Monday, February 12, 2018

येका एनारायच्या रोजनिशीतील पान

आज पहाटे तीन वाजता उठलो. काल दोन वाजता उठलो होतो त्या तुलनेत हे बरंच असं वाटलं. बाकीचे ढाराढूर झोपले होते. टीव्ही लावावा का असा विचार करत होतो पण त्यांची झोपमोड होऊन सगळ्यांनी मला झापलं असतं. झापण्याचं तेवढं काही नाही, त्याची सवय आहे, पण बायकोही उठली असती. ते महागात पडलं असतं. चवड्यावर चालत आवाज न करता किचनमध्ये गेलो. फ्रीज उघडून पाहत उभा राहिलो. एकही मनाजोगता पदार्थ दिसेना. तेवढ्यात फ्रीजचे दारं उघडे राहिल्यामुळे त्याने ठणाणा करायला सुरुवात केली. चपळाईने तो बंद करत चडफडतच पुन्हा दिवाणखान्यात येऊन उभा राहिलो. भूक तर लागली होती. मग एक आयडिया आली. तसाच पायजमा ढगळ शर्टावर चप्पल चढवून हळूच बाहेर पडलो आणि फर्ग्युसन रस्ता धरला. वैशालीत जाऊन जे मिळेल ते हाणायचंच असं ठरवून निघालो. चार वाजता पोचलो तर काय, रस्त्यावर कुणीही नाही, आणि वैशाली तर उघडलंही नव्हतं!!!😡😡😡 $&&@@&! गडबडीत फोनही घरी राहिला होता. तसाच रस्त्यावर उभा राहिलो. च्यायला पुण्यातले लोक दुपारी झोपतात, रात्रीही झोपतात, सकाळी निवांत उठतात, मग पुण्यातले लोक फार जागरुक असतात अशी वदंता का असा विचार करू लागलो. शेवटी अशी समजूत करून देणाराही एखादा सुपीक एकारान्ती पुणेरीच असणार असा विचार करून मन शांत केलं. रस्त्याच्या कडेला काही प्लास्टिकचे कप पडले होते. कधी या लोकांना सिव्हिक सेन्स येणार आहे असं पुटपुटत ते उचलून तिथेच असलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकले. डब्यावर “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे” असे लिहिले होते. काही तरी चुकतंय असं वाटलं. या वाक्यात पूर्वी “महापौर पुणे. -हुकूमावरून” असेही शब्द असायचे. ते कुठे गेले? त्या शब्दांवाचून त्या डब्याचे सौभाग्यलेणेच पुसले गेले आहे असं वाटलं. च्यायला, पूर्वीचं पुणं राहिलं नाही. कचऱ्याचा डबा ही महापौरांची हक्काची जागा होती. महापौर गेले, त्यांचं “हुकुमावरून”ही गेलं.

विचारात गढून गेल्यामुळे पहाटेची “हरि ओम” जमात बिळातून बाहेर येऊन कधी हनुमान टेकडीकडे जाऊ लागली होती ते कळलंच नाही. बरेचसे तरुण वृद्ध मफलरमधे गुंडाळलेले होते. ते वृद्ध होते हे त्यांच्या रस्त्याच्या मधोमध बागेत बागडायला आल्यासारख्या चालण्यावरून लक्षात आलं. मी सारखा वैशालीच्या बंद दरवाजाकडे पाहत होतो. प्रयत्न केला असता तर मुक्ताबाईसारखं “ताटी उघडा हो ज्ञानेश्वरा” टाईप अभंग वगैरे रचला असता. वैशालीचे मालकही तसे बऱ्यापैकी स्थितप्रज्ञ चेहऱ्याचे आहेत. हातावर उकळतं सांबार पडलं तरी चेहऱ्यावरचे भाव बदलणार नाहीत. साधनेच्या एवढ्या उच्च कोटिला पोचणे सहजसाध्य नसते.

“काका, दोन पिशव्या द्या!”
या उद्गाराने भानावर आलो. पाहिलं तर वैशालीच्या शेजारच्या बोळातून एक तरुण रत्न बाहेर आलं होतं. NY असं लिहिलेला टीशर्ट, स्वेट पॅंट्स, अर्धेन्मीलीत डोळे अशा अवस्थेत शंभराची नोट माझ्यासमोर धरून,”काका, दोन पिशव्या द्या. चितळे!” चाललं होतं. मला काही कळेना. मग लक्षात आलं. माझा पायजमा, शर्ट आणि एकूण अवतार पाहून बहुधा याला मी दूध विकायला उभा आहे असं वाटलं असावं. मी त्याला “दूध संपलं आहे” असं सांगून आणखी पुढे पाठवला. आता पोटात मात्र कावळे ओरडायला लागले होते. दोन कारटी आली. खांद्याला थैल्या अडकवलेल्या. माझ्याकडे निरखून पाहत होती. चेहऱ्यावर भाव आंधळ्याला रस्ता पार करून देणारा. म्हणाली,”काका, आळंदीच्या पालखीची वाट पाहताय का? त्याला अजून चार पाच महिने आहेत.”. माझा चेहरा पाहून दोघे सटकले. त्यांच्या सत्कृत्याच्या वहीत नोंद झाली नाही.

एका मफलरमंडित हरिओमला थांबवून विचारलं,”अहो केव्हा उघडेल हो हे हाॅटेल?” त्या गृहस्थांनी मला दहा सेकंद नुसतं रोखून पाहिलं. मग म्हणाले,”ते काही गुप्तपणे उघडणार नाहीत. तो दरवाजा उघडला की समजायचं, आत जायला हरकत नाही.” असं म्हणून ते फुटले. त्यांचं फुटणं म्हणजे जणू काही शुभशकुनच वाटावा अशा पद्धतीने वैशालीचं दार उघडलं. मी यष्टी लागल्यावर ज्या चपळाईने खिडकीतून रुमाल टाकून सीट धरतो त्या चपळाईने आत गेलो. एकूण एक टेबल मोकळं पाहून मला गहिवरून आलं. पूर्वजन्मीची पुण्याई कामी आली असंच वाटलं. पुढे काय झालं काही कळलं नाही. त्या दोनेक मिनिटांच्या आठवणी धूसर आहेत. बैलांचा कळप खूर बडवत माती उधळत येतो आहे असा आवाज झाला आणि मी पापणी बंद करून उघडल्यावर यच्चयावत टेबलं भरून माणसांनी भरून गेलेली दिसली. 😡😡 व्हाॅट द हेक?? तीन तास बाहेर पुतळा झाला होता, आता आत आल्यावरही पुतळा?

संतापाचा कढ ओसरल्यानंतर पुन्हा टेहळणी केल्यावर एका चार जणांच्या टेबलावर एक खुर्ची रिकामी असल्याचं दिसलं. आता लाजबिज केव्हाच सुटली होती. टेबलावरच्या तिघा जणांच्या त्रासिक नजरेकडे दुर्लक्ष करत खुर्ची धरली. बसल्या बसल्या पाण्याचा ग्लास जणू माझ्या ओठावरच धरल्यासारखा समोर आला. “हं!” वेटरमहाराज कण्हले. याचा अर्थ काय गिळणार ते लवकर सांगा. “मेदू.. मेदूवडा सांबार!” माझ्या तोंडातून शब्द गळले. “आणि काॅफी” हे माझे शब्द बापुडे होऊन वारा झाले. मोजून तिसऱ्या मिनिटाला साडेतीन इंच व्यासाची खोलगट बशी दोन मेदूवडे आणि त्यांना जेमतेम भिजवेल एवढं सांबार असं पुढे आलं. आईस्क्रीमवर जशा चेरीज ठेवाव्यात तसे भोपळ्याचे तुकडे त्या वड्यावर शोभून दिसत होते. मी,”चटणी?” असं विचारल्यावर वेटरमहाशय आत गेले आणि चटणीची वाटी घेऊन आले. त्यांनी ज्या पद्धतीने ती वाटी माझ्यासमोर सरकवली ते पाहून मला वाटीबरोबर आलेले दोनतीन अदृश्य शब्दही दिसले. मग मी सगळं गेलं गा च्या गा त असं म्हणून प्रथम सांबाराचा दीर्घ वास घेतला. मन तत्काळ उडपीला जाऊन परत येताना जरासं कारवार बघून आलं. चमच्यानं एक घास तोंडात घेतला आणि आहाहाहा असा उद्गार काढला. शेजारच्या तिघांनी डोसे घेतले होते. माझ्या बाजूच्यानं पेपर डोसा घेतला होता त्याचा साधारण चार इंच डोसा माझ्या कार्यक्षेत्रात येत होता. मी गमतीनं त्याला म्हणालो,”तुमच्या झाडाची फांदी माझ्या भागात आलीय, तोडू का?” त्याला धक्का बसला असावा. मी ते वाक्य तोंडात मेदूवड्याचा जरा मोठाच घास घेऊन बोललो होतो. त्याला माझ्या मानसिक स्थैर्याविषयी संशय आला असावा. कारण त्याने चटकन डोशाचा चांगला सहा इंचाचा भाग दुमडून आपल्या अधिकारक्षेत्रात घेतला. तो डोसा मोडल्यामुळे त्याच्या पोटातील सुवर्णकांती बटाटाभाजी दिसू लागली होती. तिच्याकडे मी अनिमिष डोळ्यांनी पहात राहिलो. मग भानावर येऊन मेदूवड्यावर लक्ष केंद्रित केलं. आता वड्यांनी सांबार पार शोषून घेतले होते. असे सांबाराने संपृक्त असे ते वडे माझं आयुष्य समृद्ध करत होते. समाधी लागण्याचाच अनुभव होता तो. काऊंटरवरून मालक निर्विकारपणे पाहत होते. त्यांच्या डोक्यावर तिरुपतीचा फोटो लावलेला होता. त्याच्यासमोर उदबत्ती. ताजी पूजा केलेली. ज्याने ज्याने अशा वातावरणात डोसा, मेदूवडा इडली सांबार इत्यादि दैवी पदार्थ खाल्ले आहेत ते स्वर्ग वगैरे फाट्यावर मारतात.

फाटकन समोर बिल पडले. मी बिल घेऊन उठतोय न उठतोय तेवढ्यात एक माझ्या खुर्चीवर बसलाही. समाधी उतरली. पण दैवी तेज घेऊन बाहेर पडलो. जेट लॅगचा प्रभाव उतरला होता. ओशो उत्तरेकडे जन्माला आले म्हणून. दक्षिणेत जन्मले असते तर नक्की “सांभारातून समाधीकडे” लिहिलं असतं.

Saturday, February 10, 2018

गैरसमजायण

शूर्पणखा ही रावणाची बहीण ही अत्यंत विनोदी म्हणून किमान लंकेत तरी प्रसिद्ध होती. दिसायला शंभर राक्षसिणींत उठून दिसणारी. ती दरबारात आली की राक्षसिणीच काय राक्षसही अदबीने खाली बसत म्हणून ती उठून दिसे. तिचे लांबसडक नाक हा लंकेच्या प्रतिष्ठेचा, अभिमानाचा विषय होता. कुठेही प्रथम तिच्या नाकाचा प्रवेश होत असे आणि मग मागून शूर्पणखा अवतीर्ण होत असे. नाकाप्रमाणे तिचे दातही अद्भुत असे होते. ती नेहमी हसत असल्याने ते पांढरेशुभ्र तीक्ष्ण दात नेहमीच ओठांच्या बाहेर असत. तीक्ष्ण मोठे दात हे राक्षसी सौंदर्याचे परिमाण होते. बरेच वेळा नाकाचे टोक पुढे आहे की सुळे यांवर राक्षसांच्यात पैजा लागत तर राक्षशिणींच्या ,”शंभर टक्के फेक” यावर पैजा लागत. लंकेची ब्रॅंड ॲंबेसेडर म्हणूनही तिची नियुक्ती झाली होती. कुणी तिच्या तोंडाला लागत नसत. तसा प्रयत्न काही जणांनी केला होता. पण प्रथम त्यांची गाठ नाक आणि सुळ्यांशी पडून ते मृत्युमुखी पडले होते. नाक प्रथम की सुळे यात वाद असल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण घुसमटून की दात घुसून यावर दुमत होते. स्वत: शूर्पणखेने ते मृत्यू इतर सर्व गोष्टींप्रमाणे हसण्यावारी नेले होते. लंकेतील काही तज्ज्ञांचे मत त्यांचा मृत्यू धसक्यामुळे झाला असावा असे होते. शूर्पणखेचे सामान्य हसणे अंदाजे १२० डेसिबलपर्यंत असल्यामुळे अशक्त प्रकृतीच्या राक्षसांचा धसक्याने मृत्यू होऊ शकतो असे या तज्ज्ञांचे मत होते. कुठल्याही युद्धप्रसंगी शिष्टाई करण्यासाठी प्रथम तिलाच पाठवले जात असे. मागे इंद्राबरोबर झालेल्या युद्धात इंद्राचा पराभव युद्ध न घडताच झाला होता. विनोदाने युद्धे टळतात असे रावणाचे मत होते. रावणाने काही महिने सेवाग्राम येथे व्यतीत केले होते. अहिंसेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. मग विनोद करावा म्हणून शूर्पणखा युद्धस्थलावर गेली असता प्रथम तिच्या भारदस्त सुळ्यांनी ऐरावत पाघळला तर तिच्या हास्याने इंद्राचे वज्र त्याच्या हातातच वाकले. वाकलेले वज्र हातात घेऊन खांदे पाडून उभा असलेला इंद्र पाहून शूर्पणखाच काय पुष्पवर्षावाचा सराव करून आलेले देवही हसू लागले. ते पाहून आपला कदाचित विजय झाला असावा अशी शंका येऊन राक्षसही हसू लागले. इंद्रालाही आपण “चला हवा येऊ द्या”च्या सेटवर आलो की काय असे वाटून तोही हसू लागला. अशा प्रकारे ते युद्ध टळले आणि इंद्र परत आपल्या यक्ष अप्सरादि दैनंदिन कामात गुंतून गेला.

अशा प्रकारे शूर्पणखा हे लंकेचे हसरे आणि लाडके व्यक्तिमत्व होते. हा हसरे व्यक्तिमत्व असण्याचा विक्रम पुढे अनेक वर्षांनी सुधीर गाडगीळ यांनी मोडला. पण ते नुसतेच हसरे होते. पुण्यात राहिल्यामुळे इच्छा असूनही स्मितहास्यापलीकडे जाणे त्यांना शिकता आले नाही. असो. तर, शूर्पणखेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असल्याने तिचे हसणेही आंतरराष्ट्रीय झाले होते. परंतु पुढे इतिहासात काळी घटना म्हणून ओळखले जाण्यासारखे काहीतरी घडले. भारतात कुठल्याही गोष्टीचा कसा उदोउदो करतात त्याचे हे उदाहरणच. वास्तविक लंका आणि भारत यांचे संबंध व्यापारी. लंकेने राक्षसबळ पुरवावे, त्याबदली भारताने सांबार बनवण्याचे तंत्रज्ञान पुरवावे, लंकेने दुर्मिळ असे पाण्यापेक्षा हलके बांधकाम साहित्य पुरवावे, भारताने ते वापरून समुद्रमार्ग बांधून द्यावा, असे चालायचे. रावण स्वत: आपले प्रायव्हेट जेट वापरून बिझनेस डील्स करण्यासाठी भारतात ये जा करीत असे. फ्रीक्वेंट फ्लायर प्रोग्राम मध्ये प्लॅटिनम लेव्हलला पोचल्यामुळे सगळीकडे प्राधान्याने प्रवेश मिळण्याची त्याला सवय झाली होती. नुकतेच त्याने लंकेच्या टूरिझमचा विकास करण्याचे उद्दिष्ट बाळगले होते. ऋषीमुनी निसर्गरम्य ठिकाणे ध्यानधारणेसाठी पसंत करतात हे त्याने पाहिले होते. लंकेत ही जमात नावालाही नव्हती. जिथे लोक घरे बांधण्यासाठीही सोन्याच्या विटा वापरत तिथे त्यांना निसर्गसौंदर्य वगैरेविषयी प्रेम असणे जरा अवघडच होते. म्हणून त्याने जिथे जिथे ऋषीमुनी असतील तेथे आपले सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायला सुरुवात केली. ऋषीमुनींना त्या आगाऊ सॉलिसीटेशनचा त्रास होऊ लागला. त्यांनी तत्कालीन राज्यकर्ते श्री. दशरथ यांच्याकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. त्यांनी संरक्षण, नीतिमत्ता, अर्थकारण, राजकारण, समाजकारण यांत निपुण असलेल्या आपल्या पुत्रास, रामास त्यांच्या संरक्षणासाठी पाठवले. रामाने या सेल्सच्या लोकांकडून पॅम्फ्लेट्स घेऊन त्यांच्यासमोरच त्यांचे बाण करून उडवण्यास सुरुवात केली. ते कोणत्याही वेषात आले तरी राम त्यांना ओळखत असे. शेवटी तर रामाने "नो सॉलिसीटेशन, ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्यूटेड" अशा पाट्याच लावल्या.रावणाकडे तक्रारी गेल्या. तो विचार करू लागला. इकडे राम सहकुटुंबच वनात येऊन राहिला होता. पाच दिवस वनात काम करून वीकेंडला अयोध्याला जाणे नेहमी परवडण्यासारखे नव्हते. जाण्यायेण्यात वेळही जात असे. रावणाने मग स्वतःच येऊन मार्केटिंग पिच द्यायचे ठरवले. आपण राजा आहोत म्हणून कुणी भारावून जाऊन त्यांना नको त्या कल्पना येऊ नयेत म्हणून त्याने स्थानिक लोक करतात तसा साधा साधूचा वेष धारण केला होता. विमान काही अंतरावर उतरवून तो रामाच्या कुटीकडे गेला. राम घरात नव्हते. लक्ष्मण होते. पण लक्ष्मण यांच्याकडे ठराविक रकमेच्या बाहेर जाऊन डील साईन करण्याची ऑथोरिटी नसल्यामुळे डील झाले नाही. ते रामाला विचारून येतो असे सांगून गेले. त्यांची वाट पाहून रावणही शेवटी जातो असे म्हणून निघाला. सीतामाईला विमानाचे फार कुतूहल होते. त्या विमान आतून कसे दिसते ते पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेवढ्यात रावण आला म्हणून त्या पट्कन तिथेच लपल्या. तर अचानक विमान सुरू होऊन वरही गेले. रावणाला काहीच कल्पना नव्हती.

इकडे गोंधळ झाला. सीतेचे हरण झाले, सीतेचे हरण झाले असे ऋषीमुनी ओरडू लागले. आपण हरण शोधायला काय जातो, इकडे पत्नीचेच हरण झाले असा विचार घेऊन राम अतिशय विमनस्क अवस्थेत बसले होते. शेवटी त्यांनी ठरवले, रावणाला या कृत्याचा धडा शिकवायचाच. वडिलांची सेना अयोध्येत. ती मागवणे कठीण. पण उपजत संघटनकौशल्य असल्यामुळे आणि लोकांना रामाबद्दल अतिशय प्रेम असल्याने तिथे दंडकारण्यातच सेना उभी राहिली. इकडे रावणाला विमान उतरवल्यावर विमानात सीताही असल्याचे कळले. वास्तविक त्याच विमानातून तिला परत पाठवता आले असते. पण इथे रावणाने घोडचूक केली आणि पुढे रामायण घडले. रावणाने अशोकवन नावाची एक नवीन स्कीम सुरु केली होती. त्या सोसायटीचे उद्यान भव्य आणि रम्य असे होते. कदाचित ते दाखवले तर सीतामाई रामाकडे हट्ट करून अशोकवनात प्रॉपर्टी घ्यायला लावेल असा विचार करून त्याने सीतामाईला अशोकवनात नेले. आणि त्याला अनेक कामे असल्याने तुम्हीच पहा आणि मला सांगा असे म्हणून तो निघून गेला. त्याने उपस्थित राक्षसांना काहीच इंस्ट्रक्शन्स दिल्या नसल्यामुळे तेही एकमेकांकडे पाहत उभे राहिले आणि पाच वाजल्यानंतर आपापल्या घरी निघून गेले. सीता एकटीच वनात राहिली.

इकडे राम आणि लक्ष्मण आपल्यावर चालून येत आहेत आणि युद्ध अटळ असल्याची बातमी वेगाने लंकेत आली. रावणाला हा धक्काच होता. धक्क्यातून सावरल्यावर तो विचार करू लागला. गैरसमजातून हे घडले असल्याने, तसे रामाला सांगितल्यास युद्ध टळेल असे त्याला वाटले. आणि इथेच त्याला शूर्पणखेची आठवण आली. तिच्या खेळकर विनोदी स्वभावाने राम राग विसरतील आणि युद्ध टळेल असा त्याचा आडाखा होता. त्याने शूर्पणखेला पाचारण केले. ती नेहमीप्रमाणेच हसत हसतच आली. रावण तिला म्हणाला,"हे भगिनी, आता लंकेला तुझाच आधार!". ती म्हणाली,"दादा असे झाले तरी काय?" मग रावणाने तिला सगळा प्रकार सांगितला. तशी ती जोरजोरात हसू लागली. काही केल्या ते हसू तिला आवरेना. रावण मग जरासा चिडला. "अगे भगिनी! प्रसंग काय तू अशी हसतेस काय? इथे ब्रम्हास्त्र माझ्या पार्श्वभागी येऊन टेकले आहे. तू तिथे जाऊन चार पाच विनोद सांगावेस, आणि वातावरण निवळले की गैरसमज दूर करावास असे मला वाटते." त्यावर ती म्हणाली,"दादा सॉरी, मला खरंच हसू आवरत नाही रे! काही तरी उपाय करून हे कारण नसताना आलेले हसू घालवता आले पाहिजे." त्यावर रावण म्हणाला,"चिंता करू नकोस. मी भारतातून काही कवींचे कवितासंग्रह आणले आहेत. दिवसाला एक कविता वाचल्यास हसू हळूहळू कमी होऊन सहा महिन्यात पूर्णपणे जाईल असे मला सांगण्यात आले आहे."

रावणाचे ऐकून शूर्पणखा राम जेथे वास्तव्यास होता तेथे पोहोचली. रामाने तिचे स्वागतही केले. शूर्पणखेने,"एक विनोद सांगू  का?" असे रामास विचारले. "टवाळा आवडे विनोद" अशी रामाची विचारसरणी असल्याने त्याला ते आवडले नाही. तो गंभीरपणे तिच्याकडे पाहत राहिला. शूर्पणखेला कसलाही पोच नसल्याने तिने विनोद सांगायला सुरुवातही केली होती. तिने "एकदा रामभाऊ आपल्या पत्नीस म्हणाले, अगं माझे घड्याळ बंद पडले आहे. त्यावर रामभाऊंची पत्नी त्यांस म्हणाली, जीवनातली ही घडी अशीच राहू दे." या प्रकारचा एक भिकार विनोद सांगितला. आणि तिला स्वत:लाच हसू न आवरून ती भीषण हास्य करू लागली. लक्ष्मणाला वाटले तिने मुद्दाम विनोदात "रामभाऊ" आणले आहेत. रामाला वाटले तिने मुद्दाम विनोदात पत्नीला आणले आहे. तरीही राम आपल्या स्वभावानुसार चिडला नाही, पण लक्ष्मण मात्र कृद्ध होऊन ताडदिशी उभा राहिला. इकडे शूर्पणखा हसतच सुटली होती. रामाच्या कानठळ्या बसू लागल्या होत्या. हास्य १४० डेसिबलपर्यंत गेले होते. ते कसे थांबवायचे हे सुचत नव्हते. लक्ष्मण तिला काही तरी बोलणार एवढ्यात रामाने त्याला थांबवले आणि म्हणाला,"लक्ष्मणा, हसू दे तिला. हिला शाप आहे आधीचा. आता मीच तिला उ:शाप देतो. कलियुगात हिचा पुनर्जन्म होऊन ही मानव म्हणून उदयास येणार आहे आपल्या हास्याने स्वतःचे हसू करून घेणार आहे. मीही मग तिथे उपस्थित राहून या आजच्या घटनेची आठवण करून देणार आहे. आणि ती आठवण करून दिली की तिचे हे अस्थानी हास्य कायमचे बंद होऊन योग्य त्या ठिकाणी हसण्याची अक्कल तिच्या ठायी उत्पन्न होणार आहे." हे शब्द ऐकताच शूर्पणखेला वृश्चिकदंश झाल्याप्रमाणे वाटले, तिचे नाक लाल लाल झाले, डोळे विस्फारले. क्रोधित होऊन ती उद्गारली,"अपमान! घोर अपमान! एवढा उच्च प्रतीचा विनोद सांगितल्यावरही त्याकडे टोटल दुर्लक्ष! आता युद्ध होणार ! राक्षसी असले म्हणून काय झाले , मी स्त्री आहे. स्त्रीचा अपमान! संपूर्ण स्त्रीत्वाचा अपमान! आता दादालाच सांगते! त्याला दहा दहा तोंडं आहेत म्हटलं! आता तो जे बोलेल ते ऐकावं लागेल!" असे म्हणून ती तरातरा निघून गेली.

रामाने स्मितहास्य केले आणि लक्ष्मणाला म्हणाला,"हे गैरसमजायन तर आहेच, पण यातूनच पुढे रामायण घडणार आहे." यावर लक्ष्मण फक्त,"जशी आपली आज्ञा!" एवढेच म्हणाला.