इनेगिने मराठी दोस्त असतात. कुटुंबवत्सल असतात धर्मपरायण असतात. पहाटे लवकर उठतात. चहा केलेला नसेल तर, तो नसतोच, स्वत: करतात. बेडरूम मध्ये आपल्या चाफेकळी नाकातून (सन्माननीय अपवाद लागू) मधुर स्वरात घोरत पडलेल्या सुबक ठेंगणी(पुन्हा तोच अपवाद लागू)साठीही करतात. काही गूड (गूढ नव्हे, गूडच) कॅटेगरीतले नवरे ट्रेमध्ये तो चहा घेऊन बेडरूममध्ये नेऊनही देतात असं ऐकून आहे. ट्रेमध्ये नुसता चहाच नाही तर शेजारी एक फुलदाणी आणि त्यात ताजी फुलं वगैरे! हे म्हणजे जरा अतीच. चहात फुलं बुडवून कोण खातं? बटर बिस्किटं किंवा गेला बाजार शिळी पोळी तरी न्यावी. पण अशा घरांमध्ये मुळात पोळीच होत नसते तर ती शिळी तरी कशी होणार? मग हे मुलांना शाळेसाठी तयार करतात. बेडरूममधून आता द्रुतलयीत दरबारी कानडा ऐकू येत असतो. भैरवीने “काळझोप महोत्सव” कार्यक्रमाची सांगता व्हायला अर्धा पाऊण तास तरी बाकी असतो. कुटुंबवत्सल लोक्स अशा वेळी बेडरूमचा दरवाजा हळू ओढून घेतात. आत तंबोऱ्याची तार आपल्या आवाजाने तुटू नये म्हणून. मग मुलं म्हणजे फुलं असं स्वत:ला बजावत ती फुलं गाडीत कोंबून शाळा नावाच्या सुपीक खड्ड्यात नेऊन रोपतात. तिथे हातात झारी, खताची पोती वगैरे घेऊन माळी लोक सज्ज असतात. ते लगेच गप्प बसा, चुपचाप वर्गात जा वगैरे संस्कार सुरू करतात. मग हे दोस्त समाधानाने घरी येतात. एव्हाना गायन आता संपलेलं असतं. गायक हातात चहाचा कप घेऊन शून्य नजरेने भिंतीकडे पहात घुटके घेत असतात. दोस्त लोक त्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहून आता फसत नसतात. त्या मोनोक्रोम स्क्रीनच्या मागे वाॅटसन संगणकाला लाजवेल इतकी गणितं एकाच वेळी करणारा सीपीयू कार्यरत आहे हे आता इतक्या वर्षांच्या सहवासानंतर ठाऊक असतं. “चहात साखर कमी पडलीय, २०१० साली या माणसाला मला कुठला रंग आवडतो हे विचारलं तर बेरंग असं उत्तर दिलं होतंन, मी विसरलेली नाहीये, तांदूळ संपलेयत आणायला हवेत, परवाच्या त्या निळ्या ड्रेसवर मॅचिंग सॅंडलही आणायला हवेत, त्या मेल्या अर्चनाला तर शून्य ड्रेसिंग सेन्स आहे, बघ म्हणावं कसं ड्रेस करावं ते, आज पन्नास मीटींगा आहेत तयारी नाहीय, वऱ्हाडी वांग्याचं भरीत यूट्यूब व्हिडिओ बघून करायला हवं एकदा”- असे सगळे विचार एकसमयावच्छेदेकरून करण्याची क्षमता फक्त स्त्रीला मिळालेली आहे हे दोस्त लोक जाणतात. त्या तुलनेत आपला मेंदू मगरीच्या मेंदूपेक्षा जरासाच सुधारला आहे हेही ते जाणून असतात. त्यामुळे ते निमूटपणे ऑफिसला जायच्या तयारीला लागतात. तसे जातातही. पाच सहा पर्यंत, जेवढा पगार मिळतो तेवढ्याचं काम करून परत येतात. कधी जेवण तयार असतं तर कधी नसतं. दोस्त समजुतदार असतात, समानतेचे पाईक असतात. जेवण तयार नसेल तर आपल्याला येणारा एकमेव कांदा-बटाट्याचा रस्सा करतात, भात कुकरला लावतात. मुलं एवीतेवी “इंडियन स्पायसी” फूड खात नसल्यामुळे त्यांच्यासमोर मॅकरोनी चीज ठेवतात. मग सुपर काॅम्प्यूटरही घरी येतो. तिथली कम्प्यूटेशन्स जराही कमी झालेली नसतात. तर इकडे दोस्त लोकांच्या मेंदूत गेटवरून उड्या मारणारी मेंढरं तेवढी दिसत असतात. दिवस मावळतो. लाईट बंद झाल्यासारखा भैरू झोपी जातो, सकाळी परत औत खांद्यावर घेऊन शेतावर जाण्यासाठी.
