Tuesday, May 25, 2021

कवीमन

सध्या अकाली चालू असलेला पावसाळा, कोरोनाचे संकट, तेलाचे भाव असे ज्वलंत विषय असताना मेंदूच्या प्रत्येक प्रतलावर (प्रस्तुत लेखक “मानवी मेंदूचे विलक्षण मनोव्यापार” या पुस्तकाचे लेखक आहेत. दिव्य प्रकाशन, किंमत रु. १०० मात्र.) सतत घडामोडी होत आहेत. बऱ्याच लोकांना या त्यांच्या नकळत घडत असतात. त्यांना असे काही घडून गेले हे कळतही नाही. हे लोक सामान्यत: सामान्य असतात. हे लोक समोर माधुरी दिक्षित येवो किंवा मायावती, त्यांच्या मेंदूत फारशी उलथापालथ होत नाही. कुणी तरी त्यांना सांगितले,”अहो असं फायर हायड्रंटकडे पाहिल्यासारखं काय पाहताय? साक्षात् माधुरी दीक्षित होती ती!” की ते ,”हो का? प्रत्यक्षात खूपच वेगळी दिसते हो ही! जरा काळीही आहे. काय हे मेकअपवाले कुणालाही सुंदर करतील. अगदी तुम्हालाही!” असं सांगून चालू पडतात. या लोकांना कोकिळाची कुहूकुहू झोपमोड करणारी वाटते. म्हंजे तसा काही त्रास नाही हो, पण माझ्या घड्याळातला गजर वाजायच्या आधीच यांचं सुरू होतं. पाच मिंण्टं झोप कमी मिळते. तात्पर्य यांची प्रतलं योग्य पातळीवर असतात, नॉर्मल असतात. पण सगळ्यांचंच असं नसतं. काही काही जणांच्या मेंदूत एकसमयावच्छेदेकरून अनेक मनोव्यापार चाललेले असतात. सगळ्या प्रतलांवर प्रचंड (टेक्टॉनिक) घडामोडी होत असतात. हे लोक बरेच वेळा डोकं दुखत असल्याची तक्रार करतात. स्त्रिया तर करतातच, पण तो त्यांचा स्थायीभाव (खूप विचार करण्यामुळे, बहुतांशी दुसऱ्या स्त्रीबद्दल) असावा, पण जेव्हा पुरुषही ही तक्रार करतात तेव्हा त्यांच्यातील वेगळेपण (पक्षी : मनोव्यापारातील वेगळेपण) जाणवते. हा स्वभावविशेष असलेले स्त्रीपुरुष अत्यंत संवेदनशील असतात. मी एका माणसाला “ने मजसी ने परत मातृभूमीला” हे गाणे ऐकून घळघळा रडताना पाहिले आहे. माझ्यातला संशोधक जागा होऊन मी त्याच्याशी रीतसर बोललो. त्याचे मनोव्यापार जाणून घेण्याची आवश्यकता वाटली. त्यावेळी मी पुस्तक लिहीत होतो. प्रकाशकांनी कमीत कमी १५० ग्रॅमचे पुस्तक हवे असे बजावले होते. विषय गंभीर आहे, त्याला साजेसे वजनदार लिहा अशी ताकीद त्यांनी दिली होती. १५० ग्रॅम म्हणजे किमान २०० पाने माल (प्रकाशकांचा शब्द. ते व्यवहारी आहेत. कवितेला ते मेवा म्हणतात. म्हणजे खाल्ला नाही तर कुणी मरणार नाही या अर्थी) हवा असे ते म्हणाले होते. परिशिष्ट धरले तरी पाच पाने कमी पडत होती. म्हणून मी या इसमाशी बोलण्याचे ठरवले. त्याचे अश्रू कमी झाल्यावर त्याला मी दिसलो. तो दचकला. जरा थेट समोरच बसलो असेन मी. मी जरा मागे सरकलो. आणि त्याला विचारले,”सावरकरांचे शब्द, हृदयनाथांचे संगीत काय प्रभावी आहेत नाही का? माझ्या नजरेसमोर तो मार्सेलचा समुद्रच येतो. मी तिथे गेलो नसलो तरी. तुम्हालाही असाच अनुभव असेल ना?”

त्याने डोळे नीट पुसले आणि चष्मा लावला. मला म्हणाला,”होय हो. मी भारतात जावे लागणार आहे म्हणून चिंतेत होतो आणि हे गाणे ऐकले.”
मी जरा गोंधळलो. “म्हणजे? चांगलंय की! मातृभूमीच्या प्रेमापोटी, त्या भरतभूच्या ओढीने जे प्रत्येकाला वाटतं ते या काव्यात ओतप्रोत भरलं आहे. नाही का?”
त्याने माझ्याकडे जरा चिडून पाहिले आणि म्हणाला,”माझं व्हिसा एक्स्टेन्शन रिजेक्ट झालं आहे. मला पुढच्याच आठवड्यात भारतात परत जावं लागणार आहे. त्या चिंतेत असताना या गाण्याने माझ्या हृदयावर प्रहार केले. सावरकरांचं बरं होतं.. इच्छा नसूनही त्यांना परदेशात फिरवत होते इंग्रज..” हा एक इंटरेस्टिंग मनोव्यापार होता. खरंच, भारतातच राहणारे ने परत ने मातृभूमीला असं म्हणतील का? परदेशात राहणारे नाईलाज म्हणून परत जावं लागलं तर हे गाणं म्हणतील का? या विषयावर मी चांगली पंधरा पानं लिहून पुस्तक १६० ग्रामवर नेऊन ठेवलं.
आता दुसरा गट, ज्याच्यावर मी साधारण ७५ पानं खर्चली आहेत तो गट विलक्षण आहे. सर्वसामान्यांना सामान्य वस्तू पाहून सामान्य विचार डोक्यात येतात. या गटातील लोकांना असामान्य म्हणता येणार नाही पण विलक्षण आणि विचित्र यांच्या सीमारेषेवर घुटमळणारे विचार येतात. उदाहरणार्थ, हापूस आंबा ही वस्तू घेऊ. आंबा पाहिला की सामान्य माणसांच्या मनातील अनेक प्रतलांवर विचार उत्पन्न होतात ते खालीलप्रमाणे.
प्रतल १ : कोकण, देवगड हापूस, देसाई बंधू आंबेवाले
प्रतल २ : आमरस, फोडी, मॅंगोशेक, कैरी असेल तर लोणचं
प्रतल ३ : वेड्यासारखे महाग, लेकाचे मिडलईस्टला एक्स्पोर्ट करून आम्हाला इथे कचरा देतात. १२ तले ४ लागलेले असतात. एकही हरामखोर विश्वासाचा नाही
प्रतल ४ : ओव्हररेटेड फळ आहे. आपला पायरी, माणकुराद बरा. रसही बरा येतो
प्रतल ५ : हा मूळचा भारतीय नाही म्हणे. कुणी कौतुकाची पोस्ट केली असेल तर तिथे जाऊन या माहितीची तंगडी वर करून यायला हवं. लिंक मागतील. त्यावर तुमचं संशोधन तुम्हीच करा असं सांगायचं
प्रतल ६ : चिंच
प्रतल ७ : आज आंघोळ करावी का?
प्रतल ८ : या वर्षी गणपती किती तारखेला येतोय?
तात्पर्य, सदर इसमाच्या मनोव्यापारात विकायला मुळात मालच नाही. हे लोक भरलं वांगं आणि आमरस एकाच निर्विकारपणे खातात. यातले काही जण तर भातावर आमटीऐवजी आमरस ओतून घेतला तरी लक्ष नसणारे असतात. रुक्ष, प्रोझेक. पण सगळेच असे नसतात. काही अतिसंवेदनशील, तरल, दंवणीय स्तरावरून विचार करणारे असतात. हेच कवी म्हणून ओळखले जातात (बरेच वेळा लांबूनच बोट दाखवून हा किंवा ही कवी आहे असं सांगितलं जातं) यांची खूप प्रतले एकसमयावच्छेदेकरून कार्यरत असतात. आंबा पाहिला की या लोकांच्या मनप्रतलांत येणारे विचार पुढीलप्रमाणे
प्रतल १ : मोहोर, कोकीळ, कोकण, माड, पोफळ, खाडीवरचा मदधुंद करणारा वारा
प्रतल २ : आंबा आंबा आंबा, मुरांबा, मेथांबा, कांदा, घरौंदा, पहिल्यांदा. नको, काहीच जुळत नाय्ये.
प्रतल ३ : ती पहिली भेट आठवतेय तुझी... दादरच्या त्या कुठल्याशा हाटेलात झालेली... तू मॅंगो लस्सी घेतली होतीस.. मी चहा.. मला मॅंगोशेक हवा होता पण ९० रुपये होते खिशात. पेपर नॅपकिन घेताना आपले हात एकदमच गेले आणि तुझ्या हाताचा झालेला तो पहिला स्पर्श. माझ्या वठलेल्या आंब्याला (वाचकांनी झाड असे समजावे. मनोव्यापार क्लिष्ट असतात) एकदम मोहोरच आलेला.
प्रतल ४ : विहारमध्ये मॅंगोशेक पीत बसलो असताना बाहेर उभी असलेली ती दीन करुण मुलगी.. तिच्या डोळ्यांत मला शतकांशतकांचं दु:ख दिसलं. माझ्या पोटात आंबा जातोय पण तिच्या पोटात आवंढ्याशिवाय काहीच जात नाहीय. ही विषमता का? तिलाही गारगार मॅंगोशेकचं सुख मिळावं. या जगात फार दु:ख आहे. मला ते जाणवतंय. मॅंगोशेक कडू झालाय
प्रतल ५ : तिने माझी किंमत त्यादिवशीच्या मॅंगोलस्सीइतकीच केली यांच दु:ख फार आहे. पण ऐंशी रुपये गेल्याचं दु:ख त्याहून कमी नाही. पण तिने दिलेला तो मोहोरस्पर्श.. अहाहा.. माझ्या तळहाताला झालेला. पुढे महिनाभर तळहाताला प्लास्टिकची पिशवी घालून आंघोळ केली आपण..
प्रतल ६ : आंबा शब्दाची यमकं फार बकवास आहेत. मुक्तछंद कविताच करावी.. की अजून प्रयत्न करावा? आंबा आंबा, कांदा, धंदा, मंदा, बंदा. ईईईई. धंदा काय..हे काही जुळत नाहीये. आंब्याच्या गुणांवर प्रतीकं जमवून त्यांची कविता करावी का?
प्रतल ७ : काय भंगार कविता आहे ती... घेई छंद मकरंद?? गुलकंद छान बसला असता. मकरंद म्हटलं की करवंदासारखा मकरंद देशपांडे आठवतो.
प्रतल ८ : आयुष्यातलं नातं, मुरलेलं.. मुरतं ते लोणचं.. कैरीचं लोणचं.. कैरी..आंबा..आहाहा... थांब.. हे काय सुचतंय?? आंबा... नातं... लोणचं!! व्वाह! अरे हीच ती कविता! इतक्यावेळ कुठे तुंबली होती! हां... हेच बरोबर
एक गोड नातं आपलं
जसं आंबटगोड करमठलं
बंधनाच्या फोडणीत पडलं
मोहरीच्या फेसात न्हालं
बरणीच्या घरट्यात स्थिरावलं
आंब्यात मी माझ्यात आंबा झालं
कैरी आणि देठाचं अद्वैत झालं (अश्लील नाही ना वाटणार हे? मरो!)
सगळं कसं एकरूप झालं
तवंग सुखाचा तेल तेल झालं
थोडंसं बरणीबाहेरही ओघळलं
नाही विचार करू असं कसं झालं
तुझंमाझं सुख उतू गेलं..
प्रतल ९ : व्वाह! कर! कर! साल्या विसरायच्या आत पोस्ट कर ही कविता!
प्रतल १० : मी संवेदनशीलणीय, मीच दंवणीय, मीच प्रात:स्मरणीय. अजून एक व्यायला झालीय..भावना होतेय पण कळ नाहीय..
असे हे मनोव्यापार. खूप संशोधन करून, अनेकांच्या मुलाखती घेऊन, प्रसंगी चपला तिथेच सोडून तात्काळ पलायन करून, परिश्रमपूर्वक हे पुस्तक प्रसवले आहे. गरजूंनी हे मुळातच वाचावे. कवी लोकांची हेटाळणी करू नये. ते काही मुद्दाम करत नाहीत. ती एक कंडिशन आहे. ताप आला तर तुम्ही रागावता का एखाद्याला? औषध देता आणि पडून रहायला सांगता ना? तसंच हे. दोन दगड एकमेकांजवळ पडलेले दिसले तर त्यांत नातं दिसणं ही एक मनोवस्था आहे. अशा वेळी धीर देण्याची, आणि ते दगडच आहेत हे सांगून इहलोकी परत आणण्याची जबाबदारी आपलीच असते. असो. तुम्ही हे पुस्तक वाचा. तुमच्यात आमूलाग्र बदल होईल.
-मंदार वाडेकर

जेवण झाले का?

अलिकडे जेवणाची फार चेष्टा चालू आहे असे मला वाटते. वेदांत पोटाला यज्ञाची उपमा दिली आहे तर अन्नाला त्या यज्ञात देण्याची आहुति म्हटले आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत प्रथम भोजनाची चौकशी करण्याला प्राधान्य दिले जात होते. दूतांकरवी संदेशवहन होत असे. रात्री आठनंतर भोजन झाले का ही विचारणा करण्यासाठी अनेक दूत नगरातून संदेशवहन करत फिरताना आढळत. ही पद्धत सुरक्षित नसे. क्वचित् एखाद्या दूताकडून भूर्जपत्र काढून घेऊन माहिती चोरली जात असे. मग भलभलत्या जनांकडून संदेश येऊ लागून प्राप्तकर्ती/कर्ता हैराण होत असे. ताकीद देऊनही ऐकत नसत. कसबा पेठेतील एक जुना वाडा पाडताना एक शिलालेख हाती लागला होता. कार्बन डेटिंगनुसार तो साधारण हडप्पापेक्षाही पुरातन कालातील आहे असे निष्पन्न झाले. लेखाच्या खाली

गूडभट्ट, पुणयक असे लिहिलेले आढळते. प्रथम हे नाव वाचून संशोधकांत जरा गोंधळाचे वातावरण होते. गूड हे विलायती नाव तत्कालीन भारतवर्षात कसे आले असावे याबद्दल मतभेद होते. काहींच्या मते इंग्रज हे मूलनिवासी भारतीय असून इस पूर्व १००० च्या आसपास युरोपात स्थलांतरित झाले असावेत. तर काहींच्या मते ते गूडभट्ट नसून गूढभट्ट असावे आणि निनावी संदेश पाठवण्यासाठी हे नाव धारण केले असावे. पण उत्तर प्रदेशातील श्री. रामनारायण शर्मा या संशोधकाने “काहे बवाल कर रहे हो? गुड है गुड वो. खाने का गुड” असे म्हटले आणि सगळ्याच शंका दूर झाल्या. गोऽड संदेशासाठी तसेच गोऽड नाव हवे हा साधा विचार आपल्या डोक्यात का आला नाही असे सर्वांनाच वाटले.
- भोजन किं वार्ता?
- हममम ( महिषध्वनी - सर्वसाधारण हमममम ध्वनि। स ध्वनि: महिषं भोजनपश्चात् सुखेन करोति)
- भगिनी, अहं प्रश्नं करोति। कृपय उत्तरदानं कृत्वा मम शंकानिरसन कुरु इति तीव्रेच्छा।
- आम्
- (अति आनंदे चीत्कारं करोति) साधु! साधु! मम भोजनप्रश्ने उत्तर प्राप्त:।
- (पुनश्च महिषध्वनि)
- भो पुरंध्री, भोजनादि कार्यक्रम बहु आनंददायक:।
- भोजनं भवति, प्रंतु आदि कार्यक्रम शेष:।
- (पृच्छक अति आनंदे) शेष कार्यक्रम!! कथ किम् कर्म विशेषत:?
- (महिषध्वनि)
- वच्, कृपा कृतेन।
- दूरदर्शन दीनयाचक शृंखला दर्शन कृत्वा, भूर्जपत्रसंदेश वार्तालाप, काचित् सारमेया-सखीसंबंधं गुप्त वार्तालापं एवं संभाषण एषां आदि कार्यक्रम अस्तु ।
- (नर महिषध्वनि) इदं द्वादशं रात्रप्रहर:, तस्मात् शुभ रजनी। (तव मातरम् - एषां शब्द गुप्त वचेन)
- (महिषध्वनि)
- गुडभट्ट, पुणयक
तेव्हा जेवणाकडे सर्वांनी गांभीर्याने पहावे, एकमेकांचे जेवण झाले आहे की नाही याची मानवतावादी स्तरावरून चौकशी करावी असे मला तरी वाटते.
- मंदार वाडेकर