“धोंडोपंत!!” नानू जवळजवळ ओरडलाच! काही अगम्य कारणाने तो खुर्चीच्या अगदी कडेवर बसून काम करत होता. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार ओरडण्यासाठी जी शक्ती लागली तिची समान विरुद्ध शक्ती कार्यान्वित झाल्यामुळे तो सटकन खुर्चीवरून खाली घसरला. मी टेबलासमोर उभा असल्याने मला आता त्याचे फक्त कपाळ टेबलाच्या कडेवरून सूर्य वर येत असल्यासारखे दिसले. नानूचे टक्कल तेजोनिधी लोहगोल होऊन प्रच्छन्नपणे चमकले.
“काय रे नानू, कामात आहेस का?” मी विचारले.
“अं? हां हां. नाही. म्हणजे हो. जरा काम चालू होतं.” नानू गडबडून म्हणाला. त्याने समोरच्या कागदावर एक फाईल हळूच कॅज्युअली ठेवली. पण त्याआधी खालच्या कागदावर अनेक ठिकाणी केलेली खाडाखोड मला दिसली होती. म्हणजे तो कविता लिहीत असणार याचा मला अंदाज आला होता.
“धोंडोपंत! तुम्ही काय केलंत म्हणालात?” नानूच्या चेहऱ्यावरचा अविश्वास वाहून चालला होता.
“होय नानू. मी कविता केलीय.” मी गुन्ह्याची कबुली दिली. नानू स्थिर नजरेने आ वासून माझ्याकडे पाहत होता. त्या नजरेने मीच अस्वस्थ झालो.
“हे पहा नानू, असं काहीतरी अघटित घडल्यासारखं करू नकोस. मान्य, आजवर मी आफिसच्या कागदावर टॅली, आणि शंकऱ्या शरीच्या प्रगतीपुस्तकावर सही यापलीकडे काही लिखाण केलेलं नाही, पण तू असा चेहरा करतोयस जसा काही मी कुणाचा तरी खून केला आहे आणि मर्डर वेपन घेऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालो आहे.” मी म्हणालो.
नानू तसाच काही वेळ माझ्याकडे पाहत राहिला. मग हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य ओसरत जाऊन मिष्किलपणाचे भाव आले.
“धोंडोपंत, तुम्ही मला असं फसवू शकणार नाही. खरं सांगा, अलिकडे तुम्ही लंचटाईममध्ये पंचाक्षरी मंत्र लिहीत बसता ते मी पाहिलंय. ते मला दाखवून माझ्यावर काही परिणाम होतो ते पहायचं आहे ना तुम्हाला? धोंडोपंत, तुम्हाला खरंच वाटतं मी ॲबनॉर्मल इसम आहे?” नानू हसत पण जरा गंभीर होऊन म्हणाला.
“अरे नानबा, मी कशाला असं करू? एक तर लंचटाईम मध्ये मी मंत्रबिंत्र लिहीत नाही. मला नामस्मरणाने झोप लागते. आमच्या हिला ती ध्यानधारणा वाटते. परवाच मी असा पेंगत असताना ही तिच्या मैत्रिणीला फोनवर आमचं ध्यान जपाला बसलंय असं सांगत होती ते अंधुकसं कानावर पडलं. मला बरं वाटलं. जरा तरी मान मिळतोय असं वाटलं. त्यानंतर त्या फिदीफिदी हसत होत्या ते मात्र जरा खटकलं. ध्यान करतोय त्यात हसायचं ते काय? तर, मी काही मंत्रबिंत्र लिहीत बसत नाही. गेले काही दिवस आयुष्यात काही तरी करावं असं वाटतंय मला. आयुष्य कचेरीत खर्डेघाशी, परत येताना मेथीची पेंडी, ताकभात आणि मग रात्री आठलाच ऊर्ध्व लागणे असं मलखांबासारखं तुळतुळीत आयुष्य गेलं. पूर्वी अचानक पाऊस आला की चटकन् आडोसा शोधायचो. पण आता वाटतं पाऊस आला की हात पसरून आकाशाकडे चेहरा करून ते थेंब मुक्तपणे झेलावेत, कोटधोतर वाळायची चिंता न करता. ही ओरडेल त्याची पर्वा न करता. शंकऱ्या फादर फादर, तुम्ही धोतर नेसलेला शारुक खान दिसत होता असं म्हणेल तिकडे लक्ष न देता.” मी श्वास घ्यायला थांबलो.
