Sunday, July 22, 2018

धा धा तिरकिट

स्थळ - शिकाऊ तबलेनवाजांचं घर 
काळ - रियाजाचा 

तो - (लाडात येऊन)आज जरा वाजवावं म्हणतो..
ती - उगाच लाडात येऊ नकोस. रियाज कर आधी
तो - अगं, रियाजच तर करायचाय. हे बघ , पावडर, हातोडा दोन्ही आणलंय.
ती - काय करायचीय ती पावडर, हातोड्याने तयार करण्यातच अर्धा तास जातो. सुरात येतो येतो म्हणेपर्यंत तुझा उत्साह संपतो. तू जातोस टीव्हीसमोर आडवा व्हायला, इकडे तबला तसाच चढलेला राहतो.
तो - काहीही! ठोकल्याशिवाय सुरात वाजत नाही तबला. नाठाळ तबल्याला एका बाजूने ठोकलं की तो दुसऱ्या बाजूने उतरतो. बरं, जरा तबल्यावरची कव्हर्स तर काढू दे मला. नुसतं पाहून हात फिरवला तरी किती बरं वाटतं मला.
ती - माहित्येय. पण डोळे मिटून नुसतं हात फिरवल्यानं बोल निघत नाहीत.
तो - अगं पण मी वाजवतो ना?
ती - काय जळ्ळा मेला तो दादरा तर वाजवता नेहमी. धा धि ना धा ति ना. धड खालीसुद्धा नाही पुरतां त्याला. निदान त्रिताल तरी करावा कधी तरी. चांगल्या तीन टाळ्या पडतात एका आवर्तनात. पण सोळा मात्रांपर्यंत कुठले तुम्ही टिकायला? रियाज करून करून एकदा कधी काय तो भजनी ठेका वाजवला, तर त्या भक्तिरसात आमचा ठेका चुकला तो चुकलाच. आम्ही काय भजनंच करायची का सारखी?
तो - बरं बरं, आज दाखवतोच तुला. अगदी धिन धिन धागे त्रक तू ना कत्ता करून टाकतो.
ती (लाजत) - इश्शं, इतकंही नको हं काही. जरा विलंबित लयीत घ्या. एसीमध्ये तबला तापायला जरा वेळ लागतो.
तो (घाईवर येत) - आता मला तिरकिट तिरकिट व्हायला लागलं आहे. मरू दे तो डग्गा. आता नुसता तबलाच वाजवतो.
ती - करा काय करायचं ते. मला कामं आहेत. ढीगभर भांडी पडलीत. पन्नास भांडी काढता तुम्ही सगळे.
तो - तू एकीकडे भांडी घास, मी इकडे वाजवतो.
ती (निःश्वास टाकत) - बाईचा जन्मच असा गं बाई! भांडी घासा, उष्टी काढा वर नुसता दादरा ऐका. कधी जरा बदल म्हणून मृदंग तरी वाजवा. दोन्हीकडून ठोकला तरी गोड वाटतो.
तो - अगं मृदंग अवघड वाटतो. हात पुरत नाहीत.
ती - जळ्ळं तुमचं लक्षण. बडवा काय बडवायचं ते.

Monday, February 12, 2018

येका एनारायच्या रोजनिशीतील पान

आज पहाटे तीन वाजता उठलो. काल दोन वाजता उठलो होतो त्या तुलनेत हे बरंच असं वाटलं. बाकीचे ढाराढूर झोपले होते. टीव्ही लावावा का असा विचार करत होतो पण त्यांची झोपमोड होऊन सगळ्यांनी मला झापलं असतं. झापण्याचं तेवढं काही नाही, त्याची सवय आहे, पण बायकोही उठली असती. ते महागात पडलं असतं. चवड्यावर चालत आवाज न करता किचनमध्ये गेलो. फ्रीज उघडून पाहत उभा राहिलो. एकही मनाजोगता पदार्थ दिसेना. तेवढ्यात फ्रीजचे दारं उघडे राहिल्यामुळे त्याने ठणाणा करायला सुरुवात केली. चपळाईने तो बंद करत चडफडतच पुन्हा दिवाणखान्यात येऊन उभा राहिलो. भूक तर लागली होती. मग एक आयडिया आली. तसाच पायजमा ढगळ शर्टावर चप्पल चढवून हळूच बाहेर पडलो आणि फर्ग्युसन रस्ता धरला. वैशालीत जाऊन जे मिळेल ते हाणायचंच असं ठरवून निघालो. चार वाजता पोचलो तर काय, रस्त्यावर कुणीही नाही, आणि वैशाली तर उघडलंही नव्हतं!!!😡😡😡 $&&@@&! गडबडीत फोनही घरी राहिला होता. तसाच रस्त्यावर उभा राहिलो. च्यायला पुण्यातले लोक दुपारी झोपतात, रात्रीही झोपतात, सकाळी निवांत उठतात, मग पुण्यातले लोक फार जागरुक असतात अशी वदंता का असा विचार करू लागलो. शेवटी अशी समजूत करून देणाराही एखादा सुपीक एकारान्ती पुणेरीच असणार असा विचार करून मन शांत केलं. रस्त्याच्या कडेला काही प्लास्टिकचे कप पडले होते. कधी या लोकांना सिव्हिक सेन्स येणार आहे असं पुटपुटत ते उचलून तिथेच असलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकले. डब्यावर “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे” असे लिहिले होते. काही तरी चुकतंय असं वाटलं. या वाक्यात पूर्वी “महापौर पुणे. -हुकूमावरून” असेही शब्द असायचे. ते कुठे गेले? त्या शब्दांवाचून त्या डब्याचे सौभाग्यलेणेच पुसले गेले आहे असं वाटलं. च्यायला, पूर्वीचं पुणं राहिलं नाही. कचऱ्याचा डबा ही महापौरांची हक्काची जागा होती. महापौर गेले, त्यांचं “हुकुमावरून”ही गेलं.

विचारात गढून गेल्यामुळे पहाटेची “हरि ओम” जमात बिळातून बाहेर येऊन कधी हनुमान टेकडीकडे जाऊ लागली होती ते कळलंच नाही. बरेचसे तरुण वृद्ध मफलरमधे गुंडाळलेले होते. ते वृद्ध होते हे त्यांच्या रस्त्याच्या मधोमध बागेत बागडायला आल्यासारख्या चालण्यावरून लक्षात आलं. मी सारखा वैशालीच्या बंद दरवाजाकडे पाहत होतो. प्रयत्न केला असता तर मुक्ताबाईसारखं “ताटी उघडा हो ज्ञानेश्वरा” टाईप अभंग वगैरे रचला असता. वैशालीचे मालकही तसे बऱ्यापैकी स्थितप्रज्ञ चेहऱ्याचे आहेत. हातावर उकळतं सांबार पडलं तरी चेहऱ्यावरचे भाव बदलणार नाहीत. साधनेच्या एवढ्या उच्च कोटिला पोचणे सहजसाध्य नसते.

“काका, दोन पिशव्या द्या!”
या उद्गाराने भानावर आलो. पाहिलं तर वैशालीच्या शेजारच्या बोळातून एक तरुण रत्न बाहेर आलं होतं. NY असं लिहिलेला टीशर्ट, स्वेट पॅंट्स, अर्धेन्मीलीत डोळे अशा अवस्थेत शंभराची नोट माझ्यासमोर धरून,”काका, दोन पिशव्या द्या. चितळे!” चाललं होतं. मला काही कळेना. मग लक्षात आलं. माझा पायजमा, शर्ट आणि एकूण अवतार पाहून बहुधा याला मी दूध विकायला उभा आहे असं वाटलं असावं. मी त्याला “दूध संपलं आहे” असं सांगून आणखी पुढे पाठवला. आता पोटात मात्र कावळे ओरडायला लागले होते. दोन कारटी आली. खांद्याला थैल्या अडकवलेल्या. माझ्याकडे निरखून पाहत होती. चेहऱ्यावर भाव आंधळ्याला रस्ता पार करून देणारा. म्हणाली,”काका, आळंदीच्या पालखीची वाट पाहताय का? त्याला अजून चार पाच महिने आहेत.”. माझा चेहरा पाहून दोघे सटकले. त्यांच्या सत्कृत्याच्या वहीत नोंद झाली नाही.

