लेक्चर आणि मी यांचं नातं परस्पर आदरावर टिकून आहे. मी फारसा कधी त्याच्या वाटेला गेलो नाही आणि त्यानंही कधी माझी वैचारिक पिसं उपटली नाहीत. माझी वैचारिक पिसं मोराप्रमाणे आहेत. पिसारा छान येतो फुलून, पण बूड उघडं पडतं. पण ते केवळ मलाच माहीत असतं. त्यामुळे मोराप्रमाणे मीही समोरच्याला मोहऱ्यावर ठेवतो. तर, काय सांगत होतो... हां, ते लेक्चर प्रकर्ण. कॉलेजात फक्त काय ते एक खांडेकर सर होते मला समजून घेणारे. तेवढे एकच सर तासाला झोपू द्यायचे. स्वभावच प्रेमळ त्यांचा. त्यांचा तो संथ एकसुरी आवाज अंगाईगीताप्रमाणे वाटे. रात्री पत्र्यावर पावसाची तडतड ऐकताना कशी छान झोप लागायची ना, तश्शीच अनुभूती सरांच्या लेक्चरला यायची. माझं डोकं ही तसं पत्र्यासारखंच आहे म्हणा. ऊन पाऊस थंडी काही काही मेंदूपर्यंत पोचू देत नाही. लेक्चर तर दूरची गोष्ट. नोट्स वगैरे घ्यायचा प्रश्नच नव्हता. काही माहीत नसेल तर पास होण्याची शक्यता जास्त असण्याचा विषय ते शिकवीत. बीमवर वजन ठेवल्यावर तो वाकतो आणि त्याच्या बुडाला तणाव उत्पन्न होतो हे कळायला पंचेचाळीस मिनिटांच्या गुंजारवाची गरज नव्हती. ते ज्ञान मी इयत्ता चौथीतच ओणवं राहताना मिळवलं होतं. पाठ आणि कंबर बहिर्वक्र झाल्यावर कुठे तणाव उत्पन्न होतो हे तिथेच पक्कं झालं होतं.
मी पूर्वजन्मी (तो असलाच तर) बरीच बारीकसारीक पापे केली असावीत. कारण हे मास्तर माझ्या राशीला पूर्वीच आले होते. संघाच्या शिबिरात बौद्धिक नावाचा जो भीषण प्रकार चालतो त्यात हे सर कायावाचामने सहभागी होत. "अरे, मोजून पाचव्या वाक्याला झोपवतात अशी संघात त्यांची ख्याती आहे, काय समजलास!" असे आमचे प्रिय मित्रवर्य मोरेश्वर ऊर्फ मोरू याने शिबिर सुरू व्हायला एक दिवस असताना सांगितले होते. मी जावे की नाही असा विचार करत असताना विभागाचे "पूर्णवेळ" घरी आले आणि आमच्या तीर्थरूपांकडून मी शिबिराला जाईन याचे वचन घेऊन गेले. मोऱ्याही काही सुटला नव्हता. ते त्याच्याही घरी गेले असणार. नंतर त्याला शिबिरात एवढेसे तोंड करून फिरताना पाहिले आणि मी दात काढले. त्यावर तो प्रचंड रागावला होता. पण या संकटकाळात मीही असणार आहे या विचाराने त्याने तो राग बुडवून टाकला होता. त्याने त्याच्या स्वभावाला न शोभणारे छद्मी स्मित केले होते. त्याने पूर्वी एक शिबिर केले होते. लेकाच्याला काही तरी माहीत आहे, पण सांगत नाहीये हे मला जाणवलं होतं. एरवी जिवाला जीव देण्याच्या गप्पा करणारा मोरू इथे माझ्यापासून काहीतरी लपवत होता. मग शिबिराच्या विविध कार्यक्रमांत मी ते विसरून गेलो. वेळापत्रकात दीपनिर्वाण नावाचा एक आकर्षक शब्द होता. त्या कार्यक्रमाकडे लक्ष ठेवून मी होतो. त्याच्या आधीच्या शब्दाकडे माझे दुर्लक्ष झाले होते. रात्रीच्या जेवणानंतर बौद्धिक ठेवावे ही सूचना संघातील ज्या कुणी केली असेल तो मनुष्य मानवजातीच्या मानसिक सुखाच्या विरोधात असावा एवढेच मी म्हणतो. जेवणानंतर चला, आता झोपूया असे म्हणून मी राहुटीकडे कूच करणार तेवढ्यात आमच्या सायंशाखेच्या मुख्य शिक्षकांनी "थांबा! जाता कुठे! ते दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत" अशा थाटात आम्हाला बौद्धिकाच्या दिशेने हाकलले. त्या निष्पाप कळपात मोरूही आला होता. अग्रेसर अशी आज्ञा ऐकल्यावर लेकाच्याने मला पुढे ढकलून आपण मागे राहिला होता. मी गाफील होतो. उपविश होता होता समोरून खांडेकर सर अवतीर्ण झाले. मोरू माझ्या मागे बसला होता. त्याने सांगितल्याप्रमाणे खरोखरच मोजून पाचव्या वाक्याला त्याचे डोके माझ्या पाठीवर टेकल्याचे जाणवले होते. माझ्या समोर मात्र कळिकाळाची निर्वात पोकळी आणि त्यात अंगठ्यावरसुद्धा केस उगवलेली सरांची पावले. "आता कोठे धावे मन, तुझे चरण...." या पंक्तिंचा अनुभव हा असा यावा याचे मला वाईट वाटले होते. मी जागा झालो तेव्हा राष्ट्र संकल्पना, त्याचे पुनर्निर्माण संपले होते. तंबूत निजानीज झाली होती. काही वेळापूर्वीच राष्ट्रीय पुनर्निर्माणाची जबाबदारी खांद्यावर दिले गेलेले स्वयंसेवक, प्रवाशाने गाठोडे बाजूला ठेवून अंमळ आडवे व्हावे तसे दमून झोपले होते. विषय घनगंभीर होता, पुनर्निर्माणाचे ओझे गंभीर होते, त्याला तेवढ्याच घनगंभीर विश्रांतीची गरज होती.
तात्पर्य, भाषण देऊन विरोध संपवणे, विरोधकांना नकोसे करून सोडणे ही कला आहे. ते संघाचे कुरण. तिथे बाकीचे कुणी चरू नये. नाही म्हणायला आतडी पिळवटून बोलणारे लाल बावटे आणि काही समाजवादी त्याला अपवाद. पण त्यांचं भाषण ऐकायला समोर बसलेली मंडळी आधीच "टाकून" आलेली. "मायला, काय बोंबलतंय कुणाला म्हाईत, मोर्चा कधी आन कुटं ते सांगा" या टायपातली. आणि दुसरीकडे आपली प्रिय काँग्रेस पार्टी. बौद्धिक, अभ्यास आणि भाषण यापैकी काहीही असण्याची गरज नसलेली. बाईंनी आणि त्यांच्या घराण्यातील कुणीही व्यासपीठावर उभे राहून काहीही म्हटले तरी टाळ्या वाजवणारी. "मान्नीय" हा शब्द उच्चारून मग स्टेजवर बसलेल्या तीस चाळीस जणांची नावं घेण्यातच भाषण संपायचं. मुद्द्याला कुठे हातच घालायचा नाही. मुळात मुद्दाच नसायचा काही. सगळ्यांचेच धंदे रात्रीचे. दिवसा वेळ भरपूर म्हणून सभा वगैरे करायच्या. निवडणूक असेल तर क्वार्टर आणि गांधीबाबा यांचं दर्शन होईल या आशेनं जायचं. मोठमोठ्या गप्पा न करता पोटापाण्याची सोय करणारा हा एकमेव पक्ष. म्हणून तर अजून लोक आशेवर आहेत. केव्हा हा पक्ष सत्तेवर येतोय आणि आम्ही गूळ कुजवायला टाकतो असं झालं आहे काही लोकांना. जुगार, सट्टा, मटका, हातभट्टी, स्मगलिंग, साठेबाजी या क्षेत्रात प्रचंड प्रगती केलेले आज याच आशेवर आहेत. पण काय दैव आहे पहा, या कावळ्यांतूनच, हंस जरी नसला तरी, ढोक म्हणता येईल असा एक पक्षी आज बर्कलेसारख्या विद्यापीठात भाषण देऊन आला. या भाषणात मला अजिबात झोप आली नाही. निखळ करमणूकीचा आनंद देऊन गेलं हे भाषण. "आज मी फक्त पंधरावीस मिनिटेच बोलणार आहे" या वाक्यानंच मला जिंकलं. अंदमानचे मासे आणि आदिवासी ही कथा तर विलक्षण होती. मी आता अंदमानला जायचा निश्चय केला आहे. लेक्चर असावं तर असं. उगाच राष्ट्रीय राष्ट्रीय म्हणत लोकांना झोपायला भाग पडू नये.