Monday, July 27, 2020

शूर्पणखेचे रहस्य

इतके दिवस आम्ही जे कोकलून कोकलून सांगत होतो ते आता एका गोखले नावाच्या नवइतिहास नवसंशोधिकेने गोखलून गोखलून सांगितल्यावर लोकांचे तिकडे लक्ष गेले आहेआमचा एवढा तीन तपांचा गाढा अभ्यास, पण आजवर कुणी त्याची साधी दखलही घेतली नाही. असो

बारावीला नव्वद टक्क्यांचे उत्तुंग शिखर गाठण्याचे उद्दिष्ट बाळगल्यानंतर आम्ही अकरावीला साठ टक्क्यांवर बेस कॅंप टाकला. बेस कॅंपपर्यंत पोचेपर्यंतच ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे हे आमच्या आईवडिलांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी तेव्हाच, बघू कसे काय जमते ते असे नातेवाईकांना सांगायला सुरूवात केली होती. आणि इकडे आम्हाला मात्रआता बीएला जाऊन म्हशी राखअसे सांगण्यास सुरुवात केली. आम्ही प्रयत्न तर खूप केला. बेसकँपपासून दहाबारा टक्के वर पोचलोही. पण ऑक्सिजनचे सोंग आणता येत नाही. उगाच तिथून आमचा देह खाली आणायचे कष्ट इतरांना का द्या? या निस्पृह विचारसरणीतून आम्ही सत्तर टक्क्यांवरच फोटो काढून घेतले आणि वडिलधाऱ्यांच्या उपरनिर्दिष्ट इच्छेला मान देऊन रीतसर बीएच्या म्हशी घरी आणल्या. तिथेही मानसशास्त्र, मराठी, वगैरे रटाळ शिखरे होतीच. पण पर्यटनाला प्रोत्साहन म्हणून पस्तीस टक्क्याला पोचले की तडक पास झाल्याचे हार गळ्यात पडत असे. मग आम्ही इतरत्र उंडारायला मोकळे होत असू. समुद्रसपाटीपासून दोनतीन मीटर उंचावर लायब्ररी नावाचे स्थान होते. प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन या कॅटेगरीमधे येत असलेले हे स्थान माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. या लायब्ररीत पुरातत्व विभाग नावाचा एक सगळ्यात अंधारलेल्या कोपऱ्यातील एक सेक्शन होता. पोथ्या, बासने, बाडे, रुमाल यांच्या जोडीला धूळ, कोळिष्टके, प्रसंगोपात्त उंदीर यांचा सहवास मिळत असे. त्यामुळे एकांताची चांगली सोय होती. परंतु बीएच्या मुली बीएच्या मुलांकडे पाहून झुरळ पाहिल्यासारखे करत. त्यामुळे हा सेक्शन अजूनच एकाकी पडून होता. हा सेक्शन पत्ते वगैरे खेळायला बरा पडत असे. असेच एकदा तीन पत्तीचा डाव रंगात आला असताना अचानक वरच्या रॅकमधून एक बाड माझ्या अंगावर पडले. खूप जीर्ण अशा कागदांची चळत त्यात बांधलेली होती. “शूर्पणखेचें रहस्यअसे पहिल्या पानावर लिहिले होते. त्यावेळी बाबूराव अर्नाळकर जोरात होते. त्यांच्या झुंजार कथा वाचून अंगात स्फुरण येत असे. झुंजारप्रमाणे आपल्यालाही एखादी विजया मिळेल का असे वाटत असे. पण बीए च्या त्या आमच्या वर्गात परकरझंपर पासिंगच्याच गाड्या जास्त असल्यामुळे त्यांच्यात विजया कमी आणि सत्यभामा जास्त होत्या. काॅलेजातून परत जाताना वाटेत भेळ खाणे हा त्यांच्या आयुष्यातील रोमहर्षक आणि थरारक प्रसंग असे. अर्नाळकरांनीशूर्पणखेचें रहस्यकधी लिहिले बुवा? त्यांच्या जवळपास सगळ्या रहस्यकथा मी वाचून काढल्या होत्या. बीएला अर्नाळकर लावले असते तर माझे पस्तीस टक्क्यांचे सत्तर टक्के झाले असते यात मला मुळीच शंका वाटत नाही. अशा विचारात मी ते पहिले पान बाजूला करून पुढचे पान पाहिले. तर ती एक बखर निघाली. बखर म्हटली की कुणा ग्रांट डफ असल्या नावाच्या इंग्रजाने लिहिलेलं काही तरी असेल असं वाटलं होतं. पण ही बखर खूपच प्राचीन निघाली. एका रामायणकालीन प्रकर्णाचा तो एक रुमाल होता. सुरुवातीची एक दोन पाने वाचूनच हे काहीतरी क्रांतिकारी सत्य आपल्या हाती पडले आहे याची आम्हाला खात्री पटली

