Tuesday, June 16, 2015

सच्चा इमानी

मी एक सच्चा मुस्लिम आहे हे वचन साक्षी महाराजांच्या मुखातून आले आणि प्रवचनाला जमलेल्या सर्व भक्त मंडळींच्या मुखातून "साधु! साधु!" असे उद्गार बाहेर पडले. काही मंडळींनी तिथेच फात्या पढायला सुरुवात केली. आणि अहो आश्चर्यम, जरी ते फात्या पढत होते तरी आमच्या कानी मात्र "जय जय राम क्रिष्ण हारी" असेच शब्द येत होते. रंध्रारंध्रात सर्वधर्मसमभाव भिनलेला असणे म्हणतात ते हेच काय? या असल्या गोष्टी भिनण्यासाठी बरोबर रंध्रं कशी शोधतात कुणास ठाऊक. महाराजांचा मी काही मर्जीतला भक्त नव्हे, परंतु आमचा परममित्र मोरू उर्फ मोरेश्वर मात्र आहे.  गेली अनेक वर्षे तो महाराजांच्या मठात नियमित जात असतो. मंगळवारी प्रसादाला मिळणारा शेंगदाण्याचा लाडू, बुधवारी छान केळी घालून केलेला शिरा, गुरुवारी साबुदाण्याची खिचडी, शुक्रवारी मुगाची खिचडी, शनिवारची सात्विक लापशी, रविवारी महाप्रसादाचा शुद्ध तुपातील मोतीचुराचा लाडू अशा आध्यात्मिक अनुभवांना मोरू अजिबात सोडत नाही. नाही म्हणायला दर सोमवारी आत्मशुद्धी म्हणून मठात शिवांबूप्राशन असते तो दिवस मात्र कटाक्षाने टाळतो. महाराजांच्या तीक्ष्ण नजरेतून ही बाब सुटलेली नाही. मोरोबा, आपली आत्मशुद्धी अशी साचवून ठेवतो आहेस हे चांगले नाही अशा शब्दांत त्यांनी त्याची कानउघाडणीही केली आहे. आजही गुरुवार म्हणून तो माझ्याबरोबर आला होता. सर्वधर्मसमभावाचा प्राथमिक उन्माद (नॉन इंडियन रेसिडंटस साठी मराठीत भाषांतर - "रश") ओसरल्यावर मंडळी डोळे उघडून विचार करू लागली. "आधी कसं काही जाणवलं नाही?" असेही एक जण म्हणाला. इतके दिवस आपण नमाज पढत होतो की प्रणाम करीत होतो? वदनी कवळ घेत होतो की बिस्मिल्ला करत होतो? मीरा, माखन आणि कन्हैयामध्ये असे एकदम चांद, इश्क आणि शराब कसे आले? आपण सर्वधर्मसमभावी वगैरे आहोत आणि इतके दिवस आपल्याला त्याची अजिबात जाणीव नव्हती की काय अशी शंका येऊन काही जण अस्वस्थही झाले. मीही अस्वस्थ झालो. रोज आंघोळ कर असं आई कानीकपाळी ओरडून सांगत असे तरी आठवड्यातून कधीतरी आंघोळ करणे हेही त्याचाच एक भाग आहे की काय? अर्थात आंघोळ करून काही दिव्य प्रभावळ वगैरे प्राप्त होत नव्हतीच. "गळ्यात आंघोळ केली आहे अशी पाटी लावत जा" असंही आई म्हणायची. पण "जनहितार्थ जारी" म्हणून आंघोळ करणं भाग होतं. महाराजांच्या त्या सगुण मूर्तीकडे नेहमीच पाहिले जायचे पण कीर्तन चालू असताना देवळात वर तुळईला टांगलेल्या रंगीत हंडीवर जशी शून्यात नजर लावून बसणे होते तसेच पाहिले जायचे. पण आज महाराजांच्या त्या घोषणेनंतर त्यांना निरखून पाहिले. आंघोळीच्या बाबतीत आम्ही महाराजांचे पाईक नसून महाराजच आमचे अनुयायी आहेत असे वाटू लागले.

महाराज पुढे बोलू लागले,"हिंदू धर्मात काहीही करण्याची मुभा आहे. हिंदू लोक अल्लाचे नाव घेऊ शकतात, पण मुसलमान रामाचे नाव घेतील काय?" पाइण्ट बिनतोड होता. आमच्या गावात अनेक मुसलमान गणपतीच्या देवळात जातात, काहींनी आपल्या मुलाचे नावही गणेश वगैरे ठेवले आहे, पण एकही लेकाचा रामाच्या देवळात जाताना दिसत नाही. "इमान!" महाराज गरजले. आता हे काय मध्येच असा विचार आमच्या मनात येतो आहे तोच ते पुन्हा गरजले. "इमान! म्हणजे सच्चेपणा, सचोटी! ज्याच्या कडे इमान तो खरा मुसलमान!" आणि विजयी मुद्रेने आमच्याकडे पाहू लागले. तो आनंद घोषणेचा होता की यमक जुळून आले त्याचा होता हे कळत नव्हते. तेवढ्यात मोरू ओरडला,"जय जवान!" त्यासरशी काही त्याच्यासारख्याच गाफील लोकांनी "जय किसान!" अशी साथ दिली. महाराज दचकले आणि मग चिडून मोरूकडे पाहू लागले. मीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तर खांदे उडवून थंडपणे मला म्हणतो,"काय? यमक जुळलं म्हणून म्हटलं. घोषणाच करायची होती ना?" मग मी त्याला "कळत नाही तर चूप बस" असे झापले. मोरू निर्विकार होता. "ते इमान माझ्यात आहे. इमानात मी आहे. मी म्हणजे इमान, इमान म्हणजे मी. असे आमचे अद्वैत आहे. म्हणूनच सच्चा मुसलमान मीच. तुम्ही मला नमाज पढायला काय सांगता? मी तो घालीनच. पण तुम्ही सूर्यनमस्कार घालाल काय?" मला काही कळेना, आज महाराज असे का बडबडत आहेत. आमच्यापैकी तरी कुणी नमाजबिमाज पढून दाखवा असे काही त्यांना सांगितले नव्हते. त्यांनी सूर्यनमस्कार हा शब्द उच्चारलेला ऐकला आणि मी सावध झालो. मोरूला हळूच म्हणालो,"मोऱ्या, आज चिन्हं वेगळी दिसताहेत रे बाबा. सूर्यनमस्कार घालायला लावणार बहुधा आज. चल, सटकूया." तशी मला म्हणतो,"खुळा की काय? आज गुरुवार आहे. त्रास सोस जरा." तिकडे महाराज सुरू होते. "सच्चा हिंदू हा मनाने सहिष्णु असतो. त्याला नमाज घालायला सांगितला तर तो नमाज घालील. गुरुद्वारात प्रवेश करताना शीख बांधवांच्या नियमानुसार मस्तक आच्छादित ठेवील. चर्चमध्ये गेला तर वेदीवर गुढघे टेकून प्रभू येशूच्या मूर्तीसमोर नतमस्तक होईल. हे तुम्हीसुद्धा करता. हो की नाही?" त्यांनी प्रश्न विचारला आणि माझ्याकडे पाहून उत्तराची वाट पाहू लागले. आम्ही भक्त एकमेकांकडे पाहू लागलो. मी म्हणालो,"महाराज, चर्च, मशीद आतून कसे दिसतात हे मी अमर अकबर अॅंथनी पिक्चरमध्ये पाहिले होते." मोरू म्हणाला,"मीही सुवर्णमंदिरात एकदा गेलो होतो. काश्मीरला जाताना अमृतसरवरूनच जावे लागते. तिथल्यासारखा प्रसादाचा शिरा कुठेच खाल्ला नाहीय मी. हातात वाढला तर बोटांमधून तूप अक्षरश: ओघळत होते." मोऱ्या अगदी यूसलेस आहे. महाराज स्तब्ध झाले,"मोरोबा, किती शरीराचे चोचले पुरवशील? अरे सुवर्णमंदिरात तुला सहिष्णुतेने गहिवरून आले नाही? पिक्चरमध्ये पाहून का होईना मशिदीतील ते धीर गंभीर वातावरण पाहून तुम्हाला सर्वधर्मसमभावाचे रोमांच फुटत नाहीत? जर सच्चे इमानी असाल तर हे सर्व एकसमयावच्छेदेकरून व्हायला हवे."

