Monday, May 19, 2014

वडयाचे तेल वांग्यावर

नेहमी वर्दळ असणारा काळाकुंज बंगला सुनासुना वाटत होता. इंद्रवदन उर्फ काळापहाड त्यांचा आवडता काळा चष्मा परिधान करून त्यांच्या आवडत्या खुर्चीत बसून आवडत्या भिंतीकडे टक लावून बसले होते. जेव्हा जेव्हा एखादी कठीण केस येई तेव्हा ते असेच विचारमग्न बसून राहत. आजही ते एक गहन केस घेऊन बसले होते. पण चिंता केस सुटण्याची नव्हती तर भलत्याच प्रकारे सुटल्याची होती. मधून मधून ते शेजारील स्टुलावर ठेवलेल्या फोनकडे नजर टाकीत आणि आशेने वाट पहात. जणू काही तो आता वाजणारच आहे. मग पुन्हा एक नि:श्वास टाकीत नजर भिंतीवर लावत. गेले काही दिवस त्यांनी दाढीही केली नव्हती. गेले काही दिवस झोप न मिळाल्याने डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येउन काळापहाड हे नाव वेगळ्याच प्रकारे सार्थ करीत होती.

दोन दिवसांपूर्वी थोरल्या वाड्यातून दूत मिठाई घेऊन आला तेव्हापासून इंद्रवदन सरकारांचे वदन कडूझार झाले होते. आपण एवढा तेलकट वड्यांचा रहस्यभेद केला आणि प्रत्यक्ष तेलाने माखलेल्या पुड्यासहित वडे पुरावा म्हणून सादर केले. पण ज्युरीतील सभ्य गृहस्थांनी निर्विकारपणे डोळे मिटून मिटक्या मारीत वडे खाऊन तेलकट कागद पुन्हा आपल्याच हातात ठेवला. शंभूराजे तर सुटलेच वरती आपण पाठवलेला कुक्कुटकाढा परस्पर पिऊन पिऊन धनाजीराव मात्र गुटगुटीत झाले. पुन्हा सरकारांच्या मुदपाकात ढवळाढवळ केली म्हणून आपले चांगलेच वांगेभरीत झाले. नकोच हा गुप्तहेरगिरीचा छंद असे त्यांना वाटू लागले. छोटू कधी शेजारी येऊन अदबीने उभा राहिला ते त्यांना कळलं नाही.

नि:श्वास सोडून राजे कडूवदन होत्साते म्हणाले,'बोल छोटू, आता काय आणि?'
'राजे, बातमी वाईट तर आहेच, आपण सकाळची आपली ब्लडप्रेशरची गोळी घेतलीत का?'
'होय रे माझ्या विश्वासू हेरा. ते पहा टेबलावर. गौरीची आरास मांडावी तशा पित्त, ब्लडप्रेशर, पोटशूळ, मस्तकशूळ, निद्रानाश यावरील गोळ्या कशा मांडून ठेवल्या आहेत राणीसरकारांनी. त्यांना ही मजाच वाटते आहे. डिप्रेशनवरील गोळ्यापण मागवून ठेवा म्हणत होत्या. आराशीला बरे पडेल म्हणे.'
'राजे, दगडांची गोदामं भरलेली आहेत. आवक आहे पण जावक अजिबात नाही. अशानं खजिना रिता व्हायला वेळ लागणार नाही. लवकरच खट्याक मोहीम काढली नाही तर शिलेदारांना दाणापाणी करायला पगार होणार नाही.'
राजे म्लानवदन होऊन म्हणाले,'छोटू, आता कसले खळ्ळ आणि कसले खट्याक. आता आम्ही त्या दगडांची रास लावून लगोरी खेळत बसणार. लगोरी! तिकडे शंभूराजे रास गरबा खेळणार, आम्ही इथे रास लगोरी!'
राजे भेसूर आवाजात गाऊ लागले,'मैं तो रंगियो हतो एनो दिलडानो संग, मारा साह्यबानी पाघडियो लाग्यो कोई दूजो रंग.'
छोटू भेदरला. त्याने राजांच्या डोळ्यात काही विचित्र झांक दिसते का ते पहायचा प्रयत्न केला. पण राजांनी काळा चष्मा परिधान केला असल्यामुळे त्याला काही अंदाज लागला नाही.
राजे अचानक क्रुद्धवदन होऊन म्हणाले,'छोटू! ते पहा! लोक बटाटेवडा खात आमच्यादिशेने पाहून हसत आहेत! त्यांची ही मजाल? कोण आहे रे तिकडे? आमचा हंटर घेऊन या. चामडीच लोळवतो एकेकाची. इंद्रवदन ठोकरे म्हणतात आम्हाला!'
'राजे शांत व्हा!'
'आं? छोटू आम्हांस भास वगैरे होऊ लागले आहेत की काय?'
'नाही राजे. ती वाईट बातमी म्हणालो ती हीच. काल कुणी वात्रटाने आपल्या वाड्यावर लावलेल्या 'ठोकरे वाडा'च्या पाटीचं 'ठोकरे वडा' केलं आहे. आणि समोर स्वत:ची बटाटावडयाची गाडीपण लावली आहे.'
राजे दीनवदन होऊन म्हणाले,'आपल्याला भास होत नाहीत याचा आनंद मानायचा की शंभूराजांच्या या थट्टेचा शोक करायचा? अरे विनोद! केवळ विनोद केला होता आम्ही!! त्याची एवढी सजा? आज आबासाहेब असते तर…'
छोटू मध्येच म्हणाला,'होय राजे, आबासाहेबांनी आपल्याला मायेनं जवळ घेऊन समजावलं असतं.'
राजे खिन्नवदन होऊन म्हणाले,'नाही छोट्या, दुसऱ्या पात्राला आपलं वाक्य पुरं न करू द्यायची तुझी मराठी रंगमंचावरील सवय अजून गेली नाही. आम्ही म्हणत होतो, आज आबासाहेब असते तर आमच्या दोन थोतरीत लावून आम्हाला समजावलं असतं. आणि तेच आम्हाला समजलं असतं.'
छोटू खाली मान घालून म्हणाला,'मग राजे आता या सेवकास काय आज्ञा आहे?'
राजे शोकवदन होत्साते म्हणाले,'गेले दोन दिवस आम्ही 'तो' फोन येईल म्हणून येथेच फोनशेजारी बसून आहोत. बहिर्दिशेलासुद्धा गेलो नाही, न जाणो सुरवार घसरायला आणि घंटी वाजायला एकच गाठ पडायची. कानास जानवे, घोट्यात पडलेली सुरवार अशा अवतारात धावत येणे जमणार नाही. तेव्हा तू येथे फोनच्या राखणीला बस, आम्ही जरा मोकळे होऊन येतो.'

