![]() |
सूर्याच्या उत्तरायणाची चर्चा चालू आहे |
चष्म्याच्या काचांवरून माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत “ग्रॅंट मंजूर झालीय का?” असा प्रश्न त्यांनी केला. त्यांच्या समोर न्यूयाॅर्क स्टाॅक एक्स्चेंजच्या बाहेर असलेल्या बैलाचे चित्र पडले होते. त्याचं निरीक्षण करत असताना मी व्यत्यय आणला होता.
“हे चित्र पहा. तुला प्रामुख्याने यात काय दिसते?” गंभीरपणे त्यांनी मला विचारले.
चित्र बैलाच्या मागून काढलेले असल्याने मी विशिष्ट अशा कुठल्याच अवयवाकडे न पाहण्याचा प्रयत्न करत “अनिर्बंध अर्थव्यवस्थेची दुर्दम्य अशी शक्ती आणि वाटेत येईल त्याला आडवे करण्याची इच्छाशक्ती याचं सम्यक् दर्शन हा बैल घडवतो.” असं सरांना इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात मी म्हणालो. सर माझ्याकडे टक लावून पाहत राहिले. मी अस्वस्थ झालो. बैलतुंबडे सर ज्या कुतूहलाने बैलाचे चित्र पाहत होते त्याच कुतूहलाने माझ्याकडे पाहत होते. प्रतिक्षिप्त क्रियेने मी हाताने लज्जारक्षण केले. चेनबिन ठीक आहे ना ते चाचपून पाहिले. सगळं आलबेल होतं. सर शांतपणे म्हणाले,”चौकटबद्ध साचेबंद जीवन जगताना भाषेच्या अभावामुळे जी नैसर्गिक कुचंबणा होते, त्यातून प्रथम वैफल्य आणि मग चीड अशा भावनांतून त्याला मुसंडी मारून जो प्रथम दृष्टीस पडेल त्याच्या जे काही प्रथम गवसेल तिथे शृंग घुसवून विद्ध करणे ही इच्छा बाळगणारा हा वृषभ आहे.” याचे वृषण हे कुणाच्या बापालाही घाबरत नसल्याचे द्योतक आहेत. मी संकोचलो. पण बैलतुंबडे संथपणे बोलत राहिले. “याचे एक पाऊल आक्रमकपणे पुढे टाकले आहे. मान खाली झुकवून कुणाचेही न ऐकण्याचा निर्धार दाखवला आहे. शेपूट केवळ माशा हाकलण्यासाठी नसून बंडखोरपणाने सळसळत आहे. हे पूर्ण शिल्प एका विलक्षण मानसिकतेचे द्योतक आहे. जी मला वाटतं प्राचीन आहे. प्राचीन काळात जेव्हा भाषा आणि शिंगं तेवढी प्रगत नव्हती त्यावेळी व्यक्त होण्याची प्रचंड कुचंबणा होत असावी. आज फेसबुक आदि माध्यमे उपलब्ध आहेत. त्यायोगे कित्येक शृंगं, टापा, लत्ता, शेपट्या व्यक्त होताहेत. त्याकाळी व्यक्त होण्याची काय साधनं होती यावर तू संशोधन करावंस असं मी सुचवतो. पुरातन प्रागैतिक कलेच्या इतिहासाचा तू मागोवा घ्यावास.” ते थांबले. मी त्यांच्या पाया पडून बाहेर पडलो. एक नवी दिशा मिळाली होती. मोठी माणसे त्यांना नकळत छोट्या माणसांचे आयुष्य घडवत असतात ती अशी.
त्यानंतर मी झपाटून कामाला लागलो. मानवी जीवनाचा इतिहास तसा खूप जुना आहे. परंतु लेखनकला अस्तित्वात येईपर्यत तो पुसट आहे असे वाटत होते. परंतु तसे नाही हे लवकरच लक्षात आले. त्याकालीही कथाकथन, मतभेद, वादविवाद वगैरे वाड्ग्मयविशेष अस्तित्वात असून ते जाहीरपणे भिंतीवर चितारण्याची संकल्पना लोकसंमत होती असे प्रथमदर्शनी दिसले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरगोटा आणि पांडुबरा या ठिकाणी अश्मयुगीन पोस्ट्स चित्रांच्या रूपात आढळतात. बाणाची टोके तयार करणे, भाले बनवणे, अग्नीची सोय करणे, शिकार करणे, ते न जमल्यास निदान कंदमुळे गोळा करणे, सहचारिणीची चोरी होऊ नये यासाठी सतर्क राहणे इत्यादि दैनंदिन धकाधकीतून भित्तीचित्रे करण्यासाठी ही मंडळी वेळ काढत असत. यावरून जाहीरपणे व्यक्त होण्याची मानवी गरज अश्मयुगापासून असल्याचे अधोरेखित होते. हे मत प्रा. बैलतुंबडे यांनी आपल्या “दगड आणि छिन्नी” या ग्रंथात व्यक्त केले आहे.
नागरगोटा येथील भित्तीचित्रांमध्ये अनेक तात्कालीन विषय हाताळले आहेत. चरणारे हरीण, धावणारे हरीण, हातात हात घातलेल्या स्त्रीपुरुष मानवाकृती या बहुधा तत्कालीन हनीमूनच्या पोस्टपासून हातात भाले घेतलेली माणसे या तत्कालीन राजकीय सभांपर्यंतच्या पोस्ट्स आढळून देतात. काही चित्रांमध्ये रानडुक्कर, बैल अशा प्राण्यांचे रेखाटन दिसते. ते बहुधा तत्कालीन स्थानिक टोळी नेत्यांचे प्रतीकात्मक चित्र असावे असा अंदाज बांधता येतो. एक दोन चित्रांत हातात भाले घेतलेला जमाव त्यांच्या मागे भाले उगारून धावतो आहे असेही एक रेखाटन आढळून आले. त्यावरून ती नेते मंडळीच असावीत या मताला पुष्टी मिळते. काही चित्रांत गाढवे आढळून येतात. त्यांना तोटा नाही हे आजचे मत हे त्याकाळचेही प्रचलित मत असावे याचे आश्चर्य वाटले. पूर्वी गाढवे काम करीत असावीत असे निष्कर्षवजा मत आमचे मित्र विद्यावाचस्पतीकांक्षी प्रा. के. चिंतामणी यांनी त्यांच्या “भारतीय कर्तृत्वाचा समग्र इतिहास - खंड १ ला” या ग्रंथाच्या समारोपात व्यक्त केले आहे. जिज्ञासूंनी हा ग्रंथ मुळातूनच अभ्यासावा.
मी अभ्यासलेल्या सर्व भित्तीचित्रांत डुक्कर, गाढव या अशा प्राण्यांच्या रेखाचित्रांतून व्यक्त केलेल्या भावना अस्खलित आहेत.चित्रांत भाले, चाकू वगैरे काढले असल्याने त्यावरील तत्कालीन काॅमेंट्स खूपच संयत असण्याला मदत होत असावी. तशाही चित्रांखाली फारशा काॅमेंट्स दिसत नाहीत. त्यावरून त्या काळीही लाईक थोडे पोस्ट्च फार अशी अवस्था असल्याचे जाणवते. जो तो आपल्या आपल्या ह्यात असल्याने उचलला गेरू रंगवला दगड ही सामाजिक उत्साहाची स्थिती प्रकर्षाने जाणवते. पुढे याचा ऱ्हास होत जाऊन हल्ली ती केवळ महाराष्ट्रात उरली आहे असे माझे मार्गदर्शक प्रा. बैलतुंबडे** म्हणतात.
अनेक चित्रे अभ्यासल्यानंतर असे दिसले की वैयक्तिक चित्रे अथवा पोस्ट्स हळूहळू कमी होत जाऊन त्यांची जागा तत्कालीन महत्त्वपूर्ण घटना, युद्धे, चकमकी, संघर्ष आणि वन्यजीवन या विषयांनी घेतली असावी.
वानगीदाखल एक भित्तीचित्र इथे सोबत जोडले आहे. ते पहावे. येथे सूर्याचे उत्तरायण सुरू झाले की नाही यावर चर्चा सुरू आहे. साहजिकच त्यावर दुमत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. डावीकडील बाजू नाही म्हणणारी आहे. यावर कसलेच मत व्यक्त न करता वाद पाहत शांतपणे चरणारी काही मंडळीही त्यात दिसत आहेत. ऐतिहासिक पुराव्यांतून ज्यांच्या बाजूने भालेकरी जास्त त्यांची सांस्कृतिक बाजू इतरांना कालांतराने मनोमन पटत असल्याचे दिसते. फक्त शांतपणे चरणारी मंडळी हा प्राचीन कालापासून ते अर्वाचीन कालापर्यंत तेवढीच शांतपणे चरताना दिसून येतात. सूर्य कुठे का कलेना, तो आपल्या कर्माने कलतो किंवा कलंडतो अशी भूमिका ही तशी योग्यच मानायला हरकत नाही. अलीकडच्या काळात गवताची जागा पाॅपकाॅर्नने घेतली आहे एवढाच फरक दिसून येतो.
माझ्या काही सह-अध्यायींच्या मते भित्तिचित्रे हा रिकामपण सूचित करते. मूळचा लादला गेलेला शिकारीचा फिरतीचा व्यवसाय सोडून प्राथमिक शेतीचा स्थानिक व्यवसाय स्वीकारल्यानंतर प्रगत अशा आदिमानवाकडे वेळच वेळ राहू लागला. नांगरणी वगैरे कष्टाच्या कामासाठी बैल घोडे इत्यादी लोक होतेच. एकदा पेरणी केली की आकाशाकडे नजर लावण्याचे काम उरत असे. तेही संध्याकाळपर्यंतच. संध्याकाळी आजच्या काळी जशी आन्हिकांची सोय आहे तशी त्या काली अजून गवसली नव्हती. नाही म्हणायला मोहाची फुले वगैरे खाऊन मज्जा येते हे त्यांना ठाऊक झाले होते, परंतु अद्यापि सहकार तत्वाचा शोध लागलेला नसल्यामुळे ती मज्जा तिथेच थांबली होती. एकूण वेळच वेळ. रात्री काही काळ आपल्या स्त्रीसमवेत घालवण्याचा थोडा फार प्रयत्न होत असावा, पण भाषा नसण्याच्या काळातही स्त्री हा पदार्थ फार काळ सहन होत नसावा असे अनुमान काढण्यास जागा आहे. एका भित्तिचित्रात भिंतीवर डोके आपटण्याचे रेखाचित्र काढले आहे, शेजारी एक स्त्री आभूषणे घेऊन दुसरीकडेच पाहत बसली आहे असे रेखाटले आहे. हे चित्र ख्रिस्तपूर्व तीनहजार वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज आहे. हडप्पा संस्कृतीच्या अवशेषातही आभूषणांचे तुकडे मिळाले होतेच. संस्कृती बुडाली तरी दागिने तरतात. एकूण वेळ घालविण्याचे साधन म्हणून जे मनात येईल ते लगेच भिंतीवर रेखाटणे सुरु झाले असावे. दगडांची आणि खडकांची कमतरता नसल्याने आणि मुख्यत्वे ते सहज उपलब्ध असल्याने कुणाला कळों वा न कळों, व्यक्त व्हायला सुरुवात झाली असावी. परंतु हा तर्क मला मान्य नाही. माझ्या मते सस्तन प्राण्यात, मुख्यत्वे मनुष्य प्राण्यात एक विशिष्ट प्रकारची कंड अस्तित्वात असावी, जिचे कारण अजून विज्ञानास ज्ञात नसावे, त्या कंडुशमनार्थ भित्तिचित्रांद्वारे व्यक्त होण्यास सुरुवात झाली असावी. आणि म्हणूनच प्राचीन भित्तिचित्रे हे आद्य फेसबुक असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.
**संदर्भ - सामाजिक माध्यमांचा समाजमनावरचा परिणाम. लेखक - प्रा,. बैलतुंबडे. प्रबंधात हे वाक्य वापरणार असाल तर चांगले दोन स्टार दर्शवून तळटीपेत आपले नाव टाका असे प्रा. बैलतुंबडे मला म्हणाले आहेत. शोधग्रंथात तळटीपा स्वस्त पडतात. संशोधनावरचा खर्च वाचतो असे त्यांचे स्वत:चे मत आहे. व्हाय रीइन्व्हेंट द व्हील?