Thursday, March 9, 2023

निखळ प्रेम

आमच्या घराशेजारी एका शेतकरी कुटुंबाचं आवार होतं. कोंबड्या, म्हशी, शेळ्या बकऱ्या असा बक्कळ मोठा बारदाना होता. यात एक विजोड पात्र होतं. ते म्हणजे पांढरी शुभ्र रेशमी केसांची एक पामेरेनियन कुत्री. ठार देशी गावरान घरात एखादी गोरी मड्डम सून यावी तशी ती दिसत असे. गवत, गोवऱ्या, शेणखड्डा, लाकडांची रास, कोंबड्यांनी केलेली घाण या सगळ्यात आपला पायघोळ झगा सांभाळत अलगद पायाने चालावं तशी ही कुत्री वावरत असे. दुःखी वगैरे काही नाही, ती ही सगळी आपलीच प्रॉपर्टी आहे अशा थाटात असे. तरी हे कुटुंब तिचे लाडबिड करत नसे. भाकरीचा तुकडा कधीतरी देत. मध्यमवर्गीय घरातलं “अगं हे काय व्हिके? ते काका आहेत ना आपले? त्यांच्या पायावर शू करतात का? हसतेय आणि वर!” असलं कौतुक नसे. तर.. आता सांगतो आपल्या हीरोबद्दल. त्यांच्याकडे एक गावठी कुत्राही होता. अगदी सर्वसामान्य रूप. त्याचं नाव काही अगम्य कारणास्तव त्यांनी म्हमद्या ठेवलं होतं. बरेच वेळा क्रिकेट खेळताना आमचा बॉल त्यांच्या कंपांऊंडमध्ये जात असे. अशा वेळी मात्र आमच्या या महाशयांशी सामोपचाराच्या वाटाघाटी होत. तो रोखून पाहत असताना बॉल घेऊन येणे फार जोखमीचे असे. तर ते असो. या महाशयांचे या व्हिकीवर निरतिशय प्रेम होते. लिव्ह-इन रिलेशन्स जरी असली तरी लग्नाचीच मानत असे. आम्ही बारकाईने निरीक्षण केले होते. फाटकापाशी कुणी आले की प्रथम व्हिकी ओरडे. हे महाशय कुशीवर पडून पाहत असत. ती ओरडे आणि याच्याकडे पाही. मग मात्र हे तटशिरी उठून फाटकाकडे भुंकत धावत येत. करत काहीच नसत. भुंकून झाले की परत व्हिकीशेजारी उभे राहून तिच्याकडे अभिप्रायार्थ पाहत. ती लक्षही देत नसे. 


हा म्हमद्या महा धडपड्या होता. समोर मेजर रहदारीचा रस्ता होता. ट्रक, एस्टी बसेस सारख्या जातयेत. एकदा असाच तो धावला आणि पुढचे पाय प्लास्टरमध्ये घेऊन बसला. पण तरीही अक्कल आली नाही. आठवड्यातच पुन्हा प्लास्टरसकट धावला आणि या खेपेस मागचेही दोन पाय प्लास्टरमध्ये आले. चारी पाय प्लास्टरमध्ये घेऊन पाय लांब करून पहुडलेला असायचा. जाम हसू यायचं. पण स्वारीची व्हिकेप्रतिची निष्ठा अस्खलित होती. तिला त्याच्या अवस्थेची जराही पर्वा नव्हती तरी. तर असं हे विकलांग अवस्थेत तो पडून असताना, अचानक माकडं आली. समोर सान्यांच्या आवारात जांभळाचं झाड होतं त्यावरची जांभळं खाणं हा वार्षिक कार्यक्रम करायला. त्यातला एक बलदंड हुप्प्या सान्यांच्या गेटच्या दगडी खांबावर येऊन बसला. तो यांच्यापासून १०० फुटांवर, रस्त्याच्या पलीकडे. काही अडलंय का? पण नाही, व्हिकीला ते पटलं नाही. तिने जोरजोरात भुंकून म्हमद्याकडे पाहिलं. जणू “जा, जरा बघ, नुसता पडलायस तंगड्या गळ्यात घेऊन” असंच म्हणत असावी. म्हमद्या जिवाच्या कराराने उठला. पाय तर वाकत नव्हते. तसेच ताठ पाय करत एक एक पाऊल टाकत त्या हुप्प्यापर्यंत पोचला. आणि वर बघून त्याच्याकडे पाहत जोरजोरात भुंकू लागला. पायात ताकद नसली तरी नरड्यात बक्कळ होती. त्या हुप्प्याने दुर्लक्ष केलं. पण हा गडी थांबेचना. शेवटी त्याला असह्य झालं ते. तो चटशिरी खाली उतरला आणि उजव्या पंजाने एक सण्णदिशी म्हमद्याच्या कानाखाली ठेवून दिली. म्हमद्याचे चारी पाय अचानक वेदना विसरले. गाड्यांची पर्वा न करता तो तुरूतुरू परत आपल्या आवारात आला आणि व्हिकीच्या शेजारी उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं कसंनुसं हसू आम्हाला स्पष्ट दिसत होतं. व्हिकीनं,”पडला उज्जेड. काही उपयोग नाही तुमचा!” हे म्हटलेलंही आम्हाला स्पष्ट ऐकू आलं. ती निघून जात असताना म्हमद्याचं “जानू! जानू! अगं ऐकून तर घे! पाय धड असते तर सोडला नसता त्याला! दत्ताची आण!” हे केविलवाणं बोलणंही ऐकू आलं. निखळ प्रेम प्रेम ते हे!

No comments:

Post a Comment