Sunday, May 18, 2014

औषधे, मॉडेल्स आणि जिंगल्स

श्रीश्री अरविंदोस्वामी - व्हिक्स, आयोडेक्स,झंडू बाम, अमृतांजन
निघता कानशिलावर बार, मस्तकी झणी शूळभार
लावा आयोडेक्स, क्षणात पुढील थपडीस तयार

अण्णा हजारे - वैद्य पाटणकर काढा
नको लिंबू नको सोडा
जळजळ थांबवी वैद्य पाटणकर काढा

एन डी तिवारी - अश्वगंधा
एकच जादू, सपाटून काम. होय, काम!

नमो - च्यवनप्राश
एकच जादू, झपाटून काम. होय, खरेखुरे काम!

म्याडम - झोल्पीडेम (अँबियन)
शांती, जो आपको आजतक नसीब नही थी

पप्पू - किट्टी छाप बँडएड
लपवा आपले ऊह! आह!! आणि आऊच!!!

सिब्बल - जमालगोटा
अपचन हारल्याचे भारी असह्य
करी जमालगोटा जरा सुसह्य

दिग्गुराजे - थर्टी प्लस
असेल जरी साठी आणि बुद्धीही नाठी,
तारेल नौका तुमची, ही डबल प्लस थर्टी

अब्दुल्ला - टम्स
अजीर्ण देतो हा काश्मिरी पुलाव,
लगाव टम्स और गॅसको भगाव

मायावती - हाथी छाप गजकर्ण मलम
नकोस खाजवू खरखरा,
हाथी छाप मलम हाच एक उतारा

उद्धटस्वामी - डिसप्रिन
भंगला सूर भंगली हृदये, रक्तदाब राज करी 
पाण्यापेक्षा रक्त दाट, डिसप्रिन त्यास मुक्त करी

उद्धवस्वामी - हवाबाण हरडे
खुशाल खा भजी वा तेलकट वडे,
नका सोडू हवेत बाण, जिभेवर नित्य हवाबाण हरडे

पवार 'धोरणवाले' - लक्स सौंदर्याचा साबण
इकडे धोरण तिकडे धरण
झाली धावपळ मुखचंद्र करुण
अशात सौंदर्य माझे टिकवितो
केवळ लक्सचा साबण

पवार 'धरणवाले' - हगीज्  (आता ८० किलोंवरच्या बालकांसाठीही उपलब्ध)
लागता नभास जोरदार कळ
तेथ न लज्जा न संक्षेप
कमरेस हगी तर होऊद्या खुशाल
धीमे धीमे वा टिप टिप.

(आम्ही सर्व प्रकारच्या उत्पादनांवर  जाहिराती, जिंगल्स बनवून देतो . संपर्क -'माल'विका आर्ट्स, पुणे, ३०)


Saturday, May 17, 2014

महानिर्वाण!

स्थळ - भूतपूर्व काँग्रेस कचेरी
वेळ - अर्थातच शोकाची
(पडदा उघडतो तेव्हा काही शुभ्र वसनांकित टोपीधारी, एक शुभ्र वस्त्रे धारण केलेला खुरटी दाढीधारी युवक, आणि दु:खाची पोझ घेऊन बसलेल्या मायलेकी, अर्थातच शुभ्र साडीधारी, असे खाली सतरंजीवर बसले आहेत. मायच्या चेहऱ्यावर दु:ख तर लेकीच्या चेहऱ्यावर भीती आहे. दाढीधारी युवकाच्या चेहऱ्यावर बालकाचे निर्व्याज खेळकर हास्य विलसते आहे. मधोमध सारवलेल्या जमिनीवर रांगोळीने हाताचे चित्र काढले आहे त्यावर एक कणकेचा दिवा तेवतो आहे. भिंतीवर बाबा, पणजोबा, आजी यांचे हार घातलेले फोटो लावले आहेत. एक भारताचा नकाशाही लावला आहे. दाढीधारी युवक हातातील सेलफोनवर क्यांडीक्रश खेळतो आहे. आणखी एक वृद्ध दिग्विजयी युवक आयफोनवर कुणा बालिकेशी चोरून फेसटाईमवर दबक्या आवाजात बोलतो आहे. एक पगडीधारी सरदार निर्विकार चेहऱ्याने शून्यात पाहत आहे.)

