Sunday, December 28, 2014

त्याच तिकिटावर तोच खेळ

अहाहा! या दिल्लीच्या २ डिग्रीमध्ये कसं अगदी उल्हसित वाटतं आहे. इतके दिवस जी मरगळ दाटली होती ती पार पळाली आहे. होय, याला कारणीभूत केवळ एक आणि एकच, आमचे सकलमुगुटमंडित निधर्मीप्रतिपालक कडकनियमेश्वर भ्रष्टाचारविध्वंसनिधान आपनृपति यांनी शेवटी युद्धघोषणा केली! सत्ता सोडून वर्ष व्हायला आलं. मुख्यमंत्रीपदाची पहिली पुण्यतिथी साजरी करण्याचा प्रस्ताव काही कार्यकर्त्यांनी मांडला होता. त्यानिमित्ताने निधी गोळा करता येईल असाही एक विचार त्यामागे होता. आणि तो योग्यही होता. नमोंच्या भाषणासाठी लोक पाच रुपये देऊ शकतात तर आपल्या बलिदानाच्या पुण्यतिथीला देऊ शकणार नाहीत? सहानुभूती म्हणून तरी? नक्कीच देतील. का नाही देणार? बुडत्याला हात देणे आपली संस्कृती आहे. अशी चर्चा झाली. मग किती लोक पैसे देऊन येतील याचा अंदाज घेतला गेला. आणि असं लक्षात आलं की हजेरी लावणारे बहुतेक आपलेच कार्यकर्ते असतील. मग आपल्याच लोकांना का नाडायचं असा विचार पुढं आला आणि पुण्यतिथीचा कार्यक्रमच बारगळला. नाहीतरी देशभरातून मोजून पंचवीस तीस कार्यकर्ते हजर राहतील असाच होरा होता. उगाच शेदोनशे रुपयांसाठी कशाला मरा? जागेचं भाडंच जास्त व्हायचं. तसं आम्ही आमचं श्रद्धांजलीवजा भाषण तयार ठेवलं होतंच. ते याप्रमाणे - "मित्रहो, आज आपण येथे जमलो आहोत ते दु:ख व्यक्त करण्यासाठी नाही तर एका अल्प पण तेजस्वी अशा जगण्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी. ज्याप्रमाणे कापूर भुरूभुरू जळतो, त्याचे ते जळणे अल्पजीवी असते, पण ज्योत प्रखर असते. जळून गेल्यावर त्याची नामोनिशाणीही राहत नाही. उगाच मागाहून दुसऱ्यांना केर काढावा लागत नाही. त्याचप्रमाणे ही कारकीर्द होती. उगाच बळंच एवढं एवढं तेल घालत ती टिकवून ठेवली नाही. जगावे तर स्वाभिमानाने नाही तर मरावे असा विचार करून सत्ता स्वीकारली गेली. पण आपल्याला कोंडीत पकडले गेले. इकडे पोलिस तर तिकडे लोकसभा निवडणुका अशा विचारद्वंद्वात स्वाभिमानाने मरावे आणि लोकसभेरूपी उरावे असा निर्णय घेतला गेला. पण मित्रहो, अशा देदीप्यमान मरण्याला जपानमध्ये हाराकिरी म्हणतात आणि ती अत्यंत मानाची मानली जाते. तेव्हा, त्याचा अभिमान बाळगा. पुन्हा जर अशी संधी मिळाली तर अशा पन्नास हाराकिऱ्या करायला आपण तयार आहोत ही खात्री बाळगा." अतिशय कौतुकाने मी माझे हे भाषण आमचे युद्धनीतीनिपुण सेनापती प्रशांत भूषण यांना दाखवले तर त्यांच्या पसंतीस आले नाही. "आम्ही बोंबलून सांगत होतो, राजीनामा देऊ नका. पण नाही. हाराकिरीची हौस त्यांचीच. उगाच त्यांना डोक्यावर चढवून ठेवू नका असल्या भाषणानं. सत्तेत येण्यापेक्षा राजीनामा देण्यात जास्त रस असतो त्यांना." असे ते म्हणाले. तरीही आम्ही हे भाषण आमच्या भ्रष्टाचारविरोधमार्तंडांना दाखवलेच. ते सद्गदित होऊन "तूच आम्हांला खरे ओळखलेस रे बाबा. टोपीत टोपी आपची आणि झिंगेत झिंग हौतात्म्याची. राजीनामा देऊन अकरा महिने उलटले पण उतरत नाही ती नशा. ते रस्त्यावर अंग लोटून देणे, त्रागा करणे, त्या टीव्हीवरच्या भारलेल्या मुलाखती, ते दीक्षितांच्या विरोधातील पुरावे, त्या रिक्षेवाल्याच्या थपडा, थपडेनंतर सुरू झालेला मदतीचा ओघ, स्वत: रात्र रात्र जागून निवडलेले उमेदवार, त्या गोल टोपी घालून केलेल्या इफ्तार पार्ट्या. सगळं कसं काल परवा घडल्यासारखं वाटते आहे. " त्या सर्व आठवणीत गढून ते उन्मनी अवस्थेत गेल्यासारखे दिसत होते. त्यांचे डोळे अर्धोन्मीलित होते. डोक्यावर गुंडाळलेला मफलर त्यांच्या मस्तकाभोवती एखाद्या प्रभावळीप्रमाणे शोभत होता. चेहऱ्यावर निद्रिस्त गौतम बुद्धाप्रमाणे एक शांत समाधानी मंद स्मित विलसत होते. जगीं सर्व सूखी असा कोण आहे या प्रश्नाचे उत्तर आमच्यासमोर खुरमांडी घालून अदृश्य सूत कातत बसले होते. सुताचा वापर कुणी कसा करावा त्यावर त्याचे यश अवलंबून असते असा एक विचार आमच्या मनात येऊन गेला. भाजपला सूत चांगले जमवता येते, कॉंग्रेसला ते काढता येते, तृणमूलला त्याची वात बनवता येते, माकपला त्याची वाट लावता येते, सेनेला सरळ असलेले वाकडे करता येते, मनसेला कुणी न विचारले तरी सरळ करता येते, आम्हाला नुसतेच कातता येते. लोकशाही लोकशाही ते यालाच म्हणतात काय? एक सूत सात जणांनी मिळून नष्ट करावे. गांधीजींनी उगाच चरख्याचा आटापिटा केला.

