Saturday, November 19, 2011

पुण्यानुभव

      त्या दिवशी उजाडताच वातावरण ढगाळ होते. घरात अगदी अंधारून आल्यासारखे वाटत होते. अशा मलूल वातावरणात मला बसवत नाही. काही तर करून चैतन्य निर्माण करावेसे वाटते.  दुपारचे दोन वाजले तेव्हा आणखीच अंधारले व गार वारे सुटले. ऑफिसमध्ये मी आणि माझा सहकारी मित्र उगाच खिडकीबाहेर पाहत बसून होतो. मी म्हणालो," बाळासाहेब, काही काही खरं नाही हे! अशा वातावरणात वय उताराला लागल्यासारखे वाटते. असेच बसून राहिलो तर गुढघे-दुखी व्हायची." ते म्हणाले,"काय करायचं तरी काय या हवेत?". कुठूनतरी मला एकदम सुरसुरी आली व म्हणालो,"चला! सिंहगडावर जाऊन गरमागरम भाजी खाण्यासाठी यापेक्षा दुसरी वेळ नाही!" मग यापुढे चर्चा झाली नाही. कृतीत उतरवण्याच्या मागे लागलो. आमच्या मित्रगणात हा एक अलिखित करार आहे. ब्राम्हणाने भोजनाची इच्छा प्रगट केली तर त्यात मोडता घालायचा नाही. बाळासाहेब व माझ्यातील मैत्री अशाच निरोगी क्षुधेमुळे सुदृढ आहे. वाद झालाच तर तो विशिष्ट पदार्थ कोठे जाऊन खायचा या विषयावर होतो. खाण्याचा मूळ ठराव आधीच पारित झालेला असतो. लगेच आम्ही निघालो. बाळासाहेबांचे मानसिक वय शारीरिक वयापेक्षा पाच-दहा वर्षे जास्तच आहे. ते म्हणाले,"अहो, छत्री, रेनकोट काही नाही आपल्याजवळ!" मी म्हणालो,"जाऊ दे हो, भिजू फारतर. किक मारा स्कूटरला!". त्यांनीही मग आग्रह धरला नाही. आता लक्ष्य एकच! गरमागरम भाजी आणि वाफाळणारा चहा! तसेच पावसाला तोंड देत आम्ही तीस किलोमीटरवरती गडावर जाऊन धडकलो.गडावर पाऊस नव्हता. पण गडद धुके होते. वारा सणाणत होता. ती ताजी हवा फुफ्फुसात भरून घेतली आणि लगेच भज्यांची ऑर्डर दिली. आम्ही गडावर हिंडण्याच्या फंदात पडत नाही. तशी थोडीफार माहिती बसल्याबसल्या मिळाली आहे. पश्चिमेच्या सरळसोट कड्यावरून पूर्वी शिवाजी-महाराजांच्या काळात, तानाजी मालुसरे नावाचा इसम अंधारात वर चढून आला म्हणतात. यावरून, त्या काळातही गडावर उत्तम भजी मिळत असत आणि ती खाण्यासाठी लोक वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करीत असत असें अनुमान मी आणि बाळासाहेबांनी काढले आहे. या श्री. मालुसरे यांचा पुतळाही उभा केला आहे हे ऐकून (आम्ही पाहिलेला नाही, इप्सित साध्य झाल्यावर आम्ही गडावर थांबत नाही) आश्चर्य वाटले. गडावरची भजी खाण्यासाठी प्राण पणाला लावण्याच्या त्याच्या धैर्याचे कौतुक म्हणून इथल्या भजीवाल्यांनी वर्गणी काढून हे काम केले असेल असे मत बाळासाहेबांनी व्यक्त केले आणि चौथ्या प्लेटची ऑर्डर दिली. मी आमच्या भजीवाल्याला विचारलेही. त्यालाही फारशी माहिती नसावी. तो म्हणाला ते (श्रीयुत मालुसरे) चढून आल्यावर इथे लढाई झाली. त्यात त्यांनी एका मोगल सरदाराला ठार केले आणि स्वत:ही खलास झाले. त्यानंतर हा गड शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. यापलीकडे तो काही सांगू शकला नाही. पण त्याने सांगितलेली ही माहिती महत्वपूर्ण होती. मालुसरे यांनी नुसते प्राण पणाला लावले नाहीत तर घेतले आणि दिलेही. आणि प्राण देण्या-घेण्याइतपत गडावर भजी चांगली मिळतात हे कानावर आल्यावर छत्रपतींनाही असा गड स्वराज्यात असावा अशी इच्छा होणे स्वाभाविक होते. त्यांनी गडावर भजी खाल्ल्याचा काही पुरावा आहे का याची चौकशी भारतीय इतिहास संशोधन मंडळात करायला हवी. उत्तम भजी केल्याबद्दल एखाद्याला आसपासचे गाव इनाम वगैरे मिळाले असण्याची शक्यता आहे. किंवा, "बाळकोबा वरसगांवकर पाटील याणे बहुत थंड भजी दिधली. त्यांस जरब देणे. उपरांत ऐशी हेळसांड जाहल्यास इनाम जप्त करणे." असेही किल्लेदाराला लिहिले गेले असण्याची शक्यता आहे. भा.इ.सं.मं. इकडे लक्ष घालील काय?

       इतिहासात मला गम्य नाही. शाळेत असतानासुद्धा पस्तीस मार्कांना साजेल एवढेच गम्य होते. तो इतिहास अगदीच रुक्ष होता. लढायांच्या सनांनी आणि थोर पुरुषांच्या जन्मतारखांनी भरलेला तो इतिहास जरा "चविष्ट" असता तर माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यात रस घेतला असता. सर्व सन, तारखा, "कोण कुणाला कधी म्हणाले" वगैरे सर्व बरोबर लक्षात राहिले असते. नारायणराव पेशव्यांचा खून इब्राहीम गारद्याने (चू. भू. देणे घेणे) रघुनाथराव दादांच्या हुकुमावरून केला हे माझ्या लक्षात राहिले कारण त्यावेळी नारायणरावांनी साखरभात खाल्ला होता याची नोंद आहे म्हणून! सोन्यासारखा साखरभात पेशव्यांनी पचवायच्या आधीच त्यांचा खून करणाऱ्या इब्राहीम गारद्याबद्दल मला जरा आकसच आहे.  पहिला व दुसरा बाजीराव अनुक्रमे कच्ची कणसे आणि मोतीचुराचे लाडू यांच्यामुळे लक्षात राहिले. दुसऱ्या बाजीरावाने चांगल्या मोतीचूर लाडवांच्या पंक्ती उठवल्या हे कौतुकाने छापायचे सोडून 'खवय्येगिरीने पेशवाई बुडविली" अशी इतिहासकारांनी टीका केली हे मला मुळीच आवडले नाही. माधवराव पेशवेही काही कमी दर्दी नव्हते. मिरजेहून खास रोज येणाऱ्या कृष्णेकाठच्या वांग्यांची भाजी त्यांना नेहेमी लागे. बाकी पेशवाईतील पंगतींच्या थाटाच्या वर्णन वाचल्यामुळे पेशवाई आवडू लागली हे खरे. ते सव्वा हात लांब केळीचे पान, चार कोशिंबिरी, सहा भाज्या, खिरी, रायते यांनी डाव्याउजव्या बाजू गच्च भरलेल्या, पाच पक्वान्ने, मसाले भात, साखरभात, केशराचे पाणी... हे सगळं टिकवण्यासाठीतरी पेशवाई टिकायला हवी होती असे मला वाटते. परंतु बाळाजीपंत नातू या भरल्या पंगतीतून उठून संगमावर आळूपिष्टण साहेबाकडे गोमय खाण्यासाठी गेले आणि या वैभवाला ओहोटी लागली. तात्पर्य, इतिहासाच्या पुस्तककाराला  अशा चांगल्याचुंगल्या गोष्टी घालून इतिहास खमंग आणि चमचमीत करण्याची भरपूर संधी होती. शिवाजी महाराजांच्या बारशाला, लग्नाला (तीही तीन तीन लग्ने!) पंगती उठवता आल्या असत्या. त्यांच्या जन्माचीच काय, बारशाची तिथीही मुलांच्या लक्षात राहिली असती. अफझलखान वधाच्या प्रसंगात खान एखादी मेजवानी आयोजित करून दिल्लीराइसमधील शुद्ध तुपातील हैदराबादी बिर्याणी महाराजांना नजर करतो असे दाखवले असते तर,  त्या बिर्याणीचा समाचार घेणाऱ्यांची नावेही लक्षात राहिली असती. सय्यद बंदाचा हात कलम करणारा यापेक्षा निम्मी बिर्याणी खातं करणारा जिऊ महाला नक्कीच लक्षात राहिला असता. आमच्या या विचारसरणीवर शिक्षणमंडळ अभ्यास करील काय?

       भज्यांची सहावी प्लेट संपल्यावर आम्ही उठलो. खाणे संपल्यामुळे शरीराने आता धुके आणि वारा यांची नोंद घ्यायला सुरुवात केली होती. पण आम्हाला अगदी उल्हसित वाटत होते. हीच तर या भज्यांची महती. मनसे सिंहगडावर जातात आणि काय केले म्हणून विचारले तर सांगतात, देव-टाके, घोड्यांची पागा, दारूखाना, मालुसरे यांचा पुतळा, ते चढून आलेला कडा हे सर्व पाहिले. या सर्वांहून श्रेष्ठ अशी भजी लोक विसरतात याचे मला दु:ख होते.

      आम्ही भरपूर हिंडून पुण्यातील शेलकी स्थाने पक्की केली आहेत. कधीतरी अचानक कुणाला विशिष्ट पदार्थ खाण्याची लहर येते, मग अशा वेळी आम्ही काळ, वेळ आणि अंतर पाहत नाही. तो पदार्थ सर्वात चांगला जिथे मिळतो तिथेच जायचे. पुण्यातील या जुन्या दुकानांच्या खोड्याही काही कमी नाहीत. प्रत्येक दुकानाचे स्वतंत्र नियम आणि वेळा. काहींचे ठराविक वार, तर काहींचे ठराविक पदार्थाचा मोजकाच साठा करायचे नियम. या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. बुधवारी जर एखाद्याचा प्राण बेडेकर मिसळी-साठी तडफडत असेल, तर तो जाणेच योग्य. कारण बुधवारी बेडेकर स्वत:वर जरी अशी वेळ आली तरी दुकान उघडणार नाहीत. "श्रीकृष्ण" मध्ये जावे तर तिथे साडे-अकरालाच टाळे लागलेले. तिथून "श्री" मध्ये जावे तर रांगेत उभे राहून प्राण जाणार. तसे "रामेश्वर" उघडे असते पण, त्यासाठी "आत्मदाह " करून घेण्याची तयारी हवी. अनुभवी पुणेरी बुधवारी मिसळीची भूक लागू देत नाही. इडली डोसा असे सात्विक पदार्थ खायचे असतील तर "वाडेश्वर" मध्ये जावे. परंतु सकाळी अकराच्या आत. किंवा संध्याकाळी साडेपाच नंतर. शिवाय संध्याकाळी डोसा मिळत नाही, कारण मालकच जाणोत. अडीअडचणीला उपयोगी पडणारा पदार्थ म्हणजे उत्तप्पा. त्यासाठी "कल्पना"त जावे. टिळक रोड पार केला की लांब धूर दिसू लागतो. ते "कल्पना". हा धूर कोळशाच्या शेगडीचा वगैरे असावा अशी कल्पना कराल तर ती चुकीची आहे. पुण्यातील समस्त धुराडी येथे वर्णी लावतात. दिवसभर सिगारेटचे अग्निहोत्र चालू असते. पण इथल्या उत्तप्प्याची चव दुसरीकडे नाही. मी स्वत: इथला तहहयात सदस्य आहे. शेजारी "विश्व". सकाळी पर्वतीवरून येताना इथे उपमा खावा. हा सकाळी साडेसातपर्यंत सुंदर लागतो. आजूबाजूला पर्वतीवर चकाट्या पिटून आलेले पेन्शनर कवळ्या वाजवीत असतात. त्यांच्या कुचाळक्या ऐकत उपम्याची गोडी अवीट असते. पदार्थ खाताना आजूबाजूचे वातावरणही त्याच्या चवीत फरक पाडते. "एक बिगर बटाटा मिसळ, आणि एक बटाटेवडा!", "अण्णा, पातळ भाजी आणा!", "एक मिसळ, दोन स्लाईस, नऊ पन्नास!" असल्या आरोळ्यामध्ये मिसळीला जी चव येते ती पंच-तारांकित हाटेलात नाही येणार. तिथे मंद पाश्चात्य संगीताच्या सुरावटीत "येस सर, शुअर सर, एनी मोर सर? एनी डेझर्ट सर?" असले प्रश्न ऐकून घास घशाखाली उतरणार नाही. हे पदार्थ असल्या "कंठलंगोट" संस्कृतीत नांदणारे नाहीत.

      भेळ खायची असेल तर संध्याकाळी पाचपर्यंत थांबावे लागेल. ती खावी मात्र दाढीवाल्याकडे. तसे पहाटेपासून रात्री अकरापर्यंत केव्हाही भेळ मिळण्याचे ठिकाणही पुण्यात आहे - दरबार. पंजाबी डिशेस आणि भेळ यासाठी प्रसिद्ध असलेले हे हॉटेल चक्क उडप्याचे आहे आणि तिथे नावालाही इडली-डोसा नसतो. उपवास असेल तर साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी "जनसेवा"त जावे. गुजराती थाळी हवीच असेल तर "चेतना" मध्ये जावे. ढोकळ्यासाठी मात्र थेट लष्कर गाठावे लागते. तिथे गाडीवर उत्तम ढोकळा त्यावर टोमाटो सूप, खोबरे कोथिंबीर आणि बारीक शेव असा नटून येतो. हा ढोकळा खाऊन निघावे तर समोर "मार्जोरीन" दिसते. तिथली सेन्डविचेस खाल्ल्याशिवाय गती नाही. गेल्या कित्त्येक वर्षात या सेन्डविचेसची चव जराही बदललेली नाही! आता पोट अगदी गरगरीत झाले असेल. त्यावर उतारा म्हणून तडक स्टेशन वर येऊन "शिवकैलास"मधील बासुन्दीतील आईस्क्रीम खावे. किवा वाडिया कॉलेजच्या मागे मंगलदास रस्त्यावरचा अस्सल सीताफळांचा शेक प्यावा.

      चावट खाणेही पुण्यात भरपूर आहे. विश्रामबाग वाड्यासमोर उत्कृष्ट बटाटा भजी मिळतात. पुणे मुंबई नेहेमी प्रवास करणाऱ्यांना शिवाजी-नगर स्टेशनच्या बाहेर मिळणारी "झटका" भेळ कशी असते ते विचारून पहा.  वेस्ट एंड थियेटरच्या मागील रस्त्यावर बारा महिने उकडलेल्या शेंगा मिळतात. त्या खाल्ल्यावर तोंड इतके खवळते की त्या पुन्हा घेतल्या जातात. बोरावकेचा चिकन रोल म्याकडोनाल्डच्या तोंडात मारेल असा असतो.

    मांसाहारी जिभेलाही पुण्याने सांभाळले आहे व वळणही लावले आहे. 'गुडलक', 'दोराबजी', 'दुर्गा', 'आसरा' या सर्वांनी तो विभाग सांभाळला आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी हा प्रांत दोराबजीचा.  चिकन मसाला दुर्गा किंवा आसराचा. खिमा 'गुडलक 'चा. 'गुडलक ' ची जेली विथ क्रीम पाहूनच गारगार वाटते. पुण्यात तरी दुसरीकडे तशी मिळणार नाही. शीग कबाब साठी साधू वासवानी चौकात जावे. संध्याकाळी सहानंतर तिथे फुटपाथवर एक इसम लाजवाब शीग कबाब देतो. वास्तविक ज्याने आयुष्यभर शाकाहाराचा प्रचार केला त्याच्याच नावाच्या चौकामध्ये ही वस्तू मिळावी हे दुर्दैव! परंतु पुण्याचे हे वैशिष्ट्य आहे.  'गोपाळ कृष्ण हॉल' मध्ये वर्षभर चड्ड्या, बनियन व टॉवेलचा सेल असतो. ज्यांनी पेशवाई काही काळ तोलून धरली त्या नाना फडणीसांच्या वाड्यात मयताचे पास मिळतात.

   उभ्या पुण्याला अभिमान वाटावा असा पदार्थ म्हणजे प्याटीस. हा पदार्थ फक्त रविवारी सकाळी चहा आणि "रविवार सकाळ" यांच्याबरोबरच चांगला लागतो. किंबहुना तो तसाच खायचा असतो. उत्तम प्याटीस 'पूना बेकरी' आणि 'संतोष' मध्ये मिळतो. पण त्यांचे वार आणि वेळा ठरलेल्या आहेत. वेळापत्रक माहीत असल्याशिवाय पुण्यात काहीही मिळणे अशक्य आहे.

   पण हल्ली पूर्वीचं पुणं राहिलं नाही. पावभाजी, कच्छी-दाबेली (या नावाचाही मला तिटकारा येतो) असले चंगीभंगी, आगापिछा नसलेले पदार्थ पुण्यात शिरले आहेत. त्यातील वडापाव या प्रकाराने सर्वत्र हातपाय पसरले आहेत. तसा हा प्रकार स्वस्त म्हणून कनिष्ठ वर्गातच जास्त प्रिय आहे. पण पावभाजी हा उच्चभ्रू लोकांच्याही आवडीचा प्रकार झाला आहे. या पदार्थांना कोणताही सांस्कृतिक वारसा नाही, परंपरा नाही, तपश्चर्या तर नाहीच नाही. बेडेकरांच्या मिसळीच्या पातळ भाजीला सहजासहज चव आलेली नाही. प्रभा विश्रांतीगृहाच्या कचोरीचे पुरण कोणीही करून दाखवावे. उपाशी विठोबावाल्या साठ्यांसारखी पुरणपोळी करणे येरागबाळ्याचे काम नव्हे. ही पुरणपोळी तोंडात विरघळते. वर्षानुवर्षांची साधना त्या चवीतून कळते. ती सांगावी लागत नाही. म्हणूनच मी माझ्या जुन्या निष्ठा कायम ठेवल्या आहेत. कालौघामध्ये पुण्यातील हे दैवी पदार्थ कदाचित वाहूनही जातील. पण आमचे इमान तसेच अढळ राहील!

-मंदार वाडेकर
२७ जानेवारी १९९५