Thursday, March 9, 2023

गजालगीता महाभारत पर्व - प्रपोजाध्यायः

दुर्योधन बोलतासा

रे दुःशासना वांयच ऐक माजा

सकाळ सकाळ नको रे 

चाय आणि खाजा

कौरवांचो मान जरा ठेय

पांडव बग कशे मारतंत मजा


दुःशासन बोलता

काय केल्यांनी आता पांडवांनी

एक दिवस पण जगूचा नाय धडपणी

तू बसतंय घेवन नवटाक नवटाक फेणी

मांयझयो माझो हो चा पण लागता फुळकवणी


दुर्योधन बोलतासा 

आयक रे जरा तोंड बंद ठेय

आज व्हॅलेंटाईन तेची कर कायतरी सोय

द्रौपदीन आज मेकअप केल्यान ऐकलंय

वांयच जावन जरा बघूया विचार करतंय


दुःशासन बोलता

होय रे होय मी तेका मगाशीच बघितलंय

पानदीतसून जाय होता विदुराच्या घराकडे

बरी गावली म्हणान गेलंय तर

वशाडी ईली हो कृष्ण येवन उभो रवलो पुढे


माका सांगता नवीन घर बांधल्यानी

तुमच्या चौपट कार्पेट एरिया केल्यानी

संध्याकाळी म्हाळ आसा या सगळ्यांनी

बरोबर घेवन या तुमच्या व्हॅलेंटायनी


दुर्योधन बोलतासा

आवशीक.. आमच्या खंयच्या व्हॅलेंटायनी

जी होती तेका पांडवानी केली आमची वयनी

आणि म्हाळाक जावन करूचा तरी काय

वाटाण्याचा सांबारा घावणे खांवचा की काय


कृष्ण प्रकट होऊन बोलतासा

सुधरा रे मांयझंयांनो आता तरी

दुःशासना तू तर एक नंबर पदरधरी

दुर्योधना, द्रौपदीकडे तू बघूपण नको

तोंड वर करून चाललंस तर पडतलंय

ह्या विसरा नुको..


अशा शब्दांत श्रीकृष्णान दुर्योधनाची आवाजी बंद केल्यान एकाच श्लोकात..


इतिश्री व्हॅलेंटाईन सप्ताह प्रपोजाध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

विनोदाची टेम्प्लेट

 विनोदी कसे लिहावे असा प्रश्न बरेच जणांना पडत असेल. ते विनोदी लिहायला जातात पण हाहाऐवजी निळे लाईक मिळतात किंवा बदाम मिळतात. विनोद करण्याची सोपी आणि घरगुती रेसिपी देणं गरजेचं वाटतं. या रेसिपीला अक्षरशः काहीही साहित्य चालते. नारळाच्या काथ्यापासून भरजरी रेशमी वस्त्रापर्यंत आणि मोहरीपासून भोपळ्यापर्यंत काहीही चालते. काहीही वर्ज्य नाही. जे समोर दिसेल ते. वेळेला केळं नि उपासाला रताळं ही म्हण काही उगीच नाही आली. तेव्हा साहित्य काहीही चालते हे लक्षात ठेवावे. 


रेसिपी अशी -

लक्ष्य केलेले साहित्य नीट न्याहाळावे. त्यात काही वैगुण्य सहज दिसल्यास पुढची कृती सोपी आहे. 

उदाहरणार्थ - एखाद्याने Feeling excited in my new बनियन अशी पोस्ट टाकली असेल तर (हो, कालच घाईची लागल्यानंतर पोट मोकळे झाल्यावर जी काही विलक्षण अनुभूती असते यावरही एकाची एक विस्तृत पोस्ट होती. त्यापुढे बनियन पोस्ट ही बाब फारच किरकोळ आहे.) - 


१ बनियनला मोठे भोक दिसल्यास भोक ही मुख्य वस्तू हायलाईट करावी. वाह! छान मिळालं हो हे भोक तुम्हाला! जयहिंद कलेक्शन्स की पिसे टेलर्स? शिवून घेतला की रेडीमेड? भोकाबरोबर बनियन फ्री अशी ऑफर पाहिली होती परवा. असे काही तरी लिहावे.


