Wednesday, April 9, 2014

धूर्तलक्षणे

ॐ नमोजी पंतप्रधाना
कृपा करावी भक्तजना
जो आशावंत आशाळभूत, सदैव।

श्रोते म्हणती कवण ग्रंथ
काय बोलिले आहे येथ
केलियाने श्रवण प्राप्त
काय होतसे ।

वंदून चरण स्वामींचे
करून पुण्य संघस्मरण
हा उत्कटपुच्छ स्वामीश्वान
धूर्तलक्षणे बोलिजेल ।

जन्मला जया पक्षी
करी कुरघोडी त्यावरी ।
राबवि क्रूरकठोरदृष्टी
ना मानी कुणाच्या बापासी ।
दर्शने निमित्तमात्रे
विरोधक मूर्च्छित ।
ऐकी जनाचे करी मनाचे
तो येक धूर्त ।

जन्मला थोर कुळी
सांगे पूर्वजांची कीर्ती
गोलगोमटी मूर्ती
शुभ्र वस्त्रांकित ।
विचारता प्रश्न
चर्या करे गहनचिंतित
आ वासे सदा सर्वदा
मुखी फुटतसे न शब्द
तो न धूर्त परंतु मूर्ख ।

कीर्ती जयाची अपार
सत्ता ग्रहण वारंवार ।
जेथ दिसे भूमी गोमटी
ठोकी आपुली राहुटी ।
सांगे स्वयं कृषीआधार
करी कन्या बंधुपुत्र उद्धार
खरा जाणता राजा ।
तो येक अतिधूर्त।

म्हणीतसे आपण सामान्य
करी जगा सर्वथा अमान्य ।
मीच म्हणे स्वच्छतेचा महामेरू
इतरजन पंककीटक मोरू ।
करी कंठशोष आमजनउद्धार
प्रत्यक्ष कृतीशून्य नटेश्वर।
स्वयं करी आरोप वृथा
आपुले स्वैर आचार सर्वथा ।
करी न सहन विरोधी टीका
वेठीस धरी तिहीं लोकां
झणी पावून कोप अंगावर
शिष्यगण सोडीतसे ।
तो येक धूर्त।

लक्षणे असती अपार
भारतवर्षी धूर्तच फार।
पुढील समास मूर्खलक्षण
खचित त्यात कपिल अन दिग्गीजन
श्रोतेहो हे वचन ।
तूर्त  येथ लेखनसीमा
क्षमा केली पाहिजे ।

इति द्विछदामदासबोधे गुरुशिष्य संवादे
धूर्तलक्षणनाम समास पहिला ।।




 

Tuesday, April 8, 2014

आचार्य अरविंदांची वासरी (भाग पहिला)

नोव्हेंबर - नेहेमीप्रमाणे प्रात:समयी ५ वा उठलो. नाकधौती, कपालभाति इत्यादिक आन्हिके उरकली. सौभाग्यवतींनी नेहेमीप्रमाणे "अहो, काय हे सकाळी सकाळी भयानक आवाज काढता आहात?" अशी तक्रार केली. तिला "नाक, तोंड आणि घसा ही आमची शस्त्रे. घासून पुसून तयार ठेवलीच पाहिजेत. योग्य त्यावेळी खोकला आणि नको त्यावेळी शिंकता येणे आवश्यक असते." असे सांगितले. "कराग्रे वसते लक्ष्मी" हा श्लोक म्हणत होतो तर सौ "तोंड बघा लक्ष्मी आणणाऱ्याचं" अशा आविर्भावात मान हलवत होती. पतीचा तेजोभंग करणे हा जणू पत्नीचा अधिकारच असावा. मी दुर्लक्ष केले. ७ वा कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती, शिंचे ८ वा उगवले. मग ७ ते ८ शवासन केले. परत कसले झोपता असे ही म्हणालीच. तिला बिचारीला काय कळणार, धरणे धरताना याच सिद्धीचा उपयोग होतो ते. बैठकीत निवडणुकीचा अजेंडा ठरला. वीज मोफत देण्यावर चर्चा झाली. फुकट कशी काय देणार असे एकाने विचारले. भाजपने आमच्या कार्यकर्त्यात काही जण घुसवले आहेत असा मला दाट संशय येतो आहे. वीज कंपन्या जास्त दर लावून कॉंग्रेस आणि भाजपची धन करतात. आपण त्यांच्यावर ऑडिट काढू आणि दर कमी करू असे सांगून त्याला चूप केले. वास्तविक ऑडिटचा उपयोग होऊन दर कमी होईल की नाही याची मलाही शंका आहे, परंतु सगळे ठीक होईल असे स्वत:ला बजावले.

१० नोव्हेंबर - कॉंग्रेसवाले सकाळपासून फोन करताहेत. मी उचललाच नाहीये अजून. करू देत थोडा वेळ. पण हे नक्की की भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले. मान्य केलेले देतील तरी. पण भाजपवाले माझा फोन का उचलत नाहीयेत? भाजपला जास्त जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. त्यांच्याबरोबर सरकार बनवायला हरकत नाही, पण मग आपले वेगळेपण काय? असा एक विचार कार्यकर्त्यांमध्ये आहे. मी फेसबुकवर लोकांचे मत घ्या असे सांगितले आहे. पाहू. सध्यातरी आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही, विरोधातच बसणार, असा पवित्रा घ्यावा. रात्री बारा वाजता परदेशी कार्यकर्ते/गुंतवणूकदारांबरोबर स्काईपकॉल आहे. दुपारी मला वेळ होता, तर म्हणाले आमच्या झोपेच्या वेळेला जमणार नाही आणि रविवारी कुणी सकाळी १० पर्यंत उठत नाही. काय करणार, निधी तर आवश्यक आहे. म्हटलंच आहे, अडला हरी..

१२ नोव्हेंबर - फेसबुकवर लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. कार्यकर्त्यात उन्माद उत्साह वाढतो आहे. त्यांना समजावले पाहिजे. अजून दिल्ली दूर आहे. चिरंजीव विचारत होते, बाबा तुम्ही मुख्यमंत्री झालात तर मला एक्सबॉक्स घेऊन द्याल का? हो असे म्हणणे अगदी तोंडावर आले होते. पण तोंड आवरले. संयम दाखवणे जमले पाहिजे. मोठ्या बंगल्यात राहणे, विमानातून प्रवास करणे, आलिशान गाड्या वापरणे कुणाला नको असते? पण आपले वेगळेपण टिकवण्यासाठी "सोने नाणे आम्हा मृत्तिकेसमान" असेच दाखवले पाहिजे. मोह फार वाईट असतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे. तुकारामांचे बरे होते, धंद्याचे दिवाळे काढले होते, सोने नाणे येण्याची शक्यताच नव्हती, मग काय होते म्हणायास? सत्तेत आल्यास सरकारी बंगला, गाडी घ्यावी का? फेसबुकवर लोकांचे मत घ्यायला हवे. शिंचे नेमके नको म्हणतील.