दंडकारण्य नावाच्या अरण्यात ही कथा घडते. राक्षस नावाच्या एका अतिशय प्रगत अशा जमातीने आपले अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तोही शक्यतो प्रथम अहिंसक मार्गांचा अवलंब करून, शेवटी नाईलाजाने ठकासी व्हावे ठक या मार्गाने त्यांना जावे लागले. दंडकारण्य नावाचे एक अरण्य रावणाने आपल्या प्रिय अशा बहिणीच्या नावे रीतसर करून दिले होते. तिचे नाव शूर्पणखा होते. ती अत्यंत विद्वान होती. राक्षसांच्या मते. आणि सौंदर्यवतीही. हेही राक्षसांचे मत असे बखरकार लिहितो. त्या काळात वडिलोपार्जित मिळकतीवर बहिणींचा हक्क नसे. अशा काळात शूर्पणखेच्या नावे दंडकारण्याचा सातबाराचा उतारा असणे हे क्रांतिकारी होते. रावण हा अतिशय न्यायदक्ष, नीतीमान आणि पुरोगामी असा राजा होता याचा हा एक पुरावा मानला जाऊ शकतो. तो दिवसातील बहुतांश काळ शंकराचे ध्यान करीत असे आणि फावल्या वेळात राज्य वगैरे करीत असेशंकराची पूजा करत असताना शंकर त्याच्याकडे त्याचे मस्तक अर्पण करायला सांगत. ही कटकट परत नको या हेतूने. पण रावणाला ही हिंट समजत नसे. तो नेहमी एक मस्तक अर्पण करत असे. शेवटी कंटाळून शंकर प्रसन्न झाले असे म्हणतात. तर हे असे असताना मुद्दाम वेळ काढून तो दुसऱ्यांच्या बायकांचे अपहरण करणे वगैरे उद्योग करत असेल असे मानणे कठीण आहे. रावण हा निसर्गप्रेमीही होता. तोच काय, सगळे राक्षस निसर्गप्रेमी होते. जैविक विविधता असावी असा राक्षस जमातीचा ठाम विश्वास होता. याच हेतूने दंडकारण्य ही जागा निश्चित करून तेथे सर्व जिवांना अभय दिले गेले होते. काही चुकार राक्षस एखाददुसरे हरीण ससा वगैरे मारीत पण ते केवळ उपजीविकेचे साधन म्हणूनतेथे ऋषीमुनीही राहत. ते जपजाप्य करीत, कंदमुळे खाऊन उपजीविका करत. शूर्पणखेच्या नावाने या दंडकारण्याचा सातबारा असल्याने या ऋषिमुनिंना तिची रीतसर परवानगी घ्यावी लागे. ही परवानगी दर वर्षी रीन्यू करावी लागे. काही ऋषी ते करत नसत. विसरलो म्हणून सांगत. मग शूर्पणखा वसुलीसाठी आपले राक्षस त्यांच्याकडे पाठवी. ते राक्षस अशिक्षित असत. ऋषी डिप्लोमॅटिक या भाषेत बोलत. राक्षसांना डिप्लोमॅटिक भाषा अवगत नव्हती. त्यांची भाषा ही राक्षसी असे. उदाहरणार्थ - काठी हातात घेऊन काडकन् मोडून दाखवणे म्हणजेनमस्कार, कसे आहात तुम्ही?”.  गळा आवळणे म्हणजेतुम्हाला भेटून खूप आनंद झाला!” आणि मग पुढे जशाजशा भावना अस्खलित होत त्यानुसार या क्रिया अस्खलित होत. ते त्या भाषेत ऋषींना शूर्पणखेचा दृष्टीकोन समजावून देण्याचा प्रयत्न करीत. परंतु ऋषी लोकांचा ते हिंसक आहेत असा गैरसमज होत गेला. त्यांनीही मग राक्षसांसाठी खास शाप तयार केले. “भस्म होशील!” हा शाप तत्कालीन ऋषींमध्ये प्रिय होता. अधूनमधून काही ऋषीही या शापाच्या फ्रेंडली फायरमध्ये भस्म होत. त्यामुळे हा शाप काळजीपूर्वक आणि नेम धरून सोडावा लागे. असं सगळं शांततापूर्ण आयुष्य चाललं असताना काही गरज नसताना श्रीरामाने आपल्या सावत्र आईच्या इच्छेला स्वीकारले आणि वनवास स्वीकारला. बरं, भारतात इतकी अरण्ये होती, अगदी अयोध्येच्या उत्तरेलाच कितीतरी घनदाट अरण्ये होती. काश्मीरसारखे निसर्गसुंदर वन होते. तिथे अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान अजून अस्तित्वात नसल्यामुळे राक्षसांचा त्रास नव्हता. तिकडे गेले तरी चालणार होते. पण काही अज्ञात कारणाने त्यांनी दंडकारण्यच निवडले. आणि जागाबिगा निवडून प्रशस्त कुटीच बांधून टाकली. जागा एनए आहे वगैरे काहीच पाहिले नाही. वास्तविक, शूर्पणखेकडून ना हरकत प्रमाणपत्र आणणे हे आवश्यक होते. तेही केले नाही. या अनधिकृत बांधकामाची बातमी शूर्पणखेकडे गेली. बाईंनी शहानिशा करण्यासाठी दुरून कुटीची पाहणी केली. त्यात श्रीरामाची अत्यंत देखणी मुद्रा पाहताच बाई ना हरकत प्रमाणपत्र विसरल्या. राक्षस असल्याने त्यांना कुठलेही मायावी रूप धारण करता येत असे. निळू फुलेंचे रूप घेऊन रामाला वाड्यावर बोलवावे असाही एक विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण त्यांना श्रीराम खरोखरच आवडले होते. राक्षस जातीत जेवढा नट्टापट्टा अलाऊड होता तेवढा सगळा करून त्या श्रीरामांना भेटायला गेल्या. सीतामाईंना प्रथम वाटले कुणी तरी भीक मागायला आली आहे. त्यांनीअजून भांडी पडली नाहीत, नंतर येअसे सांगितले. शूर्पणखा म्याडम रागाने जांभळ्या पडल्या. त्यांनी अपमान गिळून श्रीराम कोठे आहेत, असे विचारले. ते मृगयेस गेले आहेत, येतीलच एव्हढ्यात असे सीतामाईंनी सांगितले आणि त्यांच्यासमोरदंडकारण्य वार्ताभूर्जपत्र टाकले. काही काळाने श्रीराम घरी आले तेव्हा शूर्पणखा म्याडम यांनी फालतू वेळ घालवता त्यांना रीतसर मागणी घातली. तेव्हा श्रीरामांनी आपल्या एकपत्नीव्रताची माहिती देऊन राक्षसांमध्ये या व्रताचा प्रसार करण्याचे सुचवले. तेव्हा चिडलेल्या म्याडमनी आपण रावणाची बहीण असल्याचे सांगत, ज्या जमिनीवर तुमची कुटी उभी आहे ती जमीन आपल्या  मालकीची असल्याचे सांगितले. शिवाय आपण कुटी उभारण्यासाठी कोणतीही रीतसर परवानगी घेतली नसल्याचे लक्षात आणून दिले. आपला प्रस्ताव स्वीकारल्यास आपण या अनियमततेकडे दुर्लक्ष करू असे त्या म्हणाल्या. श्रीरामांनी यापूर्वी अशा अनेक गुंठामंत्र्यांचा समाचार घेतलेला असल्याने त्यांनी विचलित होता आपण थेट कोर्टात भेटू असे सांगितले. त्यात भर म्हणून लक्ष्मणाने "मागणी घालायला यायचं होतं तर निदान थोडा तरी मेकअप करून यायचं होतं, असं पारोशाने येणं बरं नाही." असे उद्गार काढले. असेल नसेल तेवढं सगळं मेकअपचं सामान वापरूनही आपल्याला पारोसं म्हटले गेल्याने ताईंचा राग अनावर झाला आणि आता बघाच काय करते ते अशी धमकी देऊन त्या तिथून निघाल्या. मायावी विद्या अवगत असल्याने त्यांनी आपले नाक कापले गेल्याचे रूप घेतले आणि थेट आपल्या भावाकडे गेल्या. तिथे आपले नेहमीचे मस्तक वगैरे अर्पण करण्याचे नित्यकर्म उरकून रावण नवीन आलेले मस्तक चाचपून पाहत असतानाच ताई रडत रडत दादाकडे आल्या. आपला झालेला अपमान सांगून, त्याचा बदला न घेतल्यास व्यर्थ तुझे राक्षसजीवन वगैरे तत्कालीन मराठी सिनेमात  सर्रास वापरले जाणारे संवाद म्हटले. यानंतर जे काही रामायण घडले ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 

