आयुष्यातला एखादा महापुरुष येतो तसा हा पिंपळ. चांगला वीसएक फुटांचा परीघ असलेला. खूप लहानपणच्या आठवणी धूसर का होईना त्यातली एखादी गोष्ट तरी अगदी ठळक असते. माझ्या त्या धूसर झालेल्या आठवणींतील हा जिताजागता पिंपळ एक ठळक आठवण. याच्याबरोबर दीस उजाडायचा आणि याच्याबरोबरच संपायचा. खेळणं, उंडारणं याच्याबरोबर, दुपारच्या संथ शांततेत पानांची सळसळ ऐकणं याच्याबरोबर, संध्याकाळची पानगळ पाहणं याच्याबरोबर, अंधार पडल्यानंतर वर बसलेल्या मुंजाला शोधणं याच्याबरोबरच. केवळ आईनं आता घरी ये नाही तर बघते तुझ्याकडे अशी धमकी दिल्यावरच याच्या पारावरून हलायचं. याच्याच पुढ्यात हंगामानुसार खेळ व्हायचे. स्वत:ची फळकूट नसलेली, खरीखुरी पहिलीवहिली बॅट घेऊन मी खेळलो ते यानंच पाहिलं. कडाक्याच्या थंडीत ढोपरं फुटलेली, ठेचा लागून अंगठे फुटलेले यानंच पाहिलेलं. वसंतात कोंब फुटायचे याला. तसे सगळ्या झाडांनाच फुटतात, पण याचे कोंब वेगळे. ते खुडायचे, लांब शंकूप्रमाणे असलेला तो कोंब जिभेवर ठेवायचा आणि त्यातून हवा शोषून हुबेहूब एखाद्या चिकचिक्याप्रमाणे (एक छोटा पक्षी) आवाज काढायचा. स्वत:चा कोंब खुडल्याचं दु:ख विसरून माझ्याबरोबर त्या आवाजाचा आनंद घ्यायचा तो हा पिंपळ. उन्हाळ्यात दुपारी सर्वत्र नीरव शांतता असताना मी आणि माझ्यासारखाच एक महाउपद्व्यापी मित्र या पाराच्या दगडांमध्ये घरं करून राहिलेले विंचू शोधत बसायचो. हिरवागार हीर (नारळाच्या पानाची काडी) घ्यायचा, त्याच्या लवलवत्या टोकाची आकडी करायची आणि बिळात घालायची. कुठल्या कपारीत विंचू असेल हे ज्ञान आम्हाला कसं आलं हे कुणालाच माहीत नाही. पण शंभर टक्के असायचाच. मग तो विंचू त्या आकडीला पकडायचा. ती ओढ जाणवली की सर्रकन हीर ओढायचा. भली मोठी इंगळी बाहेर पडून आमच्याच पायाशी पडायची. मग पाच दहा मिनिटं तिचं निरीक्षण करून तिला परत त्याच हीराने दगडात सोडायचं. तीही बिचारी “च्यायची कटकट” म्हणत गायब व्हायची. पुढे आम्ही हे बंद केलं. मुका जीव तो.
या पारावर हनुमानाची इटुकली देवडी. पूर्वी ही नुसतीच देवडी होती. हे पत्र्याचं छप्पर कुणातरी दिव्य आर्किटेक्टची नंतर झालेली कृपा असावी. हनुमान जयंतीला अगदी पहाटेपहाटे जायचं आणि नमस्कार करायचा. खूप खूप काही मागावं असा विचार करून तिथं गेलेला मी, प्रत्यक्षात तिथं काहीच मागायचो नाही. मन कसं रिक्त, समाधानी असायचं. काहीही न मागता या पिंपळानं सगळं दिलं. जे पैशाने कधीही विकत घेता येणार नाही असं बालपण दिलं. जोवर हा असेल तोवर माझं ते बालपणही कधी हरवणार नाही.
फोटो क्रेडिटः Subodhan Kashalikar
No comments:
Post a Comment