१५ नोव्हेंबर - अजूनही भाजपवाले फोन उचलत नाहीयेत. कार्यकर्ते म्हणत होते, मरुदेत, आपण त्यांच्याबरोबर सरकार बनवणार नाही अशी भूमिका घ्यावी म्हणजे चट सरळ येतील. आता कॉंग्रेसवाले वेगळ्याच नंबरवरून फोन करताहेत. त्यांना काय वाटलं, आम्हाला कळणार नाही? काही वात्रट कार्यकर्त्यांनी मग त्या नंबरवर निनावी फोन करून "शीला है क्या? बर्थडे पार्टी के लिये डान्सर बुक करना है. मुन्नी बदनाम हुई डान्स चाहिये." असे विचारले. मी त्यांना वाईट झापले. असे केलेत तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक असे मी म्हणालो. आता कॉंग्रेसनेही आपले कार्यकर्ते आमच्यात घुसडले आहेत असा संशय येतो आहे.

१६ नोव्हेंबर - अमेरिकेतील कार्यकर्त्यांनी शेवटी अनुदान पाठवले. सर्वात प्रथम कार्यालयाचे थकलेले भाडे द्यायला हवे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावर नको. तो लेकाचा चहावालाही तगादा लावून आहे. हे सगळे चहावाले माझ्या राशीला का बसले आहेत? म्हणतो तुमचे कार्यकर्ते नुसते सामोसे आणि चहाबाज आहेत. आगाऊ लेकाचा! एका महिन्याचे बिल सात हजार रुपये? उडालोच! आता भाजप आणि कॉंग्रेस दोघांचे कार्यकर्ते आपल्यात आहेत हा संशय दृढ झाला. कोण कोण सामोसे खातो आहे त्यावर नजर ठेवण्यास सांगायला हवे. एक चांगली बातमी म्हणजे पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची चिन्हे आहेत असा सर्व्हे आला आहे. त्यावर अमेरिकेतील एक कार्यकर्ता म्हणाला, पण बहुमत मिळाले तर काय? या सगळ्या गडबडीत तसे झाले तर काय करायचे याचा विचारच झाला नव्हता. थोड्या जागा मिळवून विरोधात बसणे केव्हाही चांगले. विरोधकांकडून लोकांच्या अपेक्षा काही करण्याच्या नसतात, उलट काही घडू न देण्याच्या असतात. तेच बरं. काही तरी मार्ग काढला पाहिजे. बैठकीत ही शक्यता बोलून दाखवली तर सर्व स्तंभित होऊन एकमेकाच्या तोंडाकडे पाहत बसले. देव करो आणि तसं काही न होवो. सरकारी नोकरी सोडण्याची अवदसा का झाली असेही एकदा वाटून गेले.

८ डिसेंबर- शेवटी ज्याची भीती होती तेच घडले. पक्षाला २८ जागा मिळून अभूतपूर्व (पहिलीच निवडणूक होती म्हणा, पण शब्द भारदस्त दिसतो) यश मिळाले. कार्यकर्त्यानी जल्लोष केला. मी नको म्हणत होतो तरी गुलाल उधळला. मला धुळीचा त्रास होतो हे मी वारंवार सांगत होतो, पण ऐकले नाही. . सर्वात प्रथम कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर विजयनृत्य झाले. पण आत सामसूम होती त्यामुळे अपेक्षित तसा आनंद मिळाला नाही.  कुणीतरी भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन नाचण्याचा बूट काढला, पण असे कळले की भाजपला ३१ जागा मिळाल्या आहेत, मग तो बेत रद्द झाला. न जाणो आमच्या ब्यांडवाल्यांच्या बरोबर आमच्याच खर्चाने स्वत:चीही फुकटात मिरवणूक काढून घ्यायचे. खूप दगदग झाली. आता बेनाड्रिल लावून पडलो आहे. मफलर गुंडाळून, कानटोपीही घातली आहे. सौ आणि आमची दोन्ही कार्टी माझ्या अवताराकडे पाहून दात काढत आहेत. मी मात्र आता सरकार बनवावे लागणार की काय या चिंतेत आहे. 

(क्रमश:)

(आचार्यांची वासरी टप्प्या टप्प्याने प्रकाशित करण्यात येईल. वाचकांनी कृपया संयम बाळगावा. - संपादक)
 

Monday, April 7, 2014

मुदपाकखान्यातील कट

(खाबुराव सुरनाळकरांच्या आगामी "तेलकट बटाटेवडा आणि तैलबुद्धीचे गुप्तचर्य" या लघुरहस्यकथेतून घेतलेले एक प्रकर्ण. खऱ्या घटनांवर आधारित परंतु पात्रे कपोलकल्पित. साधर्म्य आढळलयास केवळ योगायोग समजावा.)