नानू चटकन् उठला, मला हाताला धरून त्याच्या टेबलासमोरच्या खुर्चीवर बसवलंन. बाजूच्या माठातून पाण्याचा ग्लास भरून आणलान आणि दरडावणीच्या सुरात म्हणाला,”धोंडोपंत! आधी शांत व्हा आणि हे प्या!” असं सांगून तो लगबगीने गेला. आणि एका मिनिटात आप्पा, गोपाळराव, रेग्या, केशर मडगावकर, हेडक्लार्क काळे, सेक्शनच्या पोक्त्या पुरवत्या आजीबाई मिसेस जोग असा अख्खा सेक्शनच काळजीयुक्त चेहऱ्याने माझ्याभोवती जमला. या नानूने त्यांना काय सांगितलं होतं देव जाणे.
“धोंडोपंत! तुम्ही काळजी करू नका! या वयात असं होतं. माझ्या चुलतबहिणीच्या यजमानांनाही असंच झालं होतं. रोज योगासनं, बारा सूर्यनमस्कार घालणारा, बसल्या बैठकीला पन्नास गुलाबजाम उठवणारा, वाघाला लाजवेल अशा डरकाळ्या फोडत झोपणारा माणूस एके दिवशी सकाळी उठला आणि माझ्या बहिणीला म्हणाला मी तुझ्यासाठी आजवर काहीच केलं नाही गं, तू बस आज तुला चहा मी करून देतो. माझी बहीण तर खचलीच. रडारड सुरू. काल रात्रीपर्यंत बरे होते, छान खेकसून वगैरे झोपले आणि सकाळी काय बाधा झाली न कळे असं बोलणं सुरू झालं. मी म्हटलं बहिणीला, कुंदे, यू डोन्टच वरी. आय नो व्हाट टू डू. सरळ उचलून ठाण्याला नेला. मनोरुग्णालयाची पाटी पाहिली आणि गडी निम्मा तिथेच बरा झाला.” आप्पा वदला.
“बरं झालं बाई आप्पा तुम्ही होतात. मग झाले का बरे तुमचे मेहुणे?” केशरने विचारले.
“निम्मे बरे झाले म्हटलं की. उरलेल्याला वेळ लागेल असं डॉक्टर म्हणतायत आता. पण फरक पडलाय हो. पूर्वीसारखे बहिणीवर गुरगुरू लागलेत. कुंदेला त्याचंच अप्रूप. तेव्हा धोंडोपंत! डोन्ट वरी! नाऊ लीव्ह इट टू आप्पा!” आप्पाचा आत्मविश्वास त्याला स्वतःला एकदा त्याच इस्पितळात भरती करणार आहे.
“मिस्टर जोशी, तुम्ही हाफ डे टाकून जरा घरी जा पाहू. विश्रांती घेतली की बरं वाटेल.” हेडक्लार्क काळे.
“धोंडोपंत, ऐका माझं. हे काहीतरी बाहेरचं आहे हां. आपल्या जाणिवेपलीकडच्या गोष्टी असतात. तुम्ही माझ्याबरोबर चला. चिंचपोकळीला एक अधिकारी पुरुष आहेत, वालावलकर म्हणून. अगदी साधा माणूस. पण सिद्ध! तुमचा विश्वास असेल तर डोक्याभोवती प्रभावळपण दिसेल हां. काही बाहेरचं लागलं असेल तर तिथे नुसता प्रवेश केल्यावर ते तडफडतं. तुम्हाला हे खरंतर चुकून लागलं असावं. काय मिळणार हो तुमच्या मागे लागून?“ गोपाळराव कळकळीने म्हणाले. खरंच पुण्यवान सच्छील माणूस.