मग हे सगळे दोस्त कुठे तरी अतिकौटुंबिक सोहळ्यात भेटतात आणि त्यातला एखादा असह्य होऊन “ये जीना भी कोई जीना है लल्लू?” असं म्हणतो. मग मात्र त्यावर सगळे लल्लू पेटून उठतात, म्हणतात ,”नाही नाही त्रिवार नाही!” मग ठरतं. आपण काळवीट पार्टी करायची. अशी पार्टी की जिथे आपण वाघ असू, आणि काळवीटपण असू. जिथे काळविटासारखी शिंगं फुटतील आणि वाघासारख्या निर्भय डरकाळ्या फोडता येतील. जिथे पार्श्वभाग वर करून थेट नदीला तोंड लावून पाणी पिता येईल, आपण किती पितोय हे फक्त डोळे पाण्याच्या वर ठेवून पाहणारी मगर मात्र नसेल. काही काळ मग सगळे दोस्त स्वप्नरंजनात गुंग होतात. तितक्यात एखादा दीनदयाळू मित्र त्याची बायको भारतात जाणार असल्याचे शुभ वर्तमान देतो. मग हे शुभवर्तमान आणणाऱ्या त्या मित्राचे चौफेर कौतुक सुरू होते. “मातेव बारा धर्मदुतांमदलो एकलो, आनी ह्यां शुभवर्तमानाचो बरौवपी” असे स्थान तो मिळवतो. (गरजूंनी कोंकणीतील ख्रिस्तपुराण वाचावे). मग काळवीट पार्टी तर आता होणारच असं ठरतं. याचा गंध घटनास्थळापासून पंचवीस कदमांवर चरत (ही अतिशयोक्ती नाही) असलेल्या हरिणीला लगेच येतो. काळवीट पार्टीच्या चर्चेत गढलेल्या बैलांना आपल्या मागे उपर्निर्दिष्ट हरिणी कधी येऊन उभी राहिली याचा पत्ताही नसतो. तशी हरिणीलाही खात्री असते आपलं पात्र अभयारण्य सोडून कुठे जाणार नाही, पण सर्व हरिणींचा हा मूळ गुणधर्म असतो. वारा योग्य दिशेने वाहत असला तर हरिणीची चाहूल बरोबर तिच्या सहचराला लागते. त्याच्या बेंबीत फुटू लागलेली कस्तुरी क्षणार्धात नाहीशी होते. कुणीही काहीही विचारलेलं नसताना हा काळवीट कसंनुसं हसतो आणि “काय नाय असंच..” असं पुटपुटतो. खुराने कार्पेट खरडत राहतो. हरिणी निघून जाते. बाकीचे काळवीट तुझं तू निस्तर रे बाबा अशा नजरेने पाहत राहतात. काही जण आपल्या हरिणीपाशी जाऊन उगाच तिची चौकशी करून काही ऐकलं वगैरे नाही ना याची चाचपणी करून येतात. पण तरीही पार्टी तो होके रहेगी असा निर्णय होतो. दिवसही ठरतो.