मुदपाकखान्यातून वर्दी आली, भोजन तयार आहे. शंभूराजे उठले, सेवकास शेला, सुरवार आणायास सांगितली आणि गवाक्षात उभे राहिले. समोर नगराचा विस्तार दिसत होता. प्रासाद नगरीबाहेर एका उंच डोंगरावर वसलेला होता. भोवती नीट निगा राखलेली दाट वृक्षराजी होती. पक्ष्यांचा आवाज वगळता शांतता असायची. नगरीतील कोलाहल इथे ऐकू येत नसे आणि प्रासादातील बुद्धी,नृत्य विलास नगरीपर्यंत पोचत नसे. आबासाहेबांनी उभे केलेले हे साम्राज्य. त्यांच्या काळात प्रासादात गजबज असायची. प्रजेला थेट प्रवेश असायचा. सेवकवर्गही निष्ठावंत आणि जिवाला जीव देणारा होता. आबासाहेबांच्या कारकीर्दीत नृत्यक्रीडा, छचोर गायन, विदूषकी नाट्यछटा यांना मज्जाव होता. आबासाहेबांना फक्त एकाच गोष्टीचा षौक होता. बटाटेवड्यांचा. दर रविवारी थेट कर्जतला खास दूत पाठवून मागवलेले बटाटेवडे आणि कषायपेय यांचा आस्वाद घेणे हा एक नेमच झाला होता. मोहिमेवर निघताना सुद्धा बाजारबुणग्यात खास बटाटेवडा बनवणाऱ्या खानसाम्याची तजवीज असायची. शंभूराजेंना बटाटेवडा पचत नसे. ते नेहमी दूध आणि मनुका खाऊन राहत. त्यांना आम्लपित्ताचाही त्रास होता. उन्हातानांत फिरून त्यांना पित्त होत असे, मग अशा वेळी खास जिरं लावलेलं कोकमसरबत पीत वाळ्याच्या पडद्याखाली ते पडून राहत. राज्य करणे म्हणजे एक पीडाच असे त्यांचे मत होते. आबासाहेबांनी नक्को ती पीडा आपल्या गळ्यात टाकली असे ते खासगीत धनाजीस बोलून दाखवीत. धनाजी हा त्यांचा अत्यंत विश्वासू कारभारी. किंबहुना तो हवे ते कारभार तर करायचाच पण नको तेही करायचा. धनाजीही मग त्यांना सांगे, शंभूराजे तुम्ही राज्याची काळजी सोडाच, पीडाच ती, ती मी माझ्या डोक्यावर घेतो. मग शंभूराजे निर्धास्त होऊन कोकमसरबताचा घुटका घेत वैद्य शतघ्नेबुवा यांचा "पित्त - कारण आणि निवारण" हा ग्रंथ उशाशी ठेवून बसून राहत. त्यांनी तो ग्रंथ एकदा वाचायचा प्रयत्न केला होता. पण "सर्वसाधारणपणे क्षीण प्रकृतीबुद्धीच्या मनुष्यांस पित्तप्रकोप नेहेमी प्राप्त झालेला असतो" असे पहिलेच वाक्य वाचल्यावर पुढे वाचण्याचा नाद सोडून दिला होता. सर्वसामान्यांत वैद्यबुवांच्या ज्ञानाविषयी दुमत होते, पण शंभूराजेंचा त्यांच्यावर विश्वास होता. "राजे.. " नम्र आवाजात सेवकाने आपण आल्याची जाणीव करून दिली. शंभूराजे मुदपाकखान्याकडे निघाले. सेवकाने पुन्हा हाक मारली,"राजे, शेला सुरवार आणली आहे, परिधान करून गेल्यास बरे होईल." "हा! तव मातरम! पुन्हा विसरलो का आम्ही?" असे अल्प गालिप्रदान करून राजेंनी वस्त्रे परिधान केली. दिवस असाच निवांत जाणार होता.

मुख्य प्रासादापासून थोडेसे दूर असा दुसरा प्रासाद होता. ही धाकटी पाती. इथे राजे इंद्रवदन उर्फ "काळापहाड" यांचे वास्तव्य होते. शंभूराजे त्यांना उंदीरवदन म्हणत ते त्यांना आवडत नसे. मग तेही शंभूराजांना शुंभराजे म्हणत. एक काळ असा होता की इंद्रवदनराजेंशिवाय आबासाहेबांचे पानही हलत नसे. चुलत असले तरी आबासाहेब त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करायचे. आपल्या बटाटावड्यातील अर्धा त्यांना द्यायचे. परंतु पुढे शंभूराजे गादीवर बसणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर इंद्रवदनराजे बाहेर पडले आणि वेगळे राहू लागले. पण त्यांच्यातील "काळापहाड" त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. काहीतरी काळेबेरे आहे असे ते बहिर्जी उर्फ छोटूला म्हणाले होते. बहिर्जीने मग आपला एक विश्वासू हेर मोठ्या वाड्यात मोठ्या हुशारीने पेरला होता. तो बित्तंबातमी देत असे. आबासाहेबांच्या मोहिमेच्या खलबतांपासून ते शंभूराजेंच्या आबासाहेबांकडे केलेल्या नवीन कॅमेरा घेऊन देण्याच्या हट्टापर्यंत सर्व बातम्या "काळापहाड" पर्यंत पोचत. काळापहाड आणि छोटूच्या रात्री गुप्त बैठका होत. अशा वेळी काळापहाड आपला उन्हाचा काळा चष्मा लावून बसे. काळ्या चष्म्यामुळे राजे कुठे पाहत आहेत याची कल्पना छोटूला येत नसे. आजवर कित्येक वेळा आपला गुढघा खुर्चीवर आदळला आहे, असे असताना रात्रीच्या वेळी काळा चष्मा का लावता राजे? असे छोटूने एकदा त्यांना विचारलेही होते. त्यावर "सर्व श्रेष्ठ गुप्तहेर असा चष्मा लावतात" असे त्यास बजावण्यात आले होते. पूर्वी ते छोटूबरोबर वेषांतर करून प्रजेत मिसळत असत. पण अलीकडे एक दोन वेळा काही दुष्ट नगरजनांनी त्यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेऊन वर परत डोळे मिचकावत "काय, आहे की नाही बरोबर?" असे विचारून टाळीसाठी त्यांच्यासमोर हात पुढे केला होता. त्यांनाही मग नाईलाजाने चडफडत टाळी द्यावी लागली होती. तेव्हापासून वेषांतराची भानगड अजिबात नको असे त्यांनी छोटूला बजावले होते.

दोन महिन्यांपूर्वी अशीच एक गुप्त बैठक झाली होती.
काळापहाड:-"छोटू, बातमी खरी आहे?"
छोटू: होय सरकार, हेराने गळ्याला चिमटा काढून "आईशप्पत खरे" असे म्हटले होते.
काळापहाड : मग नक्कीच खरे.  नाही तर आमच्यासाठी कोण अशी मातोश्रींची शपथ घेईल? पण हे जर खरे असेल तर कट आणखीच गंभीर आहे.
छोटू: होय सरकार, हेर गेली महिनाभर कचराकुंडीवर नजर ठेवून आहे. दररोज न चुकता तेथे पडलेल्या चुरगाळलेल्या वृत्तपत्राचा बोळा उलगडून पाहतो. सरकार, तो बोळा तेलात माखलेला असतो! एका बैलगाडीचे वंगण होईल एवढे तेल त्या बोळ्यात असते!
काळापहाड: घात! अपघात नव्हे विश्वासघात! आबासाहेबांना वैद्यांनी तैलपदार्थ एकदम वर्ज्य असे सांगितले असताना हा कट?
छोटू: हेरानं असंही सांगितलं की बटाटेवडा आणायला जो दूत जातो त्याच्या कानाला लागून शंभूराजांनी काही गुप्त सूचनाही दिल्या.
काळापहाड: आं? शंभूराजे! कुठं फेडाल हे पाप? ते काही नाही! छोटू आता असं कर, अस्साच आपल्या मुदपाकात जा. म्हणावं आम्ही कुक्कुटकाढा तयार करण्यास सांगितला आहे. कोकणातून आपले नारो राणाजी खास स्वत: पकडलेले कुक्कुट पाठवतात. तो काढा घेऊन आपल्या हेराकरवी आबासाहेबांकडे पोचवा. आणि हो, मुदपाकात जरब दे, म्हणावं काढा चवीला अगदी बटाटेवड्यासारखाच हवा. आबासाहेबांना जरासुद्धा संशय येता नये. आणि हे पहा, शंभूराजांनी काय सूचना दिल्या होत्या याची माहिती काढा. योग्य वेळेला ती माहिती वापरता येईल. कट करता काय? पहाच हा काळापहाड काय करतो ते.
छोटू : होय राजे. तशा सूचना देतो.

आज छोटूने काही तरी महत्वाची बातमी आणल्याची वर्दी दिली होती. त्यामुळे इंद्रवदनराजेंचे आज कामकाजात लक्ष लागत नव्हते. कारभारी सांगत होते,"पुण्यनगरीहून खबर आहे, आपल्या मर्द जवानांनी रात्रीच गनिमी काव्याने हल्ला चढवून रस्त्यावर जिझिया कर वसूल करणारी ठाणी उध्वस्त केली आणि प्रतिहल्ला व्हायच्या आत पलायन केले. दोन लक्ष होनांची प्राप्ति झाली आहे राजे." इंद्रवदनराजे विचारात होते,"हं, हं.. दोन लक्ष होन काय? देऊन टाका. ती जमीन आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच!" मग भानावर येऊन म्हणाले,"बरं, बरं! छान! आता पुढील हल्ला कधी? पायात चपला वगैरे घाला रे बाबांनो. काचाबिचा पायात घुसतात. आम्ही आलो असतो, पण आज एकादशी. आम्ही स्वत: तोडफोड करणे योग्य नाही. शिवाय आज फराळास साबुदाण्याची खिचडी आहे अशी वर्दी आहे. या तुम्ही आता." त्यांनी इशाऱ्यानेच कारभाऱ्यांना निरोप दिला. तेवढ्यात बहिर्जी उर्फ छोटू सदरेत आल्याची वर्दी मिळाली. त्याला खलबतखान्यात पाठवा अशी आज्ञा करून राजे घाईघाईने आपल्या महालात गेले आणि काळा चष्मा चढवून तसेच खलबतखान्याकडे निघाले.

"हं, कुठे आहेस छोटू? काय खबर आहे?" चाचपडत खुर्चीचा अंदाज घेत, अंधारलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत राजेंनी प्रश्न केला.
"राजे, मी इथे आहे तुमच्या समोरच. धक्कादायक अशीच खबर आहे."
"वा! शुंभराजे, कसे सापडलात आता! आबासाहेबांना तेलकट बटाटेवडे देऊन दगाफटका करण्याचा कट? कुठं जाल आता?"
"अं.. राजे, थांबा. शंभूराजेंना त्यातील काहीच माहिती नव्हती. "
"आं!!?"
"होय राजे. तेलकट बटाटेवड्यांचा आग्रह हा आबासाहेबांचा स्वत:चाच हट्ट होता! शंभूराजे पित्त होते म्हणून मुदपाकात जाऊन स्वत:साठी शेंदेलोण आणि हिंग घातलेले ताक बनवायास सांगत असत."
"अस्सं! आणि मग त्या दूताच्या कानाशी लागून काय सांगत असत?"
छोटू इथे शरमला आणि चूप राहिला.
"छोट्या! खरं सांग काय ते!"
"राजे, कसं सांगू! आबासाहेब त्या दूताला बटाटेवड्यांसाठी रोख रक्कम देत असत. शंभूराजे त्या दूताला उरलेली चिल्लर परस्पर आम्हाला आणून दे अशी ताकीद देत! आबासाहेबांनी त्यांचा तनखा बंद केला आहे म्हणे."
"अरेरे! आपली सगळी मेहनत पाण्यात. हा शंभ्या असाच शुंभ पहिल्यापासून. आणि आम्ही पाठवत होतो तो कुक्कुटकाढा? त्याचं काय? आबासाहेबांनी तो तरी घेतला की नाही?"
"राजे, तो काढा आबासाहेबांपर्यंत पोचतच नव्हता. मधल्यामध्ये धनाजीरावच तो पिऊन टाकत होते!"

इंद्रवदन राजे उर्फ काळापहाड खिन्नपणे खलबतखान्यात बसून राहिले. पण निदान रहस्याचा उलगडा केल्याचा माफक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होता.


 

Saturday, April 5, 2014

बुडत्याला बसचा आधार

आमचं ते कर्नाटकचं नंदन निलेकणी म्हटलं तर थोरच की हो! येवढं स्वत:ची गाडी असून, चक्क बसमधून फिरलं की हो. आता बसमधून फिरायचं म्हंजे साधं काय हो ते? गर्दी गिर्दी असणार, लोक धक्का मारणार, पाकीssट मारणार, बाईमाणूसला चुकून धक्का बसलं तर पब्लिक आपल्याला मारणार, नक्कोच हो, थू:! हे काssय अवदसा आठवलं म्हणतो मी? गाडी गिडी आपल्या नशिबी कुठली हो? आमचं मामा लोक गाडी ठिऊन असायचं. शाळंला सुट्टी झाली की मामाच्या गावाला जायचं म्हणजे ते एक आकर्षणच असायचं. मामासुद्धा आमचा भारीच हो, एकदाच फिरवून आणायचं आम्हाला. बाकी सुट्टीचे सगळे दिवस आम्ही पार्क केलेल्या गाडीतच बसून तोंडानं आवाज काढत गाडी चालवायचो. ते आमचं सोडून सोडा हो, आम्ही बसप्रवासच करतच जल्म काढला. पण हितं ज्याच्या बुडाला कद्दी येष्टी बसच्या शिटाचा स्पर्शेसूधा झाला नाही त्यानं बसमध्ये प्रवास करणं… पाsssप, त्या बुडाची कथा गंभीरच की हो! निवडणूक ऱ्हातीय बाजूला, पुढं दोन दिवस उशीवर बसूनच काढतोय बघा.  आणि नाश्त्याला सांबार आणि इडली खाल्लं होतं म्हणे बापडा. आता बस लागली म्हणजे कुणाची लॉटरी फुटेल काय की. एक थोडं आल्याची वडीतरी जवळ ठेवायची म्हणतो मी!