आज गुरुवार, छान साबुदाण्याची खिचडी मिळणार अशा स्वप्नात मोरू बसला होता तोच महाराजांनी घोषणा केली,"भक्तजनहो, कोणत्याही गोष्टीची शरीराला सवय होणे वाईटच. आत्मपीडन हा आत्ममुक्तीचा मार्ग आहे. शरीराला सुखाची सवय करणे म्हणजे या आत्म्याला या शरीररूपी पिंजऱ्याची चटक लावणे. म्हणजेच या मायेच्या कर्दमात त्याला लोळत ठेवणे. शरीराला सुखाने बसू देऊ नका. सवयीचा गुलाम बनवून ठेवू नका. मी तर म्हणतो आजपासूनच त्याची सुरुवात करा. आज तुमचे शरीर तुमच्याकडे काय मागते आहे? मोरोबा? असे तंद्रीत आहात म्हणून तुम्हांसच विचारतो." मोरू गडबडून उत्तरला,"साबुदाण्याची खिचडी!" महाराजांनी त्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाले,"अस्सं. दोष तुझा नाही मोरोबा. आजवरच्या सवयीचा आहे. ठीक आहे. आज सोमवार आहे असे समज आणि आत्मशुद्धी कर." असे म्हणून त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका आश्रमसेवकास "मोरोबांसाठी शिवांबूची व्यवस्था करा" असे सांगितले. त्या नतद्रष्टानेही जाताना मोरोबाकडे पाहून डोळे मिचकावत,"काळजी करू नका, पहिल्या धारेची आणतो" असे सांगितले. महानालायक इसम.

Friday, June 12, 2015

भ्रष्टाचारी कोण?

चला, आम आदमी खरंच आम आदमी निघाला. तो निघणारच होता. कायदेकानू, क्लिष्ट नियम, संहिता वगैरे लागू करून भ्रष्टाचार निपटता येईल असे जे भ्रामक स्वप्न केजरीवाल चमूने दिले होते ते स्वप्नच राहणार होते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. बहुतेक सरकारी बाबूंचे जग कायदे, नियम, जी. आर., सर्क्युलर्स , वेतनश्रेणी, कारवाई या शब्दांपलीकडे नसते. केजरीवालही याला अपवाद ठरले नाहीत. त्या शब्दांतून त्यांनी नव्या समाजाची उभारणी सुरू केली. अर्थात केजरीवाल जेव्हा या नियमांच्या पाट्या वाहत होते तेव्हा सामान्य जनता नव्या बिल्डींगची स्ल्याब पडते आहे अशा कुतूहलाने ते पाहत होती. परंतु तसं असलं तरी खऱ्या आम आदमीला त्याची भुरळ पडली, आणि सारासार विचारशक्ती गमावून या मृगजळामागे तो धावला. ज्या प्रत्येकाने हे स्वप्न पाहिले त्याची मानसिकता बहुधा भ्रष्टाचार हा आपण सोडून सर्व इतर करतात अशी असावी. बदलाची सुरुवात आपल्यापासून असते हे साधे सूत्र लक्षात आले असते तर आम आदमी पार्टीला हा फार्स करून सत्तेत यायला कारण मिळाले नसते. परंतु आपल्याला शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यायला हवा असतो, आपण नुसते झेंडे लावून जयंती साजरी करायची असते. नेमके हेच या भामट्याने हेरले. यात स्वत: केजरीवाल यांचे कदाचित पैसा मिळवणे हे ध्येय नसेल, पण अहंकारी मनुष्याला स्वत:चा अहंकार कुरवाळला जाणे याखेरीज कसलेही सुख मोठे वाटत नाही. आपल्याला कसलाही मोह नाही, आपण भ्रष्टाचाराच्या पलीकडे गेलो आहोत, जणू निर्वाणप्राप्तीच झाली आहे असे वाटणे हेही अहंकाराचेच दुसरे रूप. बरं, केजरीवाल असतील स्वत: निर्वाणाप्रत पोचलेले. पण त्यांच्याभोवतालच्या बाकीच्या गणंगांचं काय? असे धुतलेले तांदूळ कुठून येणार होते?

भ्रष्टाचार हा काही पैशापुरता नसतो. ती मानसिकता आहे. आपलं जगणं आहे त्यापेक्षा सुखकर करणं ही मूलभूत इच्छा केवळ माणूस या प्राण्याची असते. तशी कमी अधिक प्रमाणात इतर सस्तन प्राण्यात ती दिसून येते, पण ती गरज केवळ त्या क्षणापुरती असते. इतर प्राणी पुढील अन्न कधी मिळेल याची चिंता करत अन्नाचा साठा करून ठेवत नाहीत. सौ. सिंहिणबाईंनी श्रीयुत सिंहसाहेबांना अवेळी उठवून "कोवळे हरीण खावेसे वाटते" असे म्हटल्याचे ऐकिवात नाही, आणि असलेच तर सिंहसाहेबांना कधी तशी धावपळ करताना पाहिल्याचे ऐकण्यात नाही. प्राणी आहे तो क्षण जगतात. वेळ आली की मरून जातात. कालची हुरहूर नाही, उद्याची चिंता नाही. आहे ती आजची, आत्ताची धडपड. पण ते जगणेही कसे, पुरेपूर. उद्याच्या चिंतेने डिप्रेशन घेऊन बसायचे नाही. भय, मैथुन आणि निद्रा यातून बाहेर आला तो मनुष्यप्राणी. तेही केवळ योगायोगाने. आपले मूळ खरं तर चिचुंद्री या प्राण्यापर्यंत जाते. निरुपद्रवी. मेंदू एवढा छोटा की केवळ मूलभूत नैसर्गिक गरजा भागतील एवढीच त्याची क्षमता. कधी काळी झाडावर वास्तव्य करणारा हा प्राणी, डायनासोर नामशेष झाल्यानंतर या प्राण्याला जमिनीवर कुणी शत्रू उरला नाही. म्हणून हा खाली उतरला. पुरेसे अन्न, वातावरणात अचानक झालेली प्राणवायूची वाढ हे सगळं जुळून आलं आणि मेंदूची वाढ होऊ लागली. परंतु अन्न ही मूलभूत गरज मेंदूच्या एका कोपऱ्यात अत्यंत प्रबळ अशी ज्वलंत राहिली. मेंदूची शक्ती वाढली आणि ती स्वाभाविकपणे अन्नाच्या गरजेसाठी वापरली जाऊ लागली. ही सुरुवात. तिथून जे आपण निघालो ते आज आपला मेंदू केवळ त्याच गरजेसाठी पण विकृतीकडे झुकेल अशा हव्यासाने वापरू लागलो आहोत. खोटं बोलणं - जगण्याचा एक नेहमीचा भाग झाला आहे. आपण म्हणतो कधी खोटं बोलू नये. पण आता असं सिद्ध झालं आहे, की ही गोष्टही आपण उत्क्रांतीबरोबर घेऊन आलो आहोत. खोटं बोलणं, धोका देणं, विश्वासघात करणं "फायद्याचं" असतं असा आपला प्रवास झाला आहे. हीच मानसिकता पुढे भ्रष्टाचाराच्या रूपात आपल्यासमोर आली आहे. पण ही विकृती आहे असं ठरवणारे आपण कोण? आपणच नियम बनवायचे, आपणच सुसंस्कृत काय ते ठरवायचं. मेंदूच्या उत्क्रांती आणि परिस्थितीनुरूप झालेल्या बदलात बराचसा परस्परविरोधही आहे. खोटं बोलणं हे चांगलं नाही हे जाणवतं, पण वेळ आल्यास खोटं बोललं जातं, मुख्यत: फायद्यासाठी. भ्रष्टाचाराचं मूळ इथे आहे. आपल्यातच आहे, आपली ज्या पद्धतीने उत्क्रांती झाली त्यात आहे. आपण कधीच खोटं बोललो नाही अशी हमी कोण देऊ शकेल? जाहीररीत्या विचारलं आणि जाहीररीत्या उत्तर द्यायचं असेल तर सगळेच हरिश्चंद्राचे अवतार निघतील. आणि तेच हा मुद्दा सिद्ध करून जाईल.  
 