एका मफलरमंडित हरिओमला थांबवून विचारलं,”अहो केव्हा उघडेल हो हे हाॅटेल?” त्या गृहस्थांनी मला दहा सेकंद नुसतं रोखून पाहिलं. मग म्हणाले,”ते काही गुप्तपणे उघडणार नाहीत. तो दरवाजा उघडला की समजायचं, आत जायला हरकत नाही.” असं म्हणून ते फुटले. त्यांचं फुटणं म्हणजे जणू काही शुभशकुनच वाटावा अशा पद्धतीने वैशालीचं दार उघडलं. मी यष्टी लागल्यावर ज्या चपळाईने खिडकीतून रुमाल टाकून सीट धरतो त्या चपळाईने आत गेलो. एकूण एक टेबल मोकळं पाहून मला गहिवरून आलं. पूर्वजन्मीची पुण्याई कामी आली असंच वाटलं. पुढे काय झालं काही कळलं नाही. त्या दोनेक मिनिटांच्या आठवणी धूसर आहेत. बैलांचा कळप खूर बडवत माती उधळत येतो आहे असा आवाज झाला आणि मी पापणी बंद करून उघडल्यावर यच्चयावत टेबलं भरून माणसांनी भरून गेलेली दिसली. 😡😡 व्हाॅट द हेक?? तीन तास बाहेर पुतळा झाला होता, आता आत आल्यावरही पुतळा?

संतापाचा कढ ओसरल्यानंतर पुन्हा टेहळणी केल्यावर एका चार जणांच्या टेबलावर एक खुर्ची रिकामी असल्याचं दिसलं. आता लाजबिज केव्हाच सुटली होती. टेबलावरच्या तिघा जणांच्या त्रासिक नजरेकडे दुर्लक्ष करत खुर्ची धरली. बसल्या बसल्या पाण्याचा ग्लास जणू माझ्या ओठावरच धरल्यासारखा समोर आला. “हं!” वेटरमहाराज कण्हले. याचा अर्थ काय गिळणार ते लवकर सांगा. “मेदू.. मेदूवडा सांबार!” माझ्या तोंडातून शब्द गळले. “आणि काॅफी” हे माझे शब्द बापुडे होऊन वारा झाले. मोजून तिसऱ्या मिनिटाला साडेतीन इंच व्यासाची खोलगट बशी दोन मेदूवडे आणि त्यांना जेमतेम भिजवेल एवढं सांबार असं पुढे आलं. आईस्क्रीमवर जशा चेरीज ठेवाव्यात तसे भोपळ्याचे तुकडे त्या वड्यावर शोभून दिसत होते. मी,”चटणी?” असं विचारल्यावर वेटरमहाशय आत गेले आणि चटणीची वाटी घेऊन आले. त्यांनी ज्या पद्धतीने ती वाटी माझ्यासमोर सरकवली ते पाहून मला वाटीबरोबर आलेले दोनतीन अदृश्य शब्दही दिसले. मग मी सगळं गेलं गा च्या गा त असं म्हणून प्रथम सांबाराचा दीर्घ वास घेतला. मन तत्काळ उडपीला जाऊन परत येताना जरासं कारवार बघून आलं. चमच्यानं एक घास तोंडात घेतला आणि आहाहाहा असा उद्गार काढला. शेजारच्या तिघांनी डोसे घेतले होते. माझ्या बाजूच्यानं पेपर डोसा घेतला होता त्याचा साधारण चार इंच डोसा माझ्या कार्यक्षेत्रात येत होता. मी गमतीनं त्याला म्हणालो,”तुमच्या झाडाची फांदी माझ्या भागात आलीय, तोडू का?” त्याला धक्का बसला असावा. मी ते वाक्य तोंडात मेदूवड्याचा जरा मोठाच घास घेऊन बोललो होतो. त्याला माझ्या मानसिक स्थैर्याविषयी संशय आला असावा. कारण त्याने चटकन डोशाचा चांगला सहा इंचाचा भाग दुमडून आपल्या अधिकारक्षेत्रात घेतला. तो डोसा मोडल्यामुळे त्याच्या पोटातील सुवर्णकांती बटाटाभाजी दिसू लागली होती. तिच्याकडे मी अनिमिष डोळ्यांनी पहात राहिलो. मग भानावर येऊन मेदूवड्यावर लक्ष केंद्रित केलं. आता वड्यांनी सांबार पार शोषून घेतले होते. असे सांबाराने संपृक्त असे ते वडे माझं आयुष्य समृद्ध करत होते. समाधी लागण्याचाच अनुभव होता तो. काऊंटरवरून मालक निर्विकारपणे पाहत होते. त्यांच्या डोक्यावर तिरुपतीचा फोटो लावलेला होता. त्याच्यासमोर उदबत्ती. ताजी पूजा केलेली. ज्याने ज्याने अशा वातावरणात डोसा, मेदूवडा इडली सांबार इत्यादि दैवी पदार्थ खाल्ले आहेत ते स्वर्ग वगैरे फाट्यावर मारतात.

फाटकन समोर बिल पडले. मी बिल घेऊन उठतोय न उठतोय तेवढ्यात एक माझ्या खुर्चीवर बसलाही. समाधी उतरली. पण दैवी तेज घेऊन बाहेर पडलो. जेट लॅगचा प्रभाव उतरला होता. ओशो उत्तरेकडे जन्माला आले म्हणून. दक्षिणेत जन्मले असते तर नक्की “सांभारातून समाधीकडे” लिहिलं असतं.

Saturday, February 10, 2018

गैरसमजायण

शूर्पणखा ही रावणाची बहीण ही अत्यंत विनोदी म्हणून किमान लंकेत तरी प्रसिद्ध होती. दिसायला शंभर राक्षसिणींत उठून दिसणारी. ती दरबारात आली की राक्षसिणीच काय राक्षसही अदबीने खाली बसत म्हणून ती उठून दिसे. तिचे लांबसडक नाक हा लंकेच्या प्रतिष्ठेचा, अभिमानाचा विषय होता. कुठेही प्रथम तिच्या नाकाचा प्रवेश होत असे आणि मग मागून शूर्पणखा अवतीर्ण होत असे. नाकाप्रमाणे तिचे दातही अद्भुत असे होते. ती नेहमी हसत असल्याने ते पांढरेशुभ्र तीक्ष्ण दात नेहमीच ओठांच्या बाहेर असत. तीक्ष्ण मोठे दात हे राक्षसी सौंदर्याचे परिमाण होते. बरेच वेळा नाकाचे टोक पुढे आहे की सुळे यांवर राक्षसांच्यात पैजा लागत तर राक्षशिणींच्या ,”शंभर टक्के फेक” यावर पैजा लागत. लंकेची ब्रॅंड ॲंबेसेडर म्हणूनही तिची नियुक्ती झाली होती. कुणी तिच्या तोंडाला लागत नसत. तसा प्रयत्न काही जणांनी केला होता. पण प्रथम त्यांची गाठ नाक आणि सुळ्यांशी पडून ते मृत्युमुखी पडले होते. नाक प्रथम की सुळे यात वाद असल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण घुसमटून की दात घुसून यावर दुमत होते. स्वत: शूर्पणखेने ते मृत्यू इतर सर्व गोष्टींप्रमाणे हसण्यावारी नेले होते. लंकेतील काही तज्ज्ञांचे मत त्यांचा मृत्यू धसक्यामुळे झाला असावा असे होते. शूर्पणखेचे सामान्य हसणे अंदाजे १२० डेसिबलपर्यंत असल्यामुळे अशक्त प्रकृतीच्या राक्षसांचा धसक्याने मृत्यू होऊ शकतो असे या तज्ज्ञांचे मत होते. कुठल्याही युद्धप्रसंगी शिष्टाई करण्यासाठी प्रथम तिलाच पाठवले जात असे. मागे इंद्राबरोबर झालेल्या युद्धात इंद्राचा पराभव युद्ध न घडताच झाला होता. विनोदाने युद्धे टळतात असे रावणाचे मत होते. रावणाने काही महिने सेवाग्राम येथे व्यतीत केले होते. अहिंसेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. मग विनोद करावा म्हणून शूर्पणखा युद्धस्थलावर गेली असता प्रथम तिच्या भारदस्त सुळ्यांनी ऐरावत पाघळला तर तिच्या हास्याने इंद्राचे वज्र त्याच्या हातातच वाकले. वाकलेले वज्र हातात घेऊन खांदे पाडून उभा असलेला इंद्र पाहून शूर्पणखाच काय पुष्पवर्षावाचा सराव करून आलेले देवही हसू लागले. ते पाहून आपला कदाचित विजय झाला असावा अशी शंका येऊन राक्षसही हसू लागले. इंद्रालाही आपण “चला हवा येऊ द्या”च्या सेटवर आलो की काय असे वाटून तोही हसू लागला. अशा प्रकारे ते युद्ध टळले आणि इंद्र परत आपल्या यक्ष अप्सरादि दैनंदिन कामात गुंतून गेला.

