहीये. प्र.गा.म. म्हणतो ही शाळाव्यवस्थाच मला आवडत नाही, मला डायरेक्ट हेड मास्तर करा, मी सगळं बदलूनच टाकतो. म्याडमनी त्याला चुचकारलं आहे. त्याला दंगा करायला मिळतो त्यात तो आनंदी, त्याच्या दंग्याने पीटीसरांचे विद्यार्थी फार काही अभ्यास करू शकणार नाहीत या विचाराने म्याडम आनंदी. एकाच्या ऐवजी दोन केळी मिळणार म्हणून कपि आशाळभूत आनंदी, आपण बारावीतच राहणार म्हणून दिगू अत्यानंदी आणि अभ्यासच करायला लागणार नाही म्हणून मी परमानंदी. असा सर्वत्र आनंदीआनंद आहे. आमची शाळा ग्रेटच आहे. मला फार आवडते. म्याडम पण आवडतात. मी याच शाळेत राहणार कायम. आमच्या म्याडम कित्ती कित्ती… ।।धृ।।

Friday, May 2, 2014

दिग्विजयी दुष्यंत

जो सर्व दिशांवर विजय प्राप्त करून येतो तो दिग्विजय! राजपुतांची शूर परंपरा चालवणारा हा नरश्रेष्ठ केवळ पुरुषच नाही तर महापुरुष निघाला! दिसण्यावर जाऊ नये असे म्हणतात तेच खरे. आमचा दिगू मोठा गोमटा पण स्त्रियांनी कधी मान वर करून त्याच्याकडे पाहिल्याचे ऐकिवात नाही. नाही म्हणायला तो आला की आमची कुत्री मात्र एकदम चूप होत असे. भुंकण्यात आपला निभाव लागणार नाही हे तिलाही कळायचे. असो आमुचा वेष बावळा, परंतु असती अंतरी नाना कळा. पूर्वी आमच्याकडे एक अत्यंत गोंडस, गोजिरवाणे, चणीने लहान असे एक पाळलेले कुत्रे होते. एकदम निरागस चेहरा करून ते बसत असे. एखादा पाहुणा कौतुकाने किती क्यूट आहे असे म्हणून हात लावायला गेला की ते विलक्षण चपळाईने त्याचा डासा काढत असे. अगदी रक्त येईपर्यंत. असेच काहीसे दिगूचे झाले. आम्हाला वाटायचे की हा मनुष्य दररोज प्रात:काळी सोनियाजींच्या नावाने गुरुचरित्र आणि झोपायच्या आधी भाजप, संघाच्या नावाने गरुडपुराण वाचीत असेल. पण प्रत्यक्षात गुरुचरित्राच्या नीट बांधलेल्या लाल बासनात हळूच वात्स्यायानाचे साहित्य लपवून ठेवावे असेच काहीसे दिगूने केले. शशी थरूर आणि एन डी तिवारी यांनी मात्र दिगूच्या फेसबुक स्टेटसवर थम्सअप केल्याचे ऐकतो.

कधी आणि कुठे या दुष्यंताने त्या शकुंतलेला पाहिले बरे? कधी हा भ्रमर गुंगुं करीत वाट चुकून कमळदलात शिरला? कधी त्याने त्या मुग्ध बालिकेशी गांधर्वविवाह केला बरे? त्या जुन्या दुष्यंताचे बरे होते. राजा झाल्यावर कारभाराचे निमित्त सांगून विसरून गेला. आता या दुष्यंताला कसले आलेत कारभार? वरून आदेश येणार, उद्या जरा खळबळ उडवा. मग हे राजे खास मध्यप्रदेशात तयार होणारे अणुइंधन (पक्षी:छोले भटुरे) पोटात भरून तयार होणार. मग सकाळी ट्विटर, वृत्तपत्रे, कुठलीही पत्रकार सभा अशा ठिकाणी स्वैर गोळाबारूद करून येणार. लक्ष्य एकच - आरएसएस अथवा भाजप. असे सदैव बिघडलेल्या पोटाचे काम या दुष्यंताला. ग्यासभरल्या पोटी रोमांटिक विचार कसे काय सुचले असतील बुवा? बरं याला सुचले, त्या शकुंतलेला या दुष्यंताचा असला सह"वास" कसा काय सहन होत असावा? करून नामानिराळे होणे ही कॉंग्रेसवाल्यांची खासियत. हा निष्ठावान कार्यकर्ता दुष्यंतही त्याला अपवाद नसणार. पण आपल्या शकुन्तलेत मग्न झालेल्या या दुष्यंताला कारभाराचा विसर पडला होता. आरएसएसवालेही हवेतील दुर्गंधी अचानक कशी नाहीशी झाली या विचारात पडले होते.   शिवाय जितकी मजा आरएसएसबद्दल बडबड करताना येते त्यापेक्षा जास्त मज्जा शकुंतलेपाशी येत असावी. पण सगळ्या मज्जेवाल्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. शकुंतलेने लग्नाचे विचारल्यावर हा दुष्यंत एकदम भानावर येऊन त्याला आपल्या जबाबदारीची आठवण झाली असणार. इथे या शकुंतलेचेसुद्धा लगीन झालेले. दुष्यंताने मग फारसे लक्ष दिले नसेल. पण अचानक माशाच्या पोटातून अंगठी निघाली आणि दुष्यंताचे विस्मरण संपले. या आमच्या दुष्यंताचे शकुंतलेला आठवण म्हणून दिलेले फोटो इंटरनेटच्या पोटातून बाहेर आले आणि त्याचा नाईलाज झाला असावा. चरफडत का होईना शकुंतलेचा स्वीकार करावा लागणार. आता जर स्वीकारच करायचा तर हे फोटो बाहेर आणायचे कार्य आरएसएसचे असावे असेही दडपून द्यावे असे त्याला वाटले असणार. वास्तविक आरएसएसवाले इंटरनेटचा उपयोग केवळ वीर सावरकर, प.पू. गोळवलकर गुरुजी आणि प.पू. हेडगेवार यांचे फोटो टाकण्यासाठीच करतात. अजून त्यांना बाकीची मज्जा कळलेली नाही.