दाढीधारी युवक (मूठ वळून हवेत फेकतो)-येस्स्स! ममा, ममा! बघ ना आय गेव्ह अ लाईफ! क्यान आय शेअर माय अचिव्हमेंट ऑन फेसबुक?
शुभ्र साडी (खिन्न मुद्रेने) - बाळा, तूच काय, आम्ही सर्वांनीच गमावलीत आमची आयुष्यं तुला पुढे आणण्याच्या हट्टापायी. आणि त्याचे झेंडे आम्हाला न विचारताच लागले फेसबुकवर. कर बाबा काय हवं ते शेअर.
लेक (चेहऱ्यावर भीतीयुक्त काळजी) - ममा, रॉबर्ट सारखा टेक्स्ट करतोय, किती दिवस लपून राहावं लागेल ते विचारतोय. काय सांगू ममा त्याला?
शुभ्र साडी - अगं, इथं माझंच तिकिट कधी निघेल याचा भरंवसा नाही, मी त्याचं कसं सांगू? सांग, म्हणावं पाचदहा वर्षं तोंड काळं कर.
लेक(हबकून) - काय? पाचदहा वर्षं?  आधीच महिना महिना घरी येत नाही तो.  कुठं मसणात जात असतो कुणास ठाऊक. आता मीच पाच दहा वर्षं जा म्हटलं तर त्याला काय गं, बरंच आहे. उड्या मारीत जाईल तो. स्वत:चं 'विल' पण करतो करतो म्हणत केलं नाहीये. उलट माझं मात्र त्याच्या नावावर करून घेतलंयन.
दाढीधारी युवक - दीदी, केजरीअंकलनी कसं खेरअंकलना ट्विटरवर ब्लॉक केलं तसं तू त्याला ब्लॉक कर ना. मग कसा टेक्स्ट करेल?
दिग्विजयी युवक - हां हां, जानू, बस एक दो घंटे में आ जाऊंगा. बस, अब इसमें रोनेवाली कौनसी बात हो गई? मैं बोल रहा हुं ना. बस चल अब बंद करता हुं, म्याडमजी देख रही है. (लाचार हसून) ही: ही: ही:! कुछ नही म्याडम, घरवाले ऐसेही परेशान कर रहे थे. फोन सायलेंट पर रखा है अब.
मिश्रा (तुपाळ चेहऱ्याने) - म्याडमजी, आप शोक ना करें. ये हाथ फिरसे उठेगा. (गडबडून) मेरा मतलब, गिरनेवाला फिरसे नयी ताकतसे उठ जाता है. अपने देश में लोग हाथ का उपयोग दो चीजोके लिये करते है. खाने के लिये या तो धोने के लिये. कमसे कम अपना हाथ दाया हाथ है, लोगोंने धोने के लिये तो इस्तेमाल नही किया ये बहुत पॉझिटिव्ह बात हुई ना?
शुभ्र साडी (किंचित हसून) - मिश्राजी, आप भूल गये. लोग हाथ का उपयोग एक और चीज के लिये भी करते हैं, थप्पड लगाने के लिये. केजरीवाल तो सस्ते में छूट गये, एक दो बारही पडी उन्हे. हम सब को ऐसी पडी है की हम गाल महसूस भी नही कर रहे हैं.

(इतक्यात एक साधारण नव्वदीचे गृहस्थ शक्य तेवढ्या लगबगीने प्रवेश करतात. हातात पुष्पगुच्छ आणि गुढघ्याला बाशिंग आहे. सर्व जण आ वासून बाशिंग पाहतात. शरमून ते गृहस्थ गडबडीने ते काढून टाकतात. पुष्पगुच्छ म्याडमना देऊ लागतात. सर्व जण पुन्हा अविश्वासाने आणि म्याडम लालबुंद होऊन त्यांच्याकडे पाहतात. पुन्हा भानावर येऊन ते गृहस्थ शरमतात आणि गुच्छ कोपऱ्यात ठेवून देतात.)

तिवारी - म्याडमजी, जैसेही पता चला हम दौडते चले आये. हमरी सादी बहुतही अचानक तय हो गई. आपको न्यौताभी नही भेज सके. बच्चोने बहुत जिद ली थी. अब बच्चे चालीस साल के हो गये फिर भी बच्चे ही है ना. हम ठहरे उनके बापू. उनकी जिद तो हमेही पूरी करनी है. लेकिन म्याडम आपके होते हुए और 'आप' के होते हुए ये सब कैसन हुआ? जैसनही पता चला, हम हनीमून जा रहे थे, वहीसे गाडी घुमाईके सीधा इहा पहुंच गये. हनीमून तो होता रही. अगर हम चले जाते और बाद में पता चलता तो पूरा हनीमूनमें, म्याडम, हम आपही को तनमनमें रख देते.
शुभ्र साडी (दुर्लक्ष करीत) - ठीक है तिवारीजी. आप सांस ले लिजिये. तंदुरुस्ती रखें. ऐसे और भी कई हनीमून आपको निभाने हैं.
पगडीधारी सरदार (एकदम खोल आवाजात) - लोकांना असं कां करावसं वाटलं याची जरा चर्चा करूया का?
दाढीधारी युवक (आश्चर्याने किंचाळत) - ममा!! अंकल बोलले! तू काय सांगितलं होतंस मग मला की ते लहानपणापासून मुके आहेत म्हणून? खोटं खोटं सगळं ना? आता मी तुझं कध्धीच ऐकणार नाही. तू नेहमी अस्संच करतेस. दीदीला काय करायचं सांगतेस, ते अंकल मुके म्हणून त्यांच्याऐवजी तूच भाषण करतेस, मला रात्री आठनंतर टीव्ही बघू देत नाहीस, जीजूंनी मात्र काही केलेलं चालतं. मागे एकदा त्यांना मारायला काही लोक आले होते तर मी खरंखरं सांगितलं, जीजू आत पलंगाखाली लपले आहेत म्हणून, तर तू मलाच रागावलीस. नेहमी खरं बोला असं मला शाळेत शिकवतात आणि घरी तू उलटं शिकवतेस. मी आता फक्त क्यांडी क्रश खेळणार जा!
शुभ्र साडी - तू चूप बस! आधीच डोकं उठलंय.
(एकदम गलका सुरु होतो)
सरदार - पण आपण चर्चा…
लेक - ममा सांग ना, रॉबर्टचं…
तिवारी -खामखां हनीमून…
दिग्विजयी युवक - हां हां, निकलही रहा हुं… म्याडम, जरा एक जरुरी कामसे…
मिश्रा - म्याडम, आरएसएस पे डाल दे इसकी जिम्मेदारी?
शुभ्र साडी - पगला गये क्या? ये आरएसएस की जीत है. काहे की जिम्मेदारी डाल रहे… राहुल! मेल्या उठ आधी आणि प्रथम अभ्यासाला लाग! आता निदान कॉलेज तरी पुरं करा!
(सरदार खिन्नपणे भारताच्या नकाशाकडे पाहत असताना पडदा पडतो)