आम्ही पुण्यतिथी साजरा करण्याचा मानस आमच्या जगज्जेत्या (पक्षी: दिल्ली चतु:सीमा आणि हरियाणाचा काही दुर्लक्षित भाग) नेत्याच्या चरणी ठेवला आणि म्हणालो,"स्वामी! सैनिकांत मरगळ आली आहे. काही शिलेदारांनी आपली घोडी चौपाटीवर भाड्याने दिली आहेत, काहींनी तिथेच पाणीपुरी भेळेच्या गाड्या टाकल्या आहेत. काही जण सिक्युरिटी गार्ड झाले आहेत तर उरलेले होमगार्डमध्ये भरती झाले आहेत. आपले परदेशातील सांडणीस्वार हाकायला काही राहिले नाही म्हणून फावल्या वेळात खरोखरच्या शेळ्या हाकू लागले आहेत. आजही काही परमभक्त आपला स्काईपकॉल येईल म्हणून रोज लॉगिन करतात आणि दु:खी अंत:करणाने दिल्लीविजय पोथी वाचत बसतात. तो कॉल येतच नाही स्वामी! येतच नाही! हे सर्व आपणच बदलू शकाल. आपल्याला पुन: एकदा सोशलमीडिया प्रांती घोडदौड करताना पाहायचे आहे आम्हाला. पूर्वी आपण भाजपला लवलेटर पाठवावे काय इथपासून आता प्यांट बदलावी काय इथवरच्या सर्व प्रश्नी आमचे आणि जन्तेचे सल्ले घेत होतात. त्याने सैनिक भारावून जात असत. आपण नुसते एक ट्विट करायचा अवकाश आपले निष्ठावंत स्मार्टफोनधारी सैनिक टिवटीव (पक्षी:रीट्विट) करून एकच जल्लोष करत असत. रणांगणावर ऐन युद्धप्रसंगी आपल्याला प्यांट बदलता यावी म्हणून सर्व सैनिक कसे रोमन डिफेन्स फ़ॉर्ममध्ये आपल्याभोवती कोंडाळे करून आडोसा देत असत. मग त्यात आपण निर्धास्तपणे प्यांटच काय, काहीही बदलू शकत होतात. ते स्पिरीट पुन्हा आणा! तो युद्धाचा जोश परत आणा!" एवढे बोलून आम्ही थांबलो. दम लागला होता. भाषणाचीही सवय मोडली आहे. हे ऐकून माजी दिल्लीनृपतींच्या चेहऱ्यावर येशू ख्रिस्तासारखे करुणप्रेमळ भाव उमटले. "वत्सा! जा, सैनिकांत हे शुभ वर्तमान दे! दिल्लीवर पुन:श्च स्वारी करायची! होय. म्हणावे परजा तुमचे ते स्मार्ट फोन पुन्हा. समस्या त्याच आहेत, त्यामुळे आपली आश्वासने तीच आहेत, उपाय तेच आहेत. फक्त ते थप्पड वगैरेचं नाटक यावेळेला नको बुवा. नाहीतर बदल म्हणून यावेळी पृष्ठभागी लाथ वगैरे अॅरेंज करणार असाल तर यावेळी त्यासाठी पात्र वेगळे निवडा. त्यासाठी खूप गणंग आहेत पडलेले. आपल्या सुदैवाने भ्रष्टाचार काही संपत नाही. भाजप भ्रष्टाचारीच हे पुन: पुन: ओरडून सांगू. पुन: धुरळा उडवू. सत्तेत येऊ अथवा न येऊ. सत्तेत आल्यास पुन्हा आंदोलन करू आणि भव्यदिव्य पद्धतीने सत्ता सोडू. अर्थात, मागील निवडणुकीत आपण निवडून येऊ, मग खरंच काही करावं लागेल अशी चिंता आपल्याला सारखी कुरतडत होती. यावेळी तीही चिंता नाही. शिवाय गेल्या वेळी तिकीट दिलेल्या पस्तीस जणांना मी गाळले आहे. त्यात नऊ आमदार आहेत! आहे की नाही क्रांतिकारी हे सर्व?  पण चिंता करू नकोस. यावेळी प्रत्येकाला हुतात्मा होण्याची संधी मिळेल याची ग्वाही मी देतो. तो कुमार विश्वास आत्तापासूनच हौतात्म्यावर कविता करू लागला आहे. कविला सफल प्रेमापेक्षा प्रेमभंगच अधिक आवडतो हेच खरे. " हे वचन ऐकून उल्हसित व्हावे की नुसतेच हसित व्हावे असा विचार आम्ही करू लागलो. "मग, पुण्यतिथीचे काय? करायची ना साजरी?" आम्ही पुन: विचारले. एवढी मेहनत घेऊन लिहिलेले भाषण निदान पंधरावीस जणांसमोरतरी वाचायला मिळायला हवे एवढाच उद्देश. "म्हणजे काय? जरूर करायची! जुन्या आठवणींना उजाळा नक्कीच देता येईल. आमच्या फोटोला हारबिर घालू नका म्हणजे झालं. झाली एवढी हार पुरे."  नृपति हासत म्हणाले. ते म्हणजे फारच विनोदी बुवा. हार शब्दावरती पण कोटी करायची म्हणजे काय. पुण्यतिथीला फोटोला हार कसा घालू आम्ही? तो कार्यक्रम जयंतीला करू.

