आम्ही आजवर खूप नाटकं केली. स्टेज मिळो वा न मिळो, आम्ही थांबलो नाही. प्रेक्षक मिळो अथवा न मिळो, आम्ही कोकलत राहिलो. या बाबतीत आम्ही डोंबाऱ्याचा आदर्श ठेवला आहे. एक-दोन माकडे, हातात डमरू किंवा काहीही आवाज करणारे पात्र, आणि तोंडातून अखंड बडबड असल्यास निरुद्द्योगी भारतीयांची कमतरता नाही हे सत्य आम्हांस केव्हाच उमगले होते. शिवाय नाटकं करायला लागतंच काय? नेपथ्य, प्रॉपर्टी म्यानेजर, दिग्दर्शक, मिळाल्यास कथा, सहज परिसरात सापडले तर एक दोन नट-बोलट. इतकीच माफक अपेक्षा. चुलीवरचा झुणका करायलाही यापेक्षा जास्त सामग्री लागते. मग आम्हाला कुणी तरी सांगितले (बहुधा पुण्यात), तुमची नाटकं सुमार असतात, कथा त्याच त्या धोपटू असतात, तुमचे दिग्दर्शकाचे बेअरिंग म्हणजे सायकलच्या चाकातून निसटून घरंगळलेले बॉलबेअरिंग असते. पूर्ण नाटकभर तुमचे दिग्दर्शन बोक्यासारखे फिरते आहे असे जाणवत राहते. बोका हा मनीला पोटुशी ठेवणे हे आपले जीवनातले एकमेव कार्य करत राहून, पिल्लं झाली की त्यांना खाण्यासाठी दबा धरून असतो तसे तुमचे नाटकातील अस्तित्व जाणवत राहते. त्यात मध्येच तुम्ही स्वतःची एंट्री करून खरोखरच एखादे पिल्लू मटकावल्यासारखे सीनच्या चिंध्या करून जाता. आम्ही थक्क होऊन ऐकत होतो. मराठी बिगबॉसमध्येही इतके डायलॉग आमच्या नशिबी आले नव्हते. इथे हा पुणेकर मध्यंतरात बटाटेवडा खात, मध्येच तोंडात आलेली कोथिंबिरीची काडी लीलया वातावरणात भिरकावत आमच्या आजवरच्या जीवनाचे वडे तेलात तळून काढत होता. आम्ही अंतर्मुख झालो. थोडेसे खिन्नही झालो. खूप वर्षांनी अंतर्मुख झाल्यामुळे अंतर्मन ओळखीचे वाटले नाही. खूप वर्षांनी गावात आल्यावर कोपऱ्यावरची नेहमीची मुतारी जाऊन तिथे सुलभ शौचालय आले आहे असे दिसल्यावर जसे वाटावे तसे वाटले. पुणेकरांसाठी काय काय नाही केलं? नाट्यसम्राट काढला. नुसता काढला नाही तर पाटेकरांना घेऊन काढला. त्यावरही पुणेकर नाखूष. पाटेकरांना घेऊन काढला नाही म्हणे, नुसतंच "घेऊन" काढला आहे म्हणाले. असं वाटलं, डेढ फुट्यासारखी "एssss" अशी गर्जना करून दगड उचलावा.
पण तितक्यात महाराज घोड्यावरून आले, म्हणाले, "माझ्या मोकाट मांजरा, माझ्या लाडक्या बोक्या, आम्ही स्वराज्य मिळवलं ते हे पाहण्यासाठी?"
आम्ही दगड खाली टाकला. "बघा ना महाराज, आम्ही मन लावून काही करत आहोत तर त्यात काही तरी न्यून काढून सांगत बसतात."
महाराज उग्र मुद्रेने म्हणाले,"आम्हीही तेच म्हणतो आहोत, आम्ही स्वराज्य मिळवलं, ते तू हे असले सिनेमे काढावेस म्हणून? आता असं काय केलंस म्हणून लोकांनी काठ्या उचलल्या आहेत?"
आम्ही स्तब्ध झालो. महाराजांनी आत्ताचा आमचा नवा उद्योग पाहिला तर नसेल?
"म म महाराज, कुठे काय, हे ते आपलं असंच." आम्ही चाचरत म्हणालो.
"मांजऱ्या!" महाराज कडाडले!
आम्हाला आमच्या सुरवारीच्या मागे अचानक तीव्र अशी जाणीव झाली.
"महाराज, माफी ! माफी! कुणी चांडाळाने मला आहे मनोहर तरी हे पुस्तक वाचायला दिलं. ते वाचून.. ते वाचून..." भीतीने आमच्या तोंडातून शब्द फुटेना.
"बोल! आता थांबू नकोस"
"ते वाचून महाराज.... मला स्फूर्ती आली. स्फूर्ती आली. महाराज येक डाव माफी, माफी!" आम्ही महाराजांच्या घोडयाच्या पायावर पडलो.
"अरे बोक्या, जे जे सुंदर, जे जे उत्कट त्यावर जाऊन तंगडं वर करायची अवदसा मुळात होतेच कशी तुला?" महाराज व्यथित झालेले दिसले.
आम्हाला जरा धीर आला. बहिर्जीला आम्हाला उचलायची आज्ञा झाली नाही हे बहुधा आमच्या "मी शिवाजीराजे बोलतोय" चं पुण्यच असावं असा विचार मनात आला. "
"होय! ते तुझं पुण्यच आहे! म्हणून वाचलास यायची जाणीव ठेव. नाही तर इथून नागनाथ पार दूर नाही. तिथे पुन्हा हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रसंग आम्ही घडवून आणला असता." महाराज जरासे शांत झालेले दिसले.
तो मोका साधून आम्ही चाचरलो," महाराज, आपल्या जीवनावरही बायोपिक काढायचा विचार आत्ताच माझ्या मनात आला. आशीर्वाद असेल का?"
महाराजांनी दचकून आमच्याकडे पाहिले. प्रथम त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसले मग क्षणात त्याची जागा क्रोधाने घेतली.
"खामोश! इतके दिवस तू बैलासारखा नासधूस करत फिरतो आहेस, आम्ही दुर्लक्ष केले. वाटलं, या स्वराज्यात एखाद्या बैलालाही कलेचं स्वातंत्र्य असावं, त्याने मुक्तपणे फिरावं, डुरकावं, खुरांनी मनसोक्त माती उकरावी, एखादी तरणी गाय दिसल्यास तिच्याभवती गाणी गात पिंगा घालावा. आम्हाला वाटायचं बैल आहे, उधळणारच. पण इथे तू आमच्याच इभ्रतीला हात घालायला निघालास! खबर्दार बायोपिक काढलास तर!" महाराजांच्या त्या कडाडण्याने आम्ही थरथरलो.
महाराजांना काय वाटलं कुणास ठाऊक, मग समजावणीच्या सुरात आम्हाला म्हणाले,"म्हणजे असं बघ, माझ्या गटाण्या बोक्या, रांझ्याच्या पाटलाची सजा लक्षात ठेव. त्याला नुसतेच हातपाय होते. तुला तर शेपूट पण आहे."
हे ऐकून मग आम्ही शेपूट किंचित खाली केली.
भानावर आलो तेव्हा महाराज कुठेच नव्हते. तो पुणेकर रसिक आता चहा पीत ,"ह्यॅ:! आत्ताच्या सवाईमध्ये पोरंटोरं गातात रे. मी जातो अजून. सूर चुकवलान की बसलो तिथूनच ओरडून सांगतो. ह्यॅ! कोमल निषाद! तो कोमल निषाद नीट लावा जरा!" असं कुणाला तरी सांगत होता.
आमच्या हातातला बटाटावडा आता गार झाला होता. चहावर गलिच्छ काळपट साय आली होती. आम्ही म्हणालो,"बघा, तुमच्या नादात आमचा प्राणप्रिय असा वडा वाया गेला!". तशी तो म्हणाला,"तुमच्या भाई शिणमानं आमचं असंच केलं."
चुलीवरील झुणका करणेही याहून कठीण असते असे आता वाटू लागले आहे. पण बोका हा बोका असतो. कार्यभाग साधून झाल्यावर मनीवरच गुरगुरतो, शेपूट वर करून आपली इवलीशी लिंबे दाखवत मस्त उनाडत राहतो. आणि आम्ही बोका आहोत.