२ बनियनला बारीक भोक असल्यास - अशी बारीक भोकं असलेला बनियन घेण्यापेक्षा जाळीचा का नाही घेतला? अमर अकबर ॲंथनी मधील ऋषिकपूरच्या बनियनची आठवण करून देणे. असा जाळीचा बनियन पाहिला की थेट बकरे, कोंबड्यांचा वास असलेले गावातले उस्मानचिच्याचे हलाल झबीहा हे दुकान आठवले असे आवर्जून सांगावे.


३ बनियनला भोक नसल्यास - अरे वा! हल्ली भोकवाले बनियन मिळणं बंद झालं की काय? काय छान वायुवीजन व्हायचं! पूर्वीची ती भोकंच काय क्वालिटीची असत असे टोमणे मारावेत.


४ काहीच वैगुण्य न आढळल्यास अथवा वरील विनोदी पद्धती आधीच कुणी वापरून गेले असेल तर मग आपण स्थानमहात्म्यावर उतरावे. तुमच्या भिकारपुरात बनियन चांगले मिळत नाहीतच. आमच्या टुकारपुरात येऊन पहा, माणूस मरेल पण बनियन टिकून राहील. आमच्या गावातले बनियन अफगाणिस्तानला एक्स्पोर्ट होतात. तिथे ते बुलेटप्रूफ जॅकेटच्या आतून अस्तर म्हणून वापरतात. अमेरिकन सैनिक जॉन डो याने आमच्या गावात तयार झालेला बनियन पॅराशूट फेल झाल्यावर पर्याय म्हणून वापरला. दुर्दैवाने जॉन हा जोरात जमिनीवर आदळल्याने मृत्यू पावला पण बनियन मात्र झाडात अडकूनही जसाच्या तसा राहिला. असे काही तरी तीक्ष्ण बुद्धिदर्शक लिहावे. आपल्या गावात वास्तविक सगळे उघडे फिरत असतात हे लक्षात ठेवून आपल्याच गावबांधवाच्या पोस्टवर टिंग्या मारू नयेत हे लक्षात ठेवावे. “अबे का फिजूल फोका मारून रायला बे” हे पुल देशपांड्यांचे वाक्य लक्षात ठेवावे.


५ सर्वात शेवटी, निखळ विनोद करायचा असेल तर वरीलपैकी काहीच करू नये. सर्वथैव वेगळ्या विषयावर सर्वांना हसण्यासारखे काही लिहिता आले तर ते लिहावे, आपण हसावे, इतरांनी आपल्याबरोबर हसावे. प्रत्येक वेळी आपण विनोदी असायलाच हवे हे प्रेशर घेऊ नये. टोमण्यांतून विनोदनिर्मिती होते असा समज प्रचलित झाल्याने ते वापरणे सोपे वाटते. पण ते टाळावे. ते वर उल्लेखलेल्या एका पोस्टप्रमाणे, विनोदाची नैसर्गिक कळ आली तरच विनोदी लिहावे. 


६ हे जमत नसेल तर सरळ हॉंटसांपला शरण जावे. तिथे आलेले विनोद जणू काही इतरांकडे हॉंटसांप नाहीच असे धरून बिनधास्त पोस्टावेत. तेही लोक विनोद आधीच वाचलेला असूनही “हॅहॅहॅ…आमी हाय बरं का तुमच्या पोस्टवर” वाले असतात, हाहा करून जातीलच. अगदी खाली स्वच्छ c/p WhatsApp असं लिहिलं तरी नव्यानेच वाचल्यासारखे हाहा करणारे करुणाशील वाचक अस्तित्वात आहेत हे लक्षात ठेवावे. ही सगळ्यात सेफ आणि पॉप्युलर रेसिपी असून आपल्या अवतीभवती अनेकजण हीच फॉलो करताना दिसतील. Watch and learn.. Watch and learn.

प्रेमाचे अद्वैत

 मी अन् तू

तू अन् मी

तू म्हणजेच मी

मी म्हणजेच तू

मी मला गुणावे

तर तुलाही आपोआप मी गुणावे

माझ्यातून तुला वजा करावे

तर माझे अस्तित्वच विरावे

मी मला विस्कटावे

तू तुला वेगळे करावे

सारखेपण संपल्यावरही

तू आणि मीच उरावे

तरीही…

दोघे म्हणजे एकच असावे

प्रेम म्हणतात ते हेच असावे

प्रेम म्हणतात ते हेच असावे

- कवी सॉक्रेटिस, बाभूळगाव


अशाच काहीशा भावना प्रा. ज्ञानेश्वर झिरपे, अण्णासाहेब जाधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भुदरगड (विषयः गणित) यांनी त्यांच्या कवितेत व्यक्त केल्या आहेत. दोघेही कवी “दोन शरीरं पण एक मन” या वैश्विक निष्कर्षापर्यंत आले आहेत हे पाहून आपण थरारून जातो.


