आज पहाटे तीन वाजता उठलो. काल दोन वाजता उठलो होतो त्या तुलनेत हे बरंच असं
वाटलं. बाकीचे ढाराढूर झोपले होते. टीव्ही लावावा का असा विचार करत होतो
पण त्यांची झोपमोड होऊन सगळ्यांनी मला झापलं असतं. झापण्याचं तेवढं काही
नाही, त्याची सवय आहे, पण बायकोही उठली असती. ते महागात पडलं असतं.
चवड्यावर चालत आवाज न करता किचनमध्ये गेलो. फ्रीज उघडून पाहत उभा राहिलो.
एकही मनाजोगता पदार्थ दिसेना. तेवढ्यात फ्रीजचे दारं उघडे राहिल्यामुळे
त्याने ठणाणा करायला सुरुवात केली. चपळाईने तो बंद करत चडफडतच पुन्हा
दिवाणखान्यात येऊन उभा राहिलो. भूक तर लागली होती. मग एक आयडिया आली. तसाच
पायजमा ढगळ शर्टावर चप्पल चढवून हळूच बाहेर पडलो आणि फर्ग्युसन रस्ता धरला.
वैशालीत जाऊन जे मिळेल ते हाणायचंच असं ठरवून निघालो. चार वाजता पोचलो तर
काय, रस्त्यावर कुणीही नाही, आणि वैशाली तर उघडलंही नव्हतं!!!😡😡😡
$&&@@&! गडबडीत फोनही घरी राहिला होता. तसाच रस्त्यावर उभा
राहिलो. च्यायला पुण्यातले लोक दुपारी झोपतात, रात्रीही झोपतात, सकाळी
निवांत उठतात, मग पुण्यातले लोक फार जागरुक असतात अशी वदंता का असा विचार
करू लागलो. शेवटी अशी समजूत करून देणाराही एखादा सुपीक एकारान्ती पुणेरीच
असणार असा विचार करून मन शांत केलं. रस्त्याच्या कडेला काही प्लास्टिकचे कप
पडले होते. कधी या लोकांना सिव्हिक सेन्स येणार आहे असं पुटपुटत ते उचलून
तिथेच असलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकले. डब्यावर “स्वच्छ पुणे, सुंदर
पुणे” असे लिहिले होते. काही तरी चुकतंय असं वाटलं. या वाक्यात पूर्वी
“महापौर पुणे. -हुकूमावरून” असेही शब्द असायचे. ते कुठे गेले? त्या
शब्दांवाचून त्या डब्याचे सौभाग्यलेणेच पुसले गेले आहे असं वाटलं. च्यायला,
पूर्वीचं पुणं राहिलं नाही. कचऱ्याचा डबा ही महापौरांची हक्काची जागा
होती. महापौर गेले, त्यांचं “हुकुमावरून”ही गेलं.
विचारात गढून गेल्यामुळे पहाटेची “हरि ओम” जमात बिळातून बाहेर येऊन कधी हनुमान टेकडीकडे जाऊ लागली होती ते कळलंच नाही. बरेचसे तरुण वृद्ध मफलरमधे गुंडाळलेले होते. ते वृद्ध होते हे त्यांच्या रस्त्याच्या मधोमध बागेत बागडायला आल्यासारख्या चालण्यावरून लक्षात आलं. मी सारखा वैशालीच्या बंद दरवाजाकडे पाहत होतो. प्रयत्न केला असता तर मुक्ताबाईसारखं “ताटी उघडा हो ज्ञानेश्वरा” टाईप अभंग वगैरे रचला असता. वैशालीचे मालकही तसे बऱ्यापैकी स्थितप्रज्ञ चेहऱ्याचे आहेत. हातावर उकळतं सांबार पडलं तरी चेहऱ्यावरचे भाव बदलणार नाहीत. साधनेच्या एवढ्या उच्च कोटिला पोचणे सहजसाध्य नसते.
“काका, दोन पिशव्या द्या!”
या उद्गाराने भानावर आलो. पाहिलं तर वैशालीच्या शेजारच्या बोळातून एक तरुण रत्न बाहेर आलं होतं. NY असं लिहिलेला टीशर्ट, स्वेट पॅंट्स, अर्धेन्मीलीत डोळे अशा अवस्थेत शंभराची नोट माझ्यासमोर धरून,”काका, दोन पिशव्या द्या. चितळे!” चाललं होतं. मला काही कळेना. मग लक्षात आलं. माझा पायजमा, शर्ट आणि एकूण अवतार पाहून बहुधा याला मी दूध विकायला उभा आहे असं वाटलं असावं. मी त्याला “दूध संपलं आहे” असं सांगून आणखी पुढे पाठवला. आता पोटात मात्र कावळे ओरडायला लागले होते. दोन कारटी आली. खांद्याला थैल्या अडकवलेल्या. माझ्याकडे निरखून पाहत होती. चेहऱ्यावर भाव आंधळ्याला रस्ता पार करून देणारा. म्हणाली,”काका, आळंदीच्या पालखीची वाट पाहताय का? त्याला अजून चार पाच महिने आहेत.”. माझा चेहरा पाहून दोघे सटकले. त्यांच्या सत्कृत्याच्या वहीत नोंद झाली नाही.