“अरे अरे! लोक हो, माझं ऐकाल का जरा? मला साहित्यिक प्रेरणा होऊ शकते यावर तुमचा विश्वास नाहीये का? आम्ही काय फक्त कौटुंबिक साहित्याचाच विचार करायचा? आम्हाला काय केशराची घमघमणारी शेतं दिसू नयेत?” मी चिडून म्हणालो.
“हे सालं केशराचं घमघमणार जे म्हणालात ना ते फार किळसवाणं हां धोंडोपंत! चाळीत राहून सकाळी तपश्चर्या करणाऱ्याने तरी ही उपमा देऊ नये. आणि जरी ते वास्तव असलं तरी थेट कविता?” नानू गांभीर्याने म्हणाला.
“धोंडोपंत, काय आहे तरी काय तुमची कविता? वाचा पाहू! त्यावरून ठरवतो अर्जंट ठाण्याला जाऊ की कसे ते.” हा आप्पा निर्दयी आहे.
तरी मी त्यांना कविता ऐकवली.
सहा आण्यांचं जगणं
दोन आणे खाणं
दोन आणे पिणं
दोन आणे झोपणं
सूर्याचं रोज उगवणं
तेच विश्व पाहून मावळणं
पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं
काळवेळ पाहून कलणं
मुंगीचं कण कण गोळा करणं
का? त्याचं कारणही न कळणं
कारण न कळताच मरणं
सत्य न जाणताच विरणं
मग आपलं अस्तित्व खरं की
की अज्ञाताचा क्षणिक बुडबुडा असणं?
मी थांबलो. सगळ्यांकडे पाहिलं. आप्पा निर्विकार होता. गोपाळरावांच्या डोळ्यात काळजी होती. केशर आपलं नेलपॉलिश पाहत होती. काळेंच्या कपाळावर आठी होती. मिसेस जोगांच्या डोळ्यांत कणव होती. आणि नानू.. त्याच्या चेहऱ्यावर आनंदयुक्त मत्सर होता.
“जोशी! रोजच्या कामाचा बुडबुडा येवंदे हां, हे नसते बुडबुडे काय ना!” मिसेस जोगांनी नेहमीच्या स्टाईलने टोमणा मारलाच.
“धोंडोपंत! वेलकम् टू वन परसेंट! तुम्हाला मागे आरस्पानी दर्शन होईल म्हटलं तर तुम्ही म्हणजे बनियन वगैरे का असं विचारलं होतंत. या कवितेत मला तुमच्या बनियनच्या खिशातील तंबाखूची डबीही दिसली. एवढंच नव्हे तर माणूस वर टेरलीनची प्यांट असली तरी आत चट्ट्यापट्ट्यांची आकाशकंदील चड्डी घालूनच असतो हे वैश्विक सत्य तुम्हाला उमगलंय तेही मला या कवितेत दिसलं. माणूस फार काळ अज्ञानी राहू शकत नाही हेच यातून दिसतं.” नानू म्हणाला.
“धोंडोपंत, हे फार पुढे जायच्या आत माझ्याबरोबर ठाण्याला चला.” आप्पा निर्विकारपणे म्हणाला. त्याला अज्ञान ठाऊकच नाही.
सगळे गेल्यावर नानू जरासा खिन्न होऊन म्हणाला,”धोंडोपंत, तुम्हाला काय कमी आहे? कविता हे एकच कुरण असं आहे जिथे मी इतर वत्सल कामधेनूंकडे पाहत हिरवं बाटूक चघळतो. तुम्हाला तुमची मालकीण स्वहस्ते आंबोण आणून समोर टाकते. तुम्ही आमच्या कुरणात येऊन माझ्यासमोरचं पावशेर गवतही का हिरावून घेता?” असं म्हणून त्याने मघाशी ठेवलेली फाईल उचलली आणि भाराभर खाडाखोड असलेली कविता लिहिलेला कागद प्रेमाने उचलला. त्याची घडी घालत असताना मला त्यावर लिहिलेले “प्रिय सरला हीस” ही अक्षरे ओझरती दिसली. म्हणजे सध्याच्या वत्सल कामधेनूचं नाव सरला होतं तर. काव्याचं कुरण नेहमीच बहरलेलं असावं.
-मंदार वाडेकर
No comments:
Post a Comment