“बजरंग साहित्य चिवडा, प्रोप्रायटर मालपाणी”
सर्वात प्रथम, हा आदेश नसून आमचा पोटापाण्याचा धंदा आहे हे आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो.
आमचे येथे अत्यल्प दरात मागणीबरहुकूम खुसखुशीत, चटकदार साहित्य चिवडा बनवून मिळेल. कविता (एका कवितेवर दोन चारोळ्या फुकट देतो), लेख, जाहिरात, कार्यक्रमाचा इतिवृत्तांत, मंडळाचा वार्षिक अहवाल, मृत्यूलेख, श्रद्धांजली लेख, लग्नमुंजीची निमंत्रणपत्रिका, मंगलाष्टके, राजकीय विश्लेषण, वैचारिक लेख, प्रवासवर्णन, ललित, विडंबन, प्रहसन, सकाळी पाठवण्यासाठी लागणारे सुविचार, ओव्या, आरत्या, अभंग, शब्दकोडी, या आठवड्यात करावयाची शेतीची कामे, नाटकसिनेमांचे समीक्षण, टीका (ज्ञानेश्वरीवरील टीकेसाठी वेगळा आकार), फेसबुक व्हाॅटस्ॲपसाठी पोस्ट (किमान पन्नास लाईक्सची हमी, परंतु त्यासाठी आपली मित्रसंख्या किमान ४९९९ असणे आवश्यक) आणि इतर अनेक साहित्यप्रकारांचा चटपटीत चिवडा आम्ही करून देतो. विदेशी साहित्यप्रकारसुद्धा हाताळले जातील.
आमचे पदार्थ आजवर अनेक गिऱ्हाईकांनी चिवडले आहेत आणि ते अत्यंत समाधानी आहेत. “आपली स्तुती सांगे तो येक मूर्ख” हे आम्हीच दासबोध नावाच्या ग्रंथाच्या ऑर्डरसाठी रा. रा.नारायण ठोसर (मु. पो. जांब, तालुका अंबड, जालना) यांना लिहून दिले होते. त्यांनी पुढे संन्यास पत्करला असे आमच्या कानी आले होते. पण तो आमच्या साहित्याच्या प्रभावाखाली नसून अन्य काही दडपणाखाली घेतला एवढेच आम्ही आपणांस सांगतो. तस्मात्, आमची स्तुती आम्हीच न करता काही ग्राहकांनी आमच्यावर उधळलेली स्तुतीसुमने वानगीदाखल खाली देत आहोत.
“आम्हाला आमच्या वडिलांचे निधनसमयी श्रद्धांजलीची एक भावपूर्ण कविता लिहून हवी होती. पेपरवाल्यांनी रात्री दहानंतर मजकूर दिल्यास उद्याच्या पेपरमध्ये टाकता येणार नाही असे सांगितले होते. मग आमचे पिताश्रींचा फोटो आणि पेपरवाल्यांचाच ष्टॅंडर्ड उदबत्ती, फुलांचा ब्लाॅक एवढेच आले असते. पण पेपरवाले पैसे तेवढेच घेणार होते. अशा वेळी श्री. मालपाणी यांनी तात्काळ उभ्या जागी कविता करून दिली आणि आमचे नुकसान टाळले.
चंदनासम झिजले
परि पुण्यच उगळले
वादळात वाकले
परि ना मोडले
तात्यांशिवाय अता,
अवघे गाव आडवे झाले ॥
अशी ती कविता होती. आजही वाचली की डोळ्यात पाणी येते. आम्ही आमच्या घरातील पुढील प्रत्येक प्रसंगासाठी श्री. मालपाणी यांच्याकडेच जायचे पक्के केले आहे.” - श्री. अनिल तात्यासो कडलासकर पाटील (कडलास)
“हल्ली मराठी कोण बोलतो आणि लिहितो? आम्हाला शाळेत ओनली एक पीरीयड आहे. स्साॅलिड बोअर. आय मीन, फ्यूचरमध्ये कुठे ही लॅंग्वेज लागणार? मी माॅमडॅडला सरळ सांगितलं, लुक! आय डोन्ट गिव्ह अ फ.. काय बरं तो वर्ड, हां! फुटकी कवडी, टू धिस! फेल तर फेल. सबमिशनसाठी उद्या एक एस्से पाहिजे आहे मराठीत. सब्जेक्ट - माझी मराठी अमृताते पैजा जिंकी. व्हाॅटेव्हर! पैजा बिजा कॅसिनोत. तुम्ही लिहून देणार तर द्या नाय दिलात तरी चालेल. पण आपल्या फादरचे काॅन्टॅक्ट्स खूप. लगेच फोन लावला कुणाला तरी. मग बोलला, चिल, एस्से भेटेल उद्या सकाळी. आणि आय स्वेअर, सकाळी दूधवाल्या भय्याच्या आधी मालपाणी होम डिलिव्हरी गाय दारात उभा! मी त्याला साॅलिड हग करून बोललो, यू आर माय सेव्हियर! माझे सगळे एस्से आता मालपाणीकडे. “ - राहुल चक्रदेव, औंध,(टी वाय एस् एस् सी)