Lt a -> b (a ने b ला पाहिले, आणि b कडे ओढला गेला. पण लिमिट ओलांडली नाहीय. संस्कार!)

a = b

a^2 = ab

a^2 - b^2 = ab - b^2

(a+b) (a-b) = b(a-b)

(a+b) = b

(b+b) = b

2b = b

2=1


कोण म्हणतो गणितात भावना नाहीत? माणूस चेहऱ्याने मख्ख असला तरी त्याच्या हृदयी प्रेमाचा झरा झुळूझुळू वाहत असू शकतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते, गणिताचे मास्तर वरकरणी कितीही रुक्ष आहोत असे दाखवत असले तरी आतून प्रेमाचे भुकेले असतात. असोल्या नारळात जसे लुसलुशीत खोबरे आणि पाणी असते तसे. प्रेमाला कुठलीही भाषा समजते.


तटीः उगाच झीरो डिव्हायडेड बाय झीरो ही मीनींगलेस क्वांटिटी आहे वगैरे सांगून मोडता घालू नये. प्रेमाच्या जगात सगळंच मीनींगलेस असूनही सगळं मीनींगफुल असतं आणि झीरो तोच हीरो असतो.

- मंदार वाडेकर

महापुरुष पिंपळ

 आयुष्यातला एखादा महापुरुष येतो तसा हा पिंपळ. चांगला वीसएक फुटांचा परीघ असलेला. खूप लहानपणच्या आठवणी धूसर का होईना त्यातली एखादी गोष्ट तरी अगदी ठळक असते. माझ्या त्या धूसर झालेल्या आठवणींतील हा जिताजागता पिंपळ एक ठळक आठवण. याच्याबरोबर दीस उजाडायचा आणि याच्याबरोबरच संपायचा. खेळणं, उंडारणं याच्याबरोबर, दुपारच्या संथ शांततेत पानांची सळसळ ऐकणं याच्याबरोबर, संध्याकाळची पानगळ पाहणं याच्याबरोबर, अंधार पडल्यानंतर वर बसलेल्या मुंजाला शोधणं याच्याबरोबरच. केवळ आईनं आता घरी ये नाही तर बघते तुझ्याकडे अशी धमकी दिल्यावरच याच्या पारावरून हलायचं. याच्याच पुढ्यात हंगामानुसार खेळ व्हायचे. स्वत:ची फळकूट नसलेली, खरीखुरी पहिलीवहिली बॅट घेऊन मी खेळलो ते यानंच पाहिलं. कडाक्याच्या थंडीत ढोपरं फुटलेली, ठेचा लागून अंगठे फुटलेले यानंच पाहिलेलं. वसंतात कोंब फुटायचे याला. तसे सगळ्या झाडांनाच फुटतात, पण याचे कोंब वेगळे. ते खुडायचे, लांब शंकूप्रमाणे असलेला तो कोंब जिभेवर ठेवायचा आणि त्यातून हवा शोषून हुबेहूब एखाद्या चिकचिक्याप्रमाणे (एक छोटा पक्षी) आवाज काढायचा. स्वत:चा कोंब खुडल्याचं दु:ख विसरून माझ्याबरोबर त्या आवाजाचा आनंद घ्यायचा तो हा पिंपळ. उन्हाळ्यात दुपारी सर्वत्र नीरव शांतता असताना मी आणि माझ्यासारखाच एक महाउपद्व्यापी मित्र या पाराच्या दगडांमध्ये घरं करून राहिलेले विंचू शोधत बसायचो. हिरवागार हीर (नारळाच्या पानाची काडी) घ्यायचा, त्याच्या लवलवत्या टोकाची आकडी करायची आणि बिळात घालायची. कुठल्या कपारीत विंचू असेल हे ज्ञान आम्हाला कसं आलं हे कुणालाच माहीत नाही. पण शंभर टक्के असायचाच. मग तो विंचू त्या आकडीला पकडायचा. ती ओढ जाणवली की सर्रकन हीर ओढायचा. भली मोठी इंगळी बाहेर पडून आमच्याच पायाशी पडायची. मग पाच दहा मिनिटं तिचं निरीक्षण करून तिला परत त्याच हीराने दगडात सोडायचं. तीही बिचारी “च्यायची कटकट” म्हणत गायब व्हायची. पुढे आम्ही हे बंद केलं. मुका जीव तो.


