Saturday, January 19, 2019

पाडगावकरांचं सुख

नमस्कार, हे आकाशवाणी जळगांव स्टेशन आहे. "गंध मराठी कवितेचा" या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमांतर्गत आपण आपल्याला भावलेल्या, मनात रुंजी घालणाऱ्या कवितेचं रसग्रहण करतो, वाचन करतो. आजची कविता आहे मंगेश पाडगांवकर यांची. 

कवितेचं नाव आहे - *सुख माझ्या नजरेतून*


सुख सुख म्हणजे  नेमकं काय असतं ? 
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं,
सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं,
नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं,
हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं,
डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं,
वाटेत पडलेलं केळीच साल आपणच उचलणं,
टपरी वरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....

एखाद्या चिमणीला जवळून बघणं,
हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं,
एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....

खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं,
रातराणीचा सुगंध उरात साठवणं,
पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....🌸

पाडगांवकरांची ही कविता सुख म्हणजे काय ते नेमकं सांगते. नित्याच्या गोष्टी करत असताना आपण त्यातल्या आनंदाकडे दुर्लक्ष करत असतो, आणि एक उरकायचं काम किंवा कर्तव्य म्हणून ती कामं करत असतो. पाडगावकरांच्या या कवितेनं "अरेच्या, आपण आनंदाच्या खजिन्यावर बसलो आहोत आणि आपल्याला त्याचा पत्ताच नाही" असंच वाटतं. साध्या गोष्टींतून किती आनंद भरला आहे, चराचरात तो भरला आहे, आपण असे करंटे आहोत की आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. पुलं म्हणतात तसं आपण फणस सोलून गरे फेकून देऊन साली चावत बसलो आहोत. समाधान सुद्धा अनुभवायला शिकायला लागतं. ही कविता आपल्यालानेमकं तेच शिकवते. कविता वाचून तृप्त झालेलं मन समाधानी होतं. अशाच समाधानी अवस्थेत  या कवितेला थोडंसं माझंही ठिगळ जोडावंसं वाटतं. पाडगांवकर आज नाहीत, त्यामुळे हे धारिष्ट्य करावंसं वाटतं. पण मला वाटतं या माझ्या ठिगळातही त्यांनी आनंदच शोधला असता. 

तळहातीचा फोड हळुवार कुरवाळणं
जखमेवर हलकीशी फुंकर घालणं
दु:खाशिवाय सुख नाही हे कळणं
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

मंगेश पाडगांवकर यांना हे कडवं अर्पण करतो आणि आजचा आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद!

1 comment: