Tuesday, September 29, 2015

न जाईल ते बलिदान वृथा

मरावे परि फेसबूकरूपी उरावे
भिकार पोस्ट तरी लाईक मारावे
आपणही उलट टुकार पोस्ट करावे
घटिका पळे दिन मास झणी सरावे
सदोदित वॉलवर पडीक राहावे
जीना यहां मरना यहां घोकत असावे ।।

व्याकरणाची चिंता करणे सोडोन द्यावे
शुद्धलेखनाला तुज्या आयचो घो म्हणावे 
"खुप छान, खुप छान" कॉमेंट वाचून रडावे
मनी "खू दीर्घ रे सोट्या!' असे ओरडावे
चडफडून ओठांवर दात रुतवावे
खुनातला खू र्हस्व की दीर्घ ते आठवावे।।

वाया गेलास तू असे थोरांनी ऐकवावे
बाबा तू यूसलेस असे पोरांनी म्हणावे
फोन अथवा मी असे बायकोने चॅलेंजावे
इथले वायफाय प्रिय असे बॉसने हिणवावे
हाच तो सर्वसंगपरित्याग असे स्वत:स समजवावे
साधूस जशी चिलीम तसे हे फेसबूक बरवे।।

परि वृथा न हा त्याग असे ऐकण्यात यावे
थेट यूएस मधून सनई चौघडे वाजावे
वाजावे कसले खरे तर कानी बोंबलावे
पाहून ती भरतभेट आनंदाश्रू ओघळावे
मारा पासे सवा कोट यूजर छे नमोंनी वदावे
चोक्कस असे फेसबूकस्वामींनी चीत्कारावे
अन सवासो कोट डोलर नमोचरणी अर्पावे।।

सवा कोटीतील म्यां एक म्हणोन हरखावे
भरास येऊन स्टेटस अपडेटावे
झालाच आता भारत महासत्ता म्हणावे
पाहोन ते ट्रेंडिंग ते दोन बनिये सुखवावे
बीजनेस आणि राजकारण भरून पावावे
आपण तेवढे आपले ब्रीद सांभाळावे
मरावे परि फेसबूकरूपे उरावे ।।

Monday, September 21, 2015

निर्गुणी संवाद

खूप वर्षांपूर्वी असंच एक वेड लागलं. ते वेड अद्याप तसंच आहे. त्यावर काही उपचार वगैरेही करावेसे वाटत नाहीत. ते वेड होतं निर्गुणी भजनांचं. मला वाटतं वडील कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांची कॅसेट रेकॉर्ड करून घेऊन आले असावेत. त्यातील "सुनता है गुरु ग्यानी"ने झपाटला गेलो होतो. समाधिअवस्था कशी असते मला माहीत नाही आणि त्यावर बोलण्याची माझी योग्यताही नाही. पण समाधि कशी असेल यावर उगाच विचार मात्र करण्यात खूप वेळ घालवला आहे. कुमारांचं ते "ओहम सोहं बाजा बाजे" ऐकलं आणि तो बाजा आपल्यात सुरु झाला असं वाटलं होतं हे मात्र नक्की. अलंकारिक आणि शब्दबंबाळ लिहिण्याचा माझा पिंड नाही पण, हे वाक्य आतून आल्यामुळे जसं आलं तसं लिहिल्याशिवाय तरणोपाय नाही. ते भजनच बाजासारखं डोक्यात वाजत राहिलं. अनेक वर्षं. कधीही ते सुरू व्हायचं मग पुढे दोन दिवस अखंड चालू. या भजनांच्या निर्मितीची कथा कळली होती. कुठे वाचली स्मरत नाही. पण आजाराने अंथरुणाला खिळलेले कुमार गंधर्व, माळवा प्रांतातील ते एक छोटे गाव, डॉक्टरांनी गाण्याला केलेला मज्जाव, संध्याकाळी दुरून तरळत येणारे ते लोकगीतांचे, भजनांचे सूर असं सगळं कळलं. त्या सुरातील ते आर्त, थेट त्या परमात्म्याशी चाललेला तो संवाद कुमारांच्या प्रतिभेला न कळला तरच नवल. दैवी सूर असे असतात की डोळे आपोआप मिटतात. एक प्रतिभाशाली कलावंत आणि ते अंतराळातून तरंगत आलेले सूर यांतून निर्गुणी भजने घडली. सगुण अशा शब्दांच्या चौकटीत निर्गुण निराकाराचे दर्शन देणारे असे ते सूर कसे बसले असावेत? पण बसले आहेत खरे. अध्यात्म या शब्दाला धर्माशी निगडित करणारे करंटे आपण. या सुरांना भजन असं म्हणून टाकतो. ते भजन आहेच पण लौकिकार्थाने नाही. देवाची उगाच आळवणी नाही. नवस सायास नाहीत. "पोराला नोकरी लागूदे रे बाबा" छाप भक्ती नाही ही. त्या चिरंतन सत्याचा मागोवा घेणारे हे सूर आहेत. देव या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन त्याचे अमूर्त असे स्वरूप पाहण्याचा तो प्रयत्न आहे. देवाची सगुण मूर्ती आपण तयार केली ती केवळ निर्गुणाचे ध्यान करता येत नाही, सगुण मूर्ती नसेल तर मन इकडे तिकडे धावते, त्याला एका ठिकाणी बसवून विचार करवून घेता येत नाही म्हणून. पण होतं असं की सगुण मूर्ती हे साधन आहे आहे हे विसरून आपण तिलाच साध्य ठरवून बसतो. एकदा त्या अंतिम सत्याला आपल्या मर्यादित आकलनशक्तीच्या सगुण चौकटीत बसवले की मग पुढे जायची शक्यता नाहीच. मला वाटतं सुरांचा प्रत्येक भक्त हा शेवटी साधक बनतो. तो या सगुण चौकटीतून बाहेर पाहत असतो. त्याला पलीकडले दिसत असते जाणवत असते. पण त्या सगुण चौकटीतून कसे सुटायचे हे कळत नसते. कुमार गंधर्वांसारखा एखादाच त्या शृंखलेतून मुक्त होतो आणि सुरातून त्या अंतिम सत्याशी तादात्म्य पावतो.

हे असं असताना सहा सात वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी पुन्हा "सुनता है " कानावर पडलं. राहुल देशपांडे या नवोदित गायकानं गायलेलं. त्यापूर्वी मी कधी राहुलचं गाणं ऐकलं नव्हतं. आणि मला माहीतही नव्हतं. असाच कुठलासा कार्यक्रम असावा. त्याचं छायामुद्रण होतं. अंगावर रोमांच उभे राहिले. आवाजाचा पोत वेगळा, धीरगंभीर, खर्जातला. ऐकत राहिलो. निर्गुण निराकार असं अंगावर सायीसारखं पसरत गेलं. अनादि अशा त्या ओंकाराशी संवाद ऐकू येऊ लागला. संवाद माझा नव्हता. पण त्या गायकाचा होता. मी फक्त त्याला साक्ष होत होतो. पण अशी साक्ष अनुभवायला मिळणे आणि हे काही तरी दिव्य घडते आहे याचे भान राहणे हेच माझ्या दृष्टीने पुरेसे होते. राहुल देशपांडेंचं वेगळेपण जाणवलं होतं. नादब्रम्हाची उपासना दिसत होती, त्या उपासनेपलीकडे जाण्याची आस जाणवत होती. पुढे कित्येक दिवस मी त्या रेकॉर्डिंगची पारायणं केली. कुवतीनुसार ते सूर स्वत: अनुभवण्याचा प्रयत्न केला. स्वत: गातानाही त्या सुरांचं वजन, त्यातील आर्त जाणवायचं. कधी कधी डोळ्यात अश्रू यायचे. माझ्या येतात. एखादं भव्यदिव्य दृश्य, अप्रतिम लागलेला एखादा सूर, एखादं अत्यंत प्रेमानं किंवा नि:स्वार्थी बुद्धीनं केलेलं कृत्य (मीच असं नव्हे, दुसऱ्या कुणीही), या गोष्टींनी माझ्या डोळ्यात अश्रू येतात. पूर्वी मी ते लपवत असे. पण पुढे गोनीदांनी स्वत:च्या बद्दल असं होतं असं लिहिल्यानंतर मला संकोच वाटेनासा झाला. अश्रू हे दुबळेपणाचं लक्षण आहे अशा खोट्या भ्रामक कल्पनांतून आपण अत्यंत नैसर्गिक अशी ही भावना दडवत असतो. कुमार गंधर्वांच्या त्या "ओहम सोहं बाजा"ने तसे अश्रू माझ्या डोळ्यात आणले होते त्यानंतर राहुल देशपांडेंच्या त्याच भजनाने आणले हा योगायोग म्हणावा की या गायकांची ताकद, की त्या सुरांची आतवर पोचण्याची क्षमता? मला या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं नाही, अथवा नकोच आहे. गाभाऱ्यात प्रवेश न करता बाहेर बसून आतील मूर्तीकडे डोळे लावून बसण्याची तपश्चर्या करायला मिळणं हेही तेवढंच भाग्याचं. त्यातूनही आत्मा तृप्त होतो.

काल पुन्हा तो पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. जवळून, प्रत्यक्ष. नादब्रम्ह अवतरलं होतं. माझ्यासारख्या श्रोत्याला जर इतका अनुभव येत असेल तर प्रत्यक्ष गाणाऱ्याची अवस्था उन्मनी अशीच होत असेल असं मला नेहमी वाटायचं. आता मला संधी मिळाल्यावर हा प्रश्न राहुलना विचारलाही. त्यांनी त्याचं उत्तर त्यांच्या स्वत:च्या "विरहिणी बोले" कार्यक्रमाच्या अनुभवाबद्दल बोलून दिलं. संवाद घडतोच आणि तो असा निर्गुण असतो की त्याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. मला हे उत्तर आधीच कळलं होतं, त्यांच्या गाण्यातून. यालाच समाधि म्हणत असावेत. अध्यात्म जे काय असेल ते असो, समाधि काय असते त्याचं उत्तर मला मिळालंय. 

Friday, September 11, 2015

उ:शाप

आपण रोज उठून इवळत असतो - पुराणकाळी मपला देश लैच प्रगत हुता भौ. येक म्हणून टेक्नाॅलाॅजी आपुन सोडल्याली न्हवती. उड्ढाण घ्या, अग्निबाण घ्या, पर्जन्यबाण घ्या, बूड आजाबात न हालवता जाग्यावर विश्वरूपदर्शन (प्रोप्रा. श्रीकृष्ण यादव) घ्या, अंतर्ज्ञान घ्या, सग्गळीकडे निसतं ज्ञानच ज्ञान. न्हान पोरगं बी बोलाया लागलं तर "मित्रजन हो, तात आत्ताच सूक्ष्मदेह धारण करून पृथ्वीवरून बाहेर पडले आहेत. गुरूपर्यंत चक्कर मारून येतो असं मातोश्रींना ते सांगत असताना आम्ही ऐकले आहे. तस्मात, दोन तीन घटिका कल्लोळ करावयास काहीच हरकत नाही." आसं कायबाय बोलत असावं. दुर्दैवानं पिताश्रींनी ते अंतर्ज्ञानानं ताडावं आणि अंतरिक्षातूनच फोकयान (हे यान उत्तम अशा चिंचेच्या फोकापासून बनवलेलं असायचं) सिद्ध करून चिरंजीवांना फोकडान्स करायला लावावा. हेला म्हणतात तंत्रज्ञान. 
या घरगुती तंत्रज्ञानाचं काय नाय हो, पण ते शाप देण्याचं तंत्रज्ञान मात्र लै भारी व्हतं बर का. मायला, कुनीबी चिढला तर डायरेक शापच देयाचा. दगडच काय व्हशील, फुडल्या जल्मी गाडावच काय व्हशील. आन ते तंत्रज्ञानबी आसं भारी की मानूस व्हायाचा बी दगड आन गाडाव. मग मांडवली झाल्यावर रीतसर उ:शापबी देयाचा. पण ऋषीबिशी होते तेनला आनखी भारी शाप अव्हेलेबल व्हते. जटादाढीवालं ऋषी चिडलं तर आत्ताच्या आत्ता ईज पडून मरशील आसला काय तरी शाप देयाचं. हे कुटंबी जाऊन बसायचं ध्यान लावायला. गुमान आपल्या आश्रमात किंवा जी काय कुटीबिटी आसंला तिथं बसावं क न्हाय, ते ऱ्हायलं. आन मग कुनी गायगुरू चाराया आलं तर झालं, हेंचा तपोभंगच! जसा काय इतक्या येळ देवाचा फोन आऊट ऑफ रीच व्हता, निक्ता लागला व्हता आन हेच्यामुळं कॉल ड्रॉप झाला. इतर शापान्ला उ:शाप तरी व्हते हो, पन ईजच पाडल्यावर कसला उ:शाप आन काय. भौतेक ऋषी शाप देऊन झाल्यावर जीभ चावायचे. कारन टक्कुरं शांत झाल्यावर लक्षात यायचं मायला उगाच शाप देऊन बसलो राव. मग गुपचूप ध्यानाची जागाच बदलायचे. लोकान्ला वाटायचं काय म्हाराज हैत, सर्वसंगपरित्याग म्हंजे आसा आसावा, एका ठिकाणी माया लावून घेयाची न्हाई. आन काय चालतेत झपाझपा या वयात! म्हाराज फुडल्या गावाला गेल्यावर लोकान्ला ईज का पडली आणि गुरं राखायला गेलेला शिरपा का मिसिंग हाये ते कळायचं. तंवर म्हाराज ज्युरिसडिक्शनच्या भाईर गेलेले असत.

पण कायपन म्हना, आज ती टेक्नाॅलाॅजी ऱ्हायली न्हाई ते बरंच. ती ऱ्हायली आसती तर सगळ्यात जास्त वापरात आसलेलं तंत्रज्ञान आसतं ते शाप देण्याचं. कावळ्याच्या शापानं गाय मेली आसती. हुतं ते बऱ्यासाठीच. आपल्याला शापाच्या आदीच उ:शाप भेटला. उगाच पुराणकाळाच्या नावानं इवळू नगा.

Monday, August 17, 2015

स्वातंत्र्याची ऐशीतैशी

स्वातंत्र्यदिन होऊन गेला. लेखनकामाठ्यांनी बरंच त्यावर लिहिलं. ती आपली पद्धतच झाली आहे. बरंचसं लिखाण उपरोधी, लोकांच्या "हॅपी इन्डिपेंडन्स डे" टाईप शुभेच्छांची टर उडवणारं, तर काही नेहेमीप्रमाणे इतकी वर्षं झाली पण आपल्यात काय पण फरक नाय पडला ब्वॉ, सगळे राजकारणी चोर, सरकार झोपलं आहे, नोकरशाही खाबू आहे, शेतकरी आत्महत्या करताहेत, सामान्य जनता तेवढी अश्राप, कष्टकरी आहे, यात बळी जाणारी आहे असं काही तरी व्यक्त करणारं. स्वातंत्र्य म्हणजे सरकारने सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्यात, कुठून तरी पैसे आणावेत (म्हणजे कृपया माझ्याकडे कर मागू नका), रस्ते चकाचक करावेत, पेट्रोल फुकट करावे, कुठेही लाच द्यायला लागू नये इत्यादि गोड आशा. सरकारच्या जबाबदाऱ्या इथवर संपत नाहीत. आम्ही कर्जे घेऊ, ती माफ व्हायला हवीत, नाही तर आम्ही आत्महत्या करणार, आमची बायका पोरं रस्त्यावर आणणार, मग काही थोर समाजसेवक त्यांना बारा पंधरा हजार वाटणार, आम्ही फेसबुकवर, ट्वीटरवर या समाजसेवकांचे गोडवे गाणार आणि सरकार कसं हरामी आहे त्यावर लिहिणार. आणि हो, हे सगळं करायला फुकट वायफायचीही मागणी करणार. पण हे सगळं असं लिहिलं म्हणजे मी सर्वांपेक्षा वेगळा, संवेदनशील, विचारवंत. असं सगळं अस्वस्थ करणारं, भयंकर क्रांतिकारी लिहिल्यानंतर समाधानानं माझ्या एसी लावलेल्या घरात मी झोपणार, झोपता झोपता दुसऱ्या दिवशी लिखाणाच्या काय पाट्या टाकायच्या याचा विचार करणार. समस्या वगैरे मरूद्यात, मला विषय हवा. अरेच्या! समस्या मरूद्यात कसं? समस्या हव्यातच! नाही तर मी लिहिणार कशावर नी बोंब कशावर मारणार? स्वातंत्र्य या शब्दाचा स्वत:ला हवा तसा अर्थ कसा लावायचा हे भारतीयांकडून शिकावे. त्यातल्या त्यात मरहट्ट देशाचे सर्वात पुढे. इथे सगळेच चाणक्य, सगळेच ॲरिस्टाॅटल आणि सगळेच कान्ट. स्वत:च्या तंत्राप्रमाणे चालता आले तर ते स्वातंत्र्य नाही तर ते पारतंत्र्य. सामर्थ्य आहे गर्दीचे, स्वामी आणि त्यांच्या पिलावळीचे असे काहीसे भारतीय लोकशाहीचे स्वरूप झाले आहे. भाषणस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्व स्वत:चे तंत्र नीट लावल्याशिवाय काही अर्थाचे नसते हे सोयीस्करपणे विसरले गेले आहे. गेल्या अडुसष्ट वर्षांत, बोंबलणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच असे बाणेदारपणे लिहिणारे (केवळ लिहिणारेच) लोकलमान्य तेवढे गल्लोगल्ली झाले आहेत. दिसामाजि काही तरी लिहावे असं समर्थ सांगून गेले खरे, लोकांनी स्वत:ला पाहिजे तो अर्थ लावून दिसामाजि कायच्या काही तरी लिहावे असा सपाटा लावला. त्याला हातभार प्रात:स्मरणीय झुकेरबर्ग यांनी लावला. प्रात:स्मरणीय हा शब्द खऱ्या अर्थाने घ्यायचा. पूर्वी भल्या सकाळी लोटा पाहणारे आता प्रथम फेसबुक पाहतात.  लोकांकडे प्रचंड रिकामा वेळ आहे असं वाटायला लावणारं हे सगळं आहे.

