ग्रेसांची कविता गूढ, अगम्य, भरजरी प्रतिमांनी भारलेली असते. प्रतिमांचा हा उत्सवच असतो. दोन शब्दांची विलक्षण संधि, त्यातून अर्थ थेट समजत नाही पण नेणिवेच्या पातळीवर जाणवणे हे ग्रेसांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या प्रतिमांचा प्रत्येकाच्या तत्कालीन मनःस्थितीप्रमाणे तसा तसा अर्थ लागणे हेही त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य. चंद्रमाधवीचा प्रदेश हा शब्दसमूह वाचला की शिशिर ऋतू सुरू होत असताना येणारी निरभ्र रात्र, चमचमणाऱ्या चांदण्या, गूढ निळ्या डोंगररांगा, स्तब्ध सूचीपर्ण वृक्ष, पौर्णिमेच्या चंद्राचा सौम्य संथ प्रकाश, मंद वाऱ्याने कळत नकळत हलणारे वृक्षांचे शेंडे, खाली दंवबिंदूंनी चमकणारी गवताची पाती हे डोळ्यांसमोर येतं. पण ते तेवढंच नसतं. त्या शब्दात गूढतेची छटा दर्शवणारा डोंगररांगांच्या मध्ये आणि वृक्षांच्या माथ्यावर उतरलेला धुक्याचा समुद्रही दिसतो. हे ग्रेसांचं प्रतिमासामर्थ्य आहे.
पण ग्रेसांची ही कविता मला तत्वज्ञानाने सत्याचा मागोवा घेणारी वाटते. ती विज्ञानाशीही एकनिष्ठ वाटते. अर्थात हा कवडसा माझ्या मनाचा कवडसा आहे. अनेक अन्वयार्थांपैकी एक.
ही धूळ धुक्यासम कोमल
ताऱ्यांच्या मागुन येते
पाण्यावर हलके हलके
चंद्राची साय पसरते.
हा प्रश्न जीवाला छळतो
टिचलेले बिल्वर हसती;
कोणत्या फुलातुन गळते
कोणत्या कळीची माती?
घे हळुहळु स्मरणाने
पानांचा तू कानोसा
झाडांच्या अगदी मागे
तुज दिसतो काय कवडसा?
माधुर्य सांडते संध्या
किणकिणती सर येताना
मेघांना कळला नाही
हलकासा रंगउखाणा
जोगवा मिळाला तेव्हा
लहरीत नाचलो होतो;
पायात मोडतो तोही
पाऱ्याचा घुंगूर असतो....
शोकातिल दाट विणीची
गुंफात अरण्ये असती
वाटेत झरा उचलाया
दगडाची लागे छाती.
तुज शोधाया मी गेलो
नक्षत्र निघाले आर्द्रा;
हळदीच्या हातामधल्या
घे काढुन अवघ्या मुद्रा.
~ग्रेस
येथे कवी विज्ञानाच्या खूपच जवळ आला आहे. धूळ, गुरुत्वाकर्षण, ग्रहनिर्मिती चार ओळींत मांडण्याचे कसब ग्रेसांपाशी आहे.
कुठल्याही जातीच्या वैज्ञानिकाला सत्याचा शोध छळत असतो. सगळ्याच्या मुळाशी शेवटी ते मातीचेच अणुरेणू आहेत.
स्मरणाच्या नोंदींचा संदर्भ घेत प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ लावत कवडशामधून येणारे फोटॉन्स हे कण नसून लाटा आहेत हे सत्य येथे उमगले आहे.
माधुर्य तरी काय आहे? न्यूरॉन्ससमूहाने एकत्र येऊन केलेला जाणिवोत्सवच ना? मेघांच्या नकळत काही फ्रीक्वेन्सी शोषल्या जाऊन रंग उधळले जातात जे आपल्याला दिसतात. हलकीशी सर आली की रिफ्रॅक्शनउत्सव होतो.
फंडिंगचा जोगवा मिळाला तेव्हाचा आनंद औरच. पायात घुंगूर लावून नाचतो तोच वैज्ञानिक. हा विनोद झाला, पण एखादे गूढ उलगडते तेव्हा ज्ञानी आनंदाचे नृत्यच करावेसे वाटते. तरीही, हे अंतिम सत्य नसून त्याच्या वाटेवरचा एक टप्पा आहे याचीही जाणीव त्या आनंदोत्सवात हळूच टोचत असते.
सगळंच काही सरळ मिळत नाही. काही गूढे उकलता उकलत नाहीत. माहिती झऱ्यासारखी वाहत राहते, गूढ एखाद्या खडकासारखे मध्ये दिसत राहते. कठीण, न उकलणारे.
एकाचा शोध घेताना भलतेच गूढ उकलणे हे काही नवीन नाही. भारत शोधायला निघालेला कोलंबस अमेरिकेत जाऊन पोचला. अशा वेळी आपण त्याचाच शोध लावत होतो असं सांगितलं की हाताला लावलेल्या हळदीप्रमाणे नवलाई दाटून येते. हे तसं शाश्वत सत्य. आयुष्यभर सत्याचा शोध घेऊन झालेला साक्षात्कार “हा शोध संपणार नाही” याचाच असावा असं ग्रेस सुचवतात. आपलं जगणं हा सत्यशोधनाचा आणि स्व-शोधनाचा अखंड प्रवास आहे असं ते सांगून जातात.
-मंदार वाडेकर
No comments:
Post a Comment