बरं, माणूस वट्टात हुशार बघा. आयटी मध्ये जल्म काढलं ते काय उगीच काय ते? नारायण मूर्ती स्वत्ता इंटरव्ह्यू घेतलं होतं म्हणे त्याचं. काहीतरी नीटच बोललं असेल की हो. उगाssच घेतलं काय त्याला? कंपनी पण चांगली चालवला की हो. आमची मुलगा पण तिथंच काम करतंय. आमच्या बंगळुरात फ्ल्याटचं किमती लाखात होतं ते कोटीमध्ये गेलं, ते प्रगती नव्हे काssय? आम्ही पण आमचं चांगलं गावातलं घर विकून टाकलो बघा आणि इथं फ्ल्याट घेऊन सोडलो. आता गावात जायचं म्हणजे लांब पडतंय पण प्रगती करायची म्हणजे हे आलंच की हो. आणि एक बरंच बघा - पूर्वी आमचं सगळं ते नातेवाईक, बंगळुरात आलं की आमच्या इथंच हो! गावात घर, जवळ पडतंय सगळं. आलं की पंधरा दिवस हलत नव्हतं. आता इथं बंगळूरच्या बाहेर तीस फर्लांगावर कशाला कोण येतंय? किमती वाढल्या ते बरंच बघा.

तर असं एवढं हुशार ते, काय झालं एकदम काय की! उठलं आणि म्हणलं आता राजकारणातच जातो! ते मनमोहनसिंग बोलावलं म्हणं. ते बोलवेल मस्त, आपल्याला अक्कल नको काय म्हणतो मी? राजकारण म्हणजे कंपनी काssय ती! कंपनीत हाताखालच्या लोकांना बोलावून सांगशिला हो, हे करा आन ते करा, ती मुकाट करतात. हितं येकटं निर्णय घ्यायचं म्हणजे हरिदासाची कथाच की हो. दोन दोन वर्षं फिरून परत मूळपदावर. पुन्हा काही लोक म्हणणार आमच्यावर अन्याय झाला, आम्ही आता आंदोलन करणार, धरणं धरणार, गाड्या फोडणार. कष्टच की हो! ते आधार कार्ड असंच बोंबललं की. ओळखपत्र म्हणजे खुळेपणाच हो! आपल्या देशात काम करून घ्यायचं म्हंजे ओळख लागती, ओळखपत्र नाही. आमची ते रेशन कार्डावरचं साखर आणि राकेल आमचं मोलकरीण गेली कित्तेक वर्षं घेतंय, आता ओळखपत्र दाखवा आणि घ्या म्हटलं तर ते गरीब कुठं जाइल हो? माणशी पाच लिटर राकेल एका कार्डावर म्हटलं तर तिच्या घरचं बंब तरी पेटतो काय हो? उगाच आपलं नाटक कशाला म्हणतो मी! निवडणूक जिंकायचं म्हणून काहीही हुच्चपणा करतंय हो. ते राहुल गांधी, केजरीवाल मेट्रोतनं, लोकलमधनं फिरलं, हे बसमधून. लोकांचे कष्ट कसे असतात, म्हणून बस मध्ये फिरून बघतात, येकदा फक्त रेशन कार्डावर महिना काढून दाखवा की हो. ते मोदी तेवढं हुशार निघालं, विमानातनं फिरतंय, ट्रकमधनं माणसं आणणं सोडाच, उलटं लोकांवरच तिकीट लावतंय भाषण ऐकायला. शेवटी वाणी हो, धंद्याला तयार बघा. सडका तांदूळ बासमती म्हणून तर विकणारच, वरती कॅरीब्यागचंपण किंमत द्यायला लावणार. आणि हे आमचं ध्यान बसतंय बघा बसमधनं फिरत. ते भाजपचं अनंतकुमार आधीपासूनच ओरडतंय, डब्बल वजनाचं पार्सल म्हणून डब्बल तिकीट लावा. आधीच कॉंग्रेसचं तिकीट, त्यावर हे बसचं डब्बल तिकीट, महागात पडतंय घ्या. त्यापरीस विदाऊट तिकीट असलेलं काय वाईट?

Friday, April 4, 2014

फॉरेन रिटर्न देशभक्ती

एकदम खरीखुरी गोष्ट. आमचा परांजप्या त्यावेळी तरुण होता. अभ्यासू होता. वर्गात पुढच्या बाकावर बसायचं धाडस करणारा होता. रोज गृहपाठ करणारा होता. परीक्षेच्या आधी महिना महिना तयारी करणारा होता. आम्ही बाकीची "२१ अपेक्षित" वाली जनता त्याच्याकडे आदराने पहायचो. आम्ही "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" पंथाचे, परांजप्या "हा माझा मार्ग एकला" पंथाचा. दिवसभर उंडारून आमचा दिवस "जय जय राम कृष्ण हारी" टाईप संपायचा. तर परांजप्या "थकलो, दमलो, परि चालणे मला" या आवेशात नाईट मारायचा. ऐन नववीत त्याला छान चष्मापण लागलेला होता. मुलींकडे नजर वरकरून पण पहायचा नाही, पण एखाद्या मुलीने त्याची वही मागितली तर लगेच द्यायचा. अशा वेळी त्याच्या चष्म्यावर वाफ आलेली दिसायची, हात थरथरायचा. लेकाचा आम्ही मागितली तर द्यायचा नाही. परांजप्याचे नातेवाईक मुंबईला होते. ते कधी कधी ह्याच्यासाठी पाठ्यक्रमाबाहेरची पुस्तके घेऊन यायचे. अशा वेळी हा ते पुस्तक घरी दडवून गुपचूप अभ्यास करायचा. आम्ही मोठ्या भावंडांनी वापरलेली, कव्हर नसलेली, झाशीच्या राणीला मिशा काढलेली, चहाचे डाग पडलेली, अशी परंपरागत वा पिढीजात वारसाहक्काने मिळालेली पुस्तकं वापरायचो. परांजप्या चौथी आणि सातवी अशा दोन्ही स्कॉलरशिपच्या परीक्षा पास झाला. आम्ही ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणून अभ्यास केलेले, पण मागची जनता वर्गात येणार म्हणून मास्तरांनी पुढच्या वर्गात ढकललेले.