या पारावर हनुमानाची इटुकली देवडी. पूर्वी ही नुसतीच देवडी होती. हे पत्र्याचं छप्पर कुणातरी दिव्य आर्किटेक्टची नंतर झालेली कृपा असावी. हनुमान जयंतीला अगदी पहाटेपहाटे जायचं आणि नमस्कार करायचा. खूप खूप काही मागावं असा विचार करून तिथं गेलेला मी, प्रत्यक्षात तिथं काहीच मागायचो नाही. मन कसं रिक्त, समाधानी असायचं. काहीही न मागता या पिंपळानं सगळं दिलं. जे पैशाने कधीही विकत घेता येणार नाही असं बालपण दिलं. जोवर हा असेल तोवर माझं ते बालपणही कधी हरवणार नाही.


फोटो क्रेडिटः Subodhan Kashalikar


त्या वळणावर

 असशीलच तू इथे

माझं नाव ओठांत घेऊन

आणि एक स्वप्न घेऊन

या वळणावर


असशीलच तू इथे

जीवघेणी तान होऊन

सुखाची भैरवी देऊन

या वळणावर


असशीलच तू इथे

दंवबिंदूचं रूप लेऊन

त्याचं इवलं इंद्रधनु होऊन

या वळणावर


असशीलच तू इथे

राधेचं मन होऊन

प्रेमाला पूर्णत्व देऊन

या वळणावर


असशीलच तू इथे

जन्मजन्माची सखी होऊन

अथांग अनंत होऊन

या वळणावर

-मंदार वाडेकर


ग्रेस आणि तत्वज्ञान

 ग्रेसांची कविता गूढ, अगम्य, भरजरी प्रतिमांनी भारलेली असते. प्रतिमांचा हा उत्सवच असतो. दोन शब्दांची विलक्षण संधि, त्यातून अर्थ थेट समजत नाही पण नेणिवेच्या पातळीवर जाणवणे हे ग्रेसांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या प्रतिमांचा प्रत्येकाच्या तत्कालीन मनःस्थितीप्रमाणे तसा तसा अर्थ लागणे हेही त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य. चंद्रमाधवीचा प्रदेश हा शब्दसमूह वाचला की शिशिर ऋतू सुरू होत असताना येणारी निरभ्र रात्र, चमचमणाऱ्या चांदण्या, गूढ निळ्या डोंगररांगा, स्तब्ध सूचीपर्ण वृक्ष, पौर्णिमेच्या चंद्राचा सौम्य संथ प्रकाश, मंद वाऱ्याने कळत नकळत हलणारे वृक्षांचे शेंडे, खाली दंवबिंदूंनी चमकणारी गवताची पाती हे डोळ्यांसमोर येतं. पण ते तेवढंच नसतं. त्या शब्दात गूढतेची छटा दर्शवणारा डोंगररांगांच्या मध्ये आणि वृक्षांच्या माथ्यावर उतरलेला धुक्याचा समुद्रही दिसतो. हे ग्रेसांचं प्रतिमासामर्थ्य आहे. 


पण ग्रेसांची ही कविता मला तत्वज्ञानाने सत्याचा मागोवा घेणारी वाटते. ती विज्ञानाशीही एकनिष्ठ वाटते. अर्थात हा कवडसा माझ्या मनाचा कवडसा आहे. अनेक अन्वयार्थांपैकी एक.


ही धूळ धुक्यासम कोमल

ताऱ्यांच्या मागुन येते

पाण्यावर हलके हलके

चंद्राची साय पसरते.


हा प्रश्न जीवाला छळतो

टिचलेले बिल्वर हसती;

कोणत्या फुलातुन गळते

कोणत्या कळीची माती?


घे हळुहळु स्मरणाने

पानांचा तू कानोसा

झाडांच्या अगदी मागे

तुज दिसतो काय कवडसा?