भारतीय लोकशाही ही अशी सर्वस्वी सरकारवर अवलंबून राहणारी का झाली असावी? लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था अशी व्याख्या केल्यावर "सरकार" म्हणजे कुणी तरी अगम्य निराकार संस्था आहे, आणि तिच्याकडून सगळा न्याय अपेक्षित आहे, त्या संस्थेने जीडीपीची चिंता करायची, पाश्चिमात्य अर्थव्यवस्थेला तोडीस तोड अशी आपली अर्थव्यवस्था बनवायची, या शिवाय सामाजिक आरोग्याचीही जबाबदारी घ्यायची. आपण मात्र संध्याकाळी कट्ट्यावर बसून "ये सिस्टमही खराब है, मेरा बस चलता तो मैं ये पूरे सिस्टमको उखाड फेक देता" वगैरे जग्गूदादा (तोच तो अंगारमधला जग्गू, दातावर मारायला पैसा नाही, पण मोटरसायकलची ऐपत असणारा) स्टाईल डायलॉग्ज मारायचे. हा जग्गू शर्ट टाय लावून क्लार्कच्या पदासाठी मुलाखतीला जातो आणि तिथे आपले क्रांतिकारी विचार मांडतो. समोर त्याच्यासारखाच शर्ट टाय लावून बसलेला क्रांति बिंती करणं हे आपलं काम नाही, असं सांगून त्याला नारळ देतो. मग जग्गू पुन्हा शर्ट काढून बनियनवर मोटरसायकल उडवायला मोकळा.  तसाच पुढे जाऊन तो बँड स्टँडच्या त्या स्पेशल खडकांत बसून ही 'सिस्टम' कशी आपल्याला अँग्री यंग मॅन बनवते आहे याबद्दल त्वेषाने भाषण करतो. त्याची त्यावेळची एखादी प्रेयसी ते भाषण डोळ्यांत साहिल, किनारा, तूफां यांपैकी एक काही तरी आणून ऐकते. मग हा आणखीच शेफारतो. श्रीमंत मनुष्य हा भांडवलशाही विचारसरणीचा असतो, मध्यमवर्गीय समाजवादी असतो तर कफल्लक मनुष्य हा कम्युनिस्ट असतो. जग्गू कफल्लक असल्याने साहजिकच त्याची क्रांतिच्या कल्पना आहे त्याच चाळीत राहणे, फक्त समोर एक हॉस्पिटल, एक सातवीपर्यंतची शाळा आणि सातवी संपल्यानंतर पुढे करायला काहीच नसल्यामुळे व्हॉलीबॉल खेळण्यापुरते एक मैदान यापलीकडे जात नाही. आपण अँग्री आहोत, आपल्यावर कसलातरी सतत अन्याय होऊन राहिला आहे या धुंदीत राहायला जग्गूला आवडतं. मग जग्गू स्वत:च्या नकळत ती परिस्थिती आवडून घेऊ लागतो, नव्हे, ती तशीच राहील याची काळजी घेतो. टोकाची कृती केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही असं तो स्वत:ला समजावतो आणि इतरांना बजावतो. क्रांति म्हणजे नक्की काय असा विचार कधी तरी त्याच्या मनात येत असेलही. पण अन्याय सहन करून राहिलो आहोत, संधी मिळाली असती तर कुठल्या कुठे गेलो असतो वगैरेची धुंदी एवढी जबर असते की खरा बदल जर झाला तर काय घ्या असा विचार करून गप्प बसायला होत असेल. या जग्गूला त्याचे क्रांतिकारक विचार ऐकून घेऊनही खरोखरच ती क्लार्कची नोकरी मिळायला हवी होती. कुठलेही काम हे कमीपणाचे नसते ही पहिली खरीखुरी वैचारिक क्रांती त्याला करता आली असती. सामाजिक क्रांती घडवून आणायला आधी त्या समाजाचा अधिकृत असा भाग तरी बनता आले असते.

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, आपण काय मिळवले असा प्रश्न केला जातो. पर्यायाने प्रगती किती झाली असा तो रोख असतो. गुळगुळीत सहा पदरी रस्ते, चकचकीत इमारती, इम्पोर्टेड गाड्या विकत घेण्याची ऐपत ही प्रगतीची व्याख्या असायला हरकत नाही, पण त्याचबरोबर त्या रस्त्यांवरून नियम पाळून त्या इम्पोर्टेड गाड्या चालवणे, शहराच्या पुढील पंचवीस वर्षांच्या गरजांचा आढावा घेऊन इमारती बांधणे, मुजोरपणे बांधकाम करून नंतर लाच देऊन ते नियमित करून न घेणे हे सुद्धा प्रगती या सदराखाली बसते हे लक्षात यायला हवे. शासनाने माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालू नये, पण मी सोशल मीडियावर कसलाही पुरावा नसताना वाटेल ते आरोप करून इतर लोकांचे चारित्र्यहनन करेन हे प्रगतीच्या सदरात मोडेल असं वाटत नाही. शासनाने आपल्याला सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात, पण माझ्याकडे कर मागू नये. सामाजिक समरसता निर्माण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी पण मी माझ्या जातीचा जाज्वल्य अभिमान बाळगेन. संभाजी ब्रिगेडसारखी निखालस द्वेषाचे राजकारण करणारी जातीयवादी टोळी या देशात निर्माण होणे हे आपलेच अपयश आहे. पर्यायाने लोकशाहीचे अपयश आहे. अर्थात लोकशाहीचे स्वातंत्र्य काही चांगल्या माणसांपुरते नसते, ते असल्या नतद्रष्ट मंडळींनाही मिळते. तेव्हा इतक्या वर्षांत आपण काय मिळवले याचा विचार करताना हे अपयशसुद्धा लक्षात घ्यावे. आपण काय मिळवले याचा शोध स्वत:मध्ये प्रथम करावा लागेल. कॉंग्रेसने देशाला बुडवले अथवा नाडले नाही. ठपका ठेवून नामानिराळे होणे केव्हाही सोपे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेल्या या व्यवस्थेने लोकांनीच घालून दिलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे पालन केले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय? लोकशाहीत शासन हा लोकांचा आरसा असतो. तुम्ही सुंदर व्हा, आरशात चित्र सुंदरच दिसेल. नाही तर ऑस्कर वाईल्डने "पिक्चर ऑफ डोरायन ग्रे" मध्ये दाखवले आहे तसेच व्हायचे. वरून सुंदर, तरुण दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात आतून कशी आहे ते पहायचे असेल तर तिचा आत्मा पाहावा. भारतीय लोकशाहीचा डोरायन ग्रे होऊ नये ही सदिच्छा!