पुढे यथावकाश ती हरिणी भारतात जातेसुद्धा. तिचा धीट काळवीट मुलांना गाडीत कोंबून या क्लासला ने, त्या प्रॅक्टिसला ने, त्यांचा ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स, डिनर बनव यात बुडून जातो. हरिणीने तसं टाईमटेबलच लावून दिलेलं असतं. सकाळी संध्याकाळी स्काईपवर रीतसर रिपोर्ट द्यावा लागतो. हा काळवीट आतुरतेने त्या दिवसाची वाट पहात बसतो. आणि तो दिवसही येतो. मग सगळी तयारी करून तो बसतो. मुलांना स्लीपओव्हरला सोडायचं असतं. निघणार एवढ्यात ज्याच्याकडे सोडायचं असतं तो मित्रच त्याच्या मुलांना घेऊन दारात उभा असतो. पाच मिनिटांत बाकीच्या काळविटांच्याही गाड्या येऊन लागतात. त्यांच्याही गाड्यांतून चिल्लीपिल्ली उतरतात. पुढील पाच मिनिटांत घरात दहा बारा पोरं रणकंदन सुरू करतात. या काळविटाला काय झालं तेही कळत नाही. मग हळूहळू इतर काळविटांबरोबर त्याला कळतं की सर्व हरिणींनी मिळून काळवीट पार्टीला चार चांद लावले आहेत. सर्व हरिणी मस्तपैकी लेडीज् नाईटआऊटला गेल्या आहेत, पोरांची जबाबदारी आपल्यावर आहे. काळवीट सगळ्या बाटल्या लपवतो आणि फ्रीजमधून ज्यूसचे कॅन बाहेर काढतो. काही कार्ट्यांचा कार्टूनशिवाय जीव चाललेला असतो. काळवीट निमूटपणे फुटबाॅलचा गेम बंद करून कार्टून चॅनेल लावतो. काही कार्टी दुसऱ्या टीव्हीवर ऑनलाईन काॅल ऑफ ड्यूटी चालू करतात. आता काळविटांच्या लेकुरवाळ्या गाई झालेल्या असतात. गप्पांचे विषय स्कूल रेटिंग, स्कूल टॅक्स, एसएटी स्कोअर्स पासून लेटेस्ट डाएट फॅड इतक्या रेंजमध्ये फिरत असतात. काळवीट पिझ्झा मागवतो. हा पार्टीचा हाय पाॅईंट असतो. पोरं पिझ्झ्यावर झडप घालतात आणि पाच मिनिटांत बाॅक्सेसमध्ये कडा तेवढ्या सोडून आपली काॅल ऑफ ड्यूटी निभावण्यासाठी निघून जातात. त्यानंतर सुरू होतात प्रत्येक पोराच्या मातेचे फोन आपापल्या काळविटाला. तिकडे मार्गारिटाचे सिप घेत घेत “इज ही डुईंग ओके?” असे काळजीयुक्त प्रश्न झडतात. या काळविटाचं कलत्रही तिकडे जेटलॅगमुळे पहाटे तीन वाजताच जागं झालेलं असतं. तेही फोन करतं. पोरांपासून, फ्रिजमधलं अन्न, डिशवाॅशरमधली भांडी इथपर्यंत स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी होते. रात्री अकरा वाजेपर्यंत सगळे काळवीट जागा मिळेल तिथे पसरून घोरत असतात. पोरं त्यांच्या कर्तव्यापासून जराही न ढळता कार्यमग्न असतात. कधीतरी एक दीड वाजता सगळे काळवीट लळतलोंबत गाड्यांत बसतात. सकाळी पोरांना न्यायला येतो असं म्हणून अदृश्य होतात. आपला काळवीट नशिबी आलेलं खिल्लार राखत बसतो. पोरं सहा वाजताच उठवून सीरीयल्स, पॅनकेक, एग्ज, चाॅकलेट मिल्क वगैरे सुरू करतात. काळवीट सगळं करतो. खिल्लार आपापल्या गोठ्यात परत जाईपर्यंत दुपारचे बारा वाजतात. काळवीट तडक झोपतो ते संध्याकाळी सहा वाजता उठतो. तेही भारतात रिपोर्ट द्यायची वेळ होते म्हणून. आता उद्या परत ऑफिस. म्हणजे भैरू उठणार, औत खांद्यावर घेऊन शेताला जाणार. समोर स्काईपवर हरिणी विचारत असते,”काय, काल कशी काय झाली काळवीट पार्टी?” काळवीट निस्तेज आवाजात इट वाॅज फन असं सांगतो. ते सांगताना त्याच्या बेंबीतील कस्तुरीचा कोळसा झालेला असतो.