पुढे आम्ही दोघे तिघे उनाडपंथी इंजिनियरिंगला गेलो. परांजप्या पण गेला. आम्हालापण इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला याचा परांजप्याला मोठा विषाद वाटला होता. म्हणायचा लेको, इथं आलात खरं पण चार वर्षांची नैया पार करायची आहे. आता परांजप्या पेटून अभ्यास करायचा. आम्ही ऑप्शनची चर्चा करत असताना हा छद्मी हसायचा. वादविवादात भाग घ्यायचा, आणि सद्यस्थितीवर कडाडून टीका करायचा. आपल्या देशाचं काही होणार नाही, ही लाचखोरी, आरक्षण, जातीय राजकारण हे असंच चालू राहणार. आपल्याला शिस्त नाही, आपण असेच गलिच्छ राहणार, असेच रस्त्यावर थुंकणार. गुंड असेच माजणार, दिवसा ढवळ्या खून पाडणार, पोलिस पैसे घेऊन त्यांना सोडणार. राजकारणी असेच घोटाळे करणार, आपण त्यांना असेच निवडून देणार. संसदेवर असेच हल्ले होणार, सरकार त्यांच्याशी चर्चा करणार. भगवे उतणार, हिरवे माजणार, निळे भडकणार पण आम्ही असेच जगणार. माजलेले नवश्रीमंत असेच बेदरकार गाड्या चालवणार, असेच अपघात होणार, बघायला जमलेले कोण पोलिसांच्या भानगडीत पडणार म्हणून पंचनाम्याच्या वेळी गायब होणार. असं खूप काही तिडिकेने बोलत राहायचा. पण निवडणुकीच्या वेळी वर्गाचं प्रतिनिधित्व कर म्हणून सांगितलं तर म्हणायचा नाही रे बुवा, असली रिकामटेकडी कामं करायला वेळ नाही मला. आम्ही काही जण पुढे अभाविपचं काम करू लागलो तेव्हा हसायचा, म्हणायचा छान, वाहा राष्ट्रप्रेमाचे ओझे, भाजा लष्कराच्या भाकऱ्या. इथे सबमिशन आलंय तोंडावर आणि तुम्ही राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या गप्पा करताय. म्हणायचा बाबांनो तुम्ही करा हे सगळं, पण भारतात भविष्य नाही. तुम्ही कितीही केलंत तरी काही बदलणार नाही. असं काहीबाही बोलायचा. मग तू काय करणार अस विचारलं तर म्हणायचा, मलाही शिवाजी जन्माला यावा असं वाटतं पण माझ्या घरात नको, शेजारी खुशाल येवो.

पुढे परांजप्या थेट फॉरेनला गेल्याचं कळलं. अधूनमधून वार्षिक भेटीवर भारतात आला की भेटायचा. हातात बिसलेरीची बाटली असायची. केस थोडेसे विरळ, मागे हटलेले. चष्मा तर होताच पूर्वी, पण आता सोनेरी काड्यांचा झालेला. सुखवस्तूपण दिसायचं. पण परिस्थितीवर पूर्वीसारखा टीका करायचा नाही. आपुलकीनं बोलायचा. ज्या मित्रांशी त्याचं जमायचं नाही त्यांचीही चौकशी करायचा. नजर जुन्या खुणा, इमारती, रस्ते शोधत असायची. आमची हॉस्टेलची बिल्डिंग पाडून नवी केल्याचं पाहून खूप हळहळला, म्हणाला किती आठवणी होत्या रे. भिडे मास्तरांची मिसळ खायला गेल्यावर जुनी इमारत जाऊन तिथे बहुमजली इमारत झालेली पाहून खट्टू झाला होता. हे सगळं असलं तरी भारतात झालेले काही बदल चांगले आहेत म्हणायचा. राष्ट्रीय महामार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, विमानतळ पाहून आनंदित व्हायचा. राजकारणावर चर्चा करायचा. पूर्वी राजकारण्यांवर घसरणारा तो, आता चौकाचौकात अण्णा, दादा आणि तात्यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्वत:च लावलेले निर्लज्ज फलक पाहून मनमुराद हसायचा. म्हणायचा, जबरी! होऊ द्या खर्च! त्याला एक प्रकारे भारतातील अनिष्ट गोष्टींपासून अलिप्त आणि दूर राहण्याचा वर मिळाल्यासारखा होता. पण म्हणायचा, ही आबा, दादा, तात्या असली घाण भारतातून नष्ट झाली पाहिजे. अण्णा हजाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. पुन्हा एक वर्षासाठी दिसेनासा व्हायचा.

आता परांजप्या परत पेटून उठला आहे. त्याला हवा तसा शिवाजी शेजारच्या घरात जन्माला आला आहे. परांजप्या सढळ हाताने शिवाजीला मदत करतो आहे. एवढेच नव्हे तर शिवाजीचा परमभक्त असा मावळा पण बनला आहे. फक्त इंग्रजी येणाऱ्या आपल्या मुलांना "शिवाजी अँड हिज मावळेज" असं इंग्रजीत लिहून समजावतो आहे. ती मुले "शिवाजी अँड हिज मवालीज" असे वाचत आहेत. फक्त ही मावळेगिरी ऑनलाईन चालू आहे. कधी फेसबुकवरून चेवाचेवाने पाठिंबा व्यक्त करून तर कधी डॉलर पाठवून. इकडे शिवाजीही या व्हर्चुअल मावळ्यांच्या मदतीने आता आणतोच स्वराज्य असे म्हणू लागला आहे. फरक इतकाच आहे की इथे रायबाचं लगीन केव्हाच लागलं आहे, तानाजी काडीने कान कोरत कोरत, "म्हाराज, तुमी व्हा फुडं, हा म्या आलूच बगा." असं म्हणून म्हाराजांनाच कोंडाण्यावर चढाईसाठी पाठवतो आहे. म्हाराज जर हरलेच तर हा डॉलरचा दोर लगेच कापला जाणार आहे. परांजप्या पुन्हा आपले पूर्वीचे जीवन चालू ठेवणार आहे, वर्षाकाठी एखादी चक्कर "इंडिया"त मारणार आहे.