"श्री. मालपाणी यांजकडून मी गेली वीस वर्षे काम करत असलेल्या किराणा दुकानचे मालक, श्री घसीटाराम डुंगरशी यांच्या एकसष्टीसाठी भाषण लिहून घेतले होते. छानच झाले होते. विशेषतः मालकांनी एकदा दिवाळीनिमित्त अख्ख्या स्टाफला मिठाईच्या बॉक्सबरोबर अकरा रुपयांचे भरघोस पोस्त दिले होते, तेव्हा सगळे कसे सद्गदित झाले होते तो प्रसंग मालपाणी यांनी इतका पिळवटणारा लिहिला होता की वाचताना मी खूप भावूक होऊन ते अकरा रुपये मालपाणींनाच देऊ केले होते. परंतु तेही धंद्याशी इतके एकनिष्ठ की त्यांनी त्यातले लेखाचे ठरलेले दहा रुपये वजा करून एक रुपया परत केला होता. परंतु, भाषण जरा लांबले होते. भाषणात वेळ काढून दुकानाचा वेळ घालवता असे मालकच ओरडले असते म्हणून ते लहान करून घ्यावे का असाही विचार डोक्यात होता. परवा गुरुवार पेठेत गेलो होतो. पाच वर्षांपूर्वी तिथून एक हाफ प्यांट शिवून घेतली होती. परंतु ती पृष्ठभागावर सैल होत होती म्हणून अल्टर करून घ्यावी म्हणून परत गेलो. शेजारीच मालपाणी यांचे दुकान. म्हटलं भाषणही तेवढ्यात अल्टर करून घ्यावे. प्यांट टाकली आणि गेलो. मालपाणी स्वतःच एक ऑर्डर करत बसले होते. कुणी तरी दहा कडव्यांच्या कवितेची चारोळी करून मागितली होती. तरीही ते म्हणाले, ठेवून जा. चहापाणी करून या अर्ध्या तासात.माणूस शब्दाचा पक्का हो! खरोखर त्यांनी काम करून ठेवलं होतं. चड्डीचं काम मात्र झालं नव्हतं. भाषण घेऊन परत आलो. बजरंग साहित्य चिवडा बेस्टच!" - श्री. वसंत दामले (पुणे)
"We, at "Maharashtrache Saraswat" , are committed to keep Marathi literature and Marathi culture alive. We encourage people to participate in all the maharashtrian cultural activities that we plan. Our language has thousands of years of history which we should not forget. Unfortunately, although we are proud marathi speakers at home, formal Marathi is at times very challenging, even to us. बजरंग साहित्य चिवडा ऑनलाईन सर्व्हिसेस always comes to our rescue, extending their translation skills. Their english to marathi translation services are awesome! They even offer the services after the working hours including late nights. Once Mr Malpani saved us from grave embarrassment. We were going to conduct a Elocution Competition. We were going to advertise "If you are shy or not shy, participate!" Our own President translated it to "तुम्हाला लाज असेल किंवा नसेल, तरी या स्पर्धेत भाग घ्या!" Mr Malpani noticed it before it was published and saved us. Bajrang Sahitya Chivda is definitely a savior of organizations like us!" - श्री. श्रीरंग कुलकर्णी (द. आफ्रिका)
काही गिऱ्हाईके आम्हाला विचारतात, तुम्ही दिलेल्या मालात आम्ही बदल करून वापरला तर चालेल का? आम्ही म्हणतो खुशाल करा. एकदा माल विकला आणि पावती फाडली की तो माल आमचा नसतोच. आम्ही दिलेल्या रसमलाईवर तुम्ही खुशाल आपल्या मेंदी लावलेल्या मिशीचे केस पखरून ते केशर आहे म्हणून तुमच्या पाहुण्यांना सांगितलेत तरी चालेल. आमचा माल विकला गेल्यावर आम्ही त्याचे पुढे काय होते त्याची चिंता करीत नाही. कृष्णातीरी त्याचे श्राद्ध घालून मोकळे होतो. श्रीकृष्णार्पणमस्तु!
आपले नम्र,
प्रो. किशोर मालपाणी