Sunday, September 24, 2017

लेक्चर आणि बौद्धिक

लेक्चर आणि मी यांचं नातं परस्पर आदरावर टिकून आहे. मी फारसा कधी त्याच्या वाटेला गेलो नाही आणि त्यानंही कधी माझी वैचारिक पिसं उपटली नाहीत. माझी वैचारिक पिसं मोराप्रमाणे आहेत. पिसारा छान येतो फुलून, पण बूड उघडं पडतं. पण ते केवळ मलाच माहीत असतं. त्यामुळे मोराप्रमाणे मीही समोरच्याला मोहऱ्यावर ठेवतो. तर, काय सांगत होतो... हां, ते लेक्चर प्रकर्ण. कॉलेजात फक्त काय ते एक खांडेकर सर होते मला समजून घेणारे. तेवढे एकच सर तासाला झोपू द्यायचे. स्वभावच प्रेमळ त्यांचा. त्यांचा तो संथ एकसुरी आवाज अंगाईगीताप्रमाणे वाटे. रात्री पत्र्यावर पावसाची तडतड ऐकताना कशी छान झोप लागायची ना, तश्शीच अनुभूती सरांच्या लेक्चरला यायची. माझं डोकं ही तसं पत्र्यासारखंच आहे म्हणा. ऊन पाऊस थंडी काही काही मेंदूपर्यंत पोचू देत नाही. लेक्चर तर दूरची गोष्ट. नोट्स वगैरे घ्यायचा प्रश्नच नव्हता. काही माहीत नसेल तर पास होण्याची शक्यता जास्त असण्याचा विषय ते शिकवीत. बीमवर वजन ठेवल्यावर तो वाकतो आणि त्याच्या बुडाला तणाव उत्पन्न होतो हे कळायला पंचेचाळीस मिनिटांच्या गुंजारवाची गरज नव्हती. ते ज्ञान मी इयत्ता चौथीतच ओणवं राहताना मिळवलं होतं. पाठ आणि कंबर बहिर्वक्र झाल्यावर कुठे तणाव उत्पन्न होतो हे तिथेच पक्कं झालं होतं.

मी पूर्वजन्मी (तो असलाच तर) बरीच बारीकसारीक पापे केली असावीत. कारण हे मास्तर माझ्या राशीला पूर्वीच आले होते. संघाच्या शिबिरात बौद्धिक नावाचा जो भीषण प्रकार चालतो त्यात हे सर कायावाचामने सहभागी होत. "अरे, मोजून पाचव्या वाक्याला झोपवतात अशी संघात त्यांची ख्याती आहे, काय समजलास!" असे आमचे प्रिय मित्रवर्य मोरेश्वर ऊर्फ मोरू याने शिबिर सुरू व्हायला एक दिवस असताना सांगितले होते. मी जावे की नाही असा विचार करत असताना विभागाचे "पूर्णवेळ" घरी आले आणि आमच्या तीर्थरूपांकडून मी शिबिराला जाईन याचे वचन घेऊन गेले. मोऱ्याही काही सुटला नव्हता. ते त्याच्याही घरी गेले असणार. नंतर त्याला शिबिरात एवढेसे तोंड करून फिरताना पाहिले आणि मी दात काढले. त्यावर तो प्रचंड रागावला होता. पण या संकटकाळात मीही असणार आहे या विचाराने त्याने तो राग बुडवून टाकला होता. त्याने त्याच्या स्वभावाला न शोभणारे छद्मी स्मित केले होते. त्याने पूर्वी एक शिबिर केले होते. लेकाच्याला काही तरी माहीत आहे, पण सांगत नाहीये हे मला जाणवलं होतं. एरवी जिवाला जीव देण्याच्या गप्पा करणारा मोरू इथे माझ्यापासून काहीतरी लपवत होता. मग शिबिराच्या विविध कार्यक्रमांत मी ते विसरून गेलो. वेळापत्रकात दीपनिर्वाण नावाचा एक आकर्षक शब्द होता. त्या कार्यक्रमाकडे लक्ष ठेवून मी होतो. त्याच्या आधीच्या शब्दाकडे माझे दुर्लक्ष झाले होते. रात्रीच्या जेवणानंतर बौद्धिक ठेवावे ही सूचना संघातील ज्या कुणी केली असेल तो मनुष्य मानवजातीच्या मानसिक सुखाच्या विरोधात असावा एवढेच मी म्हणतो. जेवणानंतर चला, आता झोपूया असे म्हणून मी राहुटीकडे कूच करणार तेवढ्यात आमच्या सायंशाखेच्या मुख्य शिक्षकांनी "थांबा! जाता कुठे! ते दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत" अशा थाटात आम्हाला बौद्धिकाच्या दिशेने हाकलले. त्या निष्पाप कळपात मोरूही आला होता. अग्रेसर अशी आज्ञा ऐकल्यावर लेकाच्याने मला पुढे ढकलून आपण मागे राहिला होता. मी गाफील होतो.  उपविश होता होता समोरून खांडेकर सर अवतीर्ण झाले. मोरू माझ्या मागे बसला होता. त्याने सांगितल्याप्रमाणे खरोखरच मोजून पाचव्या वाक्याला त्याचे डोके माझ्या पाठीवर टेकल्याचे जाणवले होते. माझ्या समोर मात्र कळिकाळाची निर्वात पोकळी आणि त्यात अंगठ्यावरसुद्धा केस उगवलेली सरांची पावले. "आता कोठे धावे मन, तुझे चरण...." या पंक्तिंचा अनुभव हा असा यावा याचे मला वाईट वाटले होते. मी जागा झालो तेव्हा राष्ट्र संकल्पना, त्याचे पुनर्निर्माण संपले होते. तंबूत निजानीज झाली होती. काही वेळापूर्वीच राष्ट्रीय पुनर्निर्माणाची जबाबदारी खांद्यावर दिले गेलेले स्वयंसेवक, प्रवाशाने गाठोडे बाजूला ठेवून अंमळ आडवे व्हावे तसे दमून झोपले होते. विषय घनगंभीर होता, पुनर्निर्माणाचे ओझे गंभीर होते, त्याला तेवढ्याच घनगंभीर विश्रांतीची गरज होती.

तात्पर्य, भाषण देऊन विरोध संपवणे, विरोधकांना नकोसे करून सोडणे ही कला आहे. ते संघाचे कुरण. तिथे बाकीचे कुणी चरू नये. नाही म्हणायला आतडी पिळवटून बोलणारे लाल बावटे आणि काही समाजवादी त्याला अपवाद. पण त्यांचं भाषण ऐकायला समोर बसलेली मंडळी आधीच "टाकून" आलेली. "मायला, काय बोंबलतंय कुणाला म्हाईत, मोर्चा कधी आन कुटं ते सांगा" या टायपातली.  आणि दुसरीकडे आपली प्रिय काँग्रेस पार्टी. बौद्धिक, अभ्यास आणि भाषण यापैकी काहीही असण्याची गरज नसलेली. बाईंनी आणि त्यांच्या घराण्यातील कुणीही व्यासपीठावर उभे राहून काहीही म्हटले तरी टाळ्या वाजवणारी.  "मान्नीय" हा शब्द उच्चारून मग स्टेजवर बसलेल्या तीस चाळीस जणांची नावं घेण्यातच भाषण संपायचं. मुद्द्याला कुठे हातच घालायचा नाही. मुळात मुद्दाच नसायचा काही. सगळ्यांचेच धंदे रात्रीचे. दिवसा वेळ भरपूर म्हणून सभा वगैरे करायच्या. निवडणूक असेल तर क्वार्टर आणि गांधीबाबा यांचं दर्शन होईल या आशेनं जायचं. मोठमोठ्या गप्पा न करता पोटापाण्याची सोय करणारा हा एकमेव पक्ष. म्हणून तर अजून लोक आशेवर आहेत. केव्हा हा पक्ष सत्तेवर येतोय आणि आम्ही गूळ कुजवायला टाकतो असं झालं आहे काही लोकांना. जुगार, सट्टा, मटका, हातभट्टी, स्मगलिंग, साठेबाजी या क्षेत्रात प्रचंड प्रगती केलेले आज याच आशेवर आहेत. पण काय दैव आहे पहा, या कावळ्यांतूनच, हंस जरी नसला तरी, ढोक म्हणता येईल असा एक पक्षी आज बर्कलेसारख्या विद्यापीठात भाषण देऊन आला. या भाषणात मला अजिबात झोप आली नाही. निखळ करमणूकीचा आनंद देऊन गेलं हे भाषण. "आज मी फक्त पंधरावीस मिनिटेच बोलणार आहे" या वाक्यानंच मला जिंकलं. अंदमानचे मासे आणि आदिवासी ही कथा तर विलक्षण होती. मी आता अंदमानला जायचा निश्चय केला आहे. लेक्चर असावं तर असं. उगाच राष्ट्रीय राष्ट्रीय म्हणत लोकांना झोपायला भाग पडू नये.

Tuesday, September 12, 2017

प्रेमाचे भाषांतर


मटाच्या या भाषांतराच्या मी तर प्रेमात पडलोय. पण कथेत काहीतरी कमी पडतंय असं वाटत होतं. त्या पूर्णत्वासाठी पुढील खटाटोप...

अगदी फुटलेल्या पहाटे फोनची घंटा वाजली. या लोकांना आयुष्य नाही बहुतेक. शाप देत मी फोनला उत्तर दिले.
"हो? कोण आहे ते?"
"तर्क कर बघू?" रेषेच्या दुसऱ्या टोकाला स्त्री होती.
तोच तो चूक न करण्याजोगा आवाज.
दोन हजार सालाच्या पूर्व हिवाळी सत्रात आम्ही भेटलो होतो. भारतातून तो फोन आला आणि मी जवळ जवळ अत्यानंदाच्या अवस्थेत गेलो होतो. तिची भव्य, चमकदार अशी छबी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली.
"भपकेबाज मनुष्या, मला विमानतळावर उचलायला येशील ना?" तिने विचारले होते.
"नक्कीच येईन. तुझ्या उड्डाणाचा सविस्तर तपशील कळव. मी दिवस मोजतोय!" मी.
आणि मग तो दिवस उजाडला होता. एखाद्या निष्णात नमुन्याप्रमाणे चालत ती फाटकातून बाहेर आली होती. तीच ती राजकन्येची कृपा तिच्या प्रत्येक हालचालीत होती. मोटारीच्या मुख्य दिव्यांच्या प्रकाशझोतात अचानक आलेल्या हरणाप्रमाणे मी थिजून तिच्याकडे पाहत राहिलो होतो.
"अभिवादन दुष्टा!" तिच्या खेळमय आवाजाने मी भानावर आलो.
"ए! तिथे!" मी बरळलो.
"ए माझ्या अर्भका! मी तुला कित्ती कित्ती चुकत आलीय माझ्या जुन्या अंड्या!" आठ आण्याच्या नाण्याने नारळ वाजवून पहावा तसे तिने माझ्या डोक्यावर बोटांची हाडे आपटून टकटक केले.
ती पूर्वीपेक्षा कृश दिसत होती. बरीचशी चतुर. तिची ती देखणी मान आणखीच डावीकडे झुकली होती.
"जुन्या मळक्या अक्करमाश्या, तू अजून बदलला नाहीस. आसक्त नजरेनं बघणं बंद कर!"
"जुन्या सवयी मरायला कठीणच.." असं मी डोकं चोळत म्हणालो. तिने मंद अस्फुट स्मित केले.
गाडीत बसल्यावर ती म्हणाली,"तू कसं काय करतोयस माझ्या प्रियकरा? असं दिसतंय की बरं करतोयस".
मी हुंकार भरत म्हणालो,"बरं करतोय मी. लोंबतो आहे आत तिथे.."
तिने ऐकू येईल इतक्या क्षमतेचा उसासा सोडला. काही क्षण मग गरोदर शांततेत गेले. गाडीने हमरस्त्यावर एंट्री घेतली होती. मग तिने खांदे उडवले आणि म्हणाली,"पिळू दे ते! तू सांग, सध्या काय वाचनात आहे?"
मी गारठलो. डावीकडे झुकून चालता चालता मी नकळत उजवीकडे कलंडलो होतो. अलाईनमेंट गेलेल्या जुन्या मालवाहू ट्रकप्रमाणे.
"सध्या तरी हनुमान फाॅर्टीजशिवाय काही वाचन होत नाही मधा!"
"काय!!? माझा रक्ताळलेला पाय!" ती किंचाळली. मी घाबरून गाडी सर्वात उजवीकडील कमी वेगाच्या आळीत घातली.
"अरे, जमिनीखालील नोंदी, जनावरांचा मळा, गोठा कार्यक्रमावरील टीका - असल्या साहित्यावर वाढलो आपण! तू तुझ्या मनाबाहेर आहेस का?!"
"वस्तू बदलतात.." मी म्हणालो
"बैलाची विष्ठा!" ती म्हणाली.
"तुला माहीत नाही. उशिरात मी बऱ्याच मधून गेलो आहे." मी.
"तू जखमी दिसतोस. अरेरे, मी दु:खी आहे." ती.
"ते आता बरोबर आहे. तुला दु:ख जाणवून घ्यायला नको खरंच."
"भांडवलशाहीने तुझ्यावर चांगले उपचार केलेले दिसताहेत". ती.
"प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो. तू जर तुझी बुद्धिमत्ता बरोबर वापरली असतीस तर आज किमान आघाडी सरकारमध्ये मंत्र्याची सचिव तरी झाली असतीस." मी.
"किती कायम ठशाच्या ठोकळ्याप्रमाणे विचार तुझे! उत्तम चालणाऱ्या गिरणीप्रमाणे." ती म्हणाली.
आता आम्ही हमरस्त्यावरून डिसएंट्री केली होती.
निम्नशहरातील इमारतीच्या शेवटच्या माळ्यावरील माझ्या सदनिकेतून शहराची आकाशरेषा न्याहाळत आम्ही रात्रीचे जेवण घेतले. इटालियन भात, काळे आॅलिव्ह असलेले सलाद, आॅलिव्ह तेलात तळलेले डुक्कर किंवा तत्सम मांसाचे तुकडे, या सर्वांना मानार्थ अशी तांबडी वारुणी असा मराठमोळा बेत होता.
"हे असं तेलश्रीमंत भोजन बरं नाही.." तळलेल्या मांसाचा सुंदर छोटा तुकडा चघळत ती म्हणाली.
"तुला पूर्वी किती निरोगी भूक असायची!" मी म्हणालो.
"देशातील बहुसंख्य नागरिक एक वेळच्या जेवणासाठी टाचा घासत असताना आपण असं पाचसहा ओघांचं दुपारचं अथवा रात्रीचं किंवा खूप उशिरा रात्रीचं जेवण घेणं मला मान्य नाही." ती उत्तरली.
मी तिच्या पेल्यात आणखी वारुणी ओतली.
"केवळ रस्त्यासाठी बरं.." असं म्हणून तिने ग्लास उचलला.
जेवण झाल्यावर आम्ही धूम्रपानाच्या खोलीत आलो. तिने परदेशी बनावटीची विडी शिलगावली. माझ्या जराशा त्रस्त चेहऱ्याकडे पाहून ती म्हणाली,"तू तर साखळी पद्धतीने सेवन करायचास पूर्वी. आम्ही तुला ओएनजीसी म्हणायचो. तेव्हा तुझ्यापेक्षा पवित्र अशा थाटात माझ्याकडे पाहू नकोस."
"तिथे जाऊन आलोय, करून आलोय..मला आता ते मजेदार वाटत नाही." मी म्हणालो.
"बरं, आपले मित्र देशपुरुष भुकेले असताना भोजन कमी करावं म्हणणारी तू, त्यात विडी तत्व कसं बसतं?" मी विचारलं.
त्यावर एक डोळा मोडत ती म्हणाली,"अभिनय करू नकोस! समाजवादात भुकेलं राहणं महत्वाचं नाही, दिसणं आहे." असं म्हणून तिने धुराची वलयं छताच्या दिशेने सोडली.
"बरं बरं! आता आपला काय कार्यक्रम पुढे, माझ्या शर्करे?" मी विचारलं.
"माझ्या गोड वाटाण्या, आपला नाही, माझा कार्यक्रम! कल्पना घेऊ नकोस. उद्या एका भांडवलशाहीवादी नफेखोर उद्योगानं आयोजित केलेल्या परिषदेत माझं किल्लीचं व्याख्यान आहे. जर तुला मन नसेल तर तिथे सकाळी मला पाडशील का?" तिनं लाडिक रुक्षतेने विचारलं.
"मला काहीच समस्या नाही. जरूर पाडीन आणि हवं तर नंतर उचलायलाही येईन. तुला पाहिजे?" मी म्हणालो.
"नक्कीच! मी प्रेम करीन त्यावर!" ती चीत्कारली.
"केलंच असं गृहीत धर मग! बरं, तू दमली असशीलच. तू आता झोप घे. मी ही माझ्या बिछानाखोलीत निवृत्त होतो. तुझी रात्र चांगली जावो!" मी निरोप घेत पुटपुटलो.
"तुझीही, माझ्या जुन्या मित्रा! शर्करामुक्त स्वप्ने! घट्ट झोप! तुला ढेकूण न चावोत!" ती चिवचिवली.
(मटा भाषांतर सेवेचे आभार मानून)

गरजूंसाठी संदर्भ :
http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/my-friend-and-first-love-gauri-lankesh-was-the-epitome-of-amazing-grace/articleshow/60436982.cms