एका मफलरमंडित हरिओमला थांबवून विचारलं,”अहो केव्हा उघडेल हो हे हाॅटेल?” त्या गृहस्थांनी मला दहा सेकंद नुसतं रोखून पाहिलं. मग म्हणाले,”ते काही गुप्तपणे उघडणार नाहीत. तो दरवाजा उघडला की समजायचं, आत जायला हरकत नाही.” असं म्हणून ते फुटले. त्यांचं फुटणं म्हणजे जणू काही शुभशकुनच वाटावा अशा पद्धतीने वैशालीचं दार उघडलं. मी यष्टी लागल्यावर ज्या चपळाईने खिडकीतून रुमाल टाकून सीट धरतो त्या चपळाईने आत गेलो. एकूण एक टेबल मोकळं पाहून मला गहिवरून आलं. पूर्वजन्मीची पुण्याई कामी आली असंच वाटलं. पुढे काय झालं काही कळलं नाही. त्या दोनेक मिनिटांच्या आठवणी धूसर आहेत. बैलांचा कळप खूर बडवत माती उधळत येतो आहे असा आवाज झाला आणि मी पापणी बंद करून उघडल्यावर यच्चयावत टेबलं भरून माणसांनी भरून गेलेली दिसली. 😡😡 व्हाॅट द हेक?? तीन तास बाहेर पुतळा झाला होता, आता आत आल्यावरही पुतळा?
संतापाचा कढ ओसरल्यानंतर पुन्हा टेहळणी केल्यावर एका चार जणांच्या टेबलावर एक खुर्ची रिकामी असल्याचं दिसलं. आता लाजबिज केव्हाच सुटली होती. टेबलावरच्या तिघा जणांच्या त्रासिक नजरेकडे दुर्लक्ष करत खुर्ची धरली. बसल्या बसल्या पाण्याचा ग्लास जणू माझ्या ओठावरच धरल्यासारखा समोर आला. “हं!” वेटरमहाराज कण्हले. याचा अर्थ काय गिळणार ते लवकर सांगा. “मेदू.. मेदूवडा सांबार!” माझ्या तोंडातून शब्द गळले. “आणि काॅफी” हे माझे शब्द बापुडे होऊन वारा झाले. मोजून तिसऱ्या मिनिटाला साडेतीन इंच व्यासाची खोलगट बशी दोन मेदूवडे आणि त्यांना जेमतेम भिजवेल एवढं सांबार असं पुढे आलं. आईस्क्रीमवर जशा चेरीज ठेवाव्यात तसे भोपळ्याचे तुकडे त्या वड्यावर शोभून दिसत होते. मी,”चटणी?” असं विचारल्यावर वेटरमहाशय आत गेले आणि चटणीची वाटी घेऊन आले. त्यांनी ज्या पद्धतीने ती वाटी माझ्यासमोर सरकवली ते पाहून मला वाटीबरोबर आलेले दोनतीन अदृश्य शब्दही दिसले. मग मी सगळं गेलं गा च्या गा त असं म्हणून प्रथम सांबाराचा दीर्घ वास घेतला. मन तत्काळ उडपीला जाऊन परत येताना जरासं कारवार बघून आलं. चमच्यानं एक घास तोंडात घेतला आणि आहाहाहा असा उद्गार काढला. शेजारच्या तिघांनी डोसे घेतले होते. माझ्या बाजूच्यानं पेपर डोसा घेतला होता त्याचा साधारण चार इंच डोसा माझ्या कार्यक्षेत्रात येत होता. मी गमतीनं त्याला म्हणालो,”तुमच्या झाडाची फांदी माझ्या भागात आलीय, तोडू का?” त्याला धक्का बसला असावा. मी ते वाक्य तोंडात मेदूवड्याचा जरा मोठाच घास घेऊन बोललो होतो. त्याला माझ्या मानसिक स्थैर्याविषयी संशय आला असावा. कारण त्याने चटकन डोशाचा चांगला सहा इंचाचा भाग दुमडून आपल्या अधिकारक्षेत्रात घेतला. तो डोसा मोडल्यामुळे त्याच्या पोटातील सुवर्णकांती बटाटाभाजी दिसू लागली होती. तिच्याकडे मी अनिमिष डोळ्यांनी पहात राहिलो. मग भानावर येऊन मेदूवड्यावर लक्ष केंद्रित केलं. आता वड्यांनी सांबार पार शोषून घेतले होते. असे सांबाराने संपृक्त असे ते वडे माझं आयुष्य समृद्ध करत होते. समाधी लागण्याचाच अनुभव होता तो. काऊंटरवरून मालक निर्विकारपणे पाहत होते. त्यांच्या डोक्यावर तिरुपतीचा फोटो लावलेला होता. त्याच्यासमोर उदबत्ती. ताजी पूजा केलेली. ज्याने ज्याने अशा वातावरणात डोसा, मेदूवडा इडली सांबार इत्यादि दैवी पदार्थ खाल्ले आहेत ते स्वर्ग वगैरे फाट्यावर मारतात.
फाटकन समोर बिल पडले. मी बिल घेऊन उठतोय न उठतोय तेवढ्यात एक माझ्या खुर्चीवर बसलाही. समाधी उतरली. पण दैवी तेज घेऊन बाहेर पडलो. जेट लॅगचा प्रभाव उतरला होता. ओशो उत्तरेकडे जन्माला आले म्हणून. दक्षिणेत जन्मले असते तर नक्की “सांभारातून समाधीकडे” लिहिलं असतं.

No comments:
Post a Comment