Thursday, July 23, 2015

वैश्विक भाषा

चराचराची एक समान भाषा जर असेल तर ती गणितच असावी. ग्रह तारे यांच्या भ्रमणकक्षा, धूमकेतूंचे क्लिष्ट भ्रमणमार्ग, गुरुत्वाकर्षण आणि त्याचे परिणाम हे मूलभूत असे भौतिक नियम संपूर्ण विश्वात सारखेच लागू होतात, मग ते नियम व्यक्त कोणत्या भाषेत करणार? आणि कसे? संतांनी सांगितले,"चराचरात 'मी' वसतो". येथे संतांनी 'मी' हा शब्द वापरला असावा तो केवळ सर्वसामान्य जनतेला रुचेल, भावेल आणि कळेल म्हणून. येथे 'मी' म्हणजे हे ब्रम्हांड चालवणारा असा तो अध्याहृत आहे. त्याचे स्वरूप सामान्य मानवी मेंदूच्या आकलनापलीकडे असल्यामुळे त्याचा उल्लेख प्रथमवचनी करायचा. वास्तविक हा "मी", 'तो' नाही, 'ती' नाही किंवा 'ते'ही नाही. म्हणजे नसावा. कुणास ठाऊक. तो, ती किंवा ते मुळात आहे की नाही तेही माहीत नाही. पहा, नुसत्या शब्दांत व्यक्त करायचं झालं की कसा गोंधळ उडतो ते. मला काय म्हणायचं आहे ते मलाच कळतं आहे, पण तुम्हाला मी नीट या "मी"चे दर्शन करू शकतो का? मला तरी कुठे कळलंय म्हणा. तत्ववेत्त्यांना, संतांना, ऋषींना कळलं असेल. त्याच्या रूपाचे आकलन झाले असेल. मग त्यांनीही प्रयत्न केला. सॉक्रेटिसचे संवाद झाले, सांख्य दर्शन झाले.,गीता झाली, ते कळले नाही मग ज्ञानेश्वरी आली, तीही कळली नाही. अजून सोपे करून सांगायला तुकारामाची गाथा आली. पण झाले भलतेच. लोक उगाच भक्तीमार्गाला लागले. चराचराचे मूळ कळले की नाही, आपल्या अस्तित्वाचे कारण कळले की नाही ते ठाऊक नाही. असो. मुद्दा असा की चराचरात मी वसतो हे अनेक शब्दांत सांगून झाले. मग संतांनीच कशाला, पुढे हळूहळू विज्ञान आणि गणितही त्याला दुजोरा देऊ लागले. आईनस्टाईनने जड विश्व आणि ऊर्जा हे एकाच पदार्थाच्या दोन अवस्था असल्याचे सांगितले. नुसते सांगितले नाही तर त्याचा कार्यकारण भाव आणि ज्या समीकरणाने ते दोघे जुळले आहेत ते समीकरणही सांगितले. दृष्टांत देऊन फार तर साम्य सांगता येते पण "का" याचे उत्तर देता येत नाही. गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. रसाळ दृष्टांत वाचायला मिळतात, पण चिकित्सक वृत्तीच्या एखाद्याला "का"चे उत्तर मिळत नाही. अहं ब्रम्हास्मि! बरं बाबा तू ब्रम्ह! पण का आणि कसा काय? गणिताने हे थोडेसे सोपे केले. तर्कज्ञानाने पूर्वी ताडलेले सत्य हे गणिताने सत्य केले. गणिताला भावना नाहीत. गणित एखाद्याला उगाच भक्तीचा गहिंवर आणून "पांडुरंग! पांडुरंग!" करायला लावत नाही. गणित तटस्थ असते. ते बाजू घेत नाही. शब्दबंबाळ होत नाही. ते पूर्ण सत्य सांगते आणि समर्पकपणे सांगते. म्हणूनच उद्या जर एखाद्या परग्रहावरील उत्क्रांत पावलेल्या आपल्याइतक्या किंवा जास्त प्रगत जीवसृष्टीशी आपला संपर्क आला तर त्यांना ज्ञानेश्वरी ऐकवण्याऐवजी गणिती भाषेत संवाद नक्की साधता येईल. 

हे असं असलं तरी मनुष्य हा भावूक, लहरी, मनाचे क्लिष्ट कंगोरे असलेला प्राणी आहे. त्याची जडणघडण, उत्क्रांती भावनाशील म्हणून अधिक होत गेली आहे. भावनाशील याला दुसरा शब्द रोमाण्टिक असाही वापरता येईल. एक अधिक एक याचे उत्तर चार असे असले तर त्याला अधिक आवडते. अशा भावनिक उत्क्रांतीमुळे गणिती रुक्षपणा, काटेकोरपणा, अचूकपणा याला कमी महत्व आले. भाषा ही अचूकतेवरून अलंकारिकतेकडे वळली. असं असलं तरी तो गूढ प्रश्न "मी कोण, हे सर्व काय आहे" याचे आकर्षण संपले नाही. गणितापासून लांब गेल्याने "हे सर्व काय" आहे हे उकलून सांगणाऱ्या शास्त्रापासून लांब जाणे झाले. मग आपल्या मनाच्या त्याच संवेदनशीलतेचा वापर करून आपण भंवतालच्या चराचराशी एकत्व अनुभवू शकतो का याचाही काही जणांनी मागोवा घेतला. रेड इंडियन, मायन संकृतीचे लोक, मूळ आफ्रिकन लोक हे त्या बाबतीत बरेच विकसित होते असे दिसते. इन हार्मनी विथ नेचर, म्हणजेच चराचराशी एकरूप होऊन जगण्याची कला त्यांनी साधली होती. शेवटी विश्वातील सर्व कण हे ऊर्जेचे जड रूप आहे, आपण सर्व त्यांनीच बनलो आहोत हे त्यांना आईनस्टाईनचा सिद्धांत माहीत नसतानाही कळले होते. गणिती भाषा तर सर्व विश्वात चालेल, पण ही "नेणिवेची"अबोल भाषा त्याहूनही बोलकी असावी.

Tuesday, June 23, 2015

नमन नटवरा

दादा मडकईकरांसोबत
कारभारी - म्हाराज! म्हाराज! आपला कोतवाल म्येला की हो!
म्हाराज - आं!? आन त्यो कसा रं?
कारभारी - पालथा पडून!
म्हाराज - आरं तसं न्हवं! म्हंजे तेला काय झालं हुतं?
कारभारी - आता गतसाली येक कारटं जालं हुतं. दोन वर्साखाली येक आनखी पोरगं जाल्यालं हुतं. औंदा काय ऐकण्यात न्हवतं!
म्हाराज - आरं तुज्या! आरं तसं न्हवं! म्हंजे तेला रोग काय जाला हुता म्हंतो मी!