परंतु हल्लीच काही असेच मावळे, सर्व सोडून या प्रतिशिवाजीच्या फौजेत प्रत्यक्ष दाखल झाल्याचे कळते. आमच्या गावचा गोंद्या टेलरही दहा वर्सं मुंबईत काढून आला. तिथं म्हणे मोठ्या मोठ्या सायबांचे सूट शिवत असे. सुट्टीला गावात आला की रुबाबात हिंडायचा. तंग विजार घालायचा, खिशातला कंगवा काढून भांग पाडायचा. पुढं गावात बदल झाले, रस्ते झाले, त्यावर विजेचे दिवे आले. गोंद्याला वाटलं, गावाकल्डी मान्सं लई सुधारली. मुम्बैचा गाशा गुंडाळला आन आला गावात. है! निस्ता गाजावाजा करून दुकान टाकलं. दुकानाला नाव दिलं "टेक्सास टेलर्स"! खाली रुबाबात लिहिलं होतं "प्रोप्रा. गोविंद, बॉम्बे रिटर्न" ! ते वाचून चार दिवस गावातली मान्सं लई खिदळली आणि नंतर आपापल्या उद्योगात गढून गेली. चालू रोजी गोंद्या पायजमे आणि बंडी पेशालिस्ट झाला आहे. संध्याकाळी दुकानाच्या फळीवर चार माणसं जमवून मुम्बैच्या गमती सांगत बसतो. गावगाडा तसाच चालू आहे.
 

Thursday, April 3, 2014

कुश लव रामायण गाती

स्थळ : कुणी न पाहावे अशा जागी
काळ : चालून आलेला
वेळ : सांगून न आलेली
पात्रे : लव आणि कुश
सूत्रधार :तर मंडळी, प्रसंग थोर आहे. प्रजाजनांच्या जिवाला घोर आहे. कुणाच्याही ह्रदयास पीळ पाडणारा आहे. इये मरहट्ट देशीचे हे राजकुमार प्रत्यक्ष जनताजनार्दनासमोर वग सादर करताहेत. प्रारंभीच ईशस्तवन झाले आहे. धूप फिरवला गेला आहे.
लव : हे भ्राता कुश, आपल्या कलहामुळे तर तात आपल्याला लवकर असे सोडून गेले नसतील ना?
कुश : हे वंदनीय लवा, तू माझ्यापरीस काही क्षणांनी का होईना, जास्त जग पाहिले आहेस. तुझे बरोबरही असेल.
लव : माझे सिंहासनारोहण व्हायच्याआधीच तातांनी असे निघून जायला नको होते.
कुश (चमकून): आं? तुझे रे कसले सिंहासनारोहण ? सिंहासनारोहण खरं तर माझे व्हायचे होते. तात मला घेऊन मृगयेला जायचे तेव्हा तू  पृष्ठभागी गळू झाल्याचं कारण सांगून घोड्यावर बसायचा नाहीस.
लव ( आठ्या पाडून ) : काही खोटं नसायचं ते.  मला अवघड ठिकाणी गळवं होतात त्याला मी काय करू? आत्तासुद्धा झालं आहे. सुरवारसुद्धा घालायची पंचाईत झाली आहे. दाखवू?
कुश : काही नको. आत्ताच भोजन झालं आहे. जरा व्यायाम करत जा. नुसता बसून खातोस, तातांनी तुला बसवून गोडधोड भरवलं आजवर. गळवं होतील नाही तर काय?
लव (कपाळावर आठ्या पाडून): तू नको मला शिकवू. तातांसारखी चित्रकला आली म्हणजे तात नाही झालास तू, मला बोलायला. मृगया तात करायचे, तू त्यानंतर सावजाशेजारी उभा राहून तसबीर काढून घ्यायचास. सगळ्यांना माहीत आहे.
कुश (भडकून) : कोण म्हणतं असं?
लव (शांतपणे) : सर्व नगरजन.
कुश : अरे एकदा! फक्त एकदाच मी ती तसवीर बनवून घेतली होती. आणि त्यावेळीही त्या रानमांजराची मृगया आम्ही एकट्याने केली होती! तातांनी केवळ त्याला आधी जायबंदी करून दिलं होतं इतकंच. तेसुद्धा ते माझ्याच अंगावर आलं तर मी घाबरू नये म्हणून. परंतु शेवटचा तीर मीच मारला होता.
लव (तुच्छतेने): हं:! रानमांजर ते काय!
कुश (आणखी भडकून): तू कधी मूषकाची तरी मृगया केली आहेस का रे? आपण राजे, क्षत्रियधर्माची ओळख व्हावी म्हणून बळेच एकदा तुला तातांनी अश्वावर बसवलं आणि या आपल्या नगरीतल्या नगरीत फेरफटका मारायला लावलं. मी नेहमीप्रमाणे रपेटीला गेलो होतो. तर मध्येच तातांचा दूत दौडत निरोप घेऊन हजर , लव सरकारांना रुग्णालयात नेलं आहे, आपण आलात तर बरं होईल. मी विचारलं , गळू का? तेव्हा दूत म्हणाला, होय, पण यावेळी जरा गंभीर स्थिती आहे. दोन्ही बाजूला झाली आहेत, पालथे पडून आहेत.
लव (संतापून): मी बोलावलं नव्हतं तुला! आणि हृदयाचे ठोके खूप वाढले होते म्हणून नेलं होतं मला! मला मुळीच घोड्यावर बसायचं नव्हतं. तातांनी बळेच बसवलं.
कुश (दूर नजर लावत): आणि जो अश्व मला हवा होता तो तुला दिला. मग मी शनिवारच्या बैलबाजारात जाऊन खटं पडलेला हा अश्व घेऊन आलों. लंगडतो, पण परवा नाशकापर्यंत जाऊन आलो. पुढे महिनाभर पागेत ठेवून पायी हिंडावं लागलं. पण तुला रुग्णालयातून परत प्रासादात याच लंगड्या घोड्यावरून मी घेऊन आलो हे विसरू नकोस.
लव:ठाऊक आहे! आता मी माझा अश्व वापरणार नाही आणि तात तो तुला देतील अशा आशेवर आला होतास ना?
कुश(जाम संतापून): अरे किती कृतघ्नता ही! मीही नाही एवढा कृतघ्न! पुढच्या वेळी गळू होईल तेव्हा मला बोलावलंस तरी येणार नाही.
लव: तू नेहमी माझ्या वाईटावरच असतोस.
कुश: तुझी कर्मंच तशी आहेत.
लव(महा भडकून):कुशड्या! तू आहेसच नीच आणि पाताळयंत्री!
कुश (अपशब्द वापरण्याचा मोह आवरत):हे दुर्दैवी नामाच्या भ्राता, तसेच अपशब्द मी तुला केले तर दुर्धर प्रसंग प्राप्त होईल.