माधुर्य सांडते संध्या

किणकिणती सर येताना

मेघांना कळला नाही

हलकासा रंगउखाणा


जोगवा मिळाला तेव्हा

लहरीत नाचलो होतो;

पायात मोडतो तोही

पाऱ्याचा घुंगूर असतो....


शोकातिल दाट विणीची

गुंफात अरण्ये असती

वाटेत झरा उचलाया

दगडाची लागे छाती.


तुज शोधाया मी गेलो

नक्षत्र निघाले आर्द्रा;

हळदीच्या हातामधल्या

घे काढुन अवघ्या मुद्रा.

~ग्रेस


येथे कवी विज्ञानाच्या खूपच जवळ आला आहे. धूळ, गुरुत्वाकर्षण, ग्रहनिर्मिती चार ओळींत मांडण्याचे कसब ग्रेसांपाशी आहे.


कुठल्याही जातीच्या वैज्ञानिकाला सत्याचा शोध छळत असतो. सगळ्याच्या मुळाशी शेवटी ते मातीचेच अणुरेणू आहेत.


स्मरणाच्या नोंदींचा संदर्भ घेत प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ लावत कवडशामधून येणारे फोटॉन्स हे कण नसून लाटा आहेत हे सत्य येथे उमगले आहे.


माधुर्य तरी काय आहे? न्यूरॉन्ससमूहाने एकत्र येऊन केलेला जाणिवोत्सवच ना? मेघांच्या नकळत काही फ्रीक्वेन्सी शोषल्या जाऊन रंग उधळले जातात जे आपल्याला दिसतात. हलकीशी सर आली की रिफ्रॅक्शनउत्सव होतो.


फंडिंगचा जोगवा मिळाला तेव्हाचा आनंद औरच. पायात घुंगूर लावून नाचतो तोच वैज्ञानिक. हा विनोद झाला, पण एखादे गूढ उलगडते तेव्हा ज्ञानी आनंदाचे नृत्यच करावेसे वाटते. तरीही, हे अंतिम सत्य नसून त्याच्या वाटेवरचा एक टप्पा आहे याचीही जाणीव त्या आनंदोत्सवात हळूच टोचत असते.


सगळंच काही सरळ मिळत नाही. काही गूढे उकलता उकलत नाहीत. माहिती झऱ्यासारखी वाहत राहते, गूढ एखाद्या खडकासारखे मध्ये दिसत राहते. कठीण, न उकलणारे.


एकाचा शोध घेताना भलतेच गूढ उकलणे हे काही नवीन नाही. भारत शोधायला निघालेला कोलंबस अमेरिकेत जाऊन पोचला. अशा वेळी आपण त्याचाच शोध लावत होतो असं सांगितलं की हाताला लावलेल्या हळदीप्रमाणे नवलाई दाटून येते. हे तसं शाश्वत सत्य. आयुष्यभर सत्याचा शोध घेऊन झालेला साक्षात्कार “हा शोध संपणार नाही” याचाच असावा असं ग्रेस सुचवतात. आपलं जगणं हा सत्यशोधनाचा आणि स्व-शोधनाचा अखंड प्रवास आहे असं ते सांगून जातात.