मी आपल्यात असलेल्या या परस्परविरोधाबद्दल नेहमीच लिहीत आलो आहे. या विसंगतीतून आणि त्याचबरोबर जी बुद्धिमत्ता आपल्याला प्राप्त झाली आहे त्यानेच आपल्यासमोर या समस्या निर्माण झाल्या आहेत. आपण हा विरोधाभास ओळखून जाणीवपूर्वक प्रयत्न परस्परविरोध कमी करायचे ठरवले तर बदल घडेल. प्रत्येकात तो बदल त्याच्यापुरता असेल, पण बहुतांशी लोकांनी आपल्यापुरते असे करायचे ठरवले तर समाजाची वृत्ती आतूनच बदलेल. शेवटी समाजसुधारणा म्हणजे तरी काय? कुणीतरी व्याख्यानं देऊन, प्रवचनं देऊन बदलायचं असतं तर आत्तापर्यंत केव्हाच बदललो असतो. गाडगेबाबांनी आयुष्य वेचलं हाती खराटा घेऊन. काय झालं? त्यांच्यावर पुस्तकं लिहिली गेली, कथा निर्माण झाल्या. ती वाचून झाल्यावर अत्यंत भक्तिभावानं आपण पुन्हा ग्यालरीतून कचरा खुशाल खाली टाकू लागलो. आजही आपल्याला गुड मॉर्निंग पथकं तयार करावी लागताहेत. गांधीजींनी भले सत्याग्रहाचा मंत्र दिला. आज आपण असत्याचा आग्रह धरून सत्याग्रह करतो आहोत, सगळेच खातात म्हणून आपण दुर्लक्ष करतो. थोडक्यात आपल्या देशात भले भले महात्मे होऊन गेले, आपली मानसिक प्रगती शून्य. कमळाच्या पानावरील पाण्याप्रमाणे या महात्म्यांचे सर्व तत्वज्ञान आपल्या अंगावरून ओघळून गेले. अंगाला एक थेंबही चिकटून राहिला नाही. याचा अर्थ कुणी सांगून बदल घडत नाही. त्यासाठी सर्वांनाच तसे वाटावे लागते. सर्वांना आपली नैसर्गिक उत्क्रांतीजन्य जडणघडण समजून घेऊन अंतर्गत विरोधाभासाला तोंड द्यावे लागेल. मोह, इच्छा, मत्सर इत्यादि भावना काही सुटणार नाहीत, पण त्या सुटणार नाहीत हे समजून किमान दुसऱ्याला आपल्याइतकाच जगण्याचा अधिकार आहे हे मान्य केले, दुसऱ्याला आपल्याइतकंच मानाने वागवले पाहिजे हे लक्षात आले तर नियम, कायदे आपोआपच पाळले जातील. शेवटी ते आहेत आपणच आपणासाठी केलेले. एखादे गाढव रस्त्यावरून जाताना  मध्येच अचानक थांबले तर आपण त्याने नियमाचा भंग केला असे म्हणत नाही. त्याच्याकडून ती अपेक्षा नाही. अपेक्षा माणसांनी ते करू नये अशी असते. आपण तेही करत नाही हा भाग वेगळा. असो, आजचं लेखन केजरीवालवरून सुरू होऊन गाढवावर थांबलं हा एक योगायोग असं मनात येत आहे. पण त्याने गाढवावर अन्याय होतो आहे असंही वाटतं आहे. मानवाच्या उत्क्रांतीत गाढवाचा काहीच हातभार नाही.

Wednesday, May 13, 2015

स्वप्न पूर्ती

"देवानं तोंड दिलं म्हणून काय पण बोलतो काय बे? भ्रष्ट, चोर म्हणे! अहवाल म्हटलं की लोकांना "ठपका" एवढाच शब्द आठवतो. हे कॉंग्रेसवाले स्वत: सत्तेत असताना अहवाल "फुटायचा" असला की मारून मुटकून सत्यनारायणाच्या कथेला बसवल्यासारखे बसायचे. भटजी कथा सांगताहेत तर यांचं लक्ष प्रसादाकडे. आणि आता अहवाल येणार म्हटल्यावर यांना अगदी "मेनके"चा दिवाळी अंक हातात पडल्यासारखा आनंद होतो आहे. त्यातही कथांपेक्षा कासव छाप अगरबत्तीच्या फोल्डअप जाहिरातींकडे ओढा जास्त. एक अहवाल तो काय, आणि लागले आरोप करायला. अहवालात आहे तरी काय? "सकृतदर्शनी शंका ठेवण्यास जागा आहे", "संस्थेच्या मूळ लाभार्थ्यांचा माग लागत नाही", "संस्था पंजीकृत असल्याचा पुरावा आढळत नाही", "संस्थेच्या नोंदणीकृत पत्त्यावर नोंदणीकृत लाभार्थी न आढळता मूळचे विदर्भातील परंतु सध्या सेंच्युरी मिलमध्ये कामाला असलेले आठ जण सापडले. तेही रात्रपाळी असल्याने झोपलेले आढळून आले. एकाला उठवून "पूर्ती"बद्दल विचारले असता "काहून त्रास देतो बे! उद्याला येऊन जा" असे उत्तर मिळाले. त्यावरून त्याची झोप पुरती झाली नसल्याचा निष्कर्ष काढून समिती परतली." ही असली वाक्ये! अरे पुराव्याने सिद्ध करून दाखवा पुराव्याने!" गडकऱ्यांचे ते काहीशे अश्वशक्तींचे वाफेचे इंजिन फुसफुसत होते. हे इंजिन काही शंटिंगला पडणारे नव्हे. शिंगल डाऊन असला तरी रेटून पुढे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेसच ती. येथे नंदी हे मनुष्यविशेषाचे विशेषण नाही हे नम्रपणे सांगू इच्छितो, उगाच शिंगे आमच्यावर यायला नको. "गेली कित्येक वर्षे आमच्या विदर्भाची अवहेलना होते आहे. कापूस आणि संत्रे ही मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असलेली पिके देणारा विदर्भ, त्याची अशी किंमत? त्यातून पुलंनी "संत्रे हे एरंडेलाबरोबर खायचे फळ आहे" असलं काही तरी लिहून ठेवल्यापासून दुकानदारही एरंडेलाच्या बाटलीशेजारी संत्री लावून ठेवू लागले. पुण्यातील काही दुकानदार तर "एरंडेल संपले, नुसती संत्री चालतील का" असंही विचारतात. सरकार काही देत नाही म्हटल्यावर आम्ही सूत्रे हाती घेतली. आपला विकास आपल्याच हाती अशी आम्ही घोषणा केली. ल्हानपणापासून या घोष्णेचं आम्हाला आकर्षण आहे. ही घोष्णा आम्ही पहिल्यांदा शाळेच्या मूत्रालयाच्या भिंतीवर खरडलेली पाहिली आणि तिथेच ठरवून टाकलं. त्या पवित्र ठिकाणी लिहिलेले सर्व वाङ्ग्मयआम्हाला शिरोधार्य वाटत आलेलं आहे. फेसबुक ट्विटर नसलेल्या त्या काळात या ठिकाणच्या असल्या भिंतीच कामास येत. आजच्या अनेक थोर महात्म्यांचे हे स्फूर्तीस्थान होय. तर, तिथेच त्या भिंतीखाली आम्ही ठरवले, आपले भवितव्य आपणच हातात घ्यायचे, आपल्या स्वप्नांची पूर्ती करायची. आपल्याला रस्त्यात फार इंटरेस्ट. लहानपणी अक्खा टाईम आपण रस्त्यातच घालवला आहे. खेळण्यात. त्यामुळे रस्त्यांचे प्रश्न आपण जवळून पाह्यले आहेत. आमच्या नागपुरात रस्ते कमी. खड्डे कमी. रस्त्यांची कामे कमी. ठेकेदार बसून राहायचे. ठेकेदार बसून राहिल्यामुळे नगरपालिकेत आनंदीआनंदच असायचा. एकूण उलाढालच कमी. याला काय प्रगती म्हणतात? ते काही नाही. आता आम्हीच यातून वाट काढणार! "पंत, परिवारातील लोकांनी आता व्यवसायात पडले पाहिजे. काय समजलात? किती दिवस स्नानसंध्येत घालवणार? तेव्हा, उत्तिष्ठत! जागृत!" असा सानुनासिक आशीर्वादही त्याच दिवशी सायंशाखेत मिळाला." येथे ते इंजिन आठवणींनी थरथरले.

