Monday, August 3, 2020

काही तरी वेगळं

सध्या पाककलेबाबत लोक जास्तीत जास्त किती सहिष्णु असू शकतात याबद्दल चाचणी म्हणून अनेक पदार्थ शोधले जात आहेत. डोशाला फूलच काय बनव (मराठी फूल), आणि डोक्यातच काय घाल (खाणाऱ्याला ते बघूनच आपोआप डोक्यात जातं), कुठे टुमदार हिरवेगार कोकणात बालपण काढलेल्या हापूस आंब्याला कुठं तरी मसण्या गावातलं फुगलेलं स्थळ शोधून मनाविरुद्ध लग्न करून पाठव असले प्रकार सुरू आहेत. परवा आधीच नशिबाला विरजण लागलेल्या दह्याला जेव्हा कुकरमध्ये दोन शिट्ट्यांचा घाम फोडून नंतर चीज या दुग्ध समाजातील समाजकंटक घटकाबरोबर जबरदस्तीने नांदवण्यात आलेलं पाहिलं आणि प्रयत्न करून विस्मरणात घालवलेली लहानपणची एक गोष्ट पुन्हा वर आली. लहानपणच्या चुकांमुळे पुढे आयुष्यात नैराश्य येणं म्हणजे हेच का असं वाटून गेलं.
मन थेट बालपणात गेलं. फेड आऊट. फ्लॅशबॅक. मी मऊमऊ अशा दुपट्यावर पहुडलो आहे.. आणि पायाचा अंगठा चोखतो आहे.. दुपटे छान कोरडे आहे. आई स्वयंपाकघरात आहे. स्निग्ध मधुर असा वास सुटला आहे. ते काय असेल माहीत नाही, मला माझं नावही माहीत नाही तर स्वयंपाकघरात काय शिजतंय त्याचं नाव कसं कळणार? मी तेव्हा सहा महिन्याचा होतो हेही मला आज कळतंय. तर तो स्निग्ध मधुर सुवास.. तो मला हवाय. अंगठा चोखून चोखून कंटाळलो होतो. मग दुपट्याचा कोपरा तोंडात घालून पाहिला. बरा लागला. मग तो चोखू लागलो. बाकी हा दुपटं प्रकारच भारी आहे. तोंडालाही मस्त लागतो आणि बिंडालाही मऊमऊ लागतो. छान रवंथ करत होतो. दुपट्याचं काॅटन आणि तोंडातली लाळ यांचं अद्वैत होऊन ब्रह्मानंदी टाळी लागली होती. तेवढ्यात कुणीतरी खसकन् ते तोंडातून ओढून घेतलं. “मेल्या, दुपटं कसलं रे चोखतोयस?? गिळायला चांगलं दूधतूप मिळतंय ते पुरत नाही का??” असे कठोर शब्द कानावर आदळले. मी प्रतिक्षिप्त क्रियेने खालचा ओठ काढला, डोळे मिटले आणि रडण्याची पोझ घेतली. पण तो आताचा काळ नव्हता. आताच्या आया “दुपटं इतकं आवडतं का माझ्या शोन्याला?? आं? बलं बलं. अगदी बाबांच्या वळणावर गेलाय हं माझा शोन्या..” पण त्या काळच्या आया म्हणजे कंप्लीऽऽट नो नाॅनसेन्स होत्या. बाळाला नुसतं झोपवायचं जरी असेल तर मांडीवर घेऊन दणादणा थोपटून बेशुद्ध पाडत. तर मी रडण्याच्या पोझमधे असतानाच माझे तोंड उघडे असल्याचा फायदा घेत स्निग्धआंबटकटुचिकट असला कसला तरी द्रव माझ्या तोंडात ओतला गेला. त्या कधीच न अनुभवलेल्या भीषण चवीमुळे माझ्या आतड्याने तात्काळ बंड केले आणि तो द्रव तितक्याच वेगाने बाहेर फेकला. तो माझ्या झबल्यावर आणि माझ्या प्रिय अशा दुपट्यावर पडला. ते दृश्य माझ्या मेंदूवर कोरले गेले. आज त्याची आठवण आली. तो पदार्थ म्हणजे काॅटेज चीज, दही आणि मध यांचे एक संपृक्त द्रावण होते असे नंतर मोठेपणी मला सांगण्यात आले. माझी दुपटे चोखायची सवय घालवण्यासाठी आमच्या शेजारच्या घरातील एका टणक आजीबाईच्या बटव्यातून हे औषध आले होते म्हणे.
प्रयोग होणारच. माझ्यासारखे लोक त्यात बळी जाणारच. पण मानवजातीच्या एकूण हिताचा विचार करावा. खाणारा मरतो, आणि करणारा सोकावतो, निर्ढावतो. वाहवा करणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, हे लोण कधी तरी तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकणार आहे. तुम्ही दमूनभागून घरी आल्यावर वरणाचं पाणी वापरून केलेला क्रांतिकारी चहा तुमच्या समोर येणार आहे. त्यात दूध असेल पण वर मेल्टेड चीजने काढलेली लाडिक बदामाकृती तरंगत असेल. त्याबरोबर अधिक लाडिकपणे “ही बिस्किटं खाऊन बघा नं. पहिल्यांदाच केलीयत. काही तरी वेगळं म्हणून. हेल्दीही आहेत. भाज्यांची, कांद्याची सालं, कोथिंबिरीचे देठ काढले होते. कंपोस्टच्या डब्यात टाकणारच होते तेवढ्यात म्हटलं अय्या! टाकून का द्यायची? चाॅकलेट कुकी डो उरलाच होता. म्हटलं बिस्किटं करावीत. थोडं भाजाणीचं पीठ होतं. सासूबाईंनी पाठवलेलं. म्हटलं एवीतेवी त्याला चव नसतेच, यात वापरू. ते टाकलं, ब्राऊन शुगर टाकली. मळून घेतलं. आणि ओव्हनमध्ये ३६० डिग्री फॅरनला वीस मिनिटं ठेवलं. छान दिसतायत. टाॅम्यानं ते काही खाल्लं नाहीन्. माजलाय लेकाचा. पण तुम्ही खा चहाबरोबर.” ही वाक्यं येतायत. तुम्ही वरणपाण्याचा चहा आणि ही कंपोस्टखत कम बिस्किटं चेहरा हसरा ठेवून गिळताय. तुमच्या डोक्यात “आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलीया..” हा अभंग सतत सुरू झाला आहे. नेत्र पैलतीरी लागले आहेत. माझं आजवरचं लेखन पाहता माझं तरी नरकात जाणं निश्चित आहे पण तुम्ही तुमच्या एकूण कर्तृत्वानुसार स्वर्ग किंवा नरक यापैकी एकाचं दार पाहता आहात.. पांडुरंग हरी.. संपला अवतार. हे दृश्य नजरेसमोर आणा आणि ठरवा काय करायचं ते. काही तरी वेगळंच्या नादात काहीच्या काही वेगळं होऊन बसू नये. सध्या इतकंच.

No comments:

Post a Comment