निवडणुकीचे चिंतन शिबीर ठरले.  धोरण काय असाच कार्यकर्त्यांचा प्रश्न होता. त्याचे सहजसुंदर निराकरण झाले. मुळात समस्या तीच, जन्ता तेच, शत्रू तेच तर मग धोरण बदलायचे कारण काय असा उलट प्रश्न नृपतींनी विचारला. ज्या धोरणावर आपण पूर्वी निवडून आलो तेच राबवायचे. मग कुणी तरी विचारले,"परदेशी धोरण, काश्मीर धोरण याबाबत काय करायचे?" त्यावर ते मिष्कीलपणे हसले आणि त्यांनी खिशातून गोल टोपी काढून दाखवली. ती फडकावत ते म्हणाले,"नेहमी खिशात ठेवा ही टोपी. कामाला येते. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रश्नाला 'भ्रष्टाचार!' एवढेच उत्तर द्या." मागेही त्यांनी आम्हाला हेच सांगितले होते. हे आम्हाला घरी महागात पडले होते. घरी यायला उशीर होतो म्हणून बायकोने झापले आणि विचारले होते,"रोज कसा काय हो उशीर होतो तुम्हाला? काय करत काय असता ऑफिसमध्ये?" आम्ही गाफील होतो. आमच्याकडून घोकंपट्टी केलेले उत्तर गेले,"भ्रष्टाचार!" पुढे समजावताना नाकी नव आले होते. त्यामुळे सर्वांवर भ्रष्टाचार हे उत्तर असू शकत नाही. हे एकदा आम्ही पक्षाच्या बैठकीत सांगितले तर दुसऱ्याच दिवशी "भ्रष्टाचारावरील तुमचा विश्वास उडत चाललेला आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तेव्हा तुम्हांस पक्षातून काढून का टाकू नये?" अशी कारणे दाखवा नोटीस मिळाली. शेवटी आमच्या आळीतील "टुकार मारुती देवस्थान ट्रस्ट" विरुद्ध आंदोलन करून त्यांना त्यांचा वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर करायला लावला तेव्हा कुठे पुन्हा पक्षात स्थान मिळाले. ट्रस्टची वार्षिक उलाढाल नकद तीनशे साठ रुपये असून रंगकामावर रुपये दोनशेपन्नास खर्च दाखवण्यात आला होता. ट्रस्टपाशी केवळ दोनशेचाळीस रुपयांची पावती होती. दहा रुपये रंगाऱ्याच्या चहावर खर्च झाले हा ट्रस्टचा युक्तिवाद आम्ही मान्य केला नाही. शिवाय दर शनिवारी येणाऱ्या तीन ते पाच नारळांचा कुठेही उल्लेख दिसला नाही हेही आम्ही निदर्शनास आणून दिले. ट्रस्टने जाहीर माफी मागितली असून, यापुढील कारभारावर देखरेख करण्यासाठी अतिरिक्त सचिव म्हणून सध्या आमची नेमणूक केली आहे. असो. शिबीर संपल्यावर नृपतिंनी आम्हाला थांबवून घेतले आणि बोलले,"तुझे भाषण उत्तम आहे रे. जपून ठेव. पुढील पुण्यतिथीस उपयोगी पडेल." आम्ही ते केव्हाच ओळखले आहे.

Wednesday, December 24, 2014

रणछोडदास वांगडू

फना चित्रपट आणि पीके यात काय फरक आहे? म्हटलं तर काहीच नाही म्हटलं तर खूप काही. एकात दहशतवादाचे उदात्तीकरण तर दुसऱ्यात जे उदात्त आहे त्याचे दहशतीकरण. मनोरंजन सुद्धा दहशत माजवते. उदाहरणार्थ झी टीव्ही च्या सासू सून मालिका. त्यांनी तर "कौटुंबिक भयपट" हे नवीन दालन उघडले आहे. खानाच्या दहशतीतून आपण बाहेर पडायला तयार नाही बुवा. काही दिवसांपूर्वीच अफझलखानाने फौज पाठवून म्हाराष्ट्र काबीज केला. वास्तविक फौजेचा पाडावच व्हायचा, पण आयत्या वेळी म्हाराजांना वाघनखं काय घावली न्हाईत. फुडल्या वेळेला पघू असं म्हाराज म्हणाले आहेत. तो धुरळा खाली बसतोय न बसतोय तंवर या दुसऱ्या खानानं स्वारी केली. काय हे सगळे खान भारताच्या राशीला लागले आहेत कळत नाही. एक ककक क्किरन वाला खान, दुसरा चचच चश्मिष किरन वाला खान, तिसरा हिटअँडरन वाला खान. पहिल्याचा माथेफिरू प्रेमी बघून घाबरलो होतो, दुसऱ्याचं विदयुतमूत्रपरस्परसंबंध विषयक धक्कादायक ज्ञान पाहून काही दिवस  बाथरूममधला दिवा लावणं टाळलं होतं, तर तिसऱ्याच्या अफाट मैत्रिणीसंग्रहाबद्दल ऐकून काहीसं थक्क आणि बरंचसं खिन्न होत होतो. कक्ककिरन खान सोडून द्या. म्हणजे देवाला बकरा सोडतात तसा आम्ही त्याला पापस्तानसाठी सोडला आहे. असे सोडलेले बकरे बहुतांशी जे करत गावभर फिरतात तेच हा पण करतो. याला ढुशी दे त्याला पाड. विशेषत: वानखेडे स्टेडीयम दिसले की याचे डोके फिरते. शेवटी कंटाळून स्टेडीयमच्या अधिकाऱ्यांनी म्हणे शिवसेनेच्या वाघाचे चित्र गेटवर लावले आहे असे ऐकतो. दृष्ट लागू नये म्हणून मिरचीलिंबू टांगावे तसे. एका दगडात दोन पक्षी. स्वत:च गेटवर पाहरा देत असल्याने पीच खणता येत नाही, आणि चित्र बघून हा बकरा तिकडे फिरकत नाही. सल्लूमियां तेवढे हुशार निघाले. दर गणपतीला लालबागच्या राजाचे दर्शन घेतात असे ऐकले. असं काही ऐकलं की आम्हां  सहिष्णू हिंदू भोट मंडळींचे डोळे कसे भरून येतात. "तुम्ही काही म्हणा, सर्व धर्म सारखे हो. नमाज पढा, मोतमावलीला चर्चात जा किंवा किंवा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पाच तास रांगेत उभे राहा, चपला सगळीकडेच चोरीला जातात." असे आमचे मित्रवर्य श्री मोरेश्वर उर्फ मोरू याचे मत आहे. निधर्मीवादाचे याहून निष्पाप रूप आम्हांस माहीत नाही. त्यामुळे आम्ही यापैकी कुठेही गेलो तरी चपला पिशवीत घालून पिशवी पोटाशी धरून असतो. बाकी आमच्या निधर्मीवादाची आणखीही काही रूपे आहेत. त्यांचा उपयोग रोजांच्या दिवसांत शीरखुर्मा, बिर्याणी, तंदुरी, डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या पार्टीचे बोलावणे मिळवणे इत्यादी ऐहिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी होतो. आमचा स्वभाव एवंगुणविशिष्ट असल्याने आम्ही या खान मंडळींत आणि इतर हिंदू नटबोल्टांच्या चित्रपटात कधी फरक केला नाही. चित्रपट कुणाचाही असो, मध्यंतरात चहा आणि बटाटेवडा गरमागरम मिळाला की आमची फारशी तक्रार नसते. मोरू तर तीन बाहेर खातो आणि एक थेटरात घेऊन येऊन खातो. त्याला किती वेळा सांगितलं, अरे बाबा, तिथे ती हिरवीण छान मोहक, मादक दिसत हिरोच्या नाकापासून केवळ अर्ध्या इंचावर लाडात येऊन बोलते आहे, अशा वेळी लसूण घातलेल्या बटाटेवड्याचा खमंग वास नाकात घुसला की रसभंग होतो. आम्ही तुझ्या बटाटेवड्याकडे कौतुकाने पहायचं की पडद्याकडे? क्षणभर त्या नटाचंही चित्त विचलित होऊन तो म्हणायचा,"जरा थांब गो, हंयसर वड्याचो वास सुटलो आसा, मी पयलो भायेर जांवन वडो खातंय, मगे तुज्या गजाली ऐकतंय." माझ्या मनातील हिरो वैतागला की मालवणीत घुसतो. भद्रकाली प्रॉडक्शनची कृपा. तात्यांनू मापी करा.