असा संवाद स्टेजवर चालू होता. प्रेक्षकांत हंशा पिकत होता. प्रेक्षकांत मी आईबरोबर बसलो असेन. वय साधारण ९-१० वर्षे. संवादातील विनोद फारसा कळत नसला तरी मीही जोरजोरात हसत होतो. पण मला आठवतं, त्या वयातही एक दडपण आलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. हा जो नाट्यप्रयोग चालला होता त्यात कारभाऱ्याचं काम करत होते ते माझे बाबा. सावंतवाडी हे गाव छोटं असलं तरी परंतु नाटक, संगीत, चित्रकला, साहित्य या बाबतीत अत्यंत जागृत. या ठिकाणी "जागृत" हाच शब्द डोक्यात उस्फूर्तपणे आला आणि लक्षात आलं खरंच, एखादं देवस्थान जसं जागृत असतं तसंच या गावाचं आहे. दुसरा शब्द समर्पक ठरलाच नसता. नाट्यदर्शन ही संस्था आमचे सर दिनकर धारणकर यांनी समानव्यसनी नादिष्टांना घेऊन सुरू केली तेव्हा माझं काही कळण्याचं वय नव्हतं. पण नाटकांच्या तालमी सुरू झाल्या आणि बाबांबरोबर तालमींना जायला मिळायला लागलं. आमच्या वि. स. खांडेकर विद्यालयातच त्या तालमी होत. शाळेचं नाट्यगृहही या संस्थेला मिळायचं. त्यामुळे जागा ओळखीचीच असायची. आबा नेवगी, दादा मडकईकर, स्वत: दिनकर सर, चिटणीस सर, पी.डी. नाईक, नाटककार ल. मो. बांदेकर असे अनेक जण त्या निमित्ताने मी जवळून पहिले, त्यांचं काम त्या वयात जेवढं कळायचं तेवढं पाहिलं. आबा नेवगी आणि दादा मडकईकर हे भयंकर मिष्किल, खरं तर व्रात्यच म्हणायचं. चेष्टा, मस्करी अतोनात. पण ती कधी लागट, जिव्हारी लागणारी नसे. ज्याची मस्करी असे तोही दिलखुलास हसत असे. अशा मस्कऱ्या स्वभावाचे दादा मडकईकर मला माहीत असल्यामुळे ते कवी आहेत याचा शोध मला खूप नंतर लागला. परवाच कुणीतरी दादांची "मी पाव्स तू पाव्स" कविता उद्धृत केली होती. एवढं तरल आणि हळुवार मन असणारा हा कवी. अनेक क्षेत्रांतील लोक नाटकाच्या ओढीमुळे तिथे एकत्र आलेले दिसायचे. तालमी चालायच्या, भरपूर गप्पा व्हायच्या. मी फक्त त्या गप्प राहून पाहायचो. नाटक का करायचं, आणि लोकांना ते पाहायला का आवडतं असे प्रश्नही मला पडायचे. अनेक शब्द कानावर पडायचे. संहिता, अंक, प्रॉम्प्टर, कपडेपट, पिट, विंग, पहिली घंटा, कॅरेक्टर. सगळ्यात मला आश्चर्य वाटायचं ते म्हणजे एवढ्या प्रेक्षकांसमोर "भाषण" न अडखळता म्हणून दाखवायचं, म्हणजे पाठांतर जबरदस्त हवं. मध्येच बाबा विसरले तर? नाटक किंवा कंटाळवाणे भाषण पाडायला लोक टाळ्या वाजवतात ही मला तिथंच समजलेली गोष्ट. आयत्यावेळी कशा चुका होतात याचे किस्सेही बाबा सांगायचे. त्यामुळे लोकांनी खरोखर टाळ्या वाजवल्या तरी मी नर्व्हस होऊन स्टेजवरच्या नटमंडळींचं काय चुकलं असेल ह्याचा विचार करायचो. त्यामुळे आताही हे वगनाट्य चालू असताना मला दडपण त्याचं होतं. पण तसा काही अनवस्था प्रसंग आला नाही. राजा, परधान दोघेही टाळ्या आणि हशे वसूल करत होते. वग गाजला. नाट्यदर्शन जोमाने वाटचाल करू लागलं. पुढे मग नाटकं बघायला मिळू लागली. पुढे मग "साक्षीदार" बसले. त्यात प्रा. चिटणीस हे सरकारी वकील, प्रा. आर. एस. कुलकर्णी हे आरोपी, धारणकर सर आरोपीचे वकील, प्राचार्य घ.न.आरणके हे जज्, अशी पात्ररचना असलेली आठवते. बाबांनी त्यात "मामा"चे काम केले होते. धारणकर सर हे दिग्दर्शक आणि नाट्यदर्शनचे सर्वेसर्वा व्यक्तिमत्व. अनेकदा घरी येत. नाटकांवर चर्चा होत असे. नवीन नाटक बसवायला घेतलेलं असायचं. मला फारसं काही कळत नसे, पण कानावर पडत असे. नाट्यदर्शनमुळे १९७८ मध्ये एकोणसाठावे नाट्यसंमेलन हे सावंतवाडीत झाले. भालबा केळकर त्याचे अध्यक्ष होते. प्रिन्सिपॉल कोपरकरांबरोबर भालबा आमच्या घरी आलेले आठवते. नाट्यसंमेलनानिमित्त स्मरणिकेचे काम बाबांकडे आले होते. कित्येक महिने स्मरणिका हाच विषय घरात. एखाद्या विषयाला हात घातला की अक्षरश: तहानभूक विसरून त्यात समरस व्हायची वृत्ती. अजूनही ती तशीच आहे. एक गमतीची गोष्ट आठवते, या सगळ्या चर्चांमध्ये आमचे धाकटे बंधुराज, वय साधारण सात ते आठ पण अगदी हिरीरीने भाग घेत असत. अर्थात, नाटकच कशाला, समोर आलेल्या सर्व विषयांवर आपल्याहून वयाने साधारण तीस पस्तीस वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसांशी बरोबरीने साधकबाधक चर्चा करणे, मत व्यक्त करणे हे त्याच्या रक्तातच होते. मला वाटतं आज तो नाटकं दिग्दर्शित करतो, त्यांत कामं करतो, हा काही योगायोग नाही. त्याची समजच मोठी असावी. माझं स्वत:चं नाटकात काम करणं फारसं पुढे गेलं नाही. एकदा एका नाटकात दूधवाल्या भय्याचं काम - तेही दाराबाहेरूनच "बाई, दोsssध!" असं ओरडण्याचं. प्रवेशालाच टाळी पडायची पण ती माझ्या चेहऱ्यापेक्षा मोठ्या अशा भरघोस मिशांना असायची. आणखी एका नाटकात राजाचं. त्यातही राजा कमी आणि राजकन्येचा बाप जास्त अशी भूमिका होती. दोन तास हा नृपती  सिंहासनावर बसून राजकन्येच्या हट्टापुढे शरण आल्याच्या वेगवेगळ्या पोझेस घ्यायचा. एकदा मध्येच कधीतरी "कोण आहे रे तिकडे?" म्हणायचा. अभिनयाची कारकीर्द इथेच संपली.

बाबांना सिनेमाला जाण्याचा नाद नव्हता, किंबहुना तो आवडतच नसावा असं वाटे. सिनेमाला चला असं कधी त्यांच्याकडून म्हटलं गेल्याचं मला आठवत नाही. पण नाटक पाहायला जायला ते नाही म्हणायचे नाहीत. गोविंद चित्रमंदिर हे "सीझनल" नाट्यगृह. स्टेज नावाचा चौथरा, त्याभोवती झावळ्या लावून केलेलं प्रशस्त प्रेक्षागार. कोकणातील पाऊस असा की या झावळ्या कुजून जात आणि दरवर्षी मग सीझन आला की नवीन झावळ्या लावायला लागायच्या. नाटकाच्या आधीचं ते उत्साहाने भरलेलं वातावरण मला अजून आठवतं. बाहेर झावळ्या लावून, बाकडी ठेवून केलेलं जुजबी दुकान असे. तिथं सोडावॉटरच्या बाटल्या ठेवलेल्या असत. काचेच्या त्या बाटल्या, त्यांच्या गळ्यात असलेली ती निळी गोटी. उघडून देताना कुकरच्या शिट्टीसारखा आवाज होई आणि तो फसफसणारा सोडा पाहूनच तहान भागल्यासारखी वाटे. त्या सोड्याचेही दोन प्रकार. एक साधा, दुसरा लेमन. मी कधी प्यायल्याचं आठवत नाही. मागितला तर बाबा देणार नाहीत हेही माहीत होतं. बाहेरचं काही खाऊपिऊ नये, हे संस्कार असण्याचा काळ होता तो. त्या फसफसणाऱ्या सोड्यासारखीच माणसांची लगबग चालू असे. आत फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या असायच्या. धूप फिरवलेला असायचा त्याचा वास दरवळत असे. आपल्या खुर्चीवर बसलं की मग पहिल्या घंटेची प्रतीक्षा सुरू व्हायची. पण आधी सुरू व्हायच्या कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांच्या नावाच्या अनाउन्समेंटस. मग एकदा ती पहिली घंटा डावीकडून उजवीकडे, आणि उजवीकडून परत डावीकडे असं कुणीतरी वाजवत जायचं. मला आत जी गडबड चाललेली असायची त्याचं भयंकर उत्सुकतावजा आकर्षण होतं. घंटा वाजवून नाटक चालू करायला परवानगी देणारा इसम तर मला अत्यंत पॉवरफुल वाटायचा. पुढे कधीतरी आपणही हे काम करायचं असं मी मनाशी ठरवून ठेवलं होतं. मग पुढे एकदोन तास कसे जायचे कळायचं नाही. बाबांमुळेच दशावतार ही एक कोकणातील खास लोककला पाहायची संधी अनेकवेळा मिळायची. गणेशस्तवन, वेद पळवून नेणारा शंकासुर आणि मग विष्णूचे त्याचे ते युद्ध, मग विष्णूचे अवतार असा तो ठरलेला बंध. वालावलकर, मोचेमाडकर अशी गाजलेली दशावतार मंडळी गावात येत असत.तासनतास ते प्रयोग चालत.