-मंदार वाडेकर

निखळ प्रेम

आमच्या घराशेजारी एका शेतकरी कुटुंबाचं आवार होतं. कोंबड्या, म्हशी, शेळ्या बकऱ्या असा बक्कळ मोठा बारदाना होता. यात एक विजोड पात्र होतं. ते म्हणजे पांढरी शुभ्र रेशमी केसांची एक पामेरेनियन कुत्री. ठार देशी गावरान घरात एखादी गोरी मड्डम सून यावी तशी ती दिसत असे. गवत, गोवऱ्या, शेणखड्डा, लाकडांची रास, कोंबड्यांनी केलेली घाण या सगळ्यात आपला पायघोळ झगा सांभाळत अलगद पायाने चालावं तशी ही कुत्री वावरत असे. दुःखी वगैरे काही नाही, ती ही सगळी आपलीच प्रॉपर्टी आहे अशा थाटात असे. तरी हे कुटुंब तिचे लाडबिड करत नसे. भाकरीचा तुकडा कधीतरी देत. मध्यमवर्गीय घरातलं “अगं हे काय व्हिके? ते काका आहेत ना आपले? त्यांच्या पायावर शू करतात का? हसतेय आणि वर!” असलं कौतुक नसे. तर.. आता सांगतो आपल्या हीरोबद्दल. त्यांच्याकडे एक गावठी कुत्राही होता. अगदी सर्वसामान्य रूप. त्याचं नाव काही अगम्य कारणास्तव त्यांनी म्हमद्या ठेवलं होतं. बरेच वेळा क्रिकेट खेळताना आमचा बॉल त्यांच्या कंपांऊंडमध्ये जात असे. अशा वेळी मात्र आमच्या या महाशयांशी सामोपचाराच्या वाटाघाटी होत. तो रोखून पाहत असताना बॉल घेऊन येणे फार जोखमीचे असे. तर ते असो. या महाशयांचे या व्हिकीवर निरतिशय प्रेम होते. लिव्ह-इन रिलेशन्स जरी असली तरी लग्नाचीच मानत असे. आम्ही बारकाईने निरीक्षण केले होते. फाटकापाशी कुणी आले की प्रथम व्हिकी ओरडे. हे महाशय कुशीवर पडून पाहत असत. ती ओरडे आणि याच्याकडे पाही. मग मात्र हे तटशिरी उठून फाटकाकडे भुंकत धावत येत. करत काहीच नसत. भुंकून झाले की परत व्हिकीशेजारी उभे राहून तिच्याकडे अभिप्रायार्थ पाहत. ती लक्षही देत नसे. 


हा म्हमद्या महा धडपड्या होता. समोर मेजर रहदारीचा रस्ता होता. ट्रक, एस्टी बसेस सारख्या जातयेत. एकदा असाच तो धावला आणि पुढचे पाय प्लास्टरमध्ये घेऊन बसला. पण तरीही अक्कल आली नाही. आठवड्यातच पुन्हा प्लास्टरसकट धावला आणि या खेपेस मागचेही दोन पाय प्लास्टरमध्ये आले. चारी पाय प्लास्टरमध्ये घेऊन पाय लांब करून पहुडलेला असायचा. जाम हसू यायचं. पण स्वारीची व्हिकेप्रतिची निष्ठा अस्खलित होती. तिला त्याच्या अवस्थेची जराही पर्वा नव्हती तरी. तर असं हे विकलांग अवस्थेत तो पडून असताना, अचानक माकडं आली. समोर सान्यांच्या आवारात जांभळाचं झाड होतं त्यावरची जांभळं खाणं हा वार्षिक कार्यक्रम करायला. त्यातला एक बलदंड हुप्प्या सान्यांच्या गेटच्या दगडी खांबावर येऊन बसला. तो यांच्यापासून १०० फुटांवर, रस्त्याच्या पलीकडे. काही अडलंय का? पण नाही, व्हिकीला ते पटलं नाही. तिने जोरजोरात भुंकून म्हमद्याकडे पाहिलं. जणू “जा, जरा बघ, नुसता पडलायस तंगड्या गळ्यात घेऊन” असंच म्हणत असावी. म्हमद्या जिवाच्या कराराने उठला. पाय तर वाकत नव्हते. तसेच ताठ पाय करत एक एक पाऊल टाकत त्या हुप्प्यापर्यंत पोचला. आणि वर बघून त्याच्याकडे पाहत जोरजोरात भुंकू लागला. पायात ताकद नसली तरी नरड्यात बक्कळ होती. त्या हुप्प्याने दुर्लक्ष केलं. पण हा गडी थांबेचना. शेवटी त्याला असह्य झालं ते. तो चटशिरी खाली उतरला आणि उजव्या पंजाने एक सण्णदिशी म्हमद्याच्या कानाखाली ठेवून दिली. म्हमद्याचे चारी पाय अचानक वेदना विसरले. गाड्यांची पर्वा न करता तो तुरूतुरू परत आपल्या आवारात आला आणि व्हिकीच्या शेजारी उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं कसंनुसं हसू आम्हाला स्पष्ट दिसत होतं. व्हिकीनं,”पडला उज्जेड. काही उपयोग नाही तुमचा!” हे म्हटलेलंही आम्हाला स्पष्ट ऐकू आलं. ती निघून जात असताना म्हमद्याचं “जानू! जानू! अगं ऐकून तर घे! पाय धड असते तर सोडला नसता त्याला! दत्ताची आण!” हे केविलवाणं बोलणंही ऐकू आलं. निखळ प्रेम प्रेम ते हे!