बखर वाचून आम्ही स्तिमित झालो. या विषयावरच आपण पीएचडी करावी असे आमच्या मनाने घेतले. बीए नंतर एमए आणि मग पीएचडी यात साधारण सात वर्षे गेली. पण आम्ही जिद्दीने शूर्पणखेवर झालेल्या अन्यायावर सखोल अभ्यास करून प्रबंध प्रसिद्ध केला. दुर्दैवाने आमचा हा प्रबंधही आज लायब्ररीच्या त्याच अंधारलेल्या पुरातत्व विभाग या अंधारलेल्या सेक्शनमध्ये प्रकाशात येण्याची वाट पाहत पडून आहे. सत्याला कधी ना कधी वाचा फुटतेच या आशेवर आम्ही होतो. आणि आज गोखलेबाईंनी त्याचे सार्थक केले. त्यांनी अभ्यासपूर्वक हे केले असेल याची पूर्ण खात्री आहेच. या संशोधनाला व्हॉटसअप विश्वविद्यालयाकडून भरघोस मदत मिळाली असेल याचीही खात्री आहे. आमच्या काळी हे विश्वविद्यालय नव्हते याची खंत आज आम्हाला जाणवत आहे. ते तसे असते तर आम्ही श्रीराम आणि शूर्पणखा भेटीचा फोटोही पुरावा म्हणून नक्की सादर केला असता. असो. गोखलेबाईंच्या लेखमालेच्या निमित्ताने का होईना, आज सत्य सर्वांसमोर येत आहे याचाच आनंद वाटतो आहे. होते गोखले म्हणून सत्य ओळखले.