तात्पर्य, काही म्हणा, हा  गडी एवढा रंगेल असेल असे कधी आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. अर्थात दिगू आमच्या स्वप्नात आला असता तर या कल्पनेनेच कसेसे होते. दिगूचे एक सोडा, (म्हणजे त्याची गोष्ट सोडून द्या या अर्थी, तसे त्याने स्वत:च उरले सुरले सोडून दिले आहेच), या वीर बभ्रुवाहनाला पाहून कुणी कन्यका भाळेल असे आमच्या ध्यानीमनीही नव्हते. शेवटी आमचे कट्ट्यावरचे मित्र म्हणत तेच खरे, माकड रात्रीची वस्ती चांगल्या झाडावरच करते. आणि दुर्दैवाने झाड त्याला विरोध करू शकत नाही. पण झाडाला हेही माहीत असते की माकड एकाच झाडावर रोज वस्तीला येत नाही. आजचे आपल्यावरचे हे दुर्दैव उद्या दुसऱ्या झाडावर जाईल.

Thursday, May 1, 2014

जरा लाईट ले मामू

अबे बैंगन की तुमारी! मेरा नाम चिरंजीवी, मई यहाका बादशा! पूरा हैदराबाद मेरेको जानता. सब लोगां मेरेको सलाम करते. और तुम मेरे को लाईनमें खडा होनेको बोलता? मेरा पिक्चरमें मेरा फाईट देका नई लगतां मेरेको. मई वो साउतवाला लुंगीवाला हीरो नै, जीन्स पैनके घुटनेतक आनेवाला आदिदास शू डालके फाईट किया मै. और ये हौला मेरेकू बोलता लाईनके पिछू जाको खडनेको. कालीपिली दम कर्रा. हैदराबादमें ऐसा नई होता. अपनेको पैले वोट होना  बोलके तो होनाच. जरा लाईट ले मामू.

तू अपुनकू नई जानता. एकसो पचास फिल्ममें काम किया मैं. सबके सब पिच्चरमैं जितना बी डान्स है उसमे मैइच आगे है. कोई मेरेकू नई बोला सार, प्लीज, पीछे जाको नाचो. एक पिक्चरमें मई सिर्फ नंदीबैल का रोल किया. कुच्च नई, तीन घंटा सिर्फ शंकर भगवान के सामने बैटने का. ज्यादा ष्टोरी नई था, लेकिन "लीड" रोल था, वहा भी सबके आगे भगवान के पास मई. उस रोल के लिये मेरेकू नंदी एवॉर्ड मिला. तबसे साउतका नंदी बोलरे सब मेरको. तो चप्पु मेरे राजा कार्तिकगारू, भगवान के मंदिर में नंदीकोभी बोलोगे पीछे लाइनमें जाको बैठो? जरा लाईट ले मामू.

मेरा  येक पिक्चर "घराना मोगुडू", तेलुगुमें सबसे आगे, दस करोड का धंदा किया. तबसे सब लोगां मेरेकू बीगर द्यान बच्चन बोलते. बच्चन खुद मिलने आया, मईने देका, येईच मेरेसे बिगर और लॉंगर दिखरा. मई फिर मेरा नंबर ५ का शू पैनके मिलनेको गया. हीरॉइन लंबी रहती तो मई येईच शू पैनता. बच्चन को मेरे तरफ देकनेवास्ते उपर देकना पडा. मईने उसको पास लेके आशीर्वादबी दिया. तबी उसका बुरा दिन चल रहा था. उसको फिकरच नक्को बोला मई, ये चिरंजीवीका वादा बोला मई. मई बहुत उंचाईपे था. मई प्लेटफ़ॉर्म के उपर माईक लेके था, वो नीचे पैली लाईन में सोफेपे था. ऐसे सूप्परइस्टारकू तुम लाईन के पीछे जानेकू बोलरा? जरा लाईट ले मामू.

तीस सालसे मई लीड रोल कर्रा. फिर बोला अपना एक्टींग इतना सूपर, इतना लीडिंग, तो पोलिटिक्स मई फाडके रख देगा. करके मई अपना पार्टी बनाया. सोशल जस्टिस सबको होना करके अपना पार्टीका अजेंडा रखा. उधर बी मई आगे. जस्टिस करनेके पैले इनजस्टीस जरुरी होना करके मई पैले इनजस्टीस क्रिएट किया. उसका पहला कस्टमर अपना घरमेईच था, अपना बेटी. इनजस्टिस करके बादमे जस्टिस करनेका आयडिया पैला अपनाच. उधरभी आपुन सबसे आगे था. मेरा बेटी मेरेकू बोलरा, अप्पा, इतना इनजस्टीस मेरेकोच कायकू? मेरा गलती सुधारा मई. सब लोगान को जस्टीस चाहिये तो पैले उनकाभी इनजस्टिस होना. आज बी आपुन येईच करने को इदर आया था. और तुम बोलरा मै आगे कायकू जारा? क्या मामू क्या बातां करते तुम? जरा लाईट ले मामू! हैदराबादमई ऐसाच होता मामू!