"मग काय, काढली कंपनी अन काय. कंपनी तर काढली. एक टेबल अन दोन खुर्च्या एवढी स्थावर मालमत्ता. आणि स्वत:च्या हातानं रंगवलेला बोर्ड. धी पूर्ती कॉर्पोरेशन - प्रोप्रा. गडकरी बंधू. आता बंधू बिंधू काय नाय ओ, एकटाच बसायचो गाळ्यात. पण त्यावेळी ष्टाईल होती, इतर दुकानावर प्रोप्रा अमुक बंधू तमुक बंधू असं दिसायचं. आपणही भक्कम होतो. दोन भावान्ला येकदम पुरेल एवढी चड्डी येकट्याला लागायची मला. मग लिहिलं झालं बंधू. शाखेच्या लोकान्ला एक बरं झालं.  ध्वज, त्याचा स्टँड, दंड, वेतचर्म, संचलनात अचानक अनिर्बंध झालेले चड्ड्यांचे पट्टे, टोप्या, गंजलेली खड्गे अशी सगळी मालमत्ता ठेवायला आमचा गाळा मिळाला. म्हटलं गाळा रिकामा दिसण्यापेक्षा बरं. मग काही आमच्या भागात प्रवासावर असलेले "पूर्णवेळ" रात्री झोपायलाही येऊ लागले. असूद्या म्हटलं. मुद्दा आमच्या प्रगतीचा होता, विदर्भाच्या प्रगतीचा होता. विदर्भाच्या प्रगतीचा मार्ग शेवटी आमच्याच गाळ्यातून जाणार याची आम्हाला खात्री होती. पण प्रगती कुठून सुरू करावी याच्यावर खल सुरू होता. सुधारणा झाली पाहिजे सुधारणा झाली पाहिजे असं आम्ही घोकत राहिलो. आमच्या त्या सतत घोकण्याने काही कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला. एकदोघांनी आम्हाला आपादमस्तक न्याहाळत दररोज बारा सूर्यनमस्कार घाला, तेलकट खाणे कमी करा, सुधारणा होईल असे सुचवले. त्यांचाही दोष नव्हता. नको ती प्रगती कशी भराभर होते. आम्ही वायुभक्षण करून राहिलो तरी ती प्रगती थांबणारी नव्हती. असो. मग विचारमंथन बैठक झाली. नेहमीचे राष्ट्रीय पुनर्निर्माण, हिंदुराष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यदेवीचे पूजन या विषयांवर तीसचाळीस मिनिटांचे चिंतन झाल्यावर मग प्रगतीचा मुद्दा चर्चेला घेतला गेला. बैठक धंतोलीत असल्यामुळे त्यातल्या त्यात प्रथम विदर्भाच्या प्रगतीचा विचार पुढे आला. कपाशी भावाच्या पुढे विषय जाईना. मग आपल्या सुपीक डोक्यात एक जबरदस्त विचार आला. उसाच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्राचे लोक लैच भाव खाऊन राहिले आहेत. आमच्या नशिबाला मात्र ही कपाशी. भोत नाइंसाफी है. ही परिस्थिती बदलली पायजे. सहकार काय पश्चिम म्हाराष्ट्राचाच आहे काय? म्हटलंच आहे, व्हेन थिंग्ज गेट टफ, टफ ऑल्सो गेट्स अदर थिंग्ज (बहुतेक अशीच काहीशी म्हण आहे असं वाटतं). आपण तर टफ म्हणजे गेंडा छाप ताडपत्रीसारखे टफ. कितीही ढकललं तरी विदर्भ पश्चिमेकडे सरकणार नाही. मग आपण उसालाच इथं आणायचं. धी पूर्ती कॉर्पोरेशन साखर विकणार ही बातमी अख्ख्या विदर्भात पसरली. आपणही दोन चार साखरेची पोती आणून गाळ्यात लावली. लोक ते अप्रूप दाखवायला पोराबाळांना आणू लागले. पेपरमध्ये आपला साखरेच्या थप्प्यावर हात ठेवून उभा असल्याचा फोटो पण छापून आला. च्यायला ब्लॅक-व्हाईट फोटोचे दिवस ते. माझ्याऐवजी पोत्याच्याच खाली माझं नाव छापलं गेलं."

"हळूहळू सहकारातील मज्जा कळत गेली. साखरेच्या जोडीला मळी आल्यावर तर बहारच आली. रोजच्याला पाचहजार बाटली माल निघू लागला. एकदा कुणीतरी म्हणाले अहो एवढा बायोग्यास तयार करताहात, अख्ख्या विदर्भाला वीज मिळेल. पयले मी तडकलोच. लेका माझं मी कमवून खातो, तर तुला का त्याच्या ग्यासचा त्रास रे बाबा? पण कारखान्याच्या म्यानेजिंग डायरेक्टरनी समजावलं की हा तो ग्यास नव्हे. यापासून खरंच वीजनिर्मिती करता येईल. सरकारी सबसिडीपण मिळेल. कर्ज मिळेल. सबसिडी! किती गोड शब्द आहे. खुशाल करा म्हटलं. बायोग्यास नसला तर दुसरं काही तरी वापरा, पण ती सबसिडी घ्या. ग्यास हा शब्द उगाचच बदनाम झाला आहे. पण मनाशी म्हणालो बटाटेवडा जरा कमीच केला पाहिजे बरं. तिथं काय सरकारी सबसिडी नाही मिळायची. उगाच पोटाला तडस कशाला हवी?" 

"पूर्तीचा कारभार मोठा होऊ लागला. आमचा एक गाळा कमी पडू लागला. साखर विदर्भात झाली तरी विकायला मुंबईत जायला लागायचं. मग मुंबईत ऑफिस काढायचा निर्णय झाला. म्हणजे मी घेतला. आता शाखेत जाऊन निर्णय घेणं, परिवारात चर्चा करणं हे जरा कमी झालं होतं. कमी म्हणजे बंद. पण म्हणजे मी स्वयंसेवक राहिलो नाही असं काही नाही. स्वयं सेवाच करत होतो मी. पर्यायाने विदर्भाची सेवा आपोआप होत होती. म्हणजे असावी. नक्कीच. शंकाच नाही. म्हणजे, नाहीतर हिवाळी चिंतन शिबिरात कुणी बोललं नसतं का मला? की बुवा विदर्भाची प्रगती होत नाहीये बरं का. कुणी काही बोललं नाही. तेव्हा नक्कीच होत असणार. मी तर म्हणतो विदर्भाचीच काय अख्ख्या देशाची प्रगती होते आहे. पूर्तीने देशाची पुरती प्रगती केली आहे. निदान माझी स्वप्नपूर्ती तरी केली आहे. या कॉंग्रेसवाल्यांचं बोंबलायला काय जातंय?" एवढं सगळं बोलून नंदीग्राम एक्स्प्रेस इंजिन यार्डात गेलं.

Wednesday, April 15, 2015

नारायणाभेटी कविब्रम्ह आले

हरलेले हाकललेले थकलेले
किंवा आमच्यासारखे तुंबलेले

पडलेले ठोकलेले सटकलेले
किंवा आमच्यासारखे अडकलेले

सारे आमच्या तंबूत बसलेले
उसने हसू परंतु चेहरे उसवलेले

यादव, भूषण आणि 'आप'टलेले
हताश पसरुनी मुख रडवेले

कवि स्वत: जातीनिशी आलेले
कटी 'रिपाई'चे आखूड झबले

कल्लोळ उमटला "आले! आले!"
खिन्नवदनी नारायण प्रकटले

कवि स्वभावे पुढे सरकले
सरसावोनी त्यांसी आलिंगिले

दिसता नारायण चुंबनोत्सुक
झणी चार फूट मागे सरकले

अदृश्य माईक घेऊन गरजले
स्वागतम! आता भवन पुरते भरले

वदले ढाण्या वाघास भरते आले
तंगडी वर करून गर्जण्यास
आता सवंगडी मिळाले…

कवि - स्फुरण पावलेले

Tuesday, April 14, 2015

असाही एक गांधी

"अओ, आॅंआऊमुए ॲंअ ओओ आआ आई उआआ आंहीं" असे गेंगाण्या आवाजातील शब्द माझ्या कानी पडले आणि मी दचकून वर पाहिले. कधी नव्हे गाडीत डोक्यावर पंखा आला होता आणि तो साधारण दहा आरपीएमच्या कमाल क्षमतेने गरगरत होता. त्यातून वारानिर्मिती जरी होत नसली तरी ती होत आहे अशी कल्पना करून घेतल्यामुळे उगाच डुलकी लागली होती. डब्यात नेहमीचंच पब्लिक असल्यामुळे डुलकी जरा गाढ लागली होती. आम्हाला रूळांचा खडखडाट ऐकू आला आणि माहीमच्या खाडीचा तो मंदमधुर वास आला की आपोआप जाग येते. मग इंच इंच सरकत दाराच्या साधारण दिशेने हालचाल सुरू केली की पाच मिनिटांत टॉयलेट फ्लश झालेल्या पाण्यासारख्या त्या माणसांच्या लोंढ्यातून धडपडत दादरच्या फलाटावरती उतरायचं हे समीकरण ठरलेलं असतं. पण आज आधीच जाग आली. हे असलं व्यंजनमुक्त बोलणारं म्हणजे एखादं नवजात अर्भक असेल असं म्हणावं तर आवाज तर छान माजावर आलेल्या म्हशीप्रमाणे आला होता. त्यामुळे हे कोण बोलले बुवा असा विचार करत असतानाच मागून परत तोच आवाज आला,"आॅंआऊ इ आअइ अअ आए". आता कुतूहल अनावर झाले. मागे वळून पाहणे अगदी गरजेचेच होते. एक गृहस्थ तोंडाचा चंबू करून बोलत असताना दिसले. त्यांच्या डाव्या उजव्या कुशीत नाईलाजाने शिरून उभे राहिलेले त्यांच्या तोंडाच्या विरुद्ध बाजूला तोंड करून केविलवाणे भाव घेऊन उभे होते. रोज ऑफिसला जाताना कुणाला कुणाच्या मिठीत किंवा कुशीत शिरावे लागेल याचा काही नेम नाही. ती लॉटरी रोज प.रे. आणि म.रे. च्या सौजन्याने फुटते. मग लडिवाळपणे आपल्याला लगटलेल्या त्या इसमांचे "अप-क्लोज-पर्सनल" असे निरीक्षण इच्छा नसतानाही उगाचच घडते. निढळाच्या घामाचा पैसा आहे असं फक्त मुंबईकरच म्हणू शकतात. राष्ट्रीय एकात्मता होवो वा न होवो मुंबईच्या लोकल गाड्या ते काम गेली कित्येक वर्षं करताहेत. असा विचार करत असतानाच एकाने अत्यंत वैतागलेल्या स्वरात "अबे साले! मुंह बंद रख!" असा त्या व्यंजनविरहित इसमाला परस्पर दिलेला दम ऐकू आला. म्हटलं आता काही तरी राडा होणार. "च्यायला तंबाखूची गुळणी धरून बसलाय लेकाचा. धरण फुटायला आलंय पार. बोलताना फुटलं  तर सगळा मुखरस आमच्या अंगावर येणार!" हे ऐकल्यावर मग खुलासा झाला. सदरहू इसमाने एक अलिखित नियम मोडला होता. एक तर हे असं गाडीत एकमेकाच्या पटात शिरून उभे राहायचे असल्यावर तंबाखूची गोळी लावायला नको होती. बरं लावलीच तर निदान माहीमची खाडी येईतोवर तोंड बंद ठेवायला हवे होते. खाडीवरून जाताना मनसोक्त पिचकारी मारून तोंड मोकळे करता आले असते. इथे "आॅंआऊमुए ॲंअ ओओ आआ आई उआआ आंहीं" याचे व्यंजनात रूपांतर झाल्यावर काय होते ते ऐकायला मन आसुसले होते. पण हा महानालायक इसम, पिंक टाकायला तयार नव्हता. शेवटी खाडी आली. याने दाराच्या आत तीन फूट उभे राहून नेम धरून पिचकारी ठोकली. पहिली स्लिप आणि विकेटकीपरच्या मधून ती पल्ल्याला लागली. मग समाधानाने आमच्या या महाना(ला)यकाने विजयी मुद्रेने सर्वत्र पाहिले. किमामचा सुगंध दरवळला. "अहो, मी म्हणत होतो, तंबाखूमुळे क्यान्सर होतो याला काही पुरावा नाही!

Saturday, April 4, 2015

डान्सेस विथ वूल्व्ह्ज

कोकणाबद्दल विचार करू लागलो की मला "डान्सेस विथ वुल्व्हज" या केविन कोस्टनरच्या सिनेमाची आठवण येते. तसंच काहीसं माझ्या वडिलांचं झालं असावं. कृष्णेकाठच्या अस्सल लोण्यासारख्या मऊ काळ्याभोर मातीत जन्मलेला देह, माई घाटावर हुंदडायचं, पुरात आयर्विन पुलावरून त्या लालभडक खवळलेल्या पाण्यात बिनधास्त उडी टाकायची आणि तडक हरिपुराच्या काठावर निघायचं. त्या पाण्यात काय काय असायचं. बाभळीचे काटेवाल्या फांद्याफांदोट्या, काही वेळा चक्क अक्खी झाडं, घाबरलेले आणि म्हणूनच अत्यंत बिथरलेले नाग त्यावर चढून बसलेले असं सगळं विश्व वाहत आलेलं, मध्येच वळणावर निर्माण झालेले क्षणात तळाशी घेऊन जाणारे भोवरे. अशा सगळ्यांशी टक्कर देत पाण्याशी झुंजत जाण्यासाठी जी एक बेभान वृत्ती लागते ते कृष्णेच्या पाण्यानं पुरेपूर दिलेली. सकस काळ्या मातीनं प्रदेशाला सुपीकता दिलेली. दूध दुभतं भरपूर. दिवसभर शेतांतून, उसाच्या वावरातून फिरावं, सूर पारंब्या खेळाव्यात, भूक लागली की तिथल्याच शेतातील उसाचं कांडकं उपसून चोखावं, हातावर जोंधळ्याची कणसं चुरावीत, तशीच कच्ची हाणावीत आणि पुन्हा उनाडावं असा दिवसभराचा कार्यक्रम असावा. कृष्णेकाठची गावं भावुक आणि भाविकही, त्यातून राजाश्रय लाभलेली. नदीवर उत्तम घाट बांधलेले, काठावर ताशीव काळ्या दगडात बांधलेली मजबूत पण कमालीची कलाकुसर केलेली देवळं. देवळाभोवती डेरेदार वृक्ष. उन्हातान्हात पांथस्थानं यावं आणि त्यांच्या गार सावलीखाली घटकाभर बसावं. देवाचा सहवास, दर्शनाला येणाऱ्याजाणाऱ्यांची संथ येजा सगळंच कसं निवांत. कुणालाच घाई नसे. दिवसभर मग असं उनाडून झालं की मग घरी यावं, हातपाय धुवून शुभंकरोति म्हणावी, संध्या आचमनं करावीत, वडलांच्या करारी नजरेखाली जेवावं आणि गुडूप झोपून जावं ते दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पुन्हा हे सगळं नव्यानं अनुभवण्यासाठी. पुढं मग थोडंसं मोठं झाल्यावर शाखेत जाणं सुरू झालं असावं. शाखेत घडलेले संस्कार, तिथं घडलेला विद्वान माणसांचा सहवास, यांनी कदाचित मग डोळे उघडून दिसत असलेल्या क्षितिजापलीकडे काय असेल याचा विचार सुरू झाला असेल. गावकूस ओलांडून जाणं म्हणजे सीमोल्लंघन म्हणण्याचा काळ तो. आईवडिलांनाही आपली मुलेबाळे आपल्याचबरोबर रहावीत अशीच अपेक्षा असायची. बहुतांशी मुले गाव सोडून जात नसतही. परंतु शाखेमध्ये नव्या विचारांचा वारा आला असावा. त्याने जग विस्तारले असावे. आणि मग तो लेफ्टनंट जॉन डनबार जसा वेस्टर्न फ्रंटवर जायला निघाला तसेच माझे वडीलही कोकणात जायला निघाले असावेत.

कोकणात स्वभाव निराळे, पद्धती वेगळ्या. घाटावरचा अघळपघळपणा कोकणात नाही. सगळे कसे नीट नेटके, सुबक, स्वच्छ. याचा अर्थ अप्पलपोटेपणा नव्हे तर ती स्वयंपूर्णतेकडे झुकणारी वृत्ती म्हणायची. घरात साखर संपली म्हणून कोकणी माणूस आपली कुपाटी ओलांडून शेजाऱ्याच्या खळ्यात उभा राहायचा नाही. डोक्यावर इरले घेऊन तडक पाच दहा मैल चालत तालुक्याच्या बाजारात जाईल. अर्थात ही सर्व कल्पित गोष्ट. नेटकेपणामध्ये अचानक घरातील साखर संपली हे संभवत नाही. कोकणी माणूस तसा कुणाला चटकन मिठी मारणार नाही. ते सगळं घाटावर. तिकडे "वाईच तंबाकू काड की रं मर्दा" असं म्हणून चावडीवर अथवा पारावर बसलेल्या मंडळींशी संवाद करता येतो. मग तंबाकूवरून सुरू झालेली गप्पांची गाडी पुढं "पावणं, पैल्यांदाच आलाय न्हवं आमच्या गावात, आता काय ज्येवन केल्याशिवाय आमी काय सोडत न्हाई तुमाला" इथवर येते. अशा वातावरणातून कोकणात आल्यावर,"खंयसून आयल्यात? बदली होवन की काय? तरी म्हणा होतो शाळेतलो मास्तर दिसा नाय हल्ली. बरे हल्ली सगळे मास्तर घाटावरसून येतंत ते? काय समाजना नाय. आमचे लोक चलले हुम्बयक. मगे मास्तर भायेरसून हाडूक लागात नाय तर काय!" असे शब्द कानावर पडले असण्याची शक्यता बरीच आहे. ते ऐकून नवीन नवीन कोकणात पाऊल टाकलेल्या माझ्या वडिलांना थोडंसं दडपणही आलं असणार. इथं घरंही कशी एकमेकांपासून अंतर राखून असल्यासारखी. धुक्यात ध्यानस्थ बसलेला तो नरेंद्र डोंगर. त्याला कधी निळसर छटा यायची तर कधी करडी. सकाळी धुकं. चोहोबाजूनं डोंगर असल्यानं सूर्याचं दर्शनही उशिरा व्हायचं. कुक्कुटकोम्ब्याचे होल्यांचे हुंकार, डोंगरात फाटी आणायला गेलेल्यांचे कुकारे, सुरंगीचा मंद वास, त्यात बोंडूंचा वास मिसळलेला. पाऊसही असा पडायचा की बस. डोंगरात गाज सुरू झाली की दोन मिनिटात ताज्या दमाच्या शिलेदारांची पलटण शत्रूवर तुटून पडावी असा बरसत यायचा. कौलारू घरं ती. तो तडतड ताशा कौलावर सुरू झाला की ऐकत राहावंसं वाटायचं. रात्री त्या ताशातच कधी झोप लागली ते कळायचं नाही. सकाळी उठून बाहेर यावं तर त्या पावसानं दम घेतलेला असायचा. सगळीकडे कसं लख्ख असायचं. पायाला चिखल म्हणून कधी लागायचा नाही. घाटावर पावसात बाहेर पडणं म्हणजे धोतरा प्यांटीवर मागून चिखलाची नक्षी काढून घेणं. इथं अगदी अनवाणी सगळीकडे फिरावं, तळपाय श्रीकृष्णाच्या त्या लालबुंद नितळ अंगठ्यासारखा राहायचा.  हे सगळं वातावरण नवीन होतं. देऊळ म्हटलं की नदीच्या घाटाची सवय. इथे देवळंही शांत, निर्विकार साधूसारखी. युगानुयुगे समाधिस्थ दिसणारी. वडिलांना हे वेस्टर्न फ्रंटिअर गूढरम्यच वाटलं असेल. सभोवती अपरंपार सृष्टीसौंदर्य पण तिथे राहणाऱ्या माणसाच्या स्वभावाचा थांग न लागणे अशा मन:स्थितीत तो जॉन डनबार पडला होता तसेच त्यांचेही झाले असेल. मनाचा हिय्या करून त्यांनी तळ ठोकला असेल. आता या भूमीशी आपले नाते, हीच आपली कर्मभूमी, हीच आपली माणसे काय वाटेल ते होवो असेच त्यांनी मनाशी ठरवले असेल.

भूमी अपरिचित जरी असली, हळूहळू परिचित होऊ लागली. अवखळ पाऊलवाटा अवगत होऊ लागल्या. घाटावरच्या सरळसोट वाटेची सवय असलेली पावले आता चढाव उताराला सरावली. अंधारात सहजगत्या वावरू लागली. प्रथम प्रथम कानाला विचित्र वाटलेले मालवणी हेल आता कळू लागले. चेहरा अत्यंत निरागस ठेवून सानुनासिक स्वरात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चेष्टामस्करी कळू लागल्या. सांगलीकोल्हापूर भागात भाषेवर कानडी आघात भरपूर. शुद्ध मराठी बोलायचा प्रयत्न जरी केला तरी तो बाज काही लपत नाही. कोकणात प्रथमच हा बाज ऐकू आल्यावर त्याची थोडी थट्टाही झाली असेल. ती मस्करी खेळकरपणे सहन करून त्यांच्याबरोबर वडीलही खळखळून हसले असतील, नुसते हसलेच नसतील तर स्वत:च घाटावरच्या भाषेच्या गमतीजमती त्यांना ऐकवल्या असतील. आणि तिथेच सूर जुळले असतील. मला अजून लहानपणीच्या काही गमती आठवतात. बाबा अस्सल घाटी गावरान भाषेत इंग्लिश बोलून दाखवत. "रामा वोक अप इन द मॉर्निंग अँड वेंट टू द फिल्ड. वर्क्ड देअर फ़ॉर होल डे अँड केम ब्याक. ऑन द वे, ही सॉ पांडा. ही कॉल्ड पांडा,"ए पांडा, कम हिअर. शिट. ड्रॉ सम टोब्याको. लाईम इज? नो? ह्यांड टू युअर मदर लेका!" असला नकलाखोर गमती स्वभाव असल्यावर मित्रमंडळी जुळायला वेळ लागत नाही.  इंग्रजीमध्ये "ब्रेकिंग द आईस" ज्याला म्हणतात त्यासाठी ते पुरेसे होते. जॉन डनबारनेही "सू (Sioux)" रेड इंडियन टोळीशी साखर आणि कॉफी देऊन ते "आईस ब्रेकिंग" केले होते. मने जुळायला कोणतीही एक समान आवड पुरेशी असते. पण हा एक भाग झाला. ही नुसती सुरुवात होती. कोकणी माणूस कलाकार, रसिक, अभिजात शास्त्रीय संगीताची आवड असलेला निघाला. म्हणजे हेही धागे लगेच जुळून आले. नाटक, दशावतार, घरी होणाऱ्या खाजगी मैफिली हे सगळं कोकणच्या प्रेमात पाडणारं ठरलं. भरीला भवतांलची पाचूसारखी हिरवीगार माया. त्या हिरव्या मखमलीमध्ये हरवून जायला व्हायचं. कोकणातले ऋतू आपलेसे झाले. ग्रीष्म ऋतूचा वणवा दमट हवेमुळे फारसा जाणवायचा नाही. पण डोंगर रंग बदलायचे. त्यांची हिरवीकंच काया क्षीण करडी हिरवट व्हायची. मस्तकावर अग्निशिखा घेऊन पांगारा फुलायचा. मोहाच्या फुलांचा गंध आसमंतात भरून राहायचा. सागाच्या झाडाची पाने जाळीदार व्हायची. डोंगरात आदल्या वर्षीच्या पावसाच्या पाण्याने छोटे डोह निर्माण झालेले असायचे ते पार खडखडीत होऊन जायचे. कधी एकदा पाऊस येऊन ही यक्षभूमी ग्रीष्माच्या शापातून मुक्त करतो असे व्हायचे. आणि मग जूनमध्ये तो जो यायचा तो पुढे चार महिने निळं आकाश काही दिसू द्यायचा नाही. थंडी फारशी यायची नाहीच. उगाच डिसेंबरचे काही दिवस मात्र सकाळी अंगावर शिरशिरी आणणारे असायचे. पाण्यावर वाफ दिसायची, नरेंद्र डोंगर धुक्यात न्हाऊन गेलेला दिसायचा. अशी सुरुवातीची काही वर्षे कोकणच्या सौंदर्यावर भाळून ते आधाशीपणे पिऊन घेण्यात गेली असावी.

मग पुढे कोकण नजरेतून श्वासातून हळूहळू शरीरात उतरू लागलं, भिनू लागलं. संस्कृती आपली वाटू लागली. माणसे आपली वाटू लागली. सणप्रसंगी देवळात जाणं नवीन नव्हतं, पण आता गुरवाचं गाऱ्हाणं घालताना आईकताना तोंडातून आपोआप "व्हय म्हाराजा" येऊ लागलं. दशावतार बघताना संकासुराचं युद्ध पाहताना वर्षानुवर्षं चालत आलेली ती परंपरा आपल्या पूर्वजांनी चालवली तशीच आपण चालवत आहोत असं वाटू लागलं. हा बदल आतून तर घडलाच. त्याहूनही भंवतालच्या माणसांनी तो विश्वास दिला, आपण कुठून घाटावरून आलो याचा केव्हाच विसर पडला. मग पुढली नैसर्गिक पायरी म्हणजे आपल्या माणसांच्या कथा आणि व्यथा दिसू लागतात तशा कोकणातील दु:खं दिसू लागली. इतका कष्टाळू स्वभाव असलेली, अंगात कलागुण असलेली, परंपरा टिकवून ठेवण्याचं भान असलेली माणसं लाभलेली ही भूमी, भूमिपुत्रांच्या वाट्याला सुबत्ता कशी नाही हे जाणवू लागलं. शेतकऱ्यांच्या वाटेला अतोनात कष्ट पण त्यामानाने त्याचा परतावा मात्र तितकासा नाही हे सत्य. मग पोटासाठी जो उठतो तो मुंबईला पळतो, चाकरमानी होतो, वर्षातून फक्त गौरी-गणपतीला त्याला आपलं कोकण आठवतं. नाही, खरं तर मनानं चाकरमानी कोकणातच असतो. मनात येईल तसं त्याला येता फक्त येत नाही. चाकरमानीपणाचा तो शापच होय. अशी ही भूमी यक्षानं शाप दिल्यासारखी का? असं वारंवार वाटत राहिलं. मग त्या अस्वस्थपणाला वाचा फोडण्याचा एक मार्ग म्हणजे पूर्णपणे या भूमीशी समरस होऊन तिथलेच होऊन जावं. इथेच काम करावं, माणसं जोडावीत, त्यांना एकत्र आणून काहीतरी कार्यक्रम करावेत, इथल्या व्यथा आपल्या साहित्यातून लिखाणातून मांडाव्यात, सांस्कृतिक चळवळ उभी करून मूळच्या कलागुणांना जोपासावं असं कल्प कल्प मनी येत राहिलं असावं. इच्छा असली म्हणजे सगळं होतंच. मग त्यानुसार समान व्यसनेषु अशी मंडळी भेटली. प्राध्यापकीचं काम सांभाळून वाचन मंदिर, नाटक संस्था, समाजवादी चळवळीच्या विचारवंतांशी तात्त्विक चर्चा वाद, त्या अनुषंगानं काही सार्वजनिक कामं, लिखाण हे असं सर्व सुरू झालं. वडिलांचा पिंड संघाचा असला तरी मला वाटतं वृत्ती समाजवादी असावी. कुणी काही म्हणो समाजवादी विचारसरणीमध्ये दुबळ्याबद्दल कणव आहे, अन्यायाचा तिटकारा आहे. तो मला वडिलांच्यात त्या लहान वयातही जाणवायचा. त्याचे घनिष्ठ मित्र प्रा. रमेश चिटणीस यांच्याशी त्यांचे तात्त्विक वाद होत असत, पण मला वाटतं त्या दोघांमध्ये माणुसकी आणि अन्यायाची चीड हा समान दुवा होता. चिटणीस सर हे जास्त तर्कनिष्ठ तर वडील थोडेसे भावनाप्रधान. दोघांनीही मिळून जे कार्य केले ते स्थानिक हितासाठीच.

आणि पाहता पाहता वर्षे निघून गेली, कॉलेजमधून निवृत्त होण्याचे दिवस जवळ आले. केवळ नोकरीसाठी म्हणून कोकणात आलो, आता ती तर संपली. म्हणजे आता इथून उठून परत आपल्या गावी जायचे? हा विचारसुद्धा वडिलांना सहन झाला नव्हता हे मला आठवते. गावी परत जायचे म्हणजे काय? कोकण, इथली ही माणसे हीच माझी माती आणि माझे आपले. हेच कोकणाचे वैशिष्ट्य. इथली माणसे, त्याच्याशी जुळलेलं नातं हेच तर कमावलेलं वैभव. असा माझ्या वडिलांचा लेफ्टनंट जॉन डनबार झालेला मला आठवतो. तो ब्रिटीश सोल्जर म्हणून केव्हाच संपला होता, उरला होता तो अस्सल सू (Sioux) जमातीतीलच एक. पण डान्सेस विथ वूल्व्ह्ज ही कथा जॉन डनबारची नाही, ती कथा आहे त्या भूमीची, त्या संस्कृतीची. तसेच हीसुद्धा कथा आमच्या वडिलांची नाही, तर ती आहे कोकणाची. त्या मायेच्या भूमीची, जिने आपल्यावर प्रेम करणाऱ्याला भरभरून दिले, द्यायला शिकवले, कणखर चिवटपणा शिकवला, फणस बाहेरून काटेरी असला तरी आतून मधुर रसाचा गरा देणारा असतो हे शिकवले. कोकणी माणसाचे तिरके बोलणे हे लागट नसते, तो एक बाज असतो, तो प्रेमाचाच असतो. मांयxx, बाxx हे सर्व शब्द केवळ वाक्य सुरू करण्याचे साधन म्हणून वापरले जातात, प्रत्यक्षात त्याचा आपल्या मातापितरांशीशी सुतराम संबंध नसतो, असे सर्व काही शिकवले. कोकणी माणूस औपचारिक बोलायचे असेल तर शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण प्रेमाच्या माणसाला खास उपर्निर्दिष्ट शब्दांचा वापर करूनच संबोधतो हे सत्य आहे. गेली कित्येक वर्षे आमच्या कोकणाचा कॅलिफोर्निया कसा होईल याची चर्चा होत आली आहे, त्यावर व्याख्याने उठली आहेत. ते सर्व कॅलिफोर्निया प्रत्यक्ष न पाहताच. सांगोवांगीच सगळे. प्रत्यक्ष कॅलिफोर्निया पाहिल्यावर वाटले अरे, कशाक होयो तो कॅलिफोर्निया आमका? पैसो मिळात, चकचकीत रस्ते होईत, पण आमचां कोकणीपण जाईत त्याचा काय? कोकण नेहमीच श्रीमंत होतं, आहे आणि राहील. डोळे उघडून ती श्रीमंती आपण पहायची आहे, जपायची आहे, तिचा विकास आणि पर्यायाने तिच्या मुलांचा विकास आपोआपच होईल.

Thursday, March 12, 2015

उगाळावा जरा कोळसा

आत्ता कुठे म्याडमचा दूरदर्शीपणा लक्षात येतो आहे. धाकले धनी "ममा, ममा, मी! मी!" अशी मची बाराखडी म्हणत होते तेव्हा आम्ही पण "म्याडम, म्याडम, तुमी तुमी!" अशी म्याड बाराखडी म्हणत होतो. पण म्याडम हुशार निघाल्या. आम्ही सगळे पक्षानं दिलेला कित्ता गिरवत बसलो होतो तेव्हा मौनी सिंग बाबा डोळे मिटून खुरमांडी घालून बसले होते. लोकसभा नव्हे, जणू काही गुरुद्वारातच बसले आहेत. गुरु ग्रंथसाहिबांचं दर्शन घेऊन झालं आहे. हातावर तुपानं माखलेला शिरा प्रसाद पडला होता तो खाऊन झाला आहे. तूर्तास तरी भूक थोडी शमली आहे. समोर दोन सरदारजी अगम्य भाषेत सर्दी झालेल्या आवाजात भजन म्हणत आहेत. त्यांच्या बाजूला अजून दोन डिट्टो तसेच दिसणारे सरदार तबला आणि पेटी कुटत आहेत. लंगरात आज काय असावं बरं, तो नेहमीचा सरसोदा साग नको बुवा, लसणाच्या ढेकरा येत राहतात, म्याडमच्या शेजारी बसायचं असतं. बैंगन का भरता वातुळ, सभागृहात दिवस काढायचा आहे, कारण नसता इतरांचा सभात्याग नको व्हायला, त्यापेक्षा राजमा बरा, इत्यादी सुखद विचारात ते पडले असावेत असं वाटत होतं. आम्हाला ते स्पष्ट कळतं. विरोधक मात्र सगळ्याला विरोध करायचा म्हणून कायच्या काहीच समजत असतात. म्हणे मौन हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. एवढा ऑक्सफर्डला शिकलेला माणूस काय साधा विचार करत असणार काय? नक्कीच जीडीपी, ग्रोथरेट ऑफ इकॉनॉमी, परकीय चलन गंगाजळी असलंच कायबाय सारखं डोक्यात असणार. आपल्याला तर हे शब्द ऐकून म्हायती. सालं धावीनंतर कोणी पुस्तक हातात धरलंय? वाटलं होतं धाकले धनीपण ऑक्सफर्ड का केम्ब्रिज कुठं तरी मोठ्ठ्या शाळेत जाऊन आले आहेत म्हणे, त्यांना म्हायती असेल. त्यांना जीडीपी म्हणजे काय असं एकदा विचारलं होतं. तेव्हा त्यांनी "देशाचे मैल्याचे वट्ट उत्पादन" असे उत्तर दिले होते. च्यायला आपल्याला तर धक्काच बसला होता. मी सरळ म्हणालो, ओ, काय पन फेकू नका ओ, म्हाईत नाही तर तसं सांगा. तर ते पेटलेच. तडक जाऊन ऑक्सफर्डचीच डिक्शनरी घेऊन आले. म्हणाले हे बघा "ग्रोस" या शब्दाचा अर्थ बघा त्यात. अनेक अर्थ आहेत, पण त्यातला एक अर्थ गलिच्छ, अनप्लेझंट असा आहे. आता "देशाचे रोजचे गलिच्छ उत्पादन" दुसरे काय असणार? मी अत्यंत आदराने त्यांच्याकडे पाहिले. काही म्हणा, माणूस आहे हुशार. नापास का असेना, ते काय आपण पण आहोत. पण आज इथं लोकसभेत आलोच की नाही? त्यावेळी पैल्या बाकावर बसणारे देशपांडे जोशी आज बसलेत अमेरिकेत जाऊन कॉम्प्युटर कुटत. पण काही असो, आपल्याला लई अभिमान वाटला. च्यायला इतके दिवस आपण जीडीपी ला हातभार लावत होतो आणि आपल्याला त्याचा पत्ता पण नव्हता! तरीच सगळे जीडीपी वाढायला पायजे जीडीपी वाढायला पायजे म्हणत असतात. मी आपला पक्षाचा आदेश मानून मान डोलवत असायचो. तसं भाजपमध्ये तरी किती शाने लोक आहेत? त्यांनाही हे शब्द घंटा कळत नसणार. परकीय गंगाजळी म्हटलं की बरेच जण आदरानं नमस्कार करतात आणि "परकीय" या शब्दाला आक्षेप घेतात. गंगा आणि जळ हे दोन शब्द एकत्र आले की झालं, भाजप खासदार साष्टांग नमस्कार घालतात. फक्त ती गंगाजळी स्वदेशी असावी असा त्यांचा आग्रह असतो. तेव्हा आपल्याला एवढं काही वाईट नको वाटायला.