अशा प्रकारे शूर्पणखा हे लंकेचे हसरे आणि लाडके व्यक्तिमत्व होते. हा हसरे व्यक्तिमत्व असण्याचा विक्रम पुढे अनेक वर्षांनी सुधीर गाडगीळ यांनी मोडला. पण ते नुसतेच हसरे होते. पुण्यात राहिल्यामुळे इच्छा असूनही स्मितहास्यापलीकडे जाणे त्यांना शिकता आले नाही. असो. तर, शूर्पणखेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असल्याने तिचे हसणेही आंतरराष्ट्रीय झाले होते. परंतु पुढे इतिहासात काळी घटना म्हणून ओळखले जाण्यासारखे काहीतरी घडले. भारतात कुठल्याही गोष्टीचा कसा उदोउदो करतात त्याचे हे उदाहरणच. वास्तविक लंका आणि भारत यांचे संबंध व्यापारी. लंकेने राक्षसबळ पुरवावे, त्याबदली भारताने सांबार बनवण्याचे तंत्रज्ञान पुरवावे, लंकेने दुर्मिळ असे पाण्यापेक्षा हलके बांधकाम साहित्य पुरवावे, भारताने ते वापरून समुद्रमार्ग बांधून द्यावा, असे चालायचे. रावण स्वत: आपले प्रायव्हेट जेट वापरून बिझनेस डील्स करण्यासाठी भारतात ये जा करीत असे. फ्रीक्वेंट फ्लायर प्रोग्राम मध्ये प्लॅटिनम लेव्हलला पोचल्यामुळे सगळीकडे प्राधान्याने प्रवेश मिळण्याची त्याला सवय झाली होती. नुकतेच त्याने लंकेच्या टूरिझमचा विकास करण्याचे उद्दिष्ट बाळगले होते. ऋषीमुनी निसर्गरम्य ठिकाणे ध्यानधारणेसाठी पसंत करतात हे त्याने पाहिले होते. लंकेत ही जमात नावालाही नव्हती. जिथे लोक घरे बांधण्यासाठीही सोन्याच्या विटा वापरत तिथे त्यांना निसर्गसौंदर्य वगैरेविषयी प्रेम असणे जरा अवघडच होते. म्हणून त्याने जिथे जिथे ऋषीमुनी असतील तेथे आपले सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायला सुरुवात केली. ऋषीमुनींना त्या आगाऊ सॉलिसीटेशनचा त्रास होऊ लागला. त्यांनी तत्कालीन राज्यकर्ते श्री. दशरथ यांच्याकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. त्यांनी संरक्षण, नीतिमत्ता, अर्थकारण, राजकारण, समाजकारण यांत निपुण असलेल्या आपल्या पुत्रास, रामास त्यांच्या संरक्षणासाठी पाठवले. रामाने या सेल्सच्या लोकांकडून पॅम्फ्लेट्स घेऊन त्यांच्यासमोरच त्यांचे बाण करून उडवण्यास सुरुवात केली. ते कोणत्याही वेषात आले तरी राम त्यांना ओळखत असे. शेवटी तर रामाने "नो सॉलिसीटेशन, ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्यूटेड" अशा पाट्याच लावल्या.रावणाकडे तक्रारी गेल्या. तो विचार करू लागला. इकडे राम सहकुटुंबच वनात येऊन राहिला होता. पाच दिवस वनात काम करून वीकेंडला अयोध्याला जाणे नेहमी परवडण्यासारखे नव्हते. जाण्यायेण्यात वेळही जात असे. रावणाने मग स्वतःच येऊन मार्केटिंग पिच द्यायचे ठरवले. आपण राजा आहोत म्हणून कुणी भारावून जाऊन त्यांना नको त्या कल्पना येऊ नयेत म्हणून त्याने स्थानिक लोक करतात तसा साधा साधूचा वेष धारण केला होता. विमान काही अंतरावर उतरवून तो रामाच्या कुटीकडे गेला. राम घरात नव्हते. लक्ष्मण होते. पण लक्ष्मण यांच्याकडे ठराविक रकमेच्या बाहेर जाऊन डील साईन करण्याची ऑथोरिटी नसल्यामुळे डील झाले नाही. ते रामाला विचारून येतो असे सांगून गेले. त्यांची वाट पाहून रावणही शेवटी जातो असे म्हणून निघाला. सीतामाईला विमानाचे फार कुतूहल होते. त्या विमान आतून कसे दिसते ते पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेवढ्यात रावण आला म्हणून त्या पट्कन तिथेच लपल्या. तर अचानक विमान सुरू होऊन वरही गेले. रावणाला काहीच कल्पना नव्हती.

इकडे गोंधळ झाला. सीतेचे हरण झाले, सीतेचे हरण झाले असे ऋषीमुनी ओरडू लागले. आपण हरण शोधायला काय जातो, इकडे पत्नीचेच हरण झाले असा विचार घेऊन राम अतिशय विमनस्क अवस्थेत बसले होते. शेवटी त्यांनी ठरवले, रावणाला या कृत्याचा धडा शिकवायचाच. वडिलांची सेना अयोध्येत. ती मागवणे कठीण. पण उपजत संघटनकौशल्य असल्यामुळे आणि लोकांना रामाबद्दल अतिशय प्रेम असल्याने तिथे दंडकारण्यातच सेना उभी राहिली. इकडे रावणाला विमान उतरवल्यावर विमानात सीताही असल्याचे कळले. वास्तविक त्याच विमानातून तिला परत पाठवता आले असते. पण इथे रावणाने घोडचूक केली आणि पुढे रामायण घडले. रावणाने अशोकवन नावाची एक नवीन स्कीम सुरु केली होती. त्या सोसायटीचे उद्यान भव्य आणि रम्य असे होते. कदाचित ते दाखवले तर सीतामाई रामाकडे हट्ट करून अशोकवनात प्रॉपर्टी घ्यायला लावेल असा विचार करून त्याने सीतामाईला अशोकवनात नेले. आणि त्याला अनेक कामे असल्याने तुम्हीच पहा आणि मला सांगा असे म्हणून तो निघून गेला. त्याने उपस्थित राक्षसांना काहीच इंस्ट्रक्शन्स दिल्या नसल्यामुळे तेही एकमेकांकडे पाहत उभे राहिले आणि पाच वाजल्यानंतर आपापल्या घरी निघून गेले. सीता एकटीच वनात राहिली.

इकडे राम आणि लक्ष्मण आपल्यावर चालून येत आहेत आणि युद्ध अटळ असल्याची बातमी वेगाने लंकेत आली. रावणाला हा धक्काच होता. धक्क्यातून सावरल्यावर तो विचार करू लागला. गैरसमजातून हे घडले असल्याने, तसे रामाला सांगितल्यास युद्ध टळेल असे त्याला वाटले. आणि इथेच त्याला शूर्पणखेची आठवण आली. तिच्या खेळकर विनोदी स्वभावाने राम राग विसरतील आणि युद्ध टळेल असा त्याचा आडाखा होता. त्याने शूर्पणखेला पाचारण केले. ती नेहमीप्रमाणेच हसत हसतच आली. रावण तिला म्हणाला,"हे भगिनी, आता लंकेला तुझाच आधार!". ती म्हणाली,"दादा असे झाले तरी काय?" मग रावणाने तिला सगळा प्रकार सांगितला. तशी ती जोरजोरात हसू लागली. काही केल्या ते हसू तिला आवरेना. रावण मग जरासा चिडला. "अगे भगिनी! प्रसंग काय तू अशी हसतेस काय? इथे ब्रम्हास्त्र माझ्या पार्श्वभागी येऊन टेकले आहे. तू तिथे जाऊन चार पाच विनोद सांगावेस, आणि वातावरण निवळले की गैरसमज दूर करावास असे मला वाटते." त्यावर ती म्हणाली,"दादा सॉरी, मला खरंच हसू आवरत नाही रे! काही तरी उपाय करून हे कारण नसताना आलेले हसू घालवता आले पाहिजे." त्यावर रावण म्हणाला,"चिंता करू नकोस. मी भारतातून काही कवींचे कवितासंग्रह आणले आहेत. दिवसाला एक कविता वाचल्यास हसू हळूहळू कमी होऊन सहा महिन्यात पूर्णपणे जाईल असे मला सांगण्यात आले आहे."