Friday, May 16, 2014

प्रतिक्रिया, प्रतिक्रिया!

छगन - प्रतिक्रिया कसली घेता? आं? इथे काय कुणी नागवं नाचतं आहे का? निघा इथून!
नारू राणे - आवशीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
निळू राणे - बापाशीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
नितु राणे - भैनीक xxऱ्या! तुका काय वाटला माजो वट कमी झालो?
विश्वजित कदम - हा आमच्या सॉफ्टवेअर टीमचा पराभव आहे. व्होटिंग मशिन्स फॉंल्टी निघाली, आमचा प्रोग्राम चाललाच नाही. जेव्हा माझ्या नावासमोरचं बटण दाबलं गेलं तेव्हा दोन मतं शिरोळेंना मिळत होती.
जाणता राजा - हे भाकीत आम्ही केव्हाच केले होते. तेव्हापासून आम्ही कॉंग्रेसची कास सोडून मोदीचा कासोटा धरला होता तो काय उगाच? शिवाय आमचं सुप्रिया, आपलं, महिला धोरण..
दादा(गिरी) पवार - मग? आमी काय करायचं त्याला? तुम्ही कुणाला 'उचलू' देणार नाही, आमाला धरणाच्या दिशेनं जाऊ देणार नाही, मग आता आमचा करंगळी कार्यक्रम आमी काय व्होटिंग बूथवर जाऊन करायचा का?
दिगू - आं? काय म्हणता? कधी? असं? च्यायला! अरेरे! ओ! येस, कमिंग अमृता डीअर! सॉरी हं, मी जरा घाईत आहे. अहो म्हणजे बाहेर जायच्या घाईत! तुम्ही पत्रकार म्हणजे…
केजरू - हो हो, ते सर्व ठीक आहे. पण अरे मला शून्यापेक्षा जास्त मतं मिळाली रे, ते तरी म्हणा.
एन डी तिवारी - मरुदे! सध्या मी दुसऱ्याच चिंतेत आहे. बायकोनं हनीमूनला जायचा बूट काढला आहे. मी म्हणतो मी काय करणार जाऊन? तिला म्हणालो आहे केसरी ट्रॅव्हल्सच्या टूरबरोबर तूच जाऊन ये.
पप्पू - इट्स ओके! रीपीटर तर रीपीटर. मी नेहेमीच ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा देत आलो आहे. त्यावेळी सगळे गणंगच असतात.
प्रियांका - सॉरी अंकल! तुम्ही खरंच मला वडिलांच्या ठिकाणी आहात. रॉबर्ट तर कित्ती कित्ती मानतो तुम्हाला! आज सकाळपासून तुमच्या फोटोसमोर हात जोडून उभा आहे. जावई ना तुमचा तो? प्लीज प्लीज ही प्रतिक्रिया टीव्हीवर दाखवा हो.
ममता - अहो, आत घेणार नाही असं कुठे म्हटलं होतं मी? मी म्हटलं होतं यायच्या आधी जरा सांगा, म्हणजे जरा झाडलोट करून ठेवता येईल. बरं ते काही माछबिछ खात नाहीत, निदान चमचम बनवायला दूध नासवण्या-आपलं-फाडण्यासाठी तरी वेळ मिळायला हवा ना?
मौनमोहन - म्याडम नाहीयेत म्हणून सांगतो, सतरा ठिकाणी ठिगळं लावलेली प्यांट घालायची म्हणजे कठीण असतं हो. चालण्यापेक्षा नको तिथे फाटत तर नाही ना हे बघण्यातच जास्त वेळ जातो. शुभेच्छा!
म्याडम - राहुल! घर चलो! कितनी बार कहा है पढाई पे ध्यान दिया करो. नाऊ यू आर गोइंग टू गेट अ टाईमआऊट. टीव्ही नही, एक्स बॉक्स नही कुछ नही. हां भई. क्या रिएक्शन? हमने एक्शन किया लोगोंने हमे रिएक्शन दिया.
लालकृष्ण - हुशार आहे हो तो! वादच नाही. पण आम्ही म्हणतो वडिलधाऱ्या माणसांना निदान नमस्कार तरी करा! केव्हापासून बूट काढून बसलो आहे. पावले थंड पडतात आमची.
सुषमा - हं! रात्र रात्र बसून आम्ही सबमिशन्स करायची यांची आणि वर हे पहिले आले की अभिनंदनाला पण जायचे. आमचंच नशीब! बरं, अभिनंदन आणि काय…
उद्धवस्वामी - येस्स! आता आमची इच्छा पूर्ण होणार. मोठ्या हौसेने आम्ही पूर्ण भगवा ड्रेस शिवून घेतला होता, चड्डी बनियन पण भगवी. आता आम्हाला तो घालायला मिळणार.  आणि बरं का, 'तो' फोन आम्ही स्वत: लावणार आहोत आता.
उद्धटस्वामी - प्रतिक्रिया घ्यायला आलात हे खरंच तुमचं धाडस आहे. आं? क्यामेरा दगडप्रूफ आहे? अस्सं काय? ठीक आहे मग. आता अभिनंदन. पुढील काही दिवस दगडप्रूफ प्यांटशर्टपण घालून फिरा.
अम्मा - अमने पैलेही बोला ता, अमारा भाई जितेगा. हां, तब मनमें बोला ता, लेकीन अब खुला बोलती हुं, अब की बार मोदी सरकार. अमारा सपोर्ट नई लिया तो क्या, दोसाई काने को कबीबी आ जाव!
मोदी - धन्यवाद! सरकार चालवायचं नाही, तर राष्ट्र चालवायचं आहे! तुम्ही इथे उभे का? आता कुणी कामचुकारपणा करताना दिसला तर फटके देऊ! चला निघा इथून!
जनता - नमो! नमो!
आम्ही - गड आला पण 'आम'चा शिंव्ह गेला. केजरूस्वामी पडले याचे दु:ख होते आहे. विनोदाचा मोठाच स्त्रोत आटला.

तख्त दिल्लीचे!

दिल्लीपरेंत धडक मारोन अहमदशहा अब्दालीचे तख्त फोडण्यासाठी येवढी खास तैयारी करोन बैसलो होतो.  आमचा विजय निश्चित होता. अठरापगड जातीचे बाजारबुणगे, दहा हजाराचे पायदळ, बैल, खेचर, तोपखाना, त्यावरील गोलंदाज, खास आम्ही तयार करवून घेतलेली तीरकमठाधारी पथके, आमच्या सेनापतींसाठी पंचलक्षणी अश्व, आमच्यासाठी अंबारी धारण केलेला हत्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुसज्ज आणि संपूर्ण असा मुदपाकखाना, आचारी, पाणके. आम्हांस दोनप्रहरीच्या भोजनानंतर गुजरदेशीचे पेय लागते. सध्याचे टारगट टवाळखोर त्यास गुज्जू बीयर म्हणतात. आम्हांस ते फारसे कळत नाही, पण आमच्या मते गुजरलस्सी हे समग्र पृथ्वीतलावरील पाचक, मेंदू थंड ठेवणारे आणि आम्लपित्त शमवणारे एक अप्रतिम पेय आहे. कोणत्याही मोहिमेवर गेलो तरी आम्ही या पेयाचे कुंभच्या कुंभ खेचरावर लादून नेतो. नुसत्या त्याच्या वाहनाने खेचरसुद्धा थंड होते तर आमची काय अवस्था वर्णावी. तर अशी जय्यत तयारी करोन शीघ्रगतीने मार्गक्रमण करून दिल्लीस निघालो होतो. गंगामैयाचे दर्शन घ्यावे या हेतु वाराणशीस मुक्काम पडला.

स्नान, दर्शन इत्यादी घेऊन झाल्यावर फारसे काही करण्यासारखे नव्हते. कंटाळोन गुजरी बियरचा गिलास हातात घेऊन झाडाखाली बसलो होतो. माहूत नवीन अंकुश आणायला गेला असावा. तेवढ्यात दुरून गाण्यासारखे 'बापू बोलता है' असे शब्द ऐकू आले. पाहतो तर दिगंबर जैनांची एक टोळी 'मुक्त'पणे भ्रमण करीत दिल्लीच्या दिशेने चालली होती. आमची नजर मोठ्या प्रयासाने उत्तमांगावर ठेवून आम्ही त्यांचे नाव पुसले. प्रमुख स्वामींचे नाम केजरीबापू असे कळले.दिल्लीत मोठे अराजक माजले असून त्यावर हल्ला बोलण्यासाठी आम्ही जात आहोत असे मी त्यांस सांगितले आणि जोवर परिस्थिती ठीक होत नाही तोवर स्वामींनी जाऊ नये अशी नम्र सूचना केली. त्यावर स्वामी हसले. मोरपिसाचा पंखा आमच्या मुखासमोर चवरी ढाळल्याप्रमाणे हलवून म्हणाले,'वत्सा, आम्ही दिगंबर! सर्वत्वाचा त्याग केलेले! अब्दाली आमचे काय आणखी फेडणार? नंगे से खुदा भी डरता है! उलट आम्हांस पाहून त्यालाच (म्हंजे अब्दालीला) दोन दिवस जेवणे कठीण होईल.'  आम्ही श्वास रोखून धरून आमच्या प्राणाचे रक्षण केले. सुदैवाने स्वामींनी चवरी ढाळणे थांबवले आणि पंखा पुन:श्च लज्जारक्षणार्थ समोर धरला. तेव्हा आमचीच लज्जा राखली गेली असे आम्हांस वाटले. स्वामी पूर्वी मोरपिसाच्या पंख्याऐवजी खराटा वापरीत असत. खराटा अवघड जागी टोचतो, त्यापेक्षा मोरपीस बरे पडते असे शिष्यांचे म्हणणे पडले आणि स्वामींनीही मग त्यास परवानगी दिली असे समजले. स्वामी सर्वसंगपरित्याग करून मुक्त, त्यांस कसलेही दडपण वा लज्जा असत नाही. आम्ही स्वामींस फलाहार करून जाण्याची गळ घातली. प्रन्तु स्वामींनी त्यास नकार दिला. आम्ही पुन: त्यांस वंदन केले आणि स्वामी जावयास निघाले. जाता जाता त्यांच्या शिष्यांनी मात्र तबकातील सर्व फळे स्वामींच्या नकळत हळूच झोळीत भरली. एकाने तर हसत आम्हांस डोळा मारला आणि आमची गुजरी बियरही कमंडलूत भरून घेतली. आम्हांस म्हणतो स्वामी सर्वांसमोर संकोचतात. पण नंतर हे सर्व घेतील, चिंता नसावी. आमच्या हत्तीकडे एक करुण-प्रेमळ कटाक्ष टाकून स्वामी झपाट्याने चालू लागले.