विजांचा कडकडाट होतो आणि धीर गंभीर आकाशवाणी: अरे अरे अरे! अरे काय चालवलंय हे? इथे प्रजानन गांजले आहेत, रंजले आहेत, , मराठी जनांना वाली उरला नाही, वाणीजन नगरीला ग्रासले होतेच, आता भारतवर्षाला ग्रासू पाहत आहेत आणि इथे तुम्ही गळू, अश्व आणि सिंहासनावरून कलह माजवत आहात. जागे व्हा आणि प्रजेकडे पाहा, त्यांची दु:खे जाणा, त्यांचे निवारण करा. नाही तर सिंहासन आणि अश्व दोन्ही जातील आणि फक्त गळू राहील!

लव आणि कुश एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असताना पडदा पडतो.


 

Tuesday, April 1, 2014

एल्गार!

"थांबा, आता मी माझी औकातच दाखवतो! कोण आहे रे तिकडे?" मी दचकून तुर्यावस्थेतून चातुर्यावस्थेत आलो. काडी कानात काय छान गेली होती. समाधीवस्था प्राप्त झाली असताना धन्यांचा क्रोधाने चिरकलेला आवाज कानावर पडला आणि समाधी भंग झाली. स्टुलावरून उठलो आणि सायबांच्या केबिनीमदी गेलो. भिंतीवर ढाल आणि त्यावर एकच तलवार लटकलेली. धाकलं धनी जेव्हा थोरल्या सरकारांबरोबर बेबंदशाही नाटकाचा अखेरचा प्रयोग करून "अखिल मुंबई उग्रसेन नाटक मंडळी"तून बाहेर पडले तेव्हा मोठ्या धन्यांबरोबर तलवारीवरून खूप वादावादी झाली. शेवटी लक्ष नाही असं बघून हळूच कपडेपटातून एक तलवार पळवून घेऊन आले. ढाल काय मिळाली नाही, शेवटी दिवाळीला परळच्या बाजारातून आणली. सांगू नका कुणाला असा दम सर्वांना दिला होता. आता ढाल आणि त्यावर एकच तिरकी तलवार अशी भिंतीवर लावली आहे. परवाच धन्यांना बोललो, "मालक, खालची तुमची खुर्ची जरा पुढं ढकला. ही वरची टांगती ढाल आणि तलवार कदी खाली येईल म्हाईती नाही". तर माझ्यावरच खवळले,"लेका, वाटच बघतोयस होय रे? दोन खिळे मार खाली. आयला हे पण मीच सांगू काय रे?" आता सायबांना काय सांगू शेवटचा खिळा त्यांनीच ठोकला होता. पण भिंतच जिथं पडायला झालेली, खिळा मारायला गेलो तर भिंत पण ऱ्हायची नाय. पण सायेब पेटले होते. तसे ते दररोज सकाळी सात वाजत पेटून सायंसंध्येचे आचमन झाले की विझतात. पण आज ज्वाला जरा जास्तच भडाकलेली दिसली.

सरकारांकडे चाकरीला होतो ते बरं होतं. थोरले धनी फोटोग्राफीत असायचे आणि धाकले धनी सरकारांबरोबर फोटोत असायचे. सरकार दोघांना कधी दम देत, कधी फटके देत, पण सांभाळून घेत. आपल्यालावर कधी सरकार भडकले नाहीत. धाकल्या मालकांनी घर सोडताना माझीपण उचलबांगडी केली. मला म्हणाले पांड्या, लहानपणापासून माझी नाडी तुझ्या हातात. तू जर नाही आलास तर आमच्या सुरवारीची नाडी आणि कमरेला शेला कोण बांधणार? मी म्हणालो मग थोरल्या साहेबांचं काय? त्यांची नाडीपण मीच बांधून देतो. तर म्हणाले, ते वर्षातून एकदा उभे राहतात शिवाजी पार्कावर, एरवी टेबलाच्या मागेच असतात. त्यांना नुसती वरती बाराबंदी असली तरी चालते. आणि शिवाय सरकार त्यांना आपल्या कफनीत दडवतात.  इथे आम्हा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग. मागे एकदा दगड फेकण्यासाठी हात मागे केला इतक्यात कमरेचा शेला सुटून भलताच समरप्रसंग झाला होता. आणि हे पत्रकार असले xxxxचे, नेमका तो फोटो काढण्यासाठी धडपडत होते. तेव्हापासून ठरवले आहे, शेंडी तुटो वा पारंबी, कमरेचा शेला आणि नाडी तुटता कामा नये.

"साहेब, बोलावलं काय?" मी हळूच विचारलं. "हो! आत्ताच्या आत्ता फोन लाव! माझी औकात काढता? दाखवतोच आता. लहानपणापासून हे अस्सच करायचा हा. खोड्या करायला, मारामारी करायला आम्ही पुढं, आणि नंतर बोलणी खाताना हा सरकारांच्या मागे लपून हस्तिदंती करणार. आम्ही  शाळेत असताना एकदा मला म्हणाला आपल्या मागच्या गल्लीत "लाडू सम्राट" मध्ये जाऊया. तिथले कडक बुंदीचे लाडू फार छान असतात.  तू मालकाला बोलण्यात गुंतव, मी हळूच थोडे लांबवीन. तुला पण देईन. मी केलं तसं. हा लाडू घेऊन पळाला. मी घरी जाऊन बघतो तर एकटाच खात बसला होता. मी भडकून विचारलं,"आणि मला रे?" तर मला म्हणतो तुझ्या वाट्याचे तिथेच विसरलो. आणि वर म्हणतो तुला कशाला हवेत? आधीच तुझे दात हलतायत, कडक बुंदीचे लाडू खाशील तर आजीची कवळी वापरावी लागेल. खी:खी:खी! अस्सा चिडलो, टेबलावर कॅमेरा दिसला, त्यातली फिल्मच बाहेर काढून टाकली आणि पळालो. गेला होता रडत काकांकडे, सगळे किल्ल्यांचे काढलेले फोटो गेले म्हणून. ते काही नाही! आता मी दाखवतोच त्याला. त्यावेळी नुसती फिल्म काढली होती, आता तर कॅमेऱ्याचंच खळ्ळखट्याक करून टाकतो. बसा मग बोंबलत. बरं, जरा एवढी नाडी बांधून दे."