रावणाचे ऐकून शूर्पणखा राम जेथे वास्तव्यास होता तेथे पोहोचली. रामाने तिचे स्वागतही केले. शूर्पणखेने,"एक विनोद सांगू  का?" असे रामास विचारले. "टवाळा आवडे विनोद" अशी रामाची विचारसरणी असल्याने त्याला ते आवडले नाही. तो गंभीरपणे तिच्याकडे पाहत राहिला. शूर्पणखेला कसलाही पोच नसल्याने तिने विनोद सांगायला सुरुवातही केली होती. तिने "एकदा रामभाऊ आपल्या पत्नीस म्हणाले, अगं माझे घड्याळ बंद पडले आहे. त्यावर रामभाऊंची पत्नी त्यांस म्हणाली, जीवनातली ही घडी अशीच राहू दे." या प्रकारचा एक भिकार विनोद सांगितला. आणि तिला स्वत:लाच हसू न आवरून ती भीषण हास्य करू लागली. लक्ष्मणाला वाटले तिने मुद्दाम विनोदात "रामभाऊ" आणले आहेत. रामाला वाटले तिने मुद्दाम विनोदात पत्नीला आणले आहे. तरीही राम आपल्या स्वभावानुसार चिडला नाही, पण लक्ष्मण मात्र कृद्ध होऊन ताडदिशी उभा राहिला. इकडे शूर्पणखा हसतच सुटली होती. रामाच्या कानठळ्या बसू लागल्या होत्या. हास्य १४० डेसिबलपर्यंत गेले होते. ते कसे थांबवायचे हे सुचत नव्हते. लक्ष्मण तिला काही तरी बोलणार एवढ्यात रामाने त्याला थांबवले आणि म्हणाला,"लक्ष्मणा, हसू दे तिला. हिला शाप आहे आधीचा. आता मीच तिला उ:शाप देतो. कलियुगात हिचा पुनर्जन्म होऊन ही मानव म्हणून उदयास येणार आहे आपल्या हास्याने स्वतःचे हसू करून घेणार आहे. मीही मग तिथे उपस्थित राहून या आजच्या घटनेची आठवण करून देणार आहे. आणि ती आठवण करून दिली की तिचे हे अस्थानी हास्य कायमचे बंद होऊन योग्य त्या ठिकाणी हसण्याची अक्कल तिच्या ठायी उत्पन्न होणार आहे." हे शब्द ऐकताच शूर्पणखेला वृश्चिकदंश झाल्याप्रमाणे वाटले, तिचे नाक लाल लाल झाले, डोळे विस्फारले. क्रोधित होऊन ती उद्गारली,"अपमान! घोर अपमान! एवढा उच्च प्रतीचा विनोद सांगितल्यावरही त्याकडे टोटल दुर्लक्ष! आता युद्ध होणार ! राक्षसी असले म्हणून काय झाले , मी स्त्री आहे. स्त्रीचा अपमान! संपूर्ण स्त्रीत्वाचा अपमान! आता दादालाच सांगते! त्याला दहा दहा तोंडं आहेत म्हटलं! आता तो जे बोलेल ते ऐकावं लागेल!" असे म्हणून ती तरातरा निघून गेली.

रामाने स्मितहास्य केले आणि लक्ष्मणाला म्हणाला,"हे गैरसमजायन तर आहेच, पण यातूनच पुढे रामायण घडणार आहे." यावर लक्ष्मण फक्त,"जशी आपली आज्ञा!" एवढेच म्हणाला.

Sunday, September 24, 2017

लेक्चर आणि बौद्धिक

लेक्चर आणि मी यांचं नातं परस्पर आदरावर टिकून आहे. मी फारसा कधी त्याच्या वाटेला गेलो नाही आणि त्यानंही कधी माझी वैचारिक पिसं उपटली नाहीत. माझी वैचारिक पिसं मोराप्रमाणे आहेत. पिसारा छान येतो फुलून, पण बूड उघडं पडतं. पण ते केवळ मलाच माहीत असतं. त्यामुळे मोराप्रमाणे मीही समोरच्याला मोहऱ्यावर ठेवतो. तर, काय सांगत होतो... हां, ते लेक्चर प्रकर्ण. कॉलेजात फक्त काय ते एक खांडेकर सर होते मला समजून घेणारे. तेवढे एकच सर तासाला झोपू द्यायचे. स्वभावच प्रेमळ त्यांचा. त्यांचा तो संथ एकसुरी आवाज अंगाईगीताप्रमाणे वाटे. रात्री पत्र्यावर पावसाची तडतड ऐकताना कशी छान झोप लागायची ना, तश्शीच अनुभूती सरांच्या लेक्चरला यायची. माझं डोकं ही तसं पत्र्यासारखंच आहे म्हणा. ऊन पाऊस थंडी काही काही मेंदूपर्यंत पोचू देत नाही. लेक्चर तर दूरची गोष्ट. नोट्स वगैरे घ्यायचा प्रश्नच नव्हता. काही माहीत नसेल तर पास होण्याची शक्यता जास्त असण्याचा विषय ते शिकवीत. बीमवर वजन ठेवल्यावर तो वाकतो आणि त्याच्या बुडाला तणाव उत्पन्न होतो हे कळायला पंचेचाळीस मिनिटांच्या गुंजारवाची गरज नव्हती. ते ज्ञान मी इयत्ता चौथीतच ओणवं राहताना मिळवलं होतं. पाठ आणि कंबर बहिर्वक्र झाल्यावर कुठे तणाव उत्पन्न होतो हे तिथेच पक्कं झालं होतं.

मी पूर्वजन्मी (तो असलाच तर) बरीच बारीकसारीक पापे केली असावीत. कारण हे मास्तर माझ्या राशीला पूर्वीच आले होते. संघाच्या शिबिरात बौद्धिक नावाचा जो भीषण प्रकार चालतो त्यात हे सर कायावाचामने सहभागी होत. "अरे, मोजून पाचव्या वाक्याला झोपवतात अशी संघात त्यांची ख्याती आहे, काय समजलास!" असे आमचे प्रिय मित्रवर्य मोरेश्वर ऊर्फ मोरू याने शिबिर सुरू व्हायला एक दिवस असताना सांगितले होते. मी जावे की नाही असा विचार करत असताना विभागाचे "पूर्णवेळ" घरी आले आणि आमच्या तीर्थरूपांकडून मी शिबिराला जाईन याचे वचन घेऊन गेले. मोऱ्याही काही सुटला नव्हता. ते त्याच्याही घरी गेले असणार. नंतर त्याला शिबिरात एवढेसे तोंड करून फिरताना पाहिले आणि मी दात काढले. त्यावर तो प्रचंड रागावला होता. पण या संकटकाळात मीही असणार आहे या विचाराने त्याने तो राग बुडवून टाकला होता. त्याने त्याच्या स्वभावाला न शोभणारे छद्मी स्मित केले होते. त्याने पूर्वी एक शिबिर केले होते. लेकाच्याला काही तरी माहीत आहे, पण सांगत नाहीये हे मला जाणवलं होतं. एरवी जिवाला जीव देण्याच्या गप्पा करणारा मोरू इथे माझ्यापासून काहीतरी लपवत होता. मग शिबिराच्या विविध कार्यक्रमांत मी ते विसरून गेलो. वेळापत्रकात दीपनिर्वाण नावाचा एक आकर्षक शब्द होता. त्या कार्यक्रमाकडे लक्ष ठेवून मी होतो. त्याच्या आधीच्या शब्दाकडे माझे दुर्लक्ष झाले होते. रात्रीच्या जेवणानंतर बौद्धिक ठेवावे ही सूचना संघातील ज्या कुणी केली असेल तो मनुष्य मानवजातीच्या मानसिक सुखाच्या विरोधात असावा एवढेच मी म्हणतो. जेवणानंतर चला, आता झोपूया असे म्हणून मी राहुटीकडे कूच करणार तेवढ्यात आमच्या सायंशाखेच्या मुख्य शिक्षकांनी "थांबा! जाता कुठे! ते दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत" अशा थाटात आम्हाला बौद्धिकाच्या दिशेने हाकलले. त्या निष्पाप कळपात मोरूही आला होता. अग्रेसर अशी आज्ञा ऐकल्यावर लेकाच्याने मला पुढे ढकलून आपण मागे राहिला होता. मी गाफील होतो.  उपविश होता होता समोरून खांडेकर सर अवतीर्ण झाले. मोरू माझ्या मागे बसला होता. त्याने सांगितल्याप्रमाणे खरोखरच मोजून पाचव्या वाक्याला त्याचे डोके माझ्या पाठीवर टेकल्याचे जाणवले होते. माझ्या समोर मात्र कळिकाळाची निर्वात पोकळी आणि त्यात अंगठ्यावरसुद्धा केस उगवलेली सरांची पावले. "आता कोठे धावे मन, तुझे चरण...." या पंक्तिंचा अनुभव हा असा यावा याचे मला वाईट वाटले होते. मी जागा झालो तेव्हा राष्ट्र संकल्पना, त्याचे पुनर्निर्माण संपले होते. तंबूत निजानीज झाली होती. काही वेळापूर्वीच राष्ट्रीय पुनर्निर्माणाची जबाबदारी खांद्यावर दिले गेलेले स्वयंसेवक, प्रवाशाने गाठोडे बाजूला ठेवून अंमळ आडवे व्हावे तसे दमून झोपले होते. विषय घनगंभीर होता, पुनर्निर्माणाचे ओझे गंभीर होते, त्याला तेवढ्याच घनगंभीर विश्रांतीची गरज होती.