दिल्लीस पोहोचलो आणि पाहतो तो किल्याचा दरवाजा सताड उघडा दिसोन आला! किल्याच्या आत अजिबात वर्दळ नजरेस येईना. अब्दाली सैन्यासह परागंदा झाला असावा की काय अशी शंका उत्पन्न झाली. आमचे सैन्याचा थोडा विरसच जाहला. वीररस प्राप्त करोन उच्चरवात युद्धघोषणा करीत दिल्लीत प्रवेश केला खरे प्रन्तु विरुद्ध सैन्याने स्वागत करोन जेवण्याखाण्याची व्यवस्था झाल्याची वर्दी द्यावी असे झाले. प्रासादात प्रवेश केला तो समोरच दिल्लीचे तख्त! पूर्ण मोकळे. जवळ जाऊन पाहतो तो त्यावर पुष्पगुच्छ आणि येक खलिता ठेवलेला. खलिता उघडोन पाहिला. आत वंदन करोन सिंहासन आपलेच असल्याचा मजकूर आणि खाली अब्दालीची मोहोर! सिंहासनावर विराजमान झालो. समोरील द्वारातून सूर्यकिरणे थेट आमच्या पायाशी येत होती. सैन्याने जयजयकार सुरु केला होता. कोणी तरी कमलपुष्पांचा वर्षाव केला. आता फक्त सुराज्य आणि स्वराज्य!

Thursday, May 15, 2014

उच्छाव आला

आता उच्छाव जवळ आला. लय कामं पडली हायेत. उच्छावमूर्ती तर पयलेपासून तयार हाये. पन नुसती मूर्ती आसून काय उपेग? बाकीची लडतरं काय कमी हायेत का? गेला एक दोन म्हैना मंडळाचे कार्यकर्ते वर्गनी गोळा करत हिंडत होते. वर्गनीचं काय येवढं नाय म्हणा. भाऊंनी पाठवलं हाये म्हणल्यावर कोन नाय म्हणत नाय. आपन रक्कम आदीच लिहून ठिवतो. पावती निस्ती समोर फाडून हातात देयाची. त्या कोपऱ्यावरच्या मारवाड्याला तर अजाबात सोडत नाय. न्हेमी कुजके नारळ ठेवतो आन परत पन घेत नाय. त्याला बोललो, जेवढे कुजक्या नारळाचे कमावले त्यच्या निम्म्याची पावती फाड नाय तर हायच खळ्ळ खट्याक. लोक पैशे देयाला लय कचकच करतात. त्यातून आमच्या एरियातच तीन मंडळं. सर्वेजन पावत्या फाडनार. आमी भाऊंचं नाव सांगनार तर ते दादा, तात्या आन बापूंचं नाव सांगनार. आपन तर सांगून ठेवतो, तुमाला तेंना काय देयाचं त्या द्या, आपली पावती फाडली गेली पायजे. पन येक गोष्ट नक्की, विसर्जनाला आपल्या मंडळाचा गनपती तेंच्या फुडं असनार. तेची बी कामं पडली हायेत. गुलाल सांगायचा हाये. भूगाव ढोल, ताशे मंडळ बलावलं हाये. खड्डे खणून तयार हायेत. निसते बांबू रोवायचे आता. किती येळा सांगिटलं हाये, निसते खड्डे खणून सोडून देऊ नका, रातच्याला दिसत नाय पब्लिकला. पब्लीकचं सोडा, मागच्या वर्षाला आमचे कार्यकर्तेच दोनदा पाय मुरगाळून बसले व्हते.

काल बबन सांगत आला, पलीकडले मंडळवाले आफर देत हायेत. त्यांचे मा. ना. खा. ऊद्घाटन करायला येनार न्हाईत म्हने. पायजेल तेवढी वर्गनी जमली नाय म्हनून. गावी जाऊन कालव्याच्या पान्यात पाय सोडूण बसलेत. दादांना सोडलं हाये जुळवणी कराया. मंग दादा बोलले गनपतीनंतर पार्टी आपन सोता देतो, दोनी मंडळाचं येकच ऊद्घाटन करुण सायबांना भाष्णाला बोलावता येतं का पहा. दादांची पार्टी म्हंजे पयल्या धारेचा इंग्लिश माल भेटनार. आफर वाईट नाय. आयला हे मा. ना. खा. लय बेरकी. मागच्या वर्षी तात्याचं धोतार धरुण ष्टेजवर बसलं होतं. या वर्शी तात्यांचा गनपतीच बसला नाय, मग हे आमचा पायजमा धरणार. कुटून तरी ऊद्घाटनाला ष्टेजवर बसायला मिळायला पायजे.

या वर्शी आनखी येक डोकेदुखी हाये. आनखी येक मंडळ गनपती बसवत हाये. विदाउट वर्गनी म्हने. काय तर, आपलं काय तरी वेगळं. मांडवपन घालनार नाय. गनपतीची मुर्ति पन नाय, नुस्ती येक छोटी उंदराची मुर्ति ठेवनार हायेत. पन हलता देखावा हाये. उंदिर मदे मदे तुरुतुरु सोताभोतीच फिरतो. सोतावरतीच खुश होऊन मिशा चाटतो. लायटींग नाय, डॉंल्बी नाय काय नाय. पन म्हने येक जरूर - बुकं शिकलेले, चश्मावाले, बेंबीपर्येंत प्यांट घालून शर्ट आत खोचलेले कार्यकर्ते लय हायेत, आनि ते चोवीस तास आलटून पालटून नाचनार हायेत. 'बापू बोलता है' गान्यावर. कैच्या कायच गानं. पब्लीक जमवायचं तर आयटम सॉन्ग तरी घ्याचं. तेंचा असला हा नाच पघायला लय लोक येतील असा तेंचा अंदाज हाये. लोकान्ला सांगत फिरतात आमी म्हने वर्गनी घ्येतो त्याचा हिशोब देत नाय, गनपतीनंतर पार्टी करतो. पन आपल्याला ठाऊक हाय, यातले सगळे तात्यांकडे पार्टीला असतात. फुकट प्याला मिळाल्यावर कोन सोडनार. आमाला असं पन कळलं हाये की त्यातले काही लोक आमच्या मांडवासमोर उभे ऱ्हाऊन लोकान्ला तेंच्या मंडळाकडे जायला सांगनार हायेत. मंग आपन पन फिल्डिंग लावली हाये. चष्मेवाला दिसला की तेला उचलून मांडवाच्या मागे आनून नुस्ता प्यान्टचा बेल्ट काडून घेऊन सोडून द्या असं सांगिटलं हाये.  प्यांट सावरून धरू की उंदराच्या जैजैकाराला हात वर करू आसं होयाला पायजे. काय पन म्हना आपन जाऊन तेंची उच्छावमुर्ति पाहून आलो. उंदिर लयच देखना बनवला हाये. जरा हाडकुळा हाये पन ध्यान छान हाये.

आनखी येक सांगायचा मुद्धा, उद्या उच्छावानिमित्त आमचे येथे सट्टेनारावेणाची जंगि महापुजा होनार आहे. तरि सर्व्यांनी सहकूटूंब प्रसाद आनि मूर्तीच्या दर्शेनाचा लाभ घ्यावा. येक नम्र सुचना - उच्छ्वमुर्तिचे दर्शेन जरा दुरुण घ्यावे. ध्यान कडक हाये.

Monday, May 12, 2014

दिव्याखालचा अभ्यास

परीक्षा तर झाली. घरात ठीक वीज वगैरे असताना उगाच झाडू हातात घेऊन रस्त्यावरील खांबाखाली धुरळा करून मग तोच झाडून अभ्यास करणे झाले. त्यातून डोक्यात काही शिरले जरी नसले तरी चारचौघांनी थांबून "वा! अभ्यासू वृत्ती असावी तर अशी!" असे उद्गार तर काढले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एक दोन माऊल्यांनी थांबून अरेरे, बिन आईबापाचे पोर दिसते आहे आणि मायेचे छत्र नसताना, घरचे अठराविश्वे दारिद्रय असताना कसे अभ्यास करते आहे पहा असे कळवळून म्हटले होते. मग आपणही उगाच पोट खपाटीला गेल्याचा अभिनय वगैरे करून दाखवला होता. वास्तविक गणिताच्या पुस्तकाच्या कव्हरच्या आत बाबुराव अर्नाळकरांचे 'तळघरातील रहस्य' होते, ते आपण त्या माऊलीला दिसू दिले नव्हते. उगाच तिच्या प्रेमळ हृदयाला का धक्का पोचवा? त्या माऊलीने मग तिच्या घरी जाऊन पोळीभाजीचा डबा भरून आणला होता. आणि म्हणाली होती, लेकरा, मी तुझी काही सख्खी आई नव्हे, पण एवढं खा रे, इतका अभ्यास करतो आहेस, पोटाला काही आधार हवा. वास्तविक घरी तडस लागेपर्यंत जेवण झाले होते. वालाची उसळ आणि शिकरण! आमचे आवडते पदार्थ. बोट लावून दाबले होते. मातोश्री म्हणाल्यासुद्धा होत्या, "आता पुरे! श्वास घेण्यासाठी आत जागा ठेव जरा. आणि मेल्या खातोहेस तर जरा अंगालापण लागूदे! इतका कसा रे तू फाटक्या अंगाचा?" पुढचे ऐकायला नको म्हणून इथे रस्त्यावरच्या दिव्याखाली येऊन बसलो होतो. म्हटलं निवांत 'तळघरातील रहस्य' वाचावे. तर आता ही माऊली डबा घेऊन आली. आणि आणून आणून आणलंन काय तर शेपूची भाजी आणि भाकरी! खरोखर जिवावर आले होते. पण ती माता जणू भरवायलाच बसली होती. तिच्या डोळ्यातील प्रेमळ भाव सहन होईनात. मग उगाच एक तुकडा मोडला आणि त्या मातेस सांगितले, तुम्ही जा, खाईन मी नंतर. परीक्षा आहे उद्या, एवढे प्रकरण पूर्ण करतो आणि खातोच. त्यावर पाठीवरून हात फिरवून ती होय रे बाबा, शीक, मोठ्ठा हो, जातील हे पण दिवस असे सांगून गेली. त्या नजरेने आपण अस्वस्थ झालो होतो. थोडासा तिचा रागही आला. निवांत बसूही देत नाहीत ही मोठी माणसे. आपल्याबद्दल कणव वाटणे, डबा आणणे इथवर ठीक होते. पण शीक, मोठ्ठा हो हा आगाऊपणा कशाला? झालं? आता ही सदसदविवेकबुद्धी आपल्याला आतून कुरतडत राहणार आणि तळघरातील रहस्य उलगडण्याचे तसेच राहणार.