मला हे असलं निधर्मी करण्यात हिंदी चित्रपटांनी भरपूर हातभार लावला आहे. मनमोहन देसाई या इसमानं तर माझंच काय माझ्या पिढीतल्या सर्वांचं बालपण संस्कारित केलं आहे. जत्रेत हरवणारी ती अश्राप भावंडं, निरुपा रॉय सारखी डीलक्स प्रेम करणारी (डीलक्सच. आमच्या मातोश्रींचं प्रेमळ बोलणं म्हणजे, हं ढोसा एवढं आणि उधळा गावभर! इथवर थांबायचं)  त्यांची ती आई, घरात लक्ष न देता आपल्या काळे धंदे करणाऱ्या बॉसकडे जास्त लक्ष देणारा निष्ठावंत बाप.  मग पुढं ही पोरं रीतसर हरवल्यानंतर आणि नियमाप्रमाणे आई आंधळीलंगडी  झाल्यावर निधर्मीपणाला ऊत यायचा. एक श्रद्धाळू हिंदू घरात, दुसरं जाळीचा बनियन घालून कोंबड्या बकऱ्यांच्या गर्दीत मोहल्लेगिरी करणारं, तिसरं कुणीच नाही म्हणून चर्चच्या फादरकडे अशी सर्वधर्मसमभावी वाटणी व्हायची. या जत्रेत हरवायचा आम्ही एवढा धसका घेतला होता की कोकणातल्या आमच्या घरापासून अर्ध्या किलोमीटरवरती भरणाऱ्या  जत्रेत मी आणि माझा भाऊ कधी एकत्र गेलो नाही. गावातील यच्चयावत जनता एकमेकाला ओळखत असतानासुद्धा आम्ही ही खबरदारी वयाच्या दहाव्या वर्षी घेत होतो हे मनमोहन देसाई यांचं कथालेखक-दिग्दर्शक म्हणून यशच म्हणावं लागेल. आज वाटतं गेलो असतो तर कदाचित आज आमचे बंधुराज एखाद्या धनाढ्य हिंदू कारखानदाराचे चिरंजीव आणि मी फादर ब्रॅगांझा यांच्या अनेक असल्या पाळलेल्या मुलांपैकी एक झालो असतो. मी शिकलो नसतो पण एक उत्तम गावगुंड म्हणून नाव कमावलं असतं. शर्टाची वरची दोन बटणं उघडी टाकून सेठी टेक्स्टाईल्स, सेठी एक्स्पोर्टस, सेठी बिल्डर्स, सेठी टाईल्स, सबकुच्च सेठी असल्या सगळ्या पाट्या एकाच गेट वर लावलेल्या बिल्डींगमध्ये भावाला भेटायला गेलो असतो. तिथं "ये मायकल किसीके लिये काम नै करता और जीझस छोडके किसीके सामने नै झुकता साब" टाईप डायलॉग मारले असते. मग पुढं यथावकाश एखादी झीनत अमान… जाऊ द्या, नशीब म्हणायचं. वाटायचं, कसलं आपण दररोज "भीमरूपी महारुद्रा" म्हणणारे भोट. चर्चात जायला हवं, तिथं म्हणे मासनंतर वाईन देतात. आपल्याकडे प्रसादाची वाट बघत अर्धा अर्धा तास आरत्या सहन करायच्या आणि शेवटी मिळणार काय तर फुटाणे किंवा शेंगदाणे. त्यातून शेवटचा तो एक कुजका शेंगदाणा. नको, नको! ती आठवण नको. पुढं मग ती आंधळी झालेली आई कैदेत ठेवलेल्या नवऱ्याला वाचवायला नेमकी शहरापासून दहा पंधरा किलोमीटर वर असलेल्या पडक्या किल्ल्यात येणं हाही एक दैवी चमत्कार असायचा. इथे साधं स्वारगेटवरून सदाशिवपेठेत जायला आढावसेनेच्या मनधरण्या कराव्या लागतात आणि इथं ही आंधळी लंगडी बाई, बस जात नाही रिक्षा जात नाही अशा आडवळणी जागेवर वेळेला हजर! दैवी चमत्कारच. मग आल्यासरशी काही तरी काम दिलं पाहिजेच. मग छानपैकी छातीत गोळीच लागायची. बाप वाचायचा. एवढी महान आई, पत्नी वाचवायचं काम आता भगवान, अल्ला आणि जीझस यांच्यावर येऊन पडायचं. मग देवळाचे कळस, मशिदीचे मिनार, चर्चची घंटा किंवा पियानो असे आळीपाळीने दाखवून आणि वाजवून झाले की या धर्मात आपसात कामाची वाटणी व्हायची. हिंदू धर्माकडे म्हातारीला मरू न देण्याचे, अल्लाकडे तिची दृष्टी परत आणण्याचे आणि जीझस कडे तिला स्वत:च्या पायावर पुन्हा उभे करण्याचे काम यायचं. कूलीमध्ये तर बच्चननं दर्ग्यातील चादर अंगावर येऊन पडल्यानंतर कित्येक गोळ्या छातीवर झेलल्या होत्या. त्याआधी तो  ब्रीचकँडीमध्ये अॅडमिट झाला होता तो आणभवही कामाला आला म्हणा.  हे असं सगळं असल्यामुळे का बरं आम्ही निधर्मी होणार नाही?