तात्पर्य, भाषण देऊन विरोध संपवणे, विरोधकांना नकोसे करून सोडणे ही कला आहे. ते संघाचे कुरण. तिथे बाकीचे कुणी चरू नये. नाही म्हणायला आतडी पिळवटून बोलणारे लाल बावटे आणि काही समाजवादी त्याला अपवाद. पण त्यांचं भाषण ऐकायला समोर बसलेली मंडळी आधीच "टाकून" आलेली. "मायला, काय बोंबलतंय कुणाला म्हाईत, मोर्चा कधी आन कुटं ते सांगा" या टायपातली.  आणि दुसरीकडे आपली प्रिय काँग्रेस पार्टी. बौद्धिक, अभ्यास आणि भाषण यापैकी काहीही असण्याची गरज नसलेली. बाईंनी आणि त्यांच्या घराण्यातील कुणीही व्यासपीठावर उभे राहून काहीही म्हटले तरी टाळ्या वाजवणारी.  "मान्नीय" हा शब्द उच्चारून मग स्टेजवर बसलेल्या तीस चाळीस जणांची नावं घेण्यातच भाषण संपायचं. मुद्द्याला कुठे हातच घालायचा नाही. मुळात मुद्दाच नसायचा काही. सगळ्यांचेच धंदे रात्रीचे. दिवसा वेळ भरपूर म्हणून सभा वगैरे करायच्या. निवडणूक असेल तर क्वार्टर आणि गांधीबाबा यांचं दर्शन होईल या आशेनं जायचं. मोठमोठ्या गप्पा न करता पोटापाण्याची सोय करणारा हा एकमेव पक्ष. म्हणून तर अजून लोक आशेवर आहेत. केव्हा हा पक्ष सत्तेवर येतोय आणि आम्ही गूळ कुजवायला टाकतो असं झालं आहे काही लोकांना. जुगार, सट्टा, मटका, हातभट्टी, स्मगलिंग, साठेबाजी या क्षेत्रात प्रचंड प्रगती केलेले आज याच आशेवर आहेत. पण काय दैव आहे पहा, या कावळ्यांतूनच, हंस जरी नसला तरी, ढोक म्हणता येईल असा एक पक्षी आज बर्कलेसारख्या विद्यापीठात भाषण देऊन आला. या भाषणात मला अजिबात झोप आली नाही. निखळ करमणूकीचा आनंद देऊन गेलं हे भाषण. "आज मी फक्त पंधरावीस मिनिटेच बोलणार आहे" या वाक्यानंच मला जिंकलं. अंदमानचे मासे आणि आदिवासी ही कथा तर विलक्षण होती. मी आता अंदमानला जायचा निश्चय केला आहे. लेक्चर असावं तर असं. उगाच राष्ट्रीय राष्ट्रीय म्हणत लोकांना झोपायला भाग पडू नये.

Tuesday, September 12, 2017

प्रेमाचे भाषांतर


मटाच्या या भाषांतराच्या मी तर प्रेमात पडलोय. पण कथेत काहीतरी कमी पडतंय असं वाटत होतं. त्या पूर्णत्वासाठी पुढील खटाटोप...

अगदी फुटलेल्या पहाटे फोनची घंटा वाजली. या लोकांना आयुष्य नाही बहुतेक. शाप देत मी फोनला उत्तर दिले.
"हो? कोण आहे ते?"
"तर्क कर बघू?" रेषेच्या दुसऱ्या टोकाला स्त्री होती.
तोच तो चूक न करण्याजोगा आवाज.
दोन हजार सालाच्या पूर्व हिवाळी सत्रात आम्ही भेटलो होतो. भारतातून तो फोन आला आणि मी जवळ जवळ अत्यानंदाच्या अवस्थेत गेलो होतो. तिची भव्य, चमकदार अशी छबी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली.
"भपकेबाज मनुष्या, मला विमानतळावर उचलायला येशील ना?" तिने विचारले होते.
"नक्कीच येईन. तुझ्या उड्डाणाचा सविस्तर तपशील कळव. मी दिवस मोजतोय!" मी.
आणि मग तो दिवस उजाडला होता. एखाद्या निष्णात नमुन्याप्रमाणे चालत ती फाटकातून बाहेर आली होती. तीच ती राजकन्येची कृपा तिच्या प्रत्येक हालचालीत होती. मोटारीच्या मुख्य दिव्यांच्या प्रकाशझोतात अचानक आलेल्या हरणाप्रमाणे मी थिजून तिच्याकडे पाहत राहिलो होतो.
"अभिवादन दुष्टा!" तिच्या खेळमय आवाजाने मी भानावर आलो.
"ए! तिथे!" मी बरळलो.
"ए माझ्या अर्भका! मी तुला कित्ती कित्ती चुकत आलीय माझ्या जुन्या अंड्या!" आठ आण्याच्या नाण्याने नारळ वाजवून पहावा तसे तिने माझ्या डोक्यावर बोटांची हाडे आपटून टकटक केले.
ती पूर्वीपेक्षा कृश दिसत होती. बरीचशी चतुर. तिची ती देखणी मान आणखीच डावीकडे झुकली होती.
"जुन्या मळक्या अक्करमाश्या, तू अजून बदलला नाहीस. आसक्त नजरेनं बघणं बंद कर!"
"जुन्या सवयी मरायला कठीणच.." असं मी डोकं चोळत म्हणालो. तिने मंद अस्फुट स्मित केले.
गाडीत बसल्यावर ती म्हणाली,"तू कसं काय करतोयस माझ्या प्रियकरा? असं दिसतंय की बरं करतोयस".
मी हुंकार भरत म्हणालो,"बरं करतोय मी. लोंबतो आहे आत तिथे.."
तिने ऐकू येईल इतक्या क्षमतेचा उसासा सोडला. काही क्षण मग गरोदर शांततेत गेले. गाडीने हमरस्त्यावर एंट्री घेतली होती. मग तिने खांदे उडवले आणि म्हणाली,"पिळू दे ते! तू सांग, सध्या काय वाचनात आहे?"
मी गारठलो. डावीकडे झुकून चालता चालता मी नकळत उजवीकडे कलंडलो होतो. अलाईनमेंट गेलेल्या जुन्या मालवाहू ट्रकप्रमाणे.
"सध्या तरी हनुमान फाॅर्टीजशिवाय काही वाचन होत नाही मधा!"
"काय!!? माझा रक्ताळलेला पाय!" ती किंचाळली. मी घाबरून गाडी सर्वात उजवीकडील कमी वेगाच्या आळीत घातली.
"अरे, जमिनीखालील नोंदी, जनावरांचा मळा, गोठा कार्यक्रमावरील टीका - असल्या साहित्यावर वाढलो आपण! तू तुझ्या मनाबाहेर आहेस का?!"
"वस्तू बदलतात.." मी म्हणालो
"बैलाची विष्ठा!" ती म्हणाली.
"तुला माहीत नाही. उशिरात मी बऱ्याच मधून गेलो आहे." मी.
"तू जखमी दिसतोस. अरेरे, मी दु:खी आहे." ती.
"ते आता बरोबर आहे. तुला दु:ख जाणवून घ्यायला नको खरंच."
"भांडवलशाहीने तुझ्यावर चांगले उपचार केलेले दिसताहेत". ती.
"प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो. तू जर तुझी बुद्धिमत्ता बरोबर वापरली असतीस तर आज किमान आघाडी सरकारमध्ये मंत्र्याची सचिव तरी झाली असतीस." मी.
"किती कायम ठशाच्या ठोकळ्याप्रमाणे विचार तुझे! उत्तम चालणाऱ्या गिरणीप्रमाणे." ती म्हणाली.
आता आम्ही हमरस्त्यावरून डिसएंट्री केली होती.
निम्नशहरातील इमारतीच्या शेवटच्या माळ्यावरील माझ्या सदनिकेतून शहराची आकाशरेषा न्याहाळत आम्ही रात्रीचे जेवण घेतले. इटालियन भात, काळे आॅलिव्ह असलेले सलाद, आॅलिव्ह तेलात तळलेले डुक्कर किंवा तत्सम मांसाचे तुकडे, या सर्वांना मानार्थ अशी तांबडी वारुणी असा मराठमोळा बेत होता.
"हे असं तेलश्रीमंत भोजन बरं नाही.." तळलेल्या मांसाचा सुंदर छोटा तुकडा चघळत ती म्हणाली.
"तुला पूर्वी किती निरोगी भूक असायची!" मी म्हणालो.
"देशातील बहुसंख्य नागरिक एक वेळच्या जेवणासाठी टाचा घासत असताना आपण असं पाचसहा ओघांचं दुपारचं अथवा रात्रीचं किंवा खूप उशिरा रात्रीचं जेवण घेणं मला मान्य नाही." ती उत्तरली.
मी तिच्या पेल्यात आणखी वारुणी ओतली.
"केवळ रस्त्यासाठी बरं.." असं म्हणून तिने ग्लास उचलला.
जेवण झाल्यावर आम्ही धूम्रपानाच्या खोलीत आलो. तिने परदेशी बनावटीची विडी शिलगावली. माझ्या जराशा त्रस्त चेहऱ्याकडे पाहून ती म्हणाली,"तू तर साखळी पद्धतीने सेवन करायचास पूर्वी. आम्ही तुला ओएनजीसी म्हणायचो. तेव्हा तुझ्यापेक्षा पवित्र अशा थाटात माझ्याकडे पाहू नकोस."
"तिथे जाऊन आलोय, करून आलोय..मला आता ते मजेदार वाटत नाही." मी म्हणालो.
"बरं, आपले मित्र देशपुरुष भुकेले असताना भोजन कमी करावं म्हणणारी तू, त्यात विडी तत्व कसं बसतं?" मी विचारलं.
त्यावर एक डोळा मोडत ती म्हणाली,"अभिनय करू नकोस! समाजवादात भुकेलं राहणं महत्वाचं नाही, दिसणं आहे." असं म्हणून तिने धुराची वलयं छताच्या दिशेने सोडली.
"बरं बरं! आता आपला काय कार्यक्रम पुढे, माझ्या शर्करे?" मी विचारलं.
"माझ्या गोड वाटाण्या, आपला नाही, माझा कार्यक्रम! कल्पना घेऊ नकोस. उद्या एका भांडवलशाहीवादी नफेखोर उद्योगानं आयोजित केलेल्या परिषदेत माझं किल्लीचं व्याख्यान आहे. जर तुला मन नसेल तर तिथे सकाळी मला पाडशील का?" तिनं लाडिक रुक्षतेने विचारलं.
"मला काहीच समस्या नाही. जरूर पाडीन आणि हवं तर नंतर उचलायलाही येईन. तुला पाहिजे?" मी म्हणालो.
"नक्कीच! मी प्रेम करीन त्यावर!" ती चीत्कारली.
"केलंच असं गृहीत धर मग! बरं, तू दमली असशीलच. तू आता झोप घे. मी ही माझ्या बिछानाखोलीत निवृत्त होतो. तुझी रात्र चांगली जावो!" मी निरोप घेत पुटपुटलो.
"तुझीही, माझ्या जुन्या मित्रा! शर्करामुक्त स्वप्ने! घट्ट झोप! तुला ढेकूण न चावोत!" ती चिवचिवली.
(मटा भाषांतर सेवेचे आभार मानून)