आपल्याला समोरच्या घरातल्या त्या इरसाल कार्ट्यासारखे जमले पाहिजे. आपल्याच वर्गातले ते. आपण सर्वात पहिल्या बाकावर बसतो आणि ते शेवटच्या बाकावर बसते. तरी त्याचा पहिला नंबर आणि आपण एटीकेटीच्या कृपेवर हे गूढ अजून उलगडत नाहीये. सरांकडे आपण तक्रार पण केली होती. कॉपी करून, रट्टा मारून, दिवसरात्र घोकंपट्टी करून, परीक्षा देणाऱ्यांना तुम्ही मार्क कसे काय देता? सर म्हणाले होते, अरे दगडा, तो परीक्षेला हजर तरी राहतो. आपण कुठे होतात? आणि मग सरांनी फीचीही मागणी केली होती. त्यावर मग आपण सरांना आपल्या उत्कृष्ट अभिनयकलेचे दर्शन घडवले होते. आपल्या घरची सामान्य, नव्हे अतिसामान्य परिस्थिती, आईला चार घरचा स्वयंपाक करून आणि वडिलांना घरोघरी फिरून उदबत्त्या विकून चरितार्थ करावा लागतो, बरेच वेळेस घरात थंडा फराळ होतो, विजेचे बिल न भरल्याने अंधारात चाचपडावे लागते, मग रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागतो इत्यादी गोष्टी आपण इतक्या प्रभावीपणे सांगितल्या की आपण स्वत:च क्षणभर गहिवरलो होतो. भूमिकेशी समरस झालो की आमचे आम्हालाच आवरत नाही. सर दोन मिनिटे आ वासून पाहत होते. मग भानावर येऊन त्यांनी स्वत:च्या खिशात हात घालून दहा रुपये काढून दिले होते. म्हणाले, दिसतं तसं नसतं हेच खरं. माफ कर मला, तू शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जातो आहेस याची कल्पना असती तर माझ्याकडून असं संवेदनाशून्य भाषण झाले नसते. सर आपल्या गावात नवीन आहेत म्हणून बरं. त्यांना अजून आपल्या पिताश्रींचे धंदे, आपलं, व्यवसाय माहीत नाहीत. जर त्यांना संशय आलाच तर 'तो मी नव्हेच' चा प्रवेश करून दाखवावा.

चला, परीक्षा तर झाली. सर्वांना खात्री आहे, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतर, रस्त्यातील दिव्याखाली अभ्यास केलेल्याला यश मिळणारच. सर कालच चितळ्यांकडे जाऊन पेढ्यांची आगाऊ ऑर्डर देऊन आले आहेत. आपणही आपल्यापरीने भरपूर प्रयत्न केला आहे. यावेळी प्रश्न सोडून दिले नाहीत. उत्तर माहीत असो वा नसो, मनास येईल ते ठोकून दिले आहे. एका पेपरमध्ये अर्धी उत्तरपत्रिका 'वन्दे मातरम' तर उरलेली 'अस्सलाम आलेकुम' असे लिहून ठेवले आहे. एका पेपरमध्ये तर हळूच हजाराची नोट ठेवून दिली आहे तर दुसऱ्या पेपरात रस्त्यावर अभ्यास करतानाचे छायाचित्र चिकटवून ठेवले आहे. एका पेपरात अर्ध्या प्रश्नांचे उत्तर 'मुंबईसह संयुक्त गुजरात झालाच पाहिजे', तर उर्वरित पेपर 'गुजरातसह संपूर्ण भारत झालाच पाहिजे' याने भरला आहे.  सर म्हणाले आहेत, काही काही कनवाळू परीक्षक, केवळ प्रयत्न केला याबद्दल मार्क देणारे असतात. तुझा पेपर जर अशा परीक्षकाकडे गेला तर तू पास झालाच असे समज. मग तुझे दिव्याखाली अभ्यास करायचे दिवस संपले. पुढे काय करणार आहेस मग? आपण पुढे वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायचे आहे असे सांगितले आहे. सर म्हणाले वा! समाजाने तुला काही दिलं नाही पण त्याचा कडवटपणा न बाळगता तू डॉक्टर होऊन समाजऋण फेडणार हे कौतुकास्पद आहे. ती ऋणबिण भानगड फारशी आपल्या लक्षात आली नाही तरी आपण काही तरी मोठ्ठे करणार आहोत हे लक्षात आले. हॉस्पिटल काढून डॉक्टरलोक नोकरीला ठेव, बक्कळ पैसा मिळेल असा सल्ला पिताश्रींनी दिला आहे तेवढेच कळले आहे. ते म्हणतात बेट्या, एक लक्षात ठेव, सगळे धंदे बुडीत जातील पण हॉस्पिटलवाले, हॉटेलवाले आणि चड्ड्याबनियनवाले यांना मरण नाही हो! पण मला वाटते तो सल्ला त्यांनी आपल्या धंद्याच्या फायद्यासाठी दिला आहे. का कुणास ठाऊक त्यांच्याकडे नोकरीला असलेले लोक नेहेमी आजारी पडत असतात किंवा अपघातात तरी सापडत असतात. मला स्वत:ला अर्नाळकरांच्या कथांतील धनंजय, किमानपक्षी त्यांचा इमानदार नोकर छोटू तरी व्हावे असे वाटते. असो. तूर्तास तरी आपण  'तळघरातील रहस्य' वाचावे हेच बरे.