ही सगळी मजा या खान मंडळींनी हल्ली घालवून टाकली आहे. एक पन्नाशी ओलांडली तरी स्वत:ला एकविशीचा समजतो, स्वत:चं नाव राहुल असलं आणि हात फैलावून "मितवाsssss" केलं की सगळया लग्न झालेल्या न झालेल्या हिरवीणी येऊन गळ्यात पडतात असं त्याला वाटतं. किरणराव खाननं तर अलीकडे लोकांना खूप अपराधी वाटवण्याचं ठरवलं आहे. तारे जमीन पे मध्ये तो आईबापांना झापतो, एकूण समाजाला झापतो. ते पटलंही होतं. तसंच थ्री इडीयटसमध्ये आपल्या पोरांना कायपण करूद्या असा महत्वाचा संदेश दिला होता. त्यातील जीवघेणी स्पर्धा आणि काही ज्ञान मिळवण्यापेक्षा स्पर्धेत जिंकण्याची घाई या मुद्द्यांवर दिलेला भर पटला होता. या दोन्ही शिणमांत साहेब आपन सोता मातर लई हुशार पार्टी झाले होते. असं जनतेला डोस देऊन वर लै पैका मिळतो असं लक्षात आल्यावर मग रीतसर तो धंदाच करायचं ठरवलं. स्टार नेटवर्कमध्ये गाळा घेऊन टाकला. दुकानाचं नाव कसं आकर्षक पाहिजे, धंद्याला साजेसं. वर्षानुवर्षे भारतात चाललेलं, प्रत्यक्षात काही किंमत नसलेलं पण जाहीर चर्चेत मात्र सोन्याहून किमती असं वाक्य आयतंच मिळालं. सत्यमेव जयते! सदुसष्ट वर्षांत बिनमालाचं पूर्ण नफ्यात चाललेलं हे एकमेव जयते. पण खरं तर कच्चा माल भरपूर आहे. कर्मकांडाचं अवडंबर आहे, लोकांच्या दु:खाचं भांडवल करणारे बुवा आहेत, कुडमुडे ज्योतिषी आहेत. हिंदू सहिष्णुता पैशाला पासरी आहे. ती उत्प्रेरक म्हणून काम करेलच. आत्मनिंदा करण्यात हिंदू लोकांचा हात धरणारे कुणी नाही. इतर धर्मांत धर्माची टिंगलटवाळी क्षोभ उत्पन्न करते. हिंदू धर्मात तीच टिंगलटवाळी हास्य उत्पन्न करते. लोक पैसे टाकून ती टवाळी पाहतात. टवाळी करणाऱ्यांचा धीटपणा वाढतो. त्याला विरोध करणारे सनातनी ठरतात. विरोध करणारे काही धर्ममार्तंड नसतात. तो विरोध असतो टिंगलटवाळीला. धर्म ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. हिंदू धर्म सहिष्णु आहे म्हणजे काय तर ही वैयक्तिकता त्याने मान्य केली आहे एवढाच त्याचा अर्थ. सहिष्णुतेचा अर्थ म्हणजे तुम्ही तुम्हाला जी श्रद्धा असेल त्याची उपासना करा, मी माझ्या श्रद्धेची करतो. माझ्या श्रद्धेची टिंगलटवाळी करण्याची ती परवानगी नव्हे. बुवाबाजी, कर्मकांड हे टिंगलटवाळीचे विषय करून लोकप्रबोधन करायचे असेल तर ते ज्या ज्या धर्मात असेल त्याचे करा. हिंदू धर्माने सहिष्णुतेची धर्मशाळा उघडली आहे. त्यात कुणीही यावे, राहावे, पाहिजे तिथे शरीरधर्म करावा आणि निघून जावे अशी परिस्थिती झाली आहे. हाच प्रकार मशिदीत, मदरशांत करून पहा, तुमचा शीग कबाब होईल यांत शंका नाही. अंगाला नुसता स्पर्श केल्यानंतर पोलिओ झालेला चालू लागतो, मरणासन्न व्यक्ती बरी होते, असले ख्रिस्ती बुवाबाजीचे प्रकार सर्रास चालू आहेत त्याची टवाळी करा. हे सगळे थोतांड आहे ही "शुभ वार्ता" त्यांना द्या पाहू. टवाळीच करायची तर सर्व धर्मातील थोतांडावर करा. मग मानू आम्ही तुम्हाला निधर्मी. दु:खाची गोष्ट म्हणजे हिंदू लोकांतच ही स्वत:ची टवाळी करण्याचा प्रघात पडला आहे. घरचेच भेदी असले तर बाहेरचे तर फायदा घेणारच.

म्हणूनच आम्ही ठरवले आहे, स्वत:चे पैसे घालून आपलीच टिंगलटवाळी कशायला पहायची? त्यापेक्षा सनी देवलचे चित्रपट पाहू. लेकाचा बेंबीच्या देठापासून ओरडतो खच्चून, पण आपण थोर समाजसेवक असल्याचा आव तरी आणत नाही. व्हिसाबिसा नसला तरी पापस्तानात जाऊन तिथेही ओरडायची ताकद आहे त्यात. शिवाय हिंदू नाही, मुसलमान नाही, किरीस्तांव पण नाही. आपला शूरवीर शीख सरदार आहे. अमीरला म्हणावं कर टवाळी त्यांच्या पगडीची, रणछोडदास तर होईलच, वर दोन्ही तंगडूचं वांगडू नक्की होईल.

Friday, December 5, 2014

क्लासचा बिझनेस

आयला, भलतीच भानगड होऊन बसली. एकदा साधेपणाचा ब्रँड घेऊन बसलो की झालं, पुढे आयुष्यभर बळेबळेच खादी नेसायला लावतात, सूत कातायला लावतात हो! अहो, निवडणुकातला साधेपणा तो काय, तो आवश्यकच होता. म्हणून आम्ही काय आयुष्यभर नॅनोतून फिरायचं? गांधींचं आपलं बरं होतं, जागेचा प्रश्न नव्हता. आश्रमच्या आश्रम होता बागडायला. इथं आम्ही एक सरकारी फ्लॅट काय घेतला, आमच्या साधेपणाची आयमाय निघाली. शिवाय पूर्वी विमान अथवा जहाजप्रवास फारसे कुणी करत नसत. मग इकॉनॉमी क्लास काय आणि बिझनेस क्लास काय, त्यांना अख्खं विमान किंवा जहाज मिळालं असेल गोलमेज परिषदेला जाताना. आणि मी मुंबईहून पुण्याला जायचं होतं तेव्हा नुसतं म्हटलं, जरा फर्स्ट क्लास इंद्रायणीचं तिकीट मिळतं का बघा हो, या लोकलमधून प्रवास करून जीव शिणला नुसता. माझं पाकीट गेलं, घड्याळ तर माझ्या डोळ्यासमोर कुणीतरी काढून घेतलं. ते वाचवायला हात सोडला असता तर थेट ताशी ६० किमीच्या गतीने रुळावर पडलो असतो. निम्मा दाराबाहेर लोंबकळत होतो. च्यायला त्यातून मुंबईचे लोक एक नंबरचे बदमाश नुसते. फास्ट लोकल धरली होती. घाटकोपर स्टेशनातून जाताना कुणीतरी सणसणीत सटका ठेवून दिला मला. पार्श्वभाग अजून ठणकतो कधी कधी. मुंबईतला आम आदमी असाच प्रवास करतो असं वर ऐकायला मिळालं. म्हटलं पुण्याला जाताना तरी निदान पार्श्वभाग पूर्ण टेकायला मिळाला तर किती बरं असं वाटत होतं. पण तेही नाही. पक्षाकडे निधी नाही म्हणून रात्रीच्या पुणे पॅसेंजरने जा म्हणे. दिल्लीतून निघताना ही म्हणालीच होती, "मुंबईला जाताय, धड परत या म्हणजे मिळवली. आणि हो, तुमच्या त्या आम बिम भानगडीतून माझी आणि मुलांची आठवण झालीच तर लिंकिंग रोड का काय आहे म्हणे तिथून काही कपडे तरी आणा. तुमच्यासाठी मफलर बिफलर स्वस्तात मिळतो का पहा. दोन वर्षं झाली एकच वापरताय!". युद्धाला चाललेल्या योद्ध्याला ओवाळताना,"जरा युद्ध सांभाळूनच करा बरं का! मागच्या युद्धात सुरवार नको तिथे फाटली होती. आता ठिगळ लावलंय तसं, पण केव्हाही उसवेल हो!" असं म्हटल्यावर जे होत असेल तसंच माझं झालं. पण एक सांगतो, मुंबई पुणे पॅसेंजरमधील लाकडी बाकातील रेसिडंट ढेकूण हे एक भीषण सत्य आहे. पण एक बरं झालं, पार्श्वभाग जो ठणकत होता तो थांबून खाजायला लागला. ठणक्यापेक्षा खाज बरी! पण हा ठणका परवडला असा अनुभव दुसऱ्या दिवशी पुणेकरांनी दिला. पुण्यातील सभेत सर्व समाजातील, सर्व वयोगटातील लोक हजर होते. तिकीट नसेल तर पुण्यातील लोक शोकसभेलाही तितक्याच उत्साहाने जातात असे कळले. त्यातील इयत्ता तिसरीतील पुणेरी विद्वानाने (पुण्यात सर्व लोक विद्वान या नावाने संबोधले जातात असे मला आधीच बजावून सांगण्यात आले होते.) प्रथम "नीट ताठ उभे राहा" असे खडसावून सत्तर-ऐंशीच्या दशकातील बालसंस्कृती परत आणण्यासाठी तुम्ही काय कराल असे विचारले. त्यावर मी गमतीने गेलेले "बाल" परत येत नसतात अशी कोटी केली तर "तुमच्या या उथळ विधानाचा मी निषेध करतो. तुमचा पक्ष आमच्या समस्या काय सोडवणार? तुम्हाला अजिबात कशाचे गांभीर्य नाही." असे म्हणून त्याने सभात्याग केला. जाताना,"अंकल, पण तुम्ही आमच्या रिक्षावाल्या काकांसारखे दिसता हं." असे म्हणायला तो विसरला नाही. नंतर एका बॅकपॅक लावलेल्या तरुणाने,"आपण दिल्लीत आम्हाला सही पेरू दिलात. जबरी हं काका! यंदाच्या पुरुषोत्तम करंडकाला आमच्या नाटकाचं दिग्दर्शन कराल का तुम्ही? 'दिल्लीचं काय करायचं' अशी एक छोटी नाटिका आहे. दिग्दर्शक मध्येच सोडून गेल्यानंतर नाटक कसं पोकळीत चालू राहतं, त्याला भेदक वास्तवता कशी येते अशी काहीशी संकल्पना आहे. अलिप्ततेचं (alienation) तंत्र प्रभावीपणे तुम्हीच दाखवाल. या तंत्रात प्रेक्षक अलिप्त होऊन नाटक पाहतो, नंतर घरी जाऊन पश्चात्ताप करत बसतो. " त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या तंत्राचं प्रात्यक्षिक तिथल्यातिथेच करून दाखवलं. पण एक वृद्ध गृहस्थ मात्र माझ्याकडे पाहून मान डोलवत होते. माझे सर्व भाषण त्यांना पटले असावे. मी स्वत:च त्यांच्याकडे गेलो आणि नमस्कार केला. "आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक आमच्या पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देताहेत हे पाहून आनंद झाला. " असे मी म्हणालो. तर त्यांनी चारचौघांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात "अॅं!!!" असे उद्गार काढले. मग नंतर त्यांच्या काहीतरी लक्षात येऊन त्यांनी शर्टाच्या खिशातून ऐकू येण्याचे यंत्र बाहेर काढले आणि कानात बसवले. म्हणाले,"हां! आता बोला! संपलं का तुमचं भाषण? शिंचे हे यंत्र लावण्याचे नेहमी विसरतो मी. सवय नाहीये ना अजून! शिवाय घरी काही उपयोग नाही म्हणून काढूनच ठेवलेले असते. ह्या: ह्या: ह्या:! तुमचेही कुटुंब असेच बोलत असेल ना घरी! असो, फिरत फिरत या बाजूस आलो होतो, तुमच्या सभेचा बोर्ड दिसला. म्हटलं बघावं काय आहे ते. काही काही वेळा काहीतरी मनोरंजक सापडते. मागच्या आठवड्यात कुणी तरी असेच लडाखला जाऊन आले त्या प्रवासाचे फोटोसहित कथन होते, मज्जा आली. मानसरोवर काय सुरेख दिसते हो!" कार्यक्रम संपला तेव्हा डोके अशक्य ठणकू लागले होते. म्हटलं परत मुंबईला जाताना आता सीटवर शीर्षासन करून डोके ढेकणांच्या ताब्यात द्यावे.

आमचे बाकीचे सगळे लेकाचे बिझनेस आणि फर्स्ट क्लासने प्रवास करणारे. प्रशांत भूषण स्वत:चा व्यवसाय आहे म्हणून करतो, कुमार विश्वासचं तर काही बघायलाच नको. परवाच बिझनेस क्लासचं तिकीट तीस शेरांना पडलं म्हणून सांगत आला होता. तिकीट शेरावर विकतात? मला तर काही लाख चंदकिशोर लागतील म्हणून सांगत होता माझा एजंट. म्हणालो, बरं तुम्हाला वजनावर विकतात हे लोक! तशी म्हणाला, अहो ते तसले शेर नव्हेत काही. हे शेर म्हणजे म्हणजे माझ्या कविता. तुम्ही माझ्या कविता ऐका कधी तरी. लोक तिकीट काढून ऐकायला येतात. असतील बापडे. मी कुठल्याही नाटकसिनेमाला थेटरमध्ये गेलो की मला फक्त मध्यंतराचे वेध लागतात. आणि मध्यंतरानंतर "धी एंड" चे. मुशायरे वगैरे असतील तर मी कॉफी फुकट मिळते म्हणून शेवटपर्यंत बसतो. बाकी काही म्हणा हिज्र, मरासिम असले घनघोर उर्दू शब्द ऐकले की दचकायला होतं. कसं काय हो कुणाला हिज्र वगैरे म्हणायचं? कधी कधी मला वाटतं या आमच्या सगळ्या लोकांमध्ये मीच खरा आम आदमी आहे. पण हा कुमार, माणूस बरा आहे मनाने तसा. आता वेळीअवेळी होतात कविता त्याला, तो तरी काय करील? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पण त्यातूनच त्याने त्याचा बिझनेस उभा केला आहे हे लक्षणीय आहे. त्यामुळे बिझनेस क्लासमधून फक्त बिझनेसवाले लोकच जातात असे आजवर वाटायचे. मी तर नुसतं बिझनेस क्लासमधून गेलो. आपले वडाप्रधान तर अक्खा बिझनेस क्लास बरोबर घेऊन जातात. बघावं तेव्हा हे परदेशात. एनआरआय (नॉन रेसिडंट इंडियन) लोकांना आणि आरएनआय (रेसिडंट नॉन इंडियन) लोकांचा परदेशी पैसा परत आणण्यासाठी म्हणून गेले ते स्वतःच एनआरआय होऊन बसले. आता काळा पैसा राहूद्या, तुम्ही तरी आधी परत या अशी मागणी होऊ लागल्याचे ऐकतो. हे म्हणजे आमच्या लहानपणच्या गोष्टीसारखे झाले. माझ्या आत्तेभावाला काही कामासाठी पाठवलं की तो बराच काळ येतच नसे. मग त्याला शोधून परत पिटाळत आणण्याच्या कामगिरीवर माझी नेमणूक होई. निघताना आई सांगे,"उगाच तोंड वर करून वरावरा फिरत बसू नकोस!" मग पुढे आमचे बंधुराज कुणा डोंबाऱ्याचा खेळ पहात उभे असलेले आढळायचे. मग मीही सगळे विसरून त्याच्याबरोबर तो पाहत उभा राहायचो.  पूर्वी बडोदा संस्थानचे राजेसाहेब बाहेरचे पाणी वापरायचे नाही म्हणून हंडेच्या हंडे जहाजावर लादून घेऊन जात असत अशी एक दंतकथा आहे. मोदी ढोकळा अने ठेपला घेऊन जातात की नाही त्याची कल्पना नाही. बहुधा असावेत. मग तो साठा संपला की भारतात यावे लागते. जायला कशाला लागते कुणास ठाऊक. आम्ही नाही स्काईपवर बोलत? आम्ही येतो म्हटले की आमचे परदेशातील कार्यकर्ते ,"अहो कशाला? बीपीओ तत्वावर चालवायचं हे सगळं. खर्च कशाला?" असं म्हणतात. त्यांना काय रात्रीच्या ऑफशोअर कॉल्सची सवय आहे. इथे मला मफलर गुंडाळून रात्रीअपरात्री जागत बसावे लागते.

तेव्हा मंडळी, उगाच बिझनेस क्लासचा बिझनेस करू नका. चांगले मुद्दे असतील तर जरूर भांडा. पण हे अगदीच चीप होते आहे. आपण वर सरकारी विमानातून हिंडायचे आणि खाली कुणी स्वत:च्या पैशाने टॅक्सीतून हिंडले तरी बोंब ठोकायची असा हा प्रकार आहे. कधी नाही ते आम्हाला कुठे तरी कसला तरी मान मिळत होता. आता सन्मान करायला बोलावल्यावर प्रमुख पाहुण्याला काय यष्टीतून या असे सांगणार? यथोचित सन्मानानेच बोलावणार ना? पब्लिकचा (पक्षी:पक्षाचा)पैसा वापरून जायचे असेल तर आम्हाला लोकल अथवा पॅसेंजरनेच प्रवास करावा लागतो, किंबहुना आम्ही तो करतोच. पब्लिकच्या पैशाची एवढीच चिंता असती तर पर्वा महाराष्ट्रात शपथविधीच्या कार्यक्रमावर असले किती बिझनेस क्लास खर्च झाले असतील हो?

Thursday, December 4, 2014

चड्डीचे रहस्य

अनेक वर्षं उपेक्षित राहिलेल्या संघीय चड्डीला आता चांगले दिवस आले आहेत. इतके दिवस केवळ उत्तम वायूवीजन हा एकमेव प्लस पॉइन्ट म्हणून हे वस्त्र परिधान केलेले पृष्ठभाग आज मंत्रालयात खुर्च्यावर विसावले आहेत हा त्या चड्डीच्या यशाचा देदीप्यमान आलेख पाहण्यासारखा आहे. हे दिवस पाहण्यासाठी या चड्डीने किती खस्ता खाल्ल्या आहेत ते कॉंग्रेसच्या पांढऱ्या टोपीला नाही कळणार. गोणपाटाशी स्पर्धा करणारे कापड, मळखाऊ रंग, पोटाच्या विषुववृत्ताला आवळून धरण्यासाठी तिपदरी दोऱ्याने ओवलेली बटणे, भरभक्कम शिलाई, किमान अर्धा अर्धा किलो शेंगदाणे मावतील असे खिसे, एवंगुणविशिष्ट चड्डी ती. शिबीर असो, रोजची शाखा असो, दसऱ्याचे संचलन असो, चड्डीशिवाय स्वयंसेवक दिसत नाही. तेही बरेच म्हणा. चड्डीशिवाय स्वयंसेवक म्हणजे तुऱ्याशिवाय मोर. फक्त हा मोर पिसारा फुलवून नृत्य करीत नाही. पिसारा फुलवण्याचे काम खळ करते. कॉंग्रेसवाल्यांनी इतकी वर्षे जनतेच्या कमरेचे वस्त्र लुटून नेण्याचे सत्कार्य केले पण संघाच्या चड्डीला हात घालण्याचे धैर्य झाले नाही. संघाच्या शिस्तीप्रमाणे चड्डीची खळही कडक. त्यामुळे सैल लंगोटाच्या कॉंग्रेसला ते शक्यही झाले नसते. पण संघाचा अदृश्य हात मात्र या कॉंग्रेसवाल्यांना सगळीकडे दिसायचा. मुघल सेनेच्या घोड्यांना जसे संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा. प. पू. इंदिराबाईंना तर मान्सून वेळेवर आला नाही तरी त्यात संघाचा कावा दिसायचा. जणू काही संघाने स्वयंसेवक अगदी पार श्रीलंकेच्या आखातात पाठवून आकाशात सेतू उभा करवून घेतला असावा असं त्यांना वाटायचं. मान्सून सोडा, बाथरूममध्ये अचानक पाणी बंद झालं तरी त्यात संघाचा हात असायचा. या हाताचा त्यांनी एवढा धसका घेतला की निवडणुकीचं चिन्हसुद्धा हातच ठरवलं. नशीब, ते "जेवण्या" हाताचं तरी ठेवलं. पुढे हा हात कुठेकुठे मारला गेला, कशाकशात गेला, कशानं बरबटला, कुठे साफ करून घेतला गेला, कुणाकुणाला दाखवला गेला हे सर्व आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हे सगळं ठाऊक असूनही प.पू. माणकोजी महाराजांनी आपल्या प्रवचनात संघाच्या चड्डीचा उल्लेख केला. महाराजांच्या मते मुख्यमंत्रीपदाची अर्हता चड्डीवर अवलंबून होती. ज्याने जास्त वेळ ती टिकवून ठेवली तो खरा. महाराजांची मानसिकता जरा समजून घेतली पाहिजे. ते स्वत: हरू नावाच्या गावातून आले आहेत. जिंकू किंवा मरू असे ते कधीच म्हणत नाहीत. त्यातून कॉंग्रेसमध्ये आयुष्य गेले. कॉंग्रेसमध्ये स्वत:ची स्वत: चड्डी घालणाऱ्याना तिकिटे कधीच मिळत नाहीत. किंबहुना चड्डी घालणाऱ्याला कॉंग्रेसमध्ये काहीच मिळत नाही. चड्डी असो वा नसो, शुभ्र मुगुट मात्र हवा. मग तो गांधी घराण्याची धुणीभांडी करून मिळवलेला का असेना. लांगूलचालन करून मिळवलेल्या तिकीटापेक्षा संघाची चड्डी घालून, देशप्रेम, समाजप्रेम बाळगून खुर्ची मिळाली असेल तर ते बरंच आहे. 

चड्डीची असूया असलेले अनेक आहेत. आमचे ते जाणते राजे, "आपला देश चड्डीवाल्यांच्या हातात देणार आहात काय?" अशी घनगर्जना करून "आपलं तसं काय नाय म्हणा, काय बटणं बिटणं तुटली तर सांगा आपल्याला. भायेरून टीप मारून देऊ. काय म्हंता? शिलाई? न्हाय ओ, भायेरून टीप मारायला कसली शिलाई? फक्त चड्डी सोडून ठेवा. म्हंजे, आमाला टीप मारायला मिशनीवर घ्याला बरी ओ. का हो, आश्लील जालं का?" असं काही तरी म्हणत शेवटी चड्डी धरून राहिले. अर्थात त्यांनी चड्डी धरायचं कारण म्हणजे दुसऱ्या कुणाला ती धरता येऊ नये एवढंच होतं म्हणा. मग सेनावाले बसलेच होते "आमी नाय जा चड्डी घालणार!" असं म्हणत हटून. खरं तर पूर्वी युती अशीच टिकली होती. तुम्ही चड्डी घाला, आम्ही कफनी घालतो. बरी आरामदायक असते कफनी. पण या खेपेला प्रसंगी नागवे बसू, पण चड्डी घालणार नाही अशी व्याघ्रगर्जना करून झाली. मग शिशिर ऋतू आला. झाली पंचाईत? कफनीही नाही आणि चड्डी तर घालायची नाही अशी प्रतिज्ञा. मग चड्डीवाल्यांनाच दया आली ना? बाबारे, आता तरी घाल चड्डी, फ़्रॉस्ट बाईट वाईट असतो बरं, बोटं तुटून पडली तर कळणारसुद्धा नाही असं सांगून झालं तरी हा नाथपंथी वाघ अडून बसला होता. थंडीत व्हायचं तेच झालं. "कासव" झालं अगदी! विरोध "मावळला". मग "आम्हाला चड्डी चढवा" अशी (एकदाची) आज्ञा झाली आणि कासव वाचलं. एकावर एक बारा चड्ड्या चढवल्या तेव्हा कुठं ऊब आली. महाराजांना चड्ड्या चढवल्या जात होत्या तेव्हाही ते कठोर चेहरा करून "खामोश! बघतोस काय? इथं कुणी नागवं उभं आहे का?" असं म्हणत होतेच. तेव्हा, चड्डीमाहात्म्य सगळे ओळखून आहेत.

ज्या चड्डीने खुर्चीत नसताना प्रचंड समाजोपयोगी काम केलं आहे ती अधिकारावर आल्यावर तर नक्कीच काम करेल. नैसर्गिक आपत्ती असो, मानवनिर्मित असो, ही चड्डीच सगळीकडे मदतीसाठी जाते आहे. काश्मीरमध्ये पुराने धुमाकूळ घातला तेव्हा पांढरे टोपीकुमार, झाडूकुमार सगळे आ वासून पाहत असताना संघाचे कार्यकर्ते तिथे पोचून मदत करत होते. बारामतीचे जाणते राजे जेव्हा आपण सेक्युलर असं सांगत संभाजी ब्रिगेडसारखी पिलावळ निर्माण करत होते तेव्हा संघाच्या शाखेत "केवळ राष्ट्रधर्म हा हिंदुधर्म" हे शिकवले जात होते. संघाची चड्डी जो देशाला जननी मानतो अशा सर्व भारतीयांसाठी आहे. अशी चड्डी आदर्श इमारती उभारण्यापेक्षा आदर्श समाज उभा करेल. प्रगतीची कामे करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणे हे तर सरकारचे कर्तव्यच आहे, ते तर होईलच. पण आजवर भारतीय माणसाला अभिमान बाळगण्यासारखे काही नव्हते, स्वाभिमानी जगणे माहीत नव्हते, आपल्या देशाचे काही भले होईल याचा विश्वास नव्हता, तो तरी या चड्डीने मिळवून दिला आहे. होय ना माणकूशेठ? तेव्हा असल्या आंबट ढेकरा देण्यापेक्षा कमी खा, कमी बोला, जास्त काम करा. तुमच्या आजूबाजूचे हवामान तर चांगले राहीलच, शिवाय तुम्हीही निरोगी राहाल.