गरजूंसाठी संदर्भ :
http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/my-friend-and-first-love-gauri-lankesh-was-the-epitome-of-amazing-grace/articleshow/60436982.cms

Sunday, April 2, 2017

अध्यक्षीय

 आपल्या मंडळाच्या स्थापनेला तीस वर्षं लोटली. तीस वर्षांपूर्वी भारतातून डोळ्यांत स्वप्न, उरात अज्ञाताची धडधड घेऊन काही मराठी माणसं इथे आली. परका प्रांत, परकी भाषा, परक्या चालीरीती, परके अन्न, सगळेच कसे परके. काय मन:स्थिती झाली असेल त्यांची? तिकडे मायदेशात तसे नव्हते. तिथे मायेची माणसे होती, ओळखीचा आसमंत होता, मृदू हवामान होते. मायदेशाचा पाऊस रिमझिम पडायचा, वारा यायचा तो झुळूक बनून. पहाट व्हायची ती दुरून ऐकू येणाऱ्या काकडआरतीने किंवा देवळाच्या घंटेने, कुठे जात्याच्या आवाजाने तर कुठे आईच्या सात्विक आवाजाच्या ओवीने. त्या काळातील पिढी तशी भाग्यवानच. एकत्र कुटुंब पद्धती अजून तग धरून होती. वडिलधाऱ्यांत कुरबुरी होत असतील पण त्यांचा मुलांवरील प्रेमावर कधी परिणाम व्हायचा नाही. काका, काकू, आत्या सगळे प्रेम करणारे असायचे. सुट्टीच्या दिवसांत सगळी भावंडं एकत्र येऊन घरात उच्छाद मांडायची, मोठ्यांची बोलणी खायची, पण त्या सगळ्यातूनच अतूट असं नातं तयार झालेलं असायचं. बाहेरही तसंच जग. मित्र जीव लावणारे असायचे. शाळेतल्या मास्तर खडूस खडूस म्हणायचं पण त्याच मास्तरांनी एक पैसाही न घेता शिकवणी घेतली होती हे कुठं तरी आत जपून ठेवलं जायचं. मोठं झाल्यावर याच खडूस मास्तरांच्या आठवणीनी गहिवरून यायचं. अर्थात सगळंच काही आनंद देणारं असायचं असं नाही. दु:ख, निराशा, राग, लोभ, द्वेष वगैरे षडरिपु सर्वत्रच असतात तसे भारतातही होते, आहेत. पण ते पचवून पुढे जाण्यासाठी जे बळ लागतं ते आपल्या कुटुंब आणि मित्र संस्थांत होतं. या संस्था धीर द्यायच्या, प्रसंगी कान उपटून मार्गावर आणायच्या. आपल्या माणसाचं भलं व्हावं यासाठी निरलसपणे काम करणाऱ्या या संस्था. भारतातलं, मायदेशातलं हे असं जगणं हे एखाद्या मोठ्या कुटुंबात जगल्यासारखं असायचं. 

हे असं जीवन सोडून काही तरी वेगळं करायचं, नवी दिशा शोधायची, नवा मार्ग निर्माण करायचा अशा ध्येयातून माणसे इथे आली. प्रथम प्रथम काही दिवस बस्तान बसवण्यात गेले. नव्या रूढी, पद्धती शिकण्यात गेले, स्थिरस्थावर होण्यात गेले. आपल्या संस्कृतीची, पद्धतीची आठवण काढून कुढायला वेळ नव्हता. पण जरा स्थिरस्थावर झाल्यावर उसंत मिळाली. कामात असलेलं डोकं वर उचलून आजूबाजूला बघता येऊ लागलं. तेव्हा मग प्रथम जाणवलं ते मायदेशाचं जवळ नसणं. कॅलेन्डरवर दिवाळी, गणपती यायचे आणि तसेच निघून जायचे. मनात गणपतीची आरती आणि मनातच दिवाळीची पणती. मनातल्या मनात गणपती बसायचे, विसर्जित व्हायचे. मग यातूनच विचार पुढे आला. अरे, वसुधैव कुटुंबकम ना? आपण दूर आहोत असे कशाला मानायचे. आपण आता आपली कर्मभूमी जर ही मानली आहे, तर हीच मायभूमीसारखी का नाही करायची? शेवटी मायभूमी मायभूमी म्हणजे असतं तरी काय? ज्या जीवनपद्धतीत जन्मलो, ती जिथे अनुभवता येते, जगता येते ती मायभूमी. परदेशात राहून ती जगता यावी या विचारातून महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. 