तेव्हा म्याडमच्या दूरदर्शीपणाबद्दल बोलत होतो. पंतप्रधान पदाला आगदी योग्य माणूस शोधून काढला. पद दुर्मिळ, तसंच कॉंग्रेसमध्ये शिक्षणवालेही दुर्मिळच. म्याडम स्वत: काय शिकल्या आहेत ते त्या आकाशातील प्रेमळ बापासच ठाऊक. तो येणार, शुभ वर्तमान घेऊन येणार असं बरीच वर्षं ऐकतो आहे. ते जे काही शुभ वर्तमान असेल त्याबरोबर म्याडमच्या शिक्षणाचे शुभ नसले तरी वर्तमान तरी घेऊन यायला काय हरकत आहे म्हणतो मी? शिकल्यालं सवरल्यालं म्हटले की शशी थरूर हे एक प्रात:स्मरणीय नाव नजरेसमोर येते. पण त्यांचे अलीकडील वर्तमान पाहिले की एकूण गडी नुसताच शिकलेला आहे सवरलेला काय वाटत नाही. गड्यानं बायकोच्या हत्येचं प्रकरण असं काही हाताळलंन की वाटावं हा इसम खरंच कॉंग्रेसचा आहे की आप पार्टीचा? म्हणे तपासात पूर्ण सहकार्य करीन! अरे खरा कॉंग्रेसचा असतास तर ती आपली बायको असल्याचाच मुळात नकार दिला असतास! बसा मग करत तपास बिपास. या बाबतीत भाजपवाले कॉंग्रेसपेक्षाही चालू. बायको बियको भानगड येऊच नये याची व्यवस्था तीसतीस वर्षांपूर्वीच करून ठेवतात. मग एका दगडात दोन पक्षी. रोज घरी आल्यावर "झाल्या लष्कराच्या भाकऱ्या भाजून? घरात मेलं जोंधळ्याचं पीठ संपलंय ते आणून टाकता येत नाही!" ही कटकट करायला कुणी नाही आणि जनांत ब्रम्हचर्याचा दबदबा! अहो "पूर्णवेळ" आहेत ते, देशकार्याला वाहून घेतलं आहे, स्वत:ची आई आणि राष्ट्रदेवता यांशिवाय कुणालाही वंदन करत नाहीत ते इत्यादि वाक्ये अशीच तयार होतात मग त्यांच्याबद्दल. हुषार लेकाचे. आम्ही एकदा त्यांचे स्खलन करण्याचा प्रयत्न केला होता. बाजार समितीची निवडणूक झाली होती. अर्थातच कॉंग्रेसचेच सगळे लागून आले होते. मग पार्टी घातली होती मळ्यावरच्या बंगल्यात. आपलेच खास लोक होते. गम्मत म्हणून बोलावलं एका संघिष्ट भाजपवाल्याला. तेवढीच आपलीपण करमणूक. तर लेकाचा उपवास आहे म्हणून घरून साबुदाण्याची खिचडी बांधून घेऊन आला होता. आम्ही सोडा उघडला तेव्हा याने उपवास सोडला. एवढी खास आयटम आणली होती डान्सला तर "परस्त्री मातेसमान" असं म्हणून हा अक्खा टाईम सावरकरांची "सोनेरी पाने" वाचत बसला होता. पुन्हा काय बोलावलं नाही त्याला. असो. तर हा थरूर काही कामाचा नाही. आम्ही घोटाळे करायचे आणि हा त्यांच्या तपासात सहकार्य करत बसणार. दुसरं थोर व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दिग्गीराजे. राजा माणूस. राजारजवाड्यांसारखेच वागणे. भानगडी करायच्या त्या मान ताठ ठेवून. अगदी अंगवस्त्राबरोबर पकडलं गेलं तरी लाज न वाटू देता उलट "कोण आहे रे तिकडे! आमचा असा एकांतभंग? हत्तीच्या पायी देईन एकेकाला!" अशी आरोळी ठोकायची. पण हेही पक्षधोरणात बसत नाही. अळीमिळी गूपचिळी हे पक्षाचं ब्रीदवाक्य! इथं दिग्गीराजे स्वत:च ट्वीटरवर चौवीस तास पडीक. म्हणजे आम्ही घोटाळा करून घरी जाऊन पडायच्या आत ब्रम्हांडात झेंडे लागून त्याला हजारो लाईक्स भेटणार. शिवाय ते क्यागवाले आमच्या आधी घरी जाऊन आमची वाट बघत बसलेले असणार. नकोच ते. चिदंबरम हे आणखी लुंगीवेष्टित शिकल्यालं व्यक्तिमत्व. चेट्टीनाड प्रांतातून आलेलं आणखी एक तिखट रसायन. पार हार्वर्डमधून शिकून आलेलं. पण टूजी स्पेक्ट्रममुळं घोळ झाला. काय पण माणसाला हव्यास असतो. स्वत: एक नाही दोन दोन ब्यांका काढलेल्या. म्हणजे दुसऱ्याचा पैसा घेऊन परत त्यालाच फी लावायचा सरकारमान्य धंदा. कशाला पायजे हो राजकारण आणि घोटाळ्यांची भानगड?

पदावर माणूस पण असा पायजे की स्वत: स्वच्छ पायजे. लोकान्ला विश्वास बसला पायजे. आगदी पार चौकशी बिवकशी झाली तर उत्तर देणारा आसा पायजे की लोकान्लाच उलट वाटलं पायजे की  काय मोगलाई लावली आहे? माणूस कसा वारकरी दिसतो आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, मुखानं पांडुरंग हारी म्हणतो आहे, वाटेत भाकरतुकडा मिळाला न मिळाला, मिळेल त्याला पांडुरंगाचा प्रसाद मानून ग्रहण करतो आहे. वारीतल्याच कुणी दुसऱ्याचं पाकीट मारताना पाहिलं तरी त्याला "ही सारी ईश्वरची करणी" मानून मुखानं चकार शब्द न काढता चालतो आहे. आसा माणूस पाहिजे! मग आपले मौनी बाबा आयतेच सापडले म्याडमना. "तुम्हाला पंतप्रधान करू का" असं विचारलं तरी "जशी आपली इच्छा" एवढंच म्हणाले होते म्हणे त्यांना. तेही नुसती मान हलवून. आता आम्हीही कधी कधी नुसती मान हलवून होकार देतो बैठकीत. पण तेव्हा आमच्या तोंडात गुळणी असते. एकशेवीस तीनशेची छान किक बसलेली असते. शिवाय नकार द्यायची अथवा तोंड उघडून बोलायची पक्षात पद्धत नाही आमच्या. या सगळ्या अर्हतेत मौनी बाबा फिट्ट बसत होते. आम्हाला खात्री आहे "पंतप्रधान" ऐवजी "दत्तकविधान" असं जरी म्हटलं असतं तरी ते "जशी आपली इच्छा" असंच म्हणाले असते. आज म्याडम किती धोरणी आणि दूरदर्शी ते लक्षात येतं आहे. साधा कोळसा तो काय. तो द्यायला काय कुणाची परवानगी लागते? आम्ही कित्येक वेळेला आमच्या शेजारच्या घरी बंब पेटवायला हवेत म्हणून फुकट कोळसे दिले आहेत. काही पेटवायचं असेल तर कुठलाही कॉंग्रेसवाला मागे हटणार नाही. पण आम्हाला न विचारता का दिलेत म्हणून आमच्या गल्लीतील लोक कधी भांडायला आले नाहीत. हे भाजपवाले काहीही काळं दिसलं की ते कॉंग्रेसचंच समजतात. आपल्या स्वत:च्या तोंडाला मिश्री लावून दात काळे झाले तरी आमची कोलगेट वाईट दिसते त्यांना. आता मौनी बाबा चौकशीला तोंड देतील. तशी आम्हाला खात्री आहे इतक्या वर्षात ते न उघडलेलं तोंड आताही उघडणार नाही. पण न जाणो, म्हातारपणात तोंडावर आणि मूत्रपिंडावर नियंत्रण राहत नाही म्हणतात. सोसले नाही तरी नको ते खावेसे वाटते आणि इच्छा नसली तरी कुठेही घंपतीबाप्पा होऊन जातो. म्हणून आम्ही सक्काळी ते घरातून बाहेर पडायच्या आधी त्यांना गाठणार आहोत. उगाच त्यांच्या समोर जाऊन "ह्या: ह्या: ह्या: काय आपलं तसं काय नाय बरं का. आपण न्हेमीच तुम्हाला पाठिंबा देत आलोय. तुम्ही काय भिऊ नका, हे चौकशी बिवकशी म्हंजे नुसता भाजपचा कावा हाये बरं का. म्हंजे उगाच भ्या दावून नावं काढून घ्यायची आन पुढच्या इलेक्शनला वापरायची. ह्ये: ह्ये: तुमाला तसं सगळं म्हाईतच हाये म्हणा. तेवा तेवढं आपलं नाव जरा दोन चार दिवस इसरून जावा म्हंजे झालं. काय? ह्ये: ह्ये: ह्ये: बाकी आमाला तुमच्याबद्दल आदरच हाये हो. तो दावण्यासाठीच आमी आलोय." असं म्हणून यायचं आणि पुढील सर्व परमेश्वराच्या इच्छेवर सोडून द्यायचं. देव करो आणि त्यांना खोटं बोलण्याची ताकद मिळो. च्यायला पंतप्रधान असताना कधी भ्यालो नाही त्यांना, आता ते पंतप्रधान नसताना आमची फाटली आहे. स्वच्छ, शिकलेला  माणूस पदावर बसवला की कार्यकर्त्यांची पंचाईत होते. म्याडम तुम्ही दूरदर्शीच.