Tuesday, October 6, 2015

काव्यदिंडी ते काव्यतिरडी - एक प्रवास

पहुडलो होतो माझ्याच मनाच्या पलंगावर
बंद डोळे मंद श्वास शांती अलवार
येईल केव्हाही स्फूर्ती, होतो तयार
होते पेन उशाशी त्यावर मस्तकभार
पसरली होती यमके सभोवार
जुळवून ठेवलेली स्वहस्ते हळुवार 

अप्रिय न कोणताही मज विषय
कापूस भुईमुग अभंग ते प्रेमभंग
शब्द ते केवळ जणू यमकाची सोय
कठीण वृत्त मात्रा आर्या अन विक्रीडित
सोपा मुक्तछंद तेवढा आपला होय 

अव्यक्ताचे व्यक्त यासाठी बनली भाषा
व्यक्ताचे अव्यक्त ही कविची अभिलाषा
मला दिसे कसे सगळे संदिग्ध अन धूसर
न दिसे रवि ते दिसे मज हा दंभ मनावर
पण हाय ती भार्या! आणी क्षणात भूतलावर
म्हणे लावा तो चष्मा जो चमके टकलावर

खिन्नवदनी नि:श्वास निपचीत प्रतिभा
कशाची स्फूर्ती अन काय नुसतीच शोभा
तरल अंतरंग माझे कसे कळावे माझ्या प्रियेला
अंतरंगीचा फाटका बनियन तेवढा तीक्ष्ण नजरेला
न आवडे तरी ती आवडी नशिबी तुकारामाला
कळला न सॉक्रेटिस कुणा, देत हाती विषप्याला

गळली स्फूर्ती झाली उपरती
कशाची पालखी अन कशाची दिंडी
पसरली यमके तडकला अनुप्रास
तरल संवेदनांची लक्तरे कडीपाटास
मोजून चार रसिक जमले वेदना ऐकावया 
ऐकण्या कसले आले खांदा द्यावया 

8 comments:

  1. वा मंदार, काय मस्त कविता अन काय प्रभावी प्रतिभा…
    तू लिहायला सुरुवात करायचा अवकाश पुढचं सार नकळत घडतं जात काय रे?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विद्याताई. सुचलं की लिहितो. बरेच वेळा मनात असतं, फक्त प्रकट झालेलं नसतं.

      Delete
  2. सुंदर, संवेदनशील ..Manasi Palkar

    ReplyDelete
  3. सुंदर, संवेदनशील ..Manasi Palkar

    ReplyDelete