आज जीवनपद्धती बदलली आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. स्काईप, फोन इत्यादी सोईमुळे मायदेश, आपली माणसे जणू हाताच्या बोटांवर आले आहेत. पण तरीही एक समाज म्हणून आपल्या काही गरजा असतातच. आपण या ठिकाणी एकटे नाही हा दिलासा द्यायला आजूबाजूला आपली माणसेच लागतात. प्रसंगी धावून येणारी, अडीनडीला मदत करणारी, आपली माणसे येणार नाहीत तर कोण? शिवाय अडीनडीची गरज हीच केवळ गरज नसते. आपण गर्दीत रमणारी माणसे. मराठी माणूस एकटा जगू शकत नाही. खेड्यात असेल तर गावच्या चावडीवर आणि पुण्यात असेल तर नेहमीच्या कट्ट्यावर तो जाणारच. दिवसभर ऑफिसात परीटघडीचा चेहरा करून वावरल्यावर कधी एकदा कट्ट्यावर जातो आणि मित्रांना "च्यायला"चा रामराम घालतो असे त्याला होते. गणपतीच्या विसर्जनाचा सोहळा ज्याला बेभान करत नाही असा कुणी आहे का? ताशाचा कडक तडतडाट, घुमणारे ढोल, उंच उंच नाचणारे ते भगवे झेंडे, आणि त्यात स्वत्व हरवून बसलेले असे आपण, हे कुणी अनुभवलं नाहीय? हे सगळं आपल्याला मराठी म्हणून जगवतं. एक समाज म्हणून घडवतं. असा हा समाज एकत्र ठेवावा, केवळ कार्यक्रम करण्यासाठी म्हणून नव्हे तर माणसांना जोडून ठेवावा यासाठी आजही आपल्याला एका अशा एका संस्थेची गरज आहे, ते म्हणजे आपलं महाराष्ट्र मंडळ. हे करत असताना आपण सजगपणे बदलांकडेही पाहायला हवं. आपण राहतो तिथल्य आणि मायदेशातल्याही. संकटं येत असतात, आव्हानं बदलत असतात. मायदेशात दुष्काळाचं सावट आलं, आपण धावून जायला हवं, मदत द्यायला हवी. इथे आपण महाराष्ट्रीय नसतो, तर भारतीय असतो. आपण जिथे राहतो तिथे आव्हानं सामोरी येतात. काही राजकीय असतात, काही सामाजिक असतात. अशा वेळी ठामपणे पण आदरपूर्वक आपली मतेही मांडता आली पाहिजेत. ज्या देशात आपण राहतो त्या देशाशीही आपली बांधिलकी आहे हे ध्यानात ठेवून वागलं पाहिजे. तीस वर्षांमध्ये मंडळाने ही प्रगल्भता आणली आहे आणि ती तशीच वाढीस लागेल याची खात्री आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या मराठी मनास आवाहन करतो, आपण असेच एक राहूया. 

-मंदार वाडेकर 
अध्यक्ष, 
२०१७ समिती

Thursday, March 23, 2017

वग - घरात बायकूराज आणि बाहेर अभिजितम्हाराज

सूत्रधार - म्हाराज! ओ म्हाराज! उटला का न्हाय हो? सूर्य कासराभर वर आलाया. नगरातून रपेट मारायची न्हवं? घोडं तयार करून आणलंय.
(प्रेक्षकांकडे पाहत) - ह्ये आमचं अभिजित म्हाराज सरकार. सक्काळच्या पारी चार वाजता उटत्यात आन भूत मागं लागल्यागत अंधारातनं चालत सुटत्यात. जाता जाता चार जणांना उटवत्यात आन सोताबरोबर फरपटत नेत्यात. आसं सगळ्यांच्या झोपेचा कुटाणा करून झाल्यावर सोता मात्र पाचला घरी येऊन कसं पुन्ना पाखरावानी झोपत्यात. मग आगदी कुनी कानापाशी पार बोंबललं तरी उठत न्हाईत. त्यावर मग अर्चनाराजे राणीसरकारांनी येक युगत काडलीय. हुजऱ्याला कानाशी जाऊन ओरडायला सांगून ठेवलंय. मग त्यो जाऊन खच्चून वरडतोय "म्हाराज म्हाराज! कोण तरी भाईर रस्त्यावर प्लास्टिकची ग्लासं, बाटल्या फेकायलाय. उटा! उटा!" निसता प्लास्टिक शब्द कानावर पडू द्या, येकादी इंगळी डसल्यावानी म्हाराज ताडदिशी उटत्यात. धावत रस्त्यावर जात्यात आन जे काय शिव्या सुरू करत्यात! नाव नगं! "कोन हाय रं त्यो रांडंचा कचरा टाकायलाय रस्त्यावर? सुक्काळीच्या तुझ्या बाचा हाय व्हय रं रस्ता? उचल पयल्यांदा त्यो कचरा!" त्यास्नी शांत करस्तंवर अर्धा तास जातुया.

तसं आमचं हे आताचं म्हाराज काय मूळचं म्हाराज बिराज न्हवतं. तीबी एक ष्टोरीच हाय म्हना. आमच्या गावचं म्हाराज होतं सरकार अमरसिंह प्रतापसिंह इदरउच्चीकर! आता नावावर जाऊ नगा. इथं कुनी कानडी बोलनारं न्हाई न्हवं? न्हाईतर "काय म्हनला? उच्ची कर? बसून करू का उभ्यानं?" आसं म्हनून फिदीफिदी हासशिला. पन नावात काय आसतंय आसं तो शेक्सपियरबाबा म्हणूनच गेलाय न्हवं? तर आमचं उच्चीकर सरकार पाच वर्सांखाली गचाकलं. साॅरी, म्हंजे तेंचं महानिर्वाण का काय म्हणत्यात ते झालं. थोरलं म्हाराजांना बरं का, (डोळे बारीक करून) येक नाद होता. अहो त्यो तसला नाद न्हवं! तुमी लोक बी लै आंबटषौकीन बघा. निसतं नाद आसं म्हटलं, आन तुमी लागले कान टवकारून आयकायला. तर थोरल्या म्हाराजांना नाद हुता तो पावलं मोजायचा. पयल्यांदा एक चाळा म्हणून हे सुरू झालं. पन फुडं फुडं हे वाढतच गेलं. कुटंबी पावलं टाकत गेलं की तोंडानं येक दोन तीन चार चालू. येवढा चाळा लागला की सकाळच्याला म्हालातल्या पलंगावरून उठून पायखान्यात....  पायखाना म्हंजे संडास हो. व्हय. आजकाल तेबी सांगाया लागतंय लोकास्नी. तर, काय सांगत हुतो ..... हां! तर निस्तं पलंगापास्नं पायकान्यात जरी गेलं तरी पावलं मोजत जायचं. फुडं वय झालं, चालणं बंद झालं. मग सज्ज्यात बसून रस्त्यावर चालणाऱ्या कुनाचंबी पावलं मोजत बसायचं. 

(एक जण  कुबड्या घेऊन चालत जातो)
थोरले महाराज - एक... दीड....  दोन...  अडीच...  तीन...  साडेतीन. आरारारा! अरं ए बारा बोडीच्या! काय लग्नाच्या वरातीत चालतुयास काय रं? जरा पावलं जोरात टाक की! दोन न्हाई चांगलं चार तंगड्या हैत की तुला!

प्रधान - म्हाराज, त्या तंगड्या न्हवं, कुबड्या हैत. आपल्या गावातलं एक नंबर चालणारा हुता ह्यो. 

थो. म - आं!? मंग याला कुबड्या का आल्या हैत?

प्रधान - फाटं उटून अंधारात चालायची सवय म्हागात पडली म्हाराज. येक दिशी आसाच अंधारात चालला व्हता. गल्लीत कुत्रीबी गाढ झोपल्याली. याचा पाय येकाच्या शेपटावर पडला आन ते कळवाळलं आन जे काय खच्चून वराडलं! मग बाकीची कुत्री काय मागं ऱ्हात्यात होय? ती बी लागली भुंकाया. आसा काय खकाणा उसळला. झोपलेल्या लोकांस्नी वाटलं, कुनी चोर आलाया. काट्या बिट्या घिऊन लोकं  आली, आन ह्याला धरला, डोस्क्यावरनं कांबळं टाकलं आन आसा काय धुतलाय गड्याला, धोतरातलं दोन्ही पाय गळ्यात घिऊन बसलं ह्ये.

सूत्रधार - गावातल्या शाळांना म्हाराजांनी मोठ्या देणग्या दिलेल्या. तिथंही  यांनी मास्तरांना ताकीद देऊन ठिवल्याली. पोरांस्नी चालताना पावलं मोजायला लावायची. शाळा सुटताना परत्येक पोरांनं मास्तरांकडे पावलांची नोंद करायची.

मास्तर - हजेरी द्या रे पोरानहो! विघ्नेश खाडे!
विघ्नेश  - हजर! आठहजार पावलं!
मास्तर - मिलिंद केळकर!
मिलिंद - हजर!
मास्तर - (वर पाहत ) आणि पावलं?
मिलिंद - आज काय न्हाईत मास्तर. उद्याच्याला भरून काडतो की. 
मास्तर - लेका या इग्नेशकडं बग. पाय म्हंजे तूरकाड्या हैत पन चालतंय बग कसं तुरुतुरु. (विघ्नेश आपले पाय चाचपून पाहतो) आन तू!
मास्तर - बरं फुडं! अमित अर्काटकर 
(अमित नुसताच खाली मन घालून उभा राहतो)
मास्तर - हं! म्हंजे आज बी घरनं मार खाऊन आलायस वाटतं. 
अमित - व्हय मास्तर. मी लै चालायला जायचं म्हंतो पन घरची मानसं लगेच कामाला लावत्यात. कदी गोठ्यातलं शेन आन, कदी शेतकडं जाऊन बांधावरनं पाला घिऊन ये, कदी बाजारात जाऊन त्यालच घिऊन ये. लै कामं मागं लावत्यात. 
मास्तर - व्हय रं पोरा, तुझी दशा म्हाईत हाये मला. बस खाली, लावतो तुजी पावलं हजेरीत मी.बरं, सलील जोशी!
सलील - हजर हाये! 
मास्तर - ते दिसतंय! पावलं सांग!
सलील - आज काय न्हाई मास्तर. 
मास्तर - आं! तुलाबी कामाला लावत्यात काय घरला?
सलील - न्हाई मास्तर. जा म्हनत्यात चालाया. पन मलाच कामं आठवत्यात. फुडल्या वेळेला नक्की. 
मास्तर - पोरांहो, लै टंगळमंगळ चाललीया तुमची. महाराजास्नी कळलं तर मला नोकरीवरून काडत्याल आनि सोता मास्तर होऊन शाळेत येऊन बस्त्याल. बगा मग तुमचं तुमी. भीक नगो पन म्हाराज आवर असं होऊन बसेल. 
सगळी मुले एकसुरात - नगं नगं मास्तर, आमी जातो चालाया आता.

सूत्रधार -अशी ही शाळेची तऱ्हा.

बरं, म्हाराजांस्नी काय पोरबाळ न्हवतं. मग गादी कोन चालवनार? म्हाराजांनी हुकूम काडला. परधानजी, दवंडी पिटवा! गावात जो कुनी चालताना न चुकता न्हेमी पावलं मोजत आसंल त्यो आमच्या माघारी गादीवर बसंल. आसा मानूस तुमी शोधून आणा. मग परधानजींनी गुप्तहेर सोडले. मंडईत, रस्त्यांवर, तमाशाच्या कनातीत, शेताच्या बांधावर, नदीवरच्या घाटांवर, देवळांच्या देवडीवर, गावच्या वेशीवर, चावडीवर , आगदी पार सम्शानातही आशी सगळीकडं मान्सं पेरली. दिवस गेले, म्हैने गेले, कुनीच गावलं न्हाई. थोरलं म्हाराज हातरुनाला खिळल्यालं. पन कुणी तरी घावल ही आस घेऊन बसल्यालं. परधानजी पन डोसकं धरून बसल्यालं. 

कोतवाल (धावत येतो. मुजरा करतो) -  "घावला, परधानजी घावला!"

(आनंदाने) "आं!! कवा, कसा आन कुटं घावला रं?"
कोतवाल - "फाटं फाटंला चालली हुती स्वारी. नदीच्या कडंनं. हातात लोटा, डुईला कमरेचं गुंडाळल्यालं, सदऱ्याच्या खिशात मोबाईल, तेच्यावर हिंदी गानी लावल्याली. म्हटलं आपलाच गावातला आसंल कुनी चाललेला मोकळा हुयाला. पन ह्यो बाबा तोंडानं काय काय बडबडत चाललेला. म्हटलं काय बोलतोय सोताशीच म्हनून बगाया गेलो मागनं, तर कानावर आकडे आले. "दोन हजार पाच, दोन हजार सा, दोन हजार सात..."  म्हनलं, "ओ पावनं! जरा दम धरा.." तर ह्यो बाबा पळायला लागला. मीबी तेच्या मागं लागलो पळायला मग. झुडपामागं लपायला बघत हुता तितक्यात धरला गड्याला. 

"आहो कोतवालसाहेब, माझ्या मागं आसं का लागलाय हो? कालच आलोय गावात. लोटापरेड करायला तुमच्या गावात काय सरकारी परमिट लागतंय काय? निवांत तेबी करू दीना तुमी." 

कोतवाल - "पावने, लै घाईत हाय तुमी!"

अभि- "सक्काळच्या पारी घाई नसंल तर काय असंल सांगा बरं! सोडा हो सोडा लौकर.. न्हाई तर हितंच आमचा घंपतीबाप्पा मोरया होयाचा!"

कोतवाल - "जाशिला हो! येक सांगा की, हे तोंडानं कोणचं स्तोत्र म्हनत होता म्हनं तुमी?"

अभि - " स्तोत्र?  न्हाय हो, स्तोत्र कुटलं म्हनायला? पावलं मोजीत हुतो सोताचीच."

कोतवाल - वा! वा! न्हेमी मोजता का?

अभि - न्हेमी? काय प्रश्न विचारायलाय नको त्या वेळी ? अवं, त्याबिगर चालतच न्हाई. जाऊ द्या ओ आता तरी!

(तुतारी, ढोल, ताशा)
(माळ घालतात) 
"आज पासून आमच्या गावचं राजे तुमी! थोरल्या म्हाराजांची पावलं मोजायची गादी तुमी फुडं चालवनार!"

अभि - "अहो अहो तसं न्हाई हो! माझं आयकून तर घ्या की मी का आकडे मोजत व्हतो ते! त्याचं असं आहे, पाच हजार आकड्यापर्यंतच तग धरता येते आपल्याला. पाच हजार आकडे झाले की जिथं आसंल थितं बसावं लागतं मग. कळ काढता येत न्हाई मग. आज या तुमच्या कोतवालांनी लै घोर परसंग आनला हुता. पाच हजार आकडं झाल्यालं, आन हे चौकशी करत बसले. हितं आमचा जाग्यावर नागिन डान्स चालल्याला. कुटल्याबी टायमाला समदं पुंडलीक वरदा हाssssरी विठ्ठल झालं आसतं."

प्रधान - मंग झालं न्हाई न्हवं? न्हाई तरी आता ही कापडं तुमास्नी लागनार न्हाईत. आता पालकीतनं राजवाड्यावर चलायचं. चला म्हाराज!

सूत्रधार -आन अशा प्रकारे अभिजित सरकार म्हाराजांना राज्य गावलं. सकाळी सकाळी पाच हजार पावलांची सवय चालू ऱ्हायली. गावातल्या लोकांनाही ती लागली पायजे असा तेंचा आग्रह होता. त्यात प्लास्टिकचे कप, बाटल्या उचलायची सवय लागली. कुनी बिसलेरीची बाटली तोंडाला लावून पानी पीत आसेल तर म्हाराज बाटली टाकेतंवर तेच्या मागं मागं फिरायचे. मग फुडं फुडं लोक सोताच येऊन गावात कुटं प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या आसतील ते नेऊन दाखवायचे.

( गाणं - प्लास्टिकवाले बाबू)

सूत्रधार -कसं का आसंना, म्हाराजांच्या या नादापाई गावाला मात्र लै फायदा झालाया. मानसं चडफडत का हुईना लवकर उठत्यात, चालाया जात्यात, सरकारांच्या शिव्या खात्यात पन तब्येतीत असत्यात. कुनी आजारी फारसं पडंना झालंय. डॉक्टर लोकं माश्या मारत बसू लागली हैत. एक दोन डॉक्टर तर कायमचं गाशा गुंडाळून दुसऱ्या गावाला गेलं. गावातलं प्लास्टिक कमी झालं. किती तरी गाईगुरं पॉट फुगून मरायची. कारण प्लास्टिक पोटात जायाचं. म्हाराज बोंबलून बोंबलून लोकांनला सांगायचं, बाबांनो आपल्या जुन्या पद्धतीच बऱ्या. बाजारला जावाल तेवा घरनं सोताची पिशवी न्या, थितली प्लास्टिकची पिशवी घरला आनून निस्ता प्लास्टिकचा बाजार मांडू नगा. लोक ऐकायला लागले. गावात आता प्लास्टिक नावालापन दिसत न्हाई. सगळीकडं कसं हिरवं हिरवं दिसू लागलंय. खिल्लारं शेपट्या उडवत फिरत्यात, पाखरं चिवचिव करत्यात, घरटी बांधत्यात. त्यास्नी घरटी बांधायला आता झाडं बी झाल्यात. गाईगुरं निवांत चरत्यात, त्यांना आता प्लास्टिक पोटात जाऊन मरायचं भ्या ऱ्हायलं न्हाई. 

म्हाराज - काय परधानजी, राज्यात समदं ठीक हाय ना?

प्रधान - आपल्या कृपेनं म्हाराज सगळं ठीक हाय, सगळं ठीक हाय. चांगभलं जी! चांगभलं!

(ज्योतिबाचा येळकोट, तुतारी. सर्व मुजरा करतात, महाराज समाधानानं मागे रेलून बसतात)