एकूण नाटक हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण मला वाटतं एखाद्याला डीफाईन करणारी व्यक्तिरेखा म्हणतात ती बाबांच्या बाबतीतली व्यक्तिरेखा म्हणजे "भाऊबंदकी" नाटकातील रामशास्त्री प्रभुण्यांची. बाबांच्या बाबतीत ती व्यक्तिरेखा केवळ त्या नाटकापुरती राहिली नाही, किंबहुना ती तेवढ्यापुरती सीमित कधी नसावीच.  त्यांचा मूळ स्वभावही त्याला साजेसाच होता. खोटं न बोलणं ही गोष्ट बरेचजण प्रयत्नपूर्वक साधू शकतात. पण त्याही पुढे जाऊन असत्याला आणि अन्यायाला विरोध करणारी मंडळी फार कमी असतात. वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होईल याची पर्वा न करता अन्यायाला विरोध करणे काय असते हे मी पाहिले आहे. माझ्या विद्यार्थी दशेत तशी फक्त दोन माणसे त्यावेळी माझ्यासमोर होती. ती म्हणजे प्राध्यापक रमेश चिटणीस आणि दुसरे बाबा. आणिबाणीच्या काळात, काही अप्रिय स्थानिक संघर्षात या दोघांनीही दाखवलेला कणखरपणा, मोडेन पण वाकणार नाही ही वृत्ती सहजासहजी येणारी नाही. सारासार विचार करता येणारी, विद्वान म्हणता येईल एवढ्या बुद्धिमत्तेची भलीभली माणसे जेव्हा सत्तेपुढे शरण जात होती तेव्हा केवळ या दोन व्यक्ती एखाद्या पहाडाप्रमाणे उभ्या होत्या. भाऊबंदकी नाटकातील ते रामशास्त्री प्रभुण्यांचं पात्र असो किंवा साक्षीदार नाटकातील तडफदार सरकारी वकिलाचं पात्र असो, ते नाटकापुरतं नव्हतं. प्रत्यक्ष जगण्यातही तेच पात्र वठलं गेलं. नाटक हे एकदोन घटकांचं, पण रामशास्त्री बाणा कायमचा.

Wednesday, June 17, 2015

नमो अॅप

तुम्ही गाडी चालवत असाल, ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, कुठे असाल, एक गोष्ट तुम्हाला सारखी चिंतित करत असेल, माझे नमो आत्ता काय करीत असतील? कुठल्या देशात वणवण फिरत असतील? शुद्ध शाकाहारी माणूस तो, जपानसारख्या देशात जेवणाचे काय करीत असेल? मेक अप, सॉरी, मेक इन इंडिया कुठवर आलंय? ते स्विस ब्यांकवाले अजून अडून बसले आहेत का? साधं कोपऱ्यावरच्या स्टेट ब्यांकेत पेन्शन घ्यायला गेलं तर जिवंत असल्याचा दाखला मागतात, एक नवा पैसा देत नाहीत, ही तर स्विस ब्यांक आहे. फ़ॉरेनच्या सगळ्याच गोष्टी भारी असतात. पण नमोनी त्यांनासुद्धा झापलं. बऱ्या बोलाने कुणाची कुणाची खाती आहेत ते सांगा असं नुसतं म्हटलं, स्विस ब्यांकांनी घाबरून सगळ्यांची फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दिली म्हणे. मग पुढे नमोंनी त्यांचं काय केलं? एकेकाला उभा आडवा झोडपून सगळा काळा पैसा वसूल केला असणार याची खात्री आहे. होय ना नमो? अरेच्या? उत्तर द्यायचं सोडून विमानात बसून कुठे गेले एकदम? विमानात नीट सीट मिळाली की नाही, ब्यागा वजनात बसल्या की नाही, स्पेशल रिक्वेस्ट म्हणून शाकाहारी जेवण सांगितले होते ते मिळाले की नाही या प्रवासातल्या चिंता आपल्याला तशा नमोंनाही असणार. नेहमी शेजारी असणारे अमितभाई साईझचे लोक विमानातसुद्धा शेजारी आले तर आपला चेंगरून दहीवडा होणार त्याबद्दल चिंता नमोंनाही असणार. या सगळ्याबद्दल चिंता (काही जणांना कुतूहल) आपल्याला वाटत असते. आपण या माहितीसाठी धडपडत असतो आणि इथे मीडिया नमोंबद्दल काहीच छापत नाही, टीव्हीवर दाखवत नाहीत. नमो तर पडले प्रसिद्धीपरांग्मुख. आपणहून काही सांगायचे नाहीत आपल्याबद्दल छापायला. लोकसभेत एवढा प्रचार करावा लागला, पण प्रसिद्धीमाध्यमांकडे काही गेले नाहीत. असं सगळं असल्यामुळे लोकांना काहीच माहिती मिळत नव्हती. लोकांची काळजी, आत्मीयता, कळकळ दिवसेंदिवस वाढत चालली होती.  सर्व स्तरातून विविध अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

"वी कान्ट गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी!" - सर्वसामान्य जनता
"वी मस्ट गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी!" - राष्ट्रवादी
"मस्ट वी गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी?" - शिवसेना
"गेट ऑफ वी, मिस्टर मोदी!" - गांधी परिवार
"इनफ! वी मस्ट गेट मिस्टर मोदी!" - कॉंग्रेस
"आय डोंट गेट मिस्टर मोदी…:-(" - पप्पू

अशा मागण्या वाढत चालल्या होत्या. म्हणून मग नमो अॅप बाजारात आले आहे. आता हे अॅप डाऊनलोड करा आणि नुसत्या आपल्या टिचकीसरशी नमो तुमच्या मोबाईलमध्ये अवतरतील. नव्हे, ते नेहमी तुमच्या मोबाईलमध्येच असतील, आणि "केम छो भाय" असं म्हणत स्क्रीनवर येतील आणि स्वत: आपल्याबद्दल माहिती सांगतील. आम्ही त्याचे बेटा व्हर्शन डाऊनलोड करून पहायचे ठरवले. नमनालाच ठेच लागली. अॅप फ्री नव्हते. पाचशे रुपये लागणार होते. मरू द्या म्हणून अॅपस्टोअर क्लोज करायला गेलो तर "वेट! बाय नाऊ अॅण्ड गेट फ्री गेम!" अशी जाहिरात आली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून क्लोज करायला गेलो तर क्लोजच होत नव्हते. आणि फोनचे दुसरे कुठलेही अॅप ओपन होत नव्हते. मग चडफडत शेवटी विकत घेतले. फ्री गेम काय मिळतो आहे बघूया तरी असे म्हणून पाहिले तर "क्लिक हिअर फ़ॉर युअर फ्री गेम" असे बटन आले. तिथे क्लिक केलं तर थेट "आप"ची वेबसाईट ओपन होत होती. तिथे "पंच युअर लेफ्टनंट गवर्नर" असा गेम सुरू होता. फ्रीमध्ये वाटेल तेवढे पंच करा. नंतर निवांत खेळू म्हणून तो बंद करून परत नमो अॅपमध्ये आलो. होमस्क्रीनवर साहजिकच नमोंची साजिरी गोजिरी छबी होती. पण तीच तीच बघून कंटाळा येणार हे ओळखून वेगवेगळ्या छब्या निवडायची सोय होती. चेहरा तोच, फक्त डोक्यावर पगडी वेगळी. पुणेरी, पंजाबी, एक गुजराती "श्रीनाथजी" स्टाईलची, राजस्थानी,  काठियावाडी, एक छान मोत्याचा तुरा असलेली राजेशाही, मेक्सिकन सोम्ब्रेरो असे अनेक चॉइसेस होते. संघाची काळी टोपीपण होती. पण ती क्लिक केली तर ती अॅडव्हान्स्ड लेव्हल यूजरसाठी आहे असे कळले. किमान सहा महिने अॅप वापरल्याशिवाय ती लेव्हल अनलॉक होणार नाही असा मेसेज आला. मग मी आसामी किंवा नागालॅंडची दिसणारी टोपी निवडली. तिला हॉर्नबिल, मराठीत ज्याला धनेश म्हणतात त्या पक्षाची अख्खी चोचच होती. हा पक्षी ओरडू लागला म्हणजे जंगलातील सर्व प्राणी स्वत:चे ओरडणे थांबवून स्वस्थ बसतात. नमोंच्या डोक्यावर ही चोच शोभून दिसत होती. छबी अॅनिमेटेड होती! सेट केल्यावर ती चोच उघडून धनेश पक्ष्याची गगनभेदी आरोळी ऐकू आली, पाठोपाठ नमोंच्या छबीने,"मैं प्रधान मंत्री नही हुं, प्रधान सेवक हुं" हे वाक्य तर्जनी माझ्याकडे रोखत एक डोळा मारत म्हटलेले दिसले.


टोपी सिलेक्ट करण्यात जवळजवळ अर्धा तास गेला. तीनशेच्या वर टोप्या असलेली लायब्ररी होती ती! प्रत्येक स्वदेश, परदेश दौऱ्यानंतर लायब्ररी अपडेट होऊन त्यात आणखी टोप्या येतील असे कळले. शिवाय आपला फोटो अपलोड करून आपल्याला हव्या त्या टोपीतील नमोंच्या छबीबरोबर आपला फोटो फोटोशॉप करून देण्याचीही सोय होती. माझ्या दृष्टीने हे अॅप इथेच यशस्वी झाले होते. पाचशे रुपये देताना आपण एवढे काचकूच का करत होतो असे वाटले. मग इतर काय सोयी आहेत ते पाहू लागलो. "इंटरअॅक्ट विथ पीएम" ! वाह! स्वत: नमोंशी बातचीत? घाई घाईने "नमस्कार माननीय प्रधानमंत्री!" असे टाइप केले. लगेच उत्तर आले! "नमश्कार! ये प्रधान सेवक आपकी क्या सेवा कर सकता है?" उगाच एवढ्या महत्वाच्या व्यक्तीचा वेळ का घालवा, मुद्द्यालाच हात घातला. "सरजी, वो स्विस ब्यांकवाले मान तो गये, आगेका क्रियाकर्म कब होगा?". तर "महोदय, क्रिप्या प्रतीक्षा करें, आप कतार में हैं. प्रतीक्षा का समय लगभग चार घंटे और पैन्तालीस मिनट." असा मेसेज आला. बरोबर आहे. एकटा माणूस तरी किती जणांशी एकाच वेळी बोलेल? सगळेच लेकाचे हाच प्रश्न विचारत असतील. "प्रतीक्षा करते करते प्रधानमंत्रीजीके चुने हुए भाषण सुने" असा मेसेज मिळाला. आणि हो नाहीची वाट न पाहताच तडक नमोंचे एक भाषण लागले. ही म्हणजे पर्वणीच! खजिनाच सापडला म्हणायचा! काय ते अप्रतिम वक्तृत्व, ती ओघवती शैली! विरोधकांच्या मर्मावर वार करून त्यांना भुईसपाट करण्याची ती हातोटी हे तर त्यातून दिसून येत होतेच, पण त्याचबरोबर सर्वसमावेशक राजकारण करण्याचे वचन देऊन, कॉंग्रेसमधील भ्रष्टाचाराचे आरोप सहन करून करून थकल्या भागलेल्यांना सामावून घेण्याची त्यांची दिलदार वृत्तीही दिसून येत होती. एकापेक्षा एक सरस अशी ती भाषणे ऐकता ऐकता कधी झोप लागली ते कळले नाही. जाग आली तेव्हा फोनची बॅटरी मृत्यूपंथाला लागली होती. तरी चटकन आपल्या त्या विचारलेल्या प्रश्नाचं काय झालं ते पाहावं म्हणून परत "इंटरअॅक्ट" मध्ये घुसलो तर स्क्रीन ब्ल्यांक झाला होता. नो इंटरनेट कनेक्शन म्हणे. पाच सहा तासात या अॅपने माझा ५ गिगाबाईटचा डेटा फस्त केला होता. पण पर्वा नाही. पुन्हा विकत घेतला डेटा पॅक. आपण भाषणं